नक्षलवाद आणि माओवाद यांत कोणताही फरक नाही : कॅ. स्मिता गायकवाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2018
Total Views |

 


नाशिक : “नक्षलवाद आणि माओवाद यात कोणताही फरक नसून दोन्ही एकच आहे. नक्षलवाद ही वनवासींच्या हक्कासाठी लढण्याची चळवळ आहे, असा केवळ एक भ्रम निर्माण केला जात आहे,” असे स्पष्ट मत कॅ. स्मिता गायकवाड यांनी येथे मांडले. त्या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित ‘शहरी नक्षलवादाचे संकट’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी बोलत होत्या. म.वि.प्र. संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे संघचालक डॉ. मधुकर आचार्य उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कॅ. स्मिता गायकवाड म्हणल्या की, “भीमा-कोरेगाव दंगल झाल्यानंतर ‘शहरी माओवाद’ हा विषय पुढे आला. माओची हिंसक विचारसरणी पुढे आणण्यासाठी आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. या रणनीतीनुसार हिंसक पद्धतीने सत्ता स्थापन करण्यासाठी माओवादी संघटना कार्यरत असतात.” यावेळी त्यांनी याच्या पुष्ट्यर्थ सविस्तर असे एल्गार परिषदेचे आरोपपत्रच उपस्थितांसमोर सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केले. तसेच, त्यांनी यावेळी पुराव्यानिशी ‘सीपीआय’ ही दहशतवादी संघटना असल्याचे सांगितले. एल्गार परिषदेच्या आयोजनावर अधिक आणि सविस्तर प्रकाशझोत टाकताना कॅ. गायकवाड म्हणाल्या की, “भीमा-कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियान या नावाने सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी एल्गार परिषद आयोजित केली होती. या माध्यमातून त्यांनी तेथे हिंसक कृत्य घडविण्याची आखणी आधीच केली होती.” यावेळी त्यांनी उपस्थितांना एल्गार परिषदेच्या आयोजनाची व त्यामागच्या भूमिकेची सविस्तर माहिती दिली. तसेच, याबाबत सत्यशोधक समितीने केलेले कार्य व प्रकरणामागची सत्यता कशी शोधली याची सविस्तर मांडणी आपल्या सादरीकरणाद्वारे केली. या परिषदेच्या माध्यमातूनच ‘नवी पेशवाई’ हा शब्द पहिल्यांदाच समोर आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली माओनी अनेकांची हत्या केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे सांगताना त्यांनी माओवाद्यांच्या हिंसक कृत्यांची सविस्तर माहिती दिली.

 

कबीर कला मंचाबद्दल मत मांडताना कॅ. गायकवाड म्हणाल्या की, ती एक माओवादी फ्रंट संघटना आहे, असे लोकसभेतदेखील जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी सुरेंद्र गडलिंग याचा माओवादी कारवायांत सहभाग असल्याचे सांगून त्याला त्याबद्दलच अटक करण्यात आली,” असे सांगितले. रिपब्लिकन पॅन्थरचा माओवादाशी कसा संबंध आहे, हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “रॅडिकल आंबेडकर या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. हा वर्ग राज्यघटना मानत नाही. हा वर्ग नवीन राज्यघटनेसाठी अग्रेसर आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. सुधीर ढवळे यांच्याबाबत आपली भूमिका मांडताना त्या म्हणाल्या की, “तो स्वतःला आंबेडकरवादी म्हणवितो. मात्र, कोणताही आंबेडकरवादी समर्थन करूच शकत नाही. त्यामुळे सुधीर ढवळे आंबेडकरवादी कसे असू शकतील,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “स्वतःला आंबेडकरवादी म्हणविताना ढवळे माओच्या व्यासपीठावर काय करतो,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी हर्षाली पोतदार हिचा माओवादातील सहभाग व तिला अटक केली असता तिला सोडविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी कसे प्रयत्न केले, याबाबतदेखील भाष्य केले. कबीर कला मंचबाबत पुढे बोलताना त्यांनी गोपी, संतोष कांबळे यांच्या माओवादी कार्यातील सहभागाबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी कॅ. गायकवाड यांनी शौर्य प्रेरणा दिन कसा आखला गेला याबाबत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, “ज्यांनी भीमा-कोरेगाव येथील कार्यक्रम आखला होता, ते प्रमुख आयोजक तेथे त्या दिवशी गेलेच नव्हते. त्या दिवशी जिग्नेश मेवानी व त्या सहा इतर संबंधित लोक हे माजी न्यायाधीश बी.जे. कोळसे-पाटील यांच्या निवास्थानी होते. भीमा-कोरेगाव येथील दंगल ही नियोजित होती,” याचे पुराव्यानिशी सादरीकरण गायकवाड यांनी याप्रसंगी केले. यावेळी त्यांनी भीमा-कोरेगाव येथे छापण्यात आलेल्या पत्रात शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लिखाण कसे केले गेले. याबाबतदेखील भाष्य केले. तसेच, एटीएस, सीबीआय व रॉ यांच्या कार्यावरील समाजाचा विश्वास कसा उडेल आणि त्यांच्या कार्यवाहीबाबत संभ्रम कसा निर्माण होईल, असे कृत्य करणे ही माओची कार्यपद्धती असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी ‘मीटू अर्बन नक्षल’बाबत बोलताना सांगितले की, “केवळ गैरसमज आणि विषयाची सखोल माहिती नसल्याने काही लोक यात अडकले आहेत.” यावेळी त्यांनी ‘फोर्थ जनरेशन वॉर’बाबत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, “यात शत्रू अदृश्य असतो. या नीतीअंतर्गत लोकांच्या मनावर आणि बुद्धीवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.”

