शिवसेनेला रामराया तारणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |



 
 
 
खिशातल्या राजीनाम्यामुळे थट्टेचा विषय झालेल्या शिवसेनेला रामरायामुळे आज किमान आक्रमकतेचा आव तरी आणता आला आहे. सेनेच्या मतदाराला सुखावणारा हा आक्रमकतेचा आव सेनेला पुढच्या निवडणुकीपर्यंत तारून नेईल, यात काही शंका नाही.
 

वारसाहक्काने शिवसेना अध्यक्ष झालेल्या उद्धव ठाकरेंचे अयोध्या नगरीत सहकुटुंब सहपरिवार जोरदार स्वागत झाले. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची अशी आगतस्वागत करण्याची पद्धत ही आता ‘ओपन सिक्रेट’ झाली आहे. आपलीच फौज आधी पाठवून विमानतळावर जल्लोष वगैरे घडवून आणायचा आणि उत्स्फूर्तपणावर आपल्या मुखपत्रात सनई-चौघडे वाजवायचे, हे हाताशी मुखपत्र असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षांना संभव असते. शिवसेना यात वेगळी उठून दिसते, ती हाती घेतलेल्या भगव्यामुळे. म्हणजे वर उल्लेखलेले सगळे केले तरीसुद्धा शिवसेना भगव्यामुळे हिंदूंच्या हृदयात स्थान टिकवून असते. शिवसेना आता राम मंदिराच्या विषयात उतरली आहे. अचूक टायमिंग म्हणजे काय ते खरोखरच शिवसेनेकडून शिकावं. एखाद्या कसलेल्या कलाकाराच्या अचूक टायमिंग हेरण्याच्या पद्धतीमुळे ठाकरे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. राम मंदिर ही काही भाजप किंवा संघ परिवाराची खाजगी मिळकत नाही. ते मिळाल्याने पक्षात किंवा सत्तेत कायम स्वरूपाचे पदही मिळत नाही. राम मंदिर हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. नव्वदीच्या दशकात संघ परिवाराने संतमहंतांना सोबत घेऊन हा मुद्दा चर्चास्थानी आणला. पण, त्यापूर्वीही रामजन्मभूमीसाठी हिंदू लढल्याचे पुरावे आहेत. रामजन्मभूमी, भगवान राम हे जसे पुराण कथातून सापडतात, तसेच ते आपल्या इतिहासाचाही भाग असल्याची हिंदूंची भावना आहे. या सगळ्या प्रकरणाला जसा इतिहास आहे तसाच इतिहास शिवसेनेलाही आहे.

 
बाबरी ढाचा पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी अत्यंत आक्रमकपणे, “ज्यांनी बाबरी पाडली, ते जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे,” असे विधान केले होते. या एका रोखठोक विधानाचा मग जो काही फायदा मिळायचा तो शिवसेनेला उत्तम मिळाला. यात काही गैर आहे, असे मानण्याचेही कारण नाही. राजकीयदृष्ट्या अत्यंत अल्पजीवी असलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची लोकप्रियता घटतच होती. मुस्लीम लांगूलचालनाच्या विरोधात देशभरात जो काही रोष होता, तो रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत होता. अन्य राजकीय पक्षांनी जी ऐतिहासिक चूक केली, ती चूक न करण्याचा शहाणपणा बाळासाहेब ठाकरेंनी दाखवला आणि त्याचा त्यांना उत्तम राजकीय लाभ मिळाला. संघ परिवार त्यावेळी व आजही या सगळ्याच आंदोलनाला आपल्या बापजाद्यांची खाजगी मिळकत मानत नव्हता, आजही मानत नाही. जे जे आले ते ते या प्रवाहात सामावून गेले. पुढे जेव्हा शिवसेना एनडीएत राहूनही काँग्रेसशी साटेलोटे करीत होती, तेव्हा राम मंदिराच्या बाबतीतही शिवसेनाप्रमुखांनी आपल्या भूमिका बदलल्या होत्या. एका राजकीय पक्षाने आपल्या राजकीय अस्तित्वासाठी असंगाशी संग करणे नवे नाही. किंबहुना, लोकही याकडे आता फारसे गांभीर्याने पाहात नाहीत. मात्र, राम मंदिराऐवजी तिथे एक हॉस्पिटल बांधावे, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. संजय राऊतही राम मंदिराच्या बाबातीत अशाच भूमिका बदलत राहिले आहेत. आताही ठाकरे नावाच्या सिनेमाचे प्रमोशन जोरात सुरू आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शिवसेना शैलीत एक तरुण बाळासाहेबांच्या बिरुदावल्यांचा जयघोष करतो. मात्र, त्यातून 'हिंदुहृदयसम्राट' हे खुद्द बाळासाहेबांचे आवडते विशेषण वगळण्यात आले आहे. त्यामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.
 

ज्या अभिनिवेशात शिवसेना आज रामजन्मभूमी विषयात उतरली आहे, त्याला राम मंदिर बांधण्याच्या पवित्र भावनेपेक्षा मोदीद्वेषाचा उग्र दर्प आहे. हा दर्प इतका घाणेरडा आहे की, खुद्द अयोध्येसारख्या पवित्र नगरीत पोहोचूनही तो सेनेला दडविता आलेला नाही. ‘कदाचित सरकार बनणार नाही, पण राम मंदिर नक्की बनेल,’ हा उद्धव ठाकरेंचा दावा मंदिर बांधण्यासाठी पूरक आहे की, सरकार पाडण्यासाठी, ते कदाचित तेच सांगू शकतील. ज्या भाजपवर ते आता ताशेरे ओढत आहेत, त्याच भाजपच्या कल्याणसिंगांनी राजीनामा देईन, पण कारसेवकांवर गोळ्या चालविणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. ‘राजीनामा’ या विषयावर शिवसेना गेली चार वर्षे थट्टेचा विषय होऊन बसली आहे. शिवसेनेच्या आंदोलनामुळे राम मंदिर बांधले जाईल का? शिवसेना म्हणते म्हणून मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढला जाईल का? खरे तर या प्रश्नांना काहीच अर्थ नाही. कुणाच्या प्रयत्नांनी का होईना, जर तिथे भव्य मंदिर उभे राहिले तर हिंदूंना हवेच आहे. अयोध्येत न पोहोचलेल्या हिंदूंनाही तिथे मंदिर हवे आहे. पण, राजकीय फायदे पाहून देवदर्शन करणाऱ्यांना यातही संधी दिसत असते. असेच एक घराण्याचे वारस पलीकडे देवदर्शन करीत फिरत आहेत. आपला सेक्युलर बुरखा सोडून उद्या तेही अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी अवतरले तर त्याचे नवल वाटायला नको. उद्धव ठाकरेंचे जसे जंगी स्वागत झाले, तसे राहुल गांधींचेही होऊ शकते. मुद्दा कोंबड्यांचा नाही मुद्दा सूर्य उगविण्याचा आहे.

 

राम मंदिराच्या बाबतीत जसा फायदा भाजपला झाला तसा तो शिवसेनेला यापुढेही मिळणार आहे. शिवसेनेचा स्वत:चा एक मतदार आहे. मोदीलाटेच्या झंझावातातसुद्धा उद्धव ठाकरेंनी आपले ६३ आमदार निवडून आणले ते याच बळावर. आता या मतदारांना एक आक्रमक शिवसेना पाहण्याची सवय झाली आहे. किंबहुना, ती त्यांची भावनिक गरज आहे. रामजन्मभूमीच्या विषयावरून शिवसेना जी काही आक्रमक झाली आहे ती या मतदाराला खुश करणारी आहे. सत्तेत राहून, राजीनाम्याची भाषा करून, बाहेर पडण्याची धमकी देऊनही सत्तेच्या खुर्चीला चिटकून बसलेली शिवसेना लाचार भासते. महाराष्ट्राच्या विधानसभेतले विरोधकही भर सभागृहात शिवसेनेची या विषयावर टेर खेचायला मागेपुढे पाहात नाही. आक्रमकतेचा हा आव आणि शिवसेनेचा तो बनाव अशाप्रकारे रामराय शिवसेनेला नक्की तारेल. एवढ्या भांडवलावर २०१९ ची निवडणूक तर नक्कीच निघून जाईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@