क्रांतिकारी विचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |



 
 
 
पारमार्थिक कार्याच्या शिस्तीबरोबर प्रापंचिक, व्यावहारिक शिस्तीचे धडे रामदासांनी महंतांना दिले असतील. तथापि हे क्रांतिकारी विचार, समर्थांची निवेदनशैली ग्रंथबद्ध झाली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
 

रामदास स्वामींच्या साहित्याची समकालीन शिष्यांनी आणि आधुनिक काळातील विद्वानांनी बरीच चिकित्सा केली आहे. तरी समर्थांचे क्रांतिकारी विचार स्पष्टपणे, सलगपणे मांडले गेले नाहीत. पारमार्थिक विचारांबरोबर प्रपंच नेटका होण्यासाठी जी कार्यपद्धती समर्थांनी त्याकाळी सांगितली, तिची दखल रामदासी संप्रदायातील पुढील शिष्यांनी तर घेतली नाही, पण आधुनिक टीकाकारांनी त्यांच्या प्रपंच विज्ञान व राजकारण स्वरूप कार्याचा गौरव न करता रामदासांच्या माथी जातीयतेचे खापर फोडून त्यांच्या क्रांतिकारी विचारधारेपासून रामदासांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे रामदासांच्या दासबोध ग्रंथात संघटनाचातुर्य, प्रयत्नवाद, ऐहिकाची गरज, तर्कशुद्ध विचार करण्याची महती, महाराष्ट्रधर्म, बुद्धिनिष्ठा या नव्या क्रांतिकारी विचारांना फारच थोडी जागा दिलेली आढळते. संपूर्ण दासबोधात शिष्यांसाठी नवविधा भक्ती, आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक असे त्रिविध ताप, मोक्ष, पुरुषप्रकृती, त्रिगुण, मायाब्रह्म निरूपण, वैराग्य लक्षण इत्यादी पारमार्थिक सिद्धांतांचे यथार्थ वर्णन आढळते. तथापि, परमार्थातील ‘निवृत्तीवाद,’ ‘विश्वकुटुंब’ हे सिद्धांत ऐहिकात घुसल्याने समाजात निष्क्रियता निर्माण झाली होती. दैववादाने लोक हतबल झाले होते. समर्थांनी संघटना निर्माण केली, हिंदू संस्कृती रक्षणाची शिकवण दिली. राष्ट्रप्रेमाचा उपदेश केला. या ऐतिहासिक, क्रांतिकारी विचारांना दासबोधात फार थोडे स्थान दिले गेले आहे.

 

त्याकाळी आपल्या वाणीने आणि कृतीने समर्थांनी जनमताचा ओघ योग्य दिशेने वळवला. त्यासाठी संघटना स्थापन करून हिंदुस्थानभर मठस्थापना केली. त्या मठातील महंतांसाठी समर्थांनी आपले क्रांतिकारी विचार त्यावेळी सांगितले असतील. निवृत्तीवाद व दैववाद हाडीमासी खिळलेल्या समाजाचे मन कसे वळवायचे व त्यांना कसे कार्यप्रवृत्त करायचे, हे समर्थांनी त्यावेळी मठाधिपतींना सांगितले असेल. स्थानिक मठाधिपती नेमताना अथवा महंत तेथे पाठवताना त्यांना समर्थांनी या क्रांतिकारी विचारांचा उपदेश केला असेल. त्या विवेचनात पारमार्थिक कार्याच्या शिस्तीबरोबर प्रापंचिक, व्यावहारिक शिस्तीचे धडे रामदासांनी महंतांना दिले असतील. तथापि हे क्रांतिकारी विचार, समर्थांची निवेदनशैली ग्रंथबद्ध झाली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

 

परकीय आक्रमकांशी झुंज देऊन आपल्या लोकांना त्या विरुद्ध संघटित करण्याचे कार्य ‘शिव-समर्थ’ काळात निश्चितच झाले होते. आपल्या समाजव्यवस्थेतील दोष नाहीसे करून त्याबरोबर अनेक वर्षांपासून समाजात पसरलेले दौर्बल्य होते, ते नाहीसे करून समाजाची पुनर्बांधणी करणे हे अत्यंत कठीण काम आहे. ते काम शिवाजी महाराज व रामदासांनी केले. शिवाजी महाराज हे केवळ धाडसी सेनांनी, मुत्सद्दी राजकारणी होते असे नव्हे, तर त्याचबरोबर ते थोर तत्त्ववेत्ते आणि विचारवंत होते. समाजातील दोष दूर करून त्याला पुनर्घटित करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होते. जुन्या धर्मकल्पना, जुन्या रूढी-परंपरा मोडीत काढून शूर, देशप्रेमी, सुसंस्कारी, स्वधर्मनिष्ठ समाज त्यांना निर्माण करायचा होता. रामदासांचेही कार्य याच प्रकारचे होते. परमार्थातील तत्त्वे परमार्थात श्रेष्ठ असतात, याविषयी दुमत नाही. पण ती तत्त्वे जशीच्या तशी ऐहिकात शिरल्याने समाजाचे मोठे नुकसान होत होते, हे रामदासांच्या लक्षात आले. ऐहिक जीवनाबाबत उदासीनता पसरली होती. याची जाणीव देशभ्रमंतीच्या काळात रामदासांना तीव्रतेने झाली. शिवाजी व रामदास दोघेही क्रांतिकारी विचारांचे होते. तत्कालीन रूढी-परंपरा घट्ट झालेल्या प्रवाहाविरुद्ध जाऊन समाजाला प्रगतिशील विचार देण्याचा दोघेही प्रयत्न करीत होते. तथापि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांचे क्रांतिकारी विचार शब्दबद्ध झाले नाहीत, ग्रंथबद्ध झाले नाहीत. आज त्यांच्या कर्तृत्वातून ते समजून घ्यावे लागतात. त्यांनी वारंवार केलेली निवेदने, भाषणे, प्रवचने तत्कालीन समाजाला प्रेरक ठरली असली तरी, पुढील पिढ्यांसाठी ती ग्रंथांतून सांभाळली गेली नाहीत. आपल्या शत्रूला डावपेचाने हवे त्या ठिकाणी आणून त्याचा पराभव करण्याचे कसब थोरले बाजीराव यांच्या ठिकाणी होते. त्यामुळे सर्व लढाया ते जिंकले. पण, त्यांचे हे युद्धतंत्र पुढील पिढीसाठी ग्रंथबद्ध झाले नाही. त्यांची युद्धनीती त्यांच्याबरोबरच गेली. ती ग्रंथरुपात जतन केली गेली असती, तर पुढील पिढ्यांना कदाचित मार्गदर्शक ठरली असती.

