मशीद उभारण्याविरोधात सानपाडा रहिवाशांचे उग्र आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |



 


नवी मुंबई : सानपाड्यातील एका संस्थेला मशीद उभारण्यासाठी देण्यात आलेला भूखंड रद्द करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय सानपाडा रहिवासी महासंघाच्यावतीने मंगळवारी मुंबई - पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सानपाड्यातील रहिवाशांनी जोरदार प्रतिसाद दिला. आंदोलनादरम्यान काही काळ शीव-पनवेल महामार्ग रोखण्यात आला होता.

 

२००४ च्या आसपास सिडकोने मशिदीकरिता भूखंड हस्तांतरित केला होता. मात्र, सानपाडा हा हिंदूबहुल भाग आहे. येथे केवळ ६९ घरे मुस्लिमांची आहेत आणि त्यांना कोणताही त्रास झालेला नाही. मग मशिदीची गरज नसताना हा भूखंड का द्यावा, असा सवाल सिडकोला करत हा भूखंड त्वरित रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय सानपाडा रहिवासी महासंघाच्यावतीने करण्यात आली. या आंदोलनात पाच हजारांहून अधिक स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी पाचजणांनी सामूहिक मुंडनही केले. तर, ७० कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी अटक केली. या आंदोलनादरम्यान सानपाड्यातील सर्व व्यवहार ठप्प होते तसेच शाळा-महाविद्यालये, दुकाने पूर्णत: बंद होती.

 

जुलै, २००८ पासून स्थानिकांनी या भूखंडासाठी विरोध केला असताना सेक्टर येथील भूखंडावर मशीद बांधण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याचा अहवाल सिडकोला पोलिसांकडून देण्यात आला. २०१२ सालापर्यंत पोलिसांनी सदरचा भूखंड मशीद बांधण्यास हस्तांतरित करू नये, असा अहवाल देण्यात आला होता. परंतु, त्यानंतर सिडकोने हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया भ्रष्ट पद्धतीने होत असल्याचा आरोप यावेळी आंदोनकर्त्यांनी केला. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र पाटील यांनी “आम्ही पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मागणार आहोत. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी हमी आंदोलनकर्त्यांना दिली.

 

“सानपाड्याच्या विकास आराखड्यात सिडकोकडून कुठेही मशिदीसाठी प्रस्तावित जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही आम्हा नागरिकांची फसवणूक आहे आणि जो भूखंड मशिदीसाठी देण्यात आला आहे ती जागा वर्दळीची आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊ शकते. त्यामुळे स्थानिकांची मागणी सिडकोने मान्य करावी.”

 

सतीश निकम,संघटक,

अखिल भारतीय सानपाडा रहिवासी महासंघ

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@