शूरा ‘म्ही’ वंदिले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2018
Total Views |



अरिबमजींच्या समर्पणवृत्तीने प्रभावित होऊन निवृत्तीनंतर पाच वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्यावर मणिपूरच्या संघचालकपदाची जबाबदारी सोपवली व ती त्यांनी १८ वर्षे समर्थपणे सांभाळली.


समुद्र वरवर अतिशय शांत असतो. परंतु, त्याच्या आत काय खळबळ चाललेली असते, त्याचा अंदाज लावता येत नाही. अगदी अस्संच व्यक्तिमत्व आहे मणिपूरनिवासी ‘अरिबम ब्रजकुमार शर्मा’ या महामानवाचं! दिसायला अतिशय शांत परंतु, अंत:करणात एवढी खळबळ की, अरिबमजींच्या हातात असतं, तर त्यांनी अख्खी दुनियाच बदलून टाकली असती. १ एप्रिल, १९३८ रोजी मणिपूरच्या कुटुंबात अरिबमजींचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी ते मातृसुखाला पारखे झाले. त्याचवेळी ब्रह्मदेशाला लागून असलेल्या मणिपूरमध्ये दुसऱ्या महायुद्धाची हालचाल सुरू झाली. वडील ब्रजमणि शर्मांच्या देखरेखीखाली अरिबमाजींचं बालपण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा अनुभव घेत सुरू होतं. त्यातून आकाराला आला, एक धीरगंभीर आणि सखोल विचारवंत क्रियाशील युवक ‘अरिबम ब्रजकुमार शर्मा.’ देशाच्या स्वातंत्र्यानंतर मणिपूर भारताचा एक अविभाज्य हिस्सा बनला खरा; परंतु, राज्याची सामाजिक वीण उसवते की काय, अशी भयावह परिस्थिती उभी राहत होती. डोंगराळ भागात राहणारा नागा समाज नागालँडमध्ये सामील होण्यासाठी आतुर होता; तर दक्षिण मणिपूरचा निवासी मिझो कुकी समाज मिझोराममध्ये जाण्यासाठी उतावीळ झाला होता. मणिपूर राजघराण्याचे महाराज कुमार प्रियव्रत सिंह आणि अरिबम ब्रजकुमार शर्मांनी एकत्र येऊन ही फाटाफूट टाळण्यासाठी तसंच डोंगराळ व पठारी क्षेत्रांतील जनतेत एकोपा निर्माण करण्यासाठी एक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. याच मोहिमेच्या अंतर्गत ६० च्या दशकाच्या शेवटी शेवटी ‘मणिपूर कल्चरल इंटिग्रेशन कॉन्फरन्स’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वत: महाराज कुमार प्रियव्रत सिंह या संस्थेचे अध्यक्ष झाले, तर अरिबमाजी महासचिव. दरम्यानच्या काळात अरिबमाजी इंफाळच्या सुप्रसिद्ध डी. बी. महाविद्यालयात संख्याशास्त्राचे (statistics) व्याख्याते (lecturer) झाले होते.

 