 

जुन्या रूढी-परंपरा नाहीशा करून लोकमताचा ओघ क्रांतिकारी तत्त्वज्ञानाकडे वळवण्याचे सामर्थ्य समर्थांच्या ठिकाणी होते. त्यासाठी समर्थांनी अथक प्रयत्न केले. बलसाधना व बळाचा विवेकपूर्ण वापर करण्याचे ज्ञान समाजाला दिले. स्वामीनिष्ठ, शूरवीर तयार करून हिंदू संस्कृतीरक्षणार्थ जागोजागी मठस्थापना करून तेथे त्यांना पाठवले. तर्कशुद्ध विचार करण्याची विवेकी बुद्धी सांगून त्या महंतांना धर्मरक्षण व राष्ट्रप्रेम शिकवले. तथापि समर्थांच्या नंतर त्या प्रेरणा संप्रदायातील शिष्यांच्या ठिकाणी प्रस्फुरित झाल्या नाहीत. समर्थांच्या समकालीन शिष्यांनी, भक्तांनी समर्थांवर, त्यांच्या दासबोध ग्रंथावर आरत्या, धावे लिहिले आहेत. ते वाचताना त्यांनी ज्या समर्थकार्याचा व दासबोध तत्त्वज्ञानाचा उल्लेख केला आहे, तो पूर्णत: एकांगी आहे असे वाटते. या आरत्यांतून समर्थांनी भवसागरातून तरून नेले. ‘चौऱ्यांशी’चा फेरा चुकवला, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून दूर करून मोक्षपद दिले. नवविधा भक्ती सांगितली. बद्धांचे सिद्ध झाले. शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती, ज्ञान, वैराग्य या सार्‍या गोष्टी मिळाल्या. त्यामुळे पूजा, अर्चा, आरत्या यापुरते समर्थांचे कार्य सीमित झाले. समर्थांनी क्षात्रधर्माचे उद्दिपन केले. पडत्या काळात हिंदू संस्कृतीरक्षणाचे कार्य केले. संघटना तयार करून महंतांना जागोजागी पाठवून हिंदवी स्वराज्याच्या राष्ट्रीय कार्यास मदत केली. हिंदुस्थान बलशाली (हिंदुस्थान बळावले।) झाल्याची घोषणा केली. महाराष्ट्र धर्म सांगितला. दिल्लीच्या सम्राटाची तमा न बाळगता, ‘बुडाला औरंग्या पापी । म्लेंछ संहार जाहला ॥’ हे स्वप्न लोकांसमोर ठेवले. या त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा, राष्ट्रीय तत्त्वज्ञानाचा चुकून एका शब्दानेही आरत्यांतून उल्लेख आढळत नाही. आरती ही दैवताची केलेली स्तुती असते. समर्थांच्या राष्ट्रीय कार्याचा एका शब्दानेही उल्लेख न करता, त्यांची स्तुती कशी होऊ शकते? समर्थांची शिकवण इतर संतांपेक्षा निश्चितच वेगळी होती. जुन्या रूढी-परंपरा मोडून विवेकाने लोकमत बदलून त्यांना हिंदू संस्कृतीरक्षणाकडे वळवायचे, संत (सज्जन) प्रवृत्तीकडे नेण्याचे प्रयत्न समर्थांनी केले. त्यासाठी त्यांना ‘क्रांतिकारक’ म्हटलेले त्यांच्या आजच्या शिष्यांनाही मानवणार नाही. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांच्या पारमार्थिक प्रसारापेक्षा रामदासांचे जीवितकार्य वेगळे होते, असे कोणी म्हटले तर सांप्रदायिक शिष्यमंडळी ते अजिबात स्वीकारणार नाहीत. इतर संतांपेक्षा रामदास वेगळे होते, असे म्हणणे ते खपवून घेणार नाहीत. समर्थांचे हे क्रांतिकारी विचार शोधायचे, तर प्रतापगडच्या भवानीचे स्तोत्र, संभाजीस पत्र, आनंदवनभुवन, क्षात्रधर्म ही प्रकरणे अभ्यासार्थींनी पाहावी. दासबोध ही रामदासांनी पारमार्थिक शिष्यांसमोर वेळोवेळी केलेली व्याख्याने आहेत. ती कल्याणस्वामींनी लिहून काढली. या २०० समासी दासबोधाच्या मूळ संहिता शोधून काढण्याचे काम देव व पांगारकर या दोघांनी केले आहे. हे त्यांचे अनंत उपकार मराठी समाजावर आहेत.

 
 

- सुरेश जाखडी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@