‘समउत्कर्ष अभ्यासिका’ आणि सेवा सहयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018   
Total Views |



भ्यासिका म्हटंले की, डोळ्यासमोर विशिष्ट वातारण दिसू लागते. शांत, गंभीर वातावरणात मुले अभ्यास करत आहेत. ते अभ्यास करत आहेत की नाही, याकडे त्या वातावरणापेक्षाही गंभीरपणे लक्ष देणारे शिक्षकही तिथे उपस्थित आहेत. एकंदर सगळाच गंभीर मामला. अभ्यास एके अभ्यास असे वातावरण. पण ‘समउत्कर्ष अभ्यासिके’चे दिवाळी शिबीर अनुभवले आणि मनात असलेल्या अभ्यासिकेच्या विशिष्ट संकल्पना लुप्त झाल्या. ‘समउत्कर्ष’ याचा अर्थ काय असावा? समान उत्कर्ष? होय हाच अर्थ असू शकतो. कारण, ‘समउत्कर्ष अभ्यासिके’च्या माध्यमातून मुलांच्या शालेय अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक सकारात्मक पैलूंचा उत्कर्ष कसा साधता येईल, याबाबत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात. ‘सेवा सहयोग’ या नामांकित स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शेकडो ‘समउत्कर्ष अभ्यासिका’ मुंबईत चालवल्या जातात. या अभ्यसिकांच्या माध्यमातून अभ्यासिकेमध्ये येणारे विद्यार्थी, त्यांचे कुटुंब, त्यांचा परिसर या साऱ्यांचा विचार केला जातो. मुळात अभ्यासिकेचे स्थळ ठरते तेच अशा ठिकाणी जिथे मुलांच्या अभ्यासाच्या नावाने बोंब असते. म्हणजे मुलांना अभ्यास करायचा असतो, पण घरात अभ्यास करायला बसण्याइतकीही जागा नसते. शांतता नसते. तसेच आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमध्ये अभ्यासिका सुरू केली जाते. काही वस्त्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात, पण काही वस्त्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक वातावरणामध्ये आणखीन सकारात्मकता आणणे गरजेचे असते, अशा वस्त्यांमध्येही अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. अभ्यासिका कुठे सुरू करायच्या याबाबतचे निकष सर्वसाधरणपणे याच पठडीतील आहेत. यावरून ‘सेवा सहयोग’च्या ‘समउत्कर्ष उपक्रमा’चे सामाजिक योगदानातील मौलिकत्त्व दिसून येते. कारण, वस्त्यांमधील बालकं हीचं जागतिकीकरणातील केंद्रबिंदू आहेत. या बालकांच्या जीवनातील बदल मोठ्या झपाट्याने होत असतो. या बदलांमध्ये मानवी मूल्यांचा वारसा पेरणे, आयुष्याच्या सकारात्मक जाणिवा निर्माण करणे, सामाजिक बांधिलकीसोबतच राष्ट्र निष्ठेचे अधिष्ठान रचणे हे गरजेचे असते.

 

‘समउत्कर्ष अभ्यासिका’ अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या जीवनात हे असे अधिष्ठान रचत असते. त्यामुळे ‘समउत्कर्ष अभ्यासिके’ला मुंबईच्या वस्त्यांमध्ये भरभरून प्रतिसाद मिळतच आहे. ‘समउत्कर्ष अभ्यासिके’च्या पूर्व उपनगरांतील दहा अभ्यासिकांचे एक दिवसीय दिवाळी शिबीर २३ नोव्हेंबर रोजी विक्रोळी येथे आयोजित करण्यात आले होते. हा एक दिवस म्हणजे मुलांच्या जीवनातील चैतन्याची दिवाळीच होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दिवाळी शिबिरामध्ये पूर्व उपनगरांतील दहा अभ्यासिकेतील मुले सहभागी झाली होती. एकूण ३०० विद्यार्थी या शिबिराला उपस्थित होते. दीपाली देवळे, जितेंद्र कांबळी, अजंली गांगल या सेवा सहयोगच्या या त्रयींनी शिबिराची पूर्ण दिवसाची धुरा वाहिली. शिबिराचे उद्घाटन संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य आणि समाजसेवक बाळासाहेब म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी दीपाली देवळे, जितेंद्र कांबळी, अंजली गांगल आणि बाळासाहेब म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. त्यानंतर शिबिराला सुरुवात झाली. शिबिरामध्ये विविध स्पर्धांचे आायोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतलेला दिसत होता. सर्वात प्रथम झाली ती सामूहिक नृत्यस्पर्धा. प्रत्येक अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गटानुसार अत्यंत तालबद्धपणे नृत्य सादर केले. नृत्य निवडीमध्ये प्रत्येक अभ्यासिकेचे वैशिष्ट्य उठून दिसत होते. या नृत्यस्पर्धेनंतर नाट्यस्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. नृत्य आणि नाट्यस्पर्धेचेपरीक्षण मदनमोहन कुशवाहा आणि मंजू यादव यांनी केले. नाट्यस्पर्धेसाठी गटांनी स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती, ‘पढेगा इंडिया बढेगा इंडिया’ इत्यादी महत्त्वाचे विषय निवडले होते. त्यानंतरच्या भोजनसोहळ्यानंतर गायनस्पर्धा सुरू झाली. गायनस्पर्धेचे परीक्षण अश्विनी ठक्कर आणि रेखा गुप्ता यांनी केले. त्यानंतर ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रत्येक अभ्यासिकेच्या मुलांनी आपल्या कल्पकतेने या संकल्पनेला परिपूर्ण केले होते. सायंकाळी स्पर्धेतील यशस्वी गटांना पारितोषिके वितरित करण्यात आली. ‘समउत्कर्ष अभ्यासिके’च्या दिवाळी शिबिराला सेवा सहयोग संस्थेचे संजय हेगडे तसेच सुरेश गंगादयाल यादव, सुहास पोतदार यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांनी भेट दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@