 

शहरी माओवाद कसा निर्माण झाला याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच, कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांसाठी प्रकाश आंबेडकर कसे पुढे आले हे सांगून त्यांनी भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली. तसेच शहरी माओवाद हा ७०च्या दशकात सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी जी. एन. साईबाबा यांचा सहभाग, अनुराधा गांधी यांचा सहभाग, आनंद तेलतुंबडे व प्रकाश आंबेडकर यांचे नातेसंबंधदेखील स्पष्ट केले. तसेच, शहरी माओवादात बुद्धिवादी व शिक्षित समाज सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोंडापल्ली सीतारामय्या व कोबाद गांधी यांच्या आंध्र भेटीनंतर महाराष्ट्रात नक्षलवाद आल्याचे सांगितले. वरवरा राव याच्या पीपल्स वॉर ग्रुपबद्दलदेखील त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच, वनवासींचे भले करण्यासाठी माओवादी दंडकारण्यात गेले नाहीत, हे सांगताना त्यांनी माओवादी कार्यपद्धतीची माहिती दिली. ‘स्टार्ट’ या संघटनेच्या यादीत पाचव्या क्रमांकावर सीपीआयचा कोरडीनेट हल्ला करणाऱ्यांच्या यादीत दहशतवादी संघटना म्हणून उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी मानवाधिकार कार्यकर्ते केवळ माओवादी निधन पावला की जागे होतात, असे सांगून त्याचा खरपूस समाचार घेतला. तसेच, माओवादी विकास कामात अडथळे आणत असल्याचे सांगितले. तसेच, माओवादी मानावाधिकारचे कसे हनन करतात, याबाबतदेखील भाष्य केले. याप्रसंगी डॉ. आचार्य म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय आत्मीयतेने आणि शुद्ध मनाने जनजाती समाजाला उन्नतकार्यासाठी कार्य केले आहे. देशविघातक कृत्यांचे प्रश्नदेखील सोडविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तरीही आमच्या कार्याला कायमच विरोध केला गेला.

 

१९८२-८३ मध्ये नक्षलवाद हा विषय सुरू झाला. आजमितीस त्याने मोठे स्वरूप धारण केले आहे. विदर्भात नक्षलवादाचे चटके सहन करावे लागत आहे.” नक्षलग्रस्त भागात सरकारी कामासाठीदेखील तेथील सरकारी अधिकाऱ्यांना कशा अडचणी येतात व त्या दूर करण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, याचे त्यांनी यावेळी सोदाहरण स्पष्टीकरण दिले. तसेच, रा. स्व. संघ याकामी करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भीमा-कोरेगावमुळे नक्षलवादी समोर आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना किरण शेलार यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ची भूमिका मांडली. तसेच शहरी नक्षलवादाबद्दलदेखील यावेळी त्यांनी भाष्य केले. तसेच, अश्लीलतेला चालना देणारे, असामाजिक, राष्ट्रहित न जोपासणाऱ्या आणि राष्ट्रविरोधी कृत्यांना थारा देणाऱ्या विचारांना दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये स्थान नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर, रा. स्व. संघाचे शहर व ग्रामीण भाहगातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला नाशिकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

माओवाद्यांनी पांघरला आंबेडकरवादाचा मुखवटा

 

“दलित बांधव माओवादी नाहीत, तर माओवादीच दलित बांधवांना लक्ष्य करतात. आंबेडकरवादाचा खोटा मुखवटा पांघरून हेच माओवादी समाजात वावरत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो,” असे परखड मत कॅ. स्मिता गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. व्यवस्थेतील त्रुटींमुळे माओला कसा फायदा होतो, हेही त्यांनी सोदाहरण विशद केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@