मणिपूरच्या सांस्कृतिक एकत्रीकरणाच्या मोहिमेंतर्गत आपल्या सहकाऱ्यांसोबत अरिबमजी पाठीवर आपला शिधा घेऊन डोंगरदऱ्यांमध्ये जाऊ लागले. जनतेचा शिधा घेऊन डोंगर-दऱ्यांमध्ये जाऊ लागले. जनतेचा समस्या जाणून घेऊ लागले. त्याचबरोबर त्यांना आपले पूर्वापार चालत आलेले रितीरिवाज व संस्कृती टिकवून ठेवण्याचा आग्रह करू लागले, अशा प्रवासात अनेक वेळा त्यांना घनदाट जंगलात रात्रीचा मुक्काम करावा लागला आणि काही वेळा नागा दहशदवाद्यांच्या धमक्यांचाही मुकाबला करावा लागला. या मोहिमेमुळे अरिबमजींना कुटुंबाचा विरहही दीर्घकाळ सहन करावा लागला. परंतु, अरिबमजींच्या या त्यागाचा फायदा मात्र, समाजाला झाला. डोंगराळ भागातील नागा-कुकी समाजाचे दु:ख दैन्य आणि मूलभूत सुविधांचा अभाव या समस्या मणिपूर सरकारपर्यंत पोहोचू लागल्या व या दुर्गम क्षेत्रातील गावांमध्ये शिक्षण, वैद्यकीय सुविधा व रेशनद्वारे धान्य वाटपाच्या सरकारी योजना कार्यान्वित होऊ लागल्या. मात्र, समस्या मूलभूत सुविधांच्या अभावापुरत्याच मर्यादित नव्हत्या. ख्रिस्ती मिशनरी वेगाने आपले बस्तान या क्षेत्रात बसवत होते. त्यामुळे मणिपूरचा वनवासी समाज आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रितीरिवाज व संस्कृतीपासून विन्मुख होऊ लागला होता. अरिबमजींनी आपल्या प्रवासात येणाऱ्या या संकटांचा अचूक अंदाज घेतला व या वनवासी समाजाला आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा द्यायला सुरुवात केली. अरिबमजींनी ही मोहीम तीव्र करण्यासाठी क्रीडास्पर्धांचा आधार घेतला. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वर्षातून दोनदा खेळांच्या मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन होऊ लागले. या स्पर्धांमध्ये वनवासी क्षेत्रातील प्रतिभावान युवक अहमहमिकेने भाग घेऊ लागले. तरुण-तरुणींमध्ये खेळांविषयी आवड वाढू लागली. या सगळ्या प्रयत्नांमुळे आज मणिपूरने देशाला अनेक नामवंत खेळाडू दिलेले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, मुष्टियोद्धा विजेती एम. सी. मेरी कोम, जिला २०१३साली याच मंचावरून ‘वन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अरिबमजींनी खेळाच्या माध्यमातून एक प्रचंड नि:शब्द क्रांती घडवली. मणिपूरच्या पठारी क्षेत्रांत होळीचा सण ‘योशेंग’ नावाने पाच दिवस साजरा केला जातो. या पाच दिवसांत जबरदस्त रंग उडविणे व दारू पिऊन भांडणतंटा करणे ही तरुणांची सवयच होऊन गेली होती. अरिबमजींनी ही दारूची कुप्रथा संपविण्याचा विडा उचलला. त्यांनी योशेंग उत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. तरुण नशाखोरी सोडून या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होऊ लागले. आज योशेंगचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे.

 

संपूर्ण मणिपूरमध्ये हा उत्सव आता नशेखोरीसाठी नाही, तर गावागावांतील क्रीडास्पर्धांसाठी ओळखला जातो. एवढंच नाही, तर पहाडी क्षेत्रात राहाणारा नागा-कुकी वनवासी समाजदेखील पाच दिवस ‘यौशेंग’ महोत्सव क्रीडास्पर्धांचे आयोजन करून धूमधडाक्यात साजरा करतो. विशेष म्हणजे, या समाजाला खेळाची यापूर्वी सवयच नव्हती. ‘दारू’ ही तरुणांमध्ये नव्हे, तर प्रौढांमध्येही भयंकर समस्या बनली होती. अरिबमजींनी यातूनही मार्ग काढला. त्यांनी ‘दारूबंदी’साठी महिलांना प्रेरित केले. आपल्या पिता किंवा पुत्राला दारूच्या व्यसनातून सोडविण्यासाठी आंदोलन करण्यास त्यांनी महिलांना तयार केले. या अभूतपूर्व आंदोलानाचा सुपरिणाम म्हणजे सरकारने मणिपूरमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केली. इंफाळपासून सुमारे ५० किमीवर वसलेल्या एका वनवासी गावात अनोखी प्रथा आहे. गावात ३० घरं झाली की, ३१ वं कुटुंब नवीन गाव स्थापन करून राहू लागतं. या प्रथेचा गैरफायदा घेऊन काही गावांतील ३१ व्या व नव्या परिवारांना १२५ किमी दूर उखरुल या ठिकाणी नेऊन ख्रिस्ती मिशनऱ्यांनी वसविले आणि त्यांच्यावर आपली संस्कृती व रितीरिवाज सोडण्यासाठी दबाव आणू लागले. त्या मंडळींनी आपली ही व्यथा ‘मणिपूर कल्चरल इंटिग्रेशन कॉन्फरन्स’पर्यंत पोहोचवली. लगेच महाराज कुमार प्रियब्रतसिंह व अरिबमजींनी सैन्याच्या ट्रकातून संपूर्ण गावाला परत आणलं आणि त्यांच्या मूळ गावाच्या जवळ नवं गाव वसवून दिलं. ‘तराव’ नावाचं ते गाव आज ३५ वर्षांनंतरदेखील आपली घरवापसी विसरलेलं नाही.

