सारे काही सत्तेसाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2018
Total Views |



मायावती सध्या इतरांवर उच्चवर्णीयांबद्दल द्वेषभावनेला खतपाणी घालण्याचे आरोप करत असल्या तरी त्या स्वतः काही धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ अजिबातच नाहीत. एकेकाळी मायावतींच्या सत्तेचा ‘चबुतरा’ अशाच प्रकारच्या आगलाव्या उद्योगांच्या पायावर आधारलेला होता. एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करूनच मायावतींनी उत्तर प्रदेशातील सत्तेची फळे चाखली होती.


सत्तेसह सर्व प्रकारचे फायदे उपभोगू देणाऱ्याआपल्या राजकीय स्पेस’मध्ये नवा कोणी वाटेकरी येऊ घातला की, प्रस्थापितांच्या अस्तित्वाची लढाई सुरू होते. सध्या अशीच लढाई बसपप्रमुख मायावती आणि ‘भीम आर्मी’ व ‘बहुजन युथ’ या संघटनांमध्ये सुरू झाल्याचे दिसते. बसपप्रमुख मायावतींनी नुकताच ‘आपल्यातील’ व ‘त्यांच्यातील’ संघर्ष उलगडून दाखवत या दोन्ही संघटनांवर खळबळजनक आरोप केले. भीम आर्मी व बहुजन युथ या दोन्ही संघटना अनुसूचित जाती-जमातींतील लोकांच्या मनात उच्चवर्णीयांबद्दल द्वेषाची लागवड करत असल्याचा दावा मायावतींनी केला. शिवाय या दोन्ही संघटना अनुसूचित जाती-जमातीच्या वस्त्यांत जाऊन भोळ्या-भाबड्या लोकांची दिशाभूल करत असल्याचेही त्या म्हणाल्या. अर्थात मायावती सध्या इतरांवर उच्चवर्णीयांबद्दल द्वेषभावनेला खतपाणी घालण्याचे आरोप करत असल्या तरी त्या स्वतः काही धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ अजिबातच नाहीत. एकेकाळी मायावतींच्या सत्तेचा ‘चबुतरा’ अशाच प्रकारच्या आगलाव्या उद्योगांच्या पायावर आधारलेला होता. एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करूनच मायावतींनी उत्तर प्रदेशातील सत्तेची फळे चाखली होती. ‘तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार’ ही घोषणा मायावतींचीच होती. म्हणजेच इथल्या हिंदू धर्माचे अविभाज्य अंग असलेल्या अनुसूचित जाती-जमातीतील बांधवांच्या मनात विष कालवण्याचे काम मायावतींनीच केले होते. मग आज त्या कुठल्या तोंडाने भीम आर्मी वा बहुजन युथवर भावना भडकविण्याचे आरोप करतात? मायावतींची ही तर्‍हा म्हणजे ‘स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून,’ या पठडीतलीच म्हटली पाहिजे. पुढे आतापर्यंत मिळालेल्या सत्तेला अधिकाधीक भक्कम करण्यासाठी मायावतींनी सोयीस्कररित्या आपल्या घोषणेला उलटे फिरवले. केवळ अनुसूचित जाती-जमातीतील लोकांच्या मतांच्या गठ्ठ्यांवर आपली सत्तेची खिचडी शिजणार नाही, हे ओळखून मायावतींनी उच्चवर्णीयांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवनवे डावपेच आखले.

 

उच्चवर्णीयांना आपल्या सभेतून पिटाळून लावणारी जुनी घोषणा टाकून देऊन तिथे ‘हाथी नहीं गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ ही घोषणा पद्धतशीरपणे आणली गेली. मायावतींच्या राजकारणाला थोरपणाचा मुलामा देणाऱ्यांनी यालाच ‘सोशल इंजिनीअरिंग’चे गोंडस नाव देत डोक्यावर घेतले. पण २०१४ नंतर भारतीय राजकारणाचा पोत पूर्णपणे बदलला. आज मायावती स्वतःच्या पक्षात सर्वच जाती-धर्मांच्या लोकांना स्थान असल्याचे म्हणत असल्या तरी त्यांच्यावर ही वेळ या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळेच आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’चे धोरण अवलंबल्याने पायाखालची वाळू सरकलेल्यांना आपला उरलासुरला जनाधार गमावण्याची भीती सतावू लागली. त्यातूनच मायावतींसारख्या नेतेमंडळींनी सर्वांच्या हिताची भाषा केल्याचे दिसते. पण देशातल्या जनतेला या लोकांचे दाखवायचे आणि खायचे दात पक्के ठाऊक असल्याने त्यांच्यावर मतदारांचा विश्वास बसण्याची शक्यता बिलकुल नाही. उलट आपल्या आतापर्यंतच्या जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याच्या स्वार्थपरायण राजकारणामुळे गाळात गेलेले हे लोक त्याच दलदलीत अधिकाधिक खोल खोल रुतत जातील. दुसरीकडे आताची मायावतींची भीम आर्मी व बहुजन युथ या दोन्ही संघटनांतील लढाई कोणत्याही वैचारिक अधिष्ठानावर आधारलेली नाही. ही केवळ अनुसूचित जाती-जमातींचे आम्हीच प्रतिनिधीत्व करतो, असे म्हणणाऱ्या दोन गटांतली स्पर्धा आहे. कारण मायावतींनी बसपचे संस्थापक असलेल्या कांशीराम यांचा वैचारिक संघर्ष कधीचाच सोडून दिला आहे. त्यांच्या लेखी आता फक्त सत्तासंघर्ष सर्वोच्च असून राजकारणात प्रस्थापित झालेल्या मायावतींना अन्य कोणी आपल्यात भागीदार होऊ नये, असे वाटते व त्यासाठीच त्यांचा सारा आटापिटा असतो.

 

मायावतींनी गेल्या काही वर्षांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि काही प्रमाणात राजस्थानमध्ये आपले स्थान निर्माण केल्याचे दिसते. त्यांचा उद्देश संपूर्ण भारतात स्वतःच्या नेतृत्वाला सर्वमान्यता मिळविण्याचा असून महाराष्ट्रातही त्यांनी तसा प्रयत्न केला आहेच, पण उत्तर प्रदेशची सत्ता मिळाल्यानंतर स्वतःचे पुतळे उभारण्याच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांची ही मोहीम बऱ्यापैकी थंडावली. नंतर सत्ता गेल्यानंतर त्या बऱ्यापैकी शुद्धीवर आल्या व आपल्या जुन्या स्वप्नाच्या धुडात हवा भरण्याच्या कामाला लागल्या. याचअंतर्गत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून कोणीही खंदा नेता पुढे न आल्याने मायावतींनी देशाचे नेतृत्व करण्याच्या आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी पुन्हा एकदा जोर लावायला सुरू केले. अनुसूचित जाती-जमातींची मतपेढी फुटू नये व ती कायमस्वरूपी आपल्याच मागे उभी राहावी, असेही मायावतींना वाटते. मात्र, भीम आर्मीसारख्या संघटनांमुळे आपल्या ध्येयपूर्तीत मिठाचा खडा पडू शकतो, याची जाणीव झाल्याने त्यांनी या संघटनांवर आरोप केल्याचे दिसते. भीम आर्मी व बहुजन युथ संघटनेचे नेमके याच्या उलट आहे. हिंदू धर्मांतील उच्चवर्णीयांच्या विरोधात चिथावणीखोर विधाने करून या दोन्ही संघटना व त्यांचे म्होरके आपली ‘स्पेस’ निर्माण करू इच्छितात. ही ‘स्पेस’ अर्थातच मायावतींसारख्या प्रस्थापित नेत्यांमागे असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या लोकसंख्येला आपल्यामागे वळवूनच निर्माण होऊ शकते, हे या लोकांना चांगलेच ठाऊक आहे. यासाठी अर्थातच आधार घेतला जातो, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा.

 

अनुसूचित जाती-जमातीतील बहुसंख्य लोक बाबासाहेबांचे नाव घेऊन कोणी बोलू लागले की, अधिकच भावनिक होतात. याचा फायदा भीम आर्मीसारख्या संघटना उठवतात व बाबासाहेबांच्या नावावर भडक वक्तव्ये करून अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना आपल्यामागे फिरवण्याची कारस्थाने रचतात. यासाठी उच्चवर्णीयांचा आणि प्रस्थापितांचा द्वेष करणे, त्यांच्याबद्दल अफवा पसरवणे असल्या उचापत्या प्राधान्याने केल्या जातात. कोरेगाव-भीमा दंगलीसारख्या सामाजिक सौहार्दाला चूड लावणाऱ्या घटना यातूनच घडतात. प्रकाश आंबेडकरांनी कोरेगाव-भीमा दंगलीचा उपयोग समाजातील प्रस्थापित नेतृत्वाविरोधात स्वतःची ‘स्पेस’ निर्माण करण्यासाठीच केला. तसाच उद्योग भीम आर्मी व बहुजन युथ या संघटनांनी चालवल्याचे दिसते. मूळनिवासी-वैदिक, रावण-महिषासुराचे पूजन असले वाद उकरून काढले जातात. परिणामी रोजगार, आरोग्य आदी महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चा व प्रचार भरकटवून वादग्रस्त मुद्द्यांवर केंद्रित केला जातो. समाजात दरी निर्माण करून, समाजाच्या एकतेचे तुकडे-तुकडे करून त्यावर आपल्या सत्तेचा कशिदा विणण्याची या लोकांची योजना असते. मायावतींच्या बसपने सुरुवातीला हेच केले व त्यातूनच त्या प्रस्थापित झाल्या. आता भीम आर्मीसारख्या संघटना त्याच मार्गाने जात असून मायावतींना त्यांच्यामुळे आपल्या स्थानाला धक्का पोहोचण्याची भीती वाटते. म्हणूनच त्यांनी आपण सर्वांना सोबत घेऊन जाऊ इच्छितो, असे म्हटले व अन्य संघटनांशी वैचारिक संघर्ष असल्याचे जाहीर केले. पण या दोन्ही पक्ष आणि संघटनांचे मार्ग एकाच म्हणजे, समाजात दुफळी माजवून सत्तेचे लोणी ओरबाडण्याच्याच दिशेने जातात, हे सर्वांनी लक्षात ठेवलेले बरे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@