रोगनिवारणामधील अडथळे (भाग-२)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |



आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किरणोत्सर्ग (Radiation). या किरणोत्सर्गामुळे बऱ्याच लोकांना अनेक नवनवीन आजारांना सामोरे जावे लागते.


होमियोपॅथीच्या नियमांनुसार जरी औषधे चालू असली तरी, काही गोष्टींमुळे या रोगानिवारणात अडथळे निर्माण होतात. काही लोकांना अतिशय उग्र अशी अत्तरे शरीरावर लावण्याची सवय असते. अशा लोकांमध्ये या औषधांचा परिणाम कमी होतो. तसेच आहारामध्ये सततचे कॉफीसेवन, पुदिना किंवा लसूण अशा उग्रवासाच्या पदार्थांचे कच्च्या स्वरूपात सेवन हे अतिप्रमाणात केल्यानेही औषधांच्या क्रियेवर परिणाम होत असतो. आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किरणोत्सर्ग (Radiation). या किरणोत्सर्गामुळे बऱ्याच लोकांना अनेक नवनवीन आजारांना सामोरे जावे लागते. हल्लीच्या काळात मोबाईल फोन व लॅपटॉप, टॅब, नोटपॅड इत्यादींचा वापर हा प्रमाणाबाहेर वाढला आहे. मोबाईल फोनच्या सतत सान्निध्यात असणारे लोक या आजारांना निमंत्रण देत असतात. मोबाईल तसेच संगणकामधून बाहेर पडणारी किरणे ही आरोग्यासाठी धोकादायक असतात व त्याचे थेट चेतासंस्थेवर दुष्परिणाम दिसून येतात. या सर्वांमुळे रोगनिवारणाचा प्रक्रियेत अडथळा येत असतो. होमियोपॅथीच नव्हे, तर इतर सर्व प्रकारच्या औषधशास्त्रातील तज्ज्ञांचे हेच मत आहे की, या रेडिएशनमुळे माणूस कमकुवत होत जातो व त्यामुळे पूर्णपणे रोगमुक्त होऊ शकत नाही. तसेच कुठलीही औषधेसुद्धा या उपकरणापासून थोडीशी लांबच ठेवावित. कारण, या उपकरणांमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे औषधांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

 

आहारामध्येसुद्धा सर्व लोकांनी विशेष सतर्कता बाळगायला हवी. आहारातील त्रुटींमुळे किंवा चुकीच्या आहारामुळे अनेक रोगांना संधी मिळते. अशा प्रकारच्या आहारामुळे रोग बळावतो. उदा. हल्लीच्या काळात असे दिसून येते की, तरुण मुलींमध्ये संप्रेरकांचा असमतोल (Hormonal Imbalance) झाल्यामुळे अनेक आजार होतात. या आजारातीत एक महत्त्वाचा रोग म्हणजे अंडाशयाचे विकार. पॉलिसिक्टीक ओव्हेरियन डिसीज. (PCOD) यात मासिक पाळीवर परिणाम होतो. त्यामुळे त्याचे विविध दुष्परिणाम दिसू लागतात. या PCODच्या मागे चुकीचा आहार हेदेखील एक कारण असू शकते. जंक फूड हा एक निकस आहाराचा प्रकार आहे. जिभेला चटकदार असे वाटणारे खाणे हे शरीराला मात्र अपायकारक असते. अशा जंकफूडमुळे शरीरातील संप्रेरकांमध्ये दोष निर्माण होऊ शकतो व जोपर्यंत हा निकस आहार आपण बदलत नाही, तोपर्यंत रुग्णाला आजारापासून पूर्ण मुक्ती मिळू शकत नाही. आहारातील या अडथळ्यामुळे औषधे परिणाम करत असूनही आजार बरा व्हायला वेळ लागतो. याचे कारण हे औषधांमुळे नसते, तर स्वत:च्याच वागण्यात व आहारात असते. जर आपण या आहाराची काळजी घेतली, तर रोगनिवारणामध्ये काहीही अडथळे येणार नाहीत.

 

अजून एक महत्त्वाचे उदाहरण इथे द्यावेसे वाटते ते म्हणजे, लहान मुले व तरुणाईला भेडसावणारी समस्या लठ्ठपणा किंवा ओबेसीटी. हा लठ्ठपणासुद्धा एक प्रकारचा आजारच आहे. या लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे, आहारावर नियंत्रण नसणे व निकस आहार खात राहणे. यामुळे या लठ्ठपणावर औषधे जरी चालू असली तरी, या आहारातील त्रुटींमुळे लठ्ठपणा कमी होतच नाही. अशा प्रकारे ही सवय रोगनिवारणात अडथळे आणते व रुग्ण मात्र औषधांना दोष देतो. माणसाला जर पूर्णपणे रोगमुक्त व्हायचे असेल, तर त्याचा त्याच्या आहार, विहार, आचार व विचार या चार गोष्टींवर पूर्णपणे ताबा असला पाहिजे. यापैकी एकाही घटकात जर बदल झाला, तर माणूस आजारी पडू शकतो व जर हे घटकातील बदल जर नियंत्रणात ठेवले नाहीत, तर मग हेच बदल रोगनिवारणात अडथळे आणणारे घटक ठरतात. पुढील भागात आपण या रोगनिवारणामधील अडथळ्यांविषयी आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

- डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@