 

एरवी अरिबमजी शांत व चूपचाप राहणारी व्यक्ती आहे. परंतु, आपल्या मणिपूरवासीयांमध्ये मात्र त्यांची कळी खुलते. वनवासी समाजालादेखील अरिबमजींमध्ये आपला खराखुरा शुभचिंतक नजरेस येतो. केवळ मणिपूरच्या 34 वेगवेगळ्या जनसमुदायांच्या रितीरिवाज व संस्कृतीच्या रक्षणार्थच अरिबमजी झटले नाहीत, तर ब्रह्मदेशातील मंडाले व आसाममधील मैतेई समाजाला (म्यानमारमधील) जोडण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आपल्या संख्याशास्त्राच्या प्रगाढ ज्ञानाच्या आधारे मणिपूरच्या वाढलेल्या अतार्किक लोकसंख्येमागे सर्वात मुख्य कारण शेजारील म्यानमार व बांगलादेशातून झालेली घुसखोरी आहे. हे शास्त्रशुद्धरीत्या सिद्ध करून दाखविले आहे. अरिबमजींच्या समर्पणवृत्तीने प्रभावित होऊन निवृत्तीनंतर पाच वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्यावर मणिपूरच्या संघचालकपदाची जबाबदारी सोपवली व ती त्यांनी १८ वर्षे समर्थपणे सांभाळली. याशिवाय मणिपूरच्या सेवाभारती व विद्याभारतीचे आधारस्तंभ राहिलेले आहेत. धर्मपत्नी अरिबम मेमचाउबी देवी यांच्या सहकार्याशिवाय अरिबमजींना सामाजिक क्षेत्रांतील आपले ध्येय गाठणे अशक्यच होते. ईशान्य भारतातील समाज जीवनात अलौकिक योगदान देणाऱ्या एका सेवाव्रतीला माय होम इंडिया’ या सामाजिक संस्थेतर्फे २०१० सालापासून मुंबईत ‘One India’ पुरस्कार देण्यात येतो. येथ ‘ONE’ हे Our North East या भावार्थाने लघुरुपात घेतलेले आहे. रोख एक लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असते. २०१८ या वर्षीच्या One India पुरस्काराचे मानकरी आहेत, अरिबम ब्रजकुमार शर्मा. दि. २६ नोव्हेंबर, २०१८ सोमवार रोजी शिवाजी पार्क, दादरच्या वीर सावरकर सभागृहात सायंकाळी ५ वाजता नागालँडच्या राज्यपालांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे. My Home India (MHI) च्या या अनोख्या पुरस्काराचं वर्णन ‘शूरा म्ही (MHI) वंदिले’ असंच करावं लागेलं...

 

मूळ लेखक - ओमप्रकाश तिवारी

 

हिंदीतून स्वैर अनुवाद - पराग नेरूरकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@