शेतकरी हा सरकारच्या केंद्रस्थानी : विश्वास पाठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2018
Total Views |



पालघर : “समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जाणारा शेतकरी हाच सरकारच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या देखरेखीखाली महावितरणने शेतकरी हिताच्या योजना हाती घेतल्या आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी तसेच उच्चदाब वीज वितरण प्रणाली अशा महत्त्वाकांक्षी योजना महावितरण राबवत आहे,” असे मