दादा चोळकरांसारख्या व्यक्तीच संघाच्या शिल्पकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |



दादा चोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची कल्याण येथे सांगता

 

कल्याण : अनुकूलतेच्या काळात संघासाठी काम करणे सोपे आहे परंतु प्रतिकुलतेच्या काळात संघासाठी काम करणे अवघड आहे. हे अवघड काम करणाऱ्या दादा चोळकर यांच्यासारख्या व्यक्ती याच संघाच्या शिल्पकार असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केली. गोविंद उपाख्य दादा चोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त सहजीवन सेवा मंडळ आयोजित कार्यक्रमात भैय्याजी बोलत होते.

 

नमस्कार मंडळ, कल्याण येथे झालेल्या या समारंभात व्यासपीठावर जिल्हा संघचालक डॉ. विवेक मोडक, शहर संघचालक उमेश कुलकर्णी, सहजीवन सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकर फडके, नमस्कार मंडळाचे उपाध्यक्ष मधुकर जोशी आदी उपस्थित होते. यावेळी दादा चोळकर यांच्या आठवणींवर आधारित स्मरणिकेचेही प्रकाशित करण्यात आले. सरकार्यवाह भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले की, आजपासून १०० वर्षांपूर्वीच्या चार-पाच वर्षांच्या कालावधीत ईश्वरी शक्तीने अनेक श्रेष्ठ मंडळींना तुमच्या-आमच्यासाठी भूतलावर पाठवले. बाळासाहेब देवरस, दीनदयाळ उपाध्याय, यादवराव जोशी, एकनाथ रानडे आदी व्यक्तिमत्वांचे स्मरण यावेळी भैय्याजी यांनी केले. हे सर्वजण जवळपास एकाच काळात जन्मले आणि एक श्रेष्ठ शक्ती आपणा सर्वांसाठी उभी करून शांतपणे पुढे मार्गस्थ झाल्याचे ते म्हणाले. कल्याणमध्येही स्वयंसेवकांची अशी एक पिढीच घडल्याचे नमूद करत भगवंतराव जोशी, दामूअण्णा टोकेकर, माधवराव काणे, रामभाऊ कापसे, भाऊसाहेब मोडक, भाऊराव सबनीस आदींचे स्मरण भैय्याजी जोशी यांनी केले.

 

दादा चोळकर यांनी आपल्या आचरणातून अनेकांना संघकार्याची प्रेरणा दिल्याचे भैय्याजी यांनी सांगितले. ते म्हणाले की, उच्च शिक्षण, नोकरी सारे काही सोडून ते संघकार्यात आले. तो काळ खूप वेगळा होता. महात्मा गांधींची हत्येचा आरोप संघावर करण्यात आला होता. त्यानंतर संघ जणू उपेक्षित बनला होता. अशा काळात नोकरी सोडून संघकार्यात आले. संघावरील बंदी उठल्यावर १९६५ पर्यंत संघकार्याचा आलेख खाली गेलेला आहे. पण याच काळात अनेकजण संघासाठी उभे राहिले. या अवघड कालावधीत संघासाठी ज्यांनी कष्ट उपसले, त्या पिढीचे नाव दादा चोळकर असल्याचे उद्गार भैय्याजींनी यावेळी काढले. दादांसारख्या व्यक्ती या संघाच्या शिल्पकार आहेतच परंतु संघकार्यात उतरलेल्या अनेकांच्ता जीवनाचेही शिल्पकार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संघाचे काम हे उत्तेजनेने नाही तर शांतपणे करण्याचे काम असल्याचे भैय्याजी यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की, त्यामुळे संघकामाची गती कमी दिसते. परंतु, ती तशीच राहणार आहे, त्याबद्दल आपण काही वाटून घेता कामा नये. संघाच्या प्रचारकांच्या मालिकेतील उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दादा चोळकर असल्याचे ते म्हणाले. यांचे कुळ काय आहे, असा प्रश्न पडतो. परंतु, डॉ. हेडगेवार हेच या सर्वांचे कुळ असल्याचे ते म्हणाले. परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्यांच्या जीवावर देश उभा राहत नाही. तो उभा राहतो ते तडजोड न करणाऱ्यांच्या जोरावर. असे आदर्श समाजात कमी होत चालले असताना, दादांसारख्या आदर्शांचे स्मरण करणे आपणा सर्वांना उर्जा देणारे असल्याचे भैय्याजी यांनी सांगितले. ज्यावेळी देशाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी अशा व्यक्तींच्या उल्लेखाशिवाय देशाचा सामाजिक इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

 

आज संघ म्हणेल ते होऊ शकते !

 

एक काळ असा होता ज्यात संघ उपेक्षित, अपमानित होता. त्यानंतरही संघशक्ती वाढताना पाहून संघाल नष्ट करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. परंतु, संघ वाढतच गेला. आज देशात आपण म्हणू ते होऊ शकते. आज ही एक अशी शक्ती उभी राहिली आहे, जिची कोणी उपेक्षा करू शकत नसल्याचे प्रतिपादन भैय्याजी जोशी यांनी केले. जे संघाचे कट्टर विरोधक आहेत, तेही आज संघाचे काय आवश्यक असल्याचे सांगत आहेत. अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीशीही संघाचा तसा थेट काही संबंध नाही. परंतु, लोक म्हणातात, की ते तुमच्यामुळेच होईल. हे विश्वासाचे वातावरण संघाने निर्माण केले आहे. या कार्याच्या पाठिशी एक अख्खी पिढी आहे, जी डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजींच्या पाठीशी उभी राहिली. तिच्या आधारावरच आपण इथवर पोहोचलो असून, हा प्रवाह पुढेही असाच सुरू राहील असा विश्वासही भैय्याजी जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@