ठाण्यातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |


 


ठाणे : केवळ खरीप हंगामात भात, नागली पिकणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादनही वाढावे व त्यातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन अभियानाचा उपक्रम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे यातून खरीप तसेच रब्बी हंगामातही विविध भाजीपाला शेतकऱ्यांच्या गटांना घेता येईल. वाहते नदी-नाले, आढे, झरे, विहिरी, शेततळे, वगैरे थोडेफार सिंचन सुविधा असणारी ठिकाणे शोधून शेतकऱ्यांचे पिकनिहाय गट स्थापन करण्यात येतील व अल्प मुदतीचा भाजीपाला घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल बनसोडे यांनी दिली.

 

निर्यातक्षम भाजीपाला पिकवणार

 

या योजनेतून शेतकरी गटांना – समुहांना प्रशिक्षणे, प्रात्याक्षिके, मेळावे, शेतीशाळा, कॉर्नर सभा, प्रक्षेत्रे भेटी इत्यादी माध्यमातुन भाजीपाला लागवडींच्या सुधारीत व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे. निर्यातक्षम व उच्च गुणवत्तेचा भाजीपाला उत्पादन घेणे त्यासाठी जमीन तयार करणे, माती-पाणी तपासणी, जमीनीची मशागत, पेरणी, सेंद्रिय व रासायनिक खत व्यवस्थापन, पिक संरक्षण व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन,काढणी व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन, पॅकिंग व्यवस्थापन, वाहतुक व्यवस्थापन, मार्केट व्यवस्थापन, रेकॉर्ड ठेवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

औजारे उपलब्ध करून देणार

 

शेतकरी, शेतमजुर, शेतकरी गटांना, समुहांना, बचतगटांना अनुदानाने सुधारीत बियाणे, खते, किटकनाशके, सुधारीत औजारे, पिक संरक्षण औजारे, सिंचन साहित्य व यंत्रे इत्यादी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

 

शेतकऱ्यांना शाश्वत व भक्कम उत्पन्न

 

या अभियानामुळे रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतीसाठी थोडयाफार प्रमाणात सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी अल्प काळात येणारी भाजीपाल्यासारखी पिके घेणे फायद्याचे ठरणार आहे. भाजीपाला पिकाचे उत्पादन लागवड केल्यापासुन दोन ते तीन महिन्यात सुरु होते. तुलनेत सद्या जिल्हयात साधारणपणे ४२०० हेक्टरवर भाजीपाला (प्रामुख्याने भेंडी) पिक घेतले जाते. हे क्षेत्र वाढण्यास वाव असुन शिस्तबध्द नियोजन केल्यास ते १२६५२ हेक्टर पर्यंत वाढु शकते. या योजनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा शाश्वत व भक्कम स्त्रोत निर्माण होणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला.

 

अशी करणार अंमलबजावणी

 

निर्यातक्षम भाजीपाला अभियानाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली सहनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 

लाभार्थी असे असतील

 

गटातील शेतकऱ्याकडे १० गुंठयापेक्षा जास्त शेतीचे क्षेत्र असलेले आणि सिंचन सुविधा उपलबध असलेल्या ठिकाणचे पिकनिहाय शेतकरी,शेतमजुर, शेतकऱ्यांचे गट, समुह, महिलांचे बचतगट या योजनेत पात्र असतील. तसेच शेतकरी गट, शेतकरी समुह, बचतगट हे नोंदणीकृत असावेत. त्यांची नोंदणी प्रकल्प संचालक, आत्मा, प्रकल्प संचालक, डीआरडीए, महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण जिवनन्नोती अभियान यापैकी एकाकडे असणे आवश्यक.

 

अशी करता येईल नोंदणी

 

योजनेमध्ये शेतकरी गट-समुह, बचतगट स्थापन केल्यानंतर त्यांच्या नोंदणी आत्मा, डीआरडीए, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण जिवनन्नोती अभियान यापैकी कोणत्याही एका यंत्रणेकडे करता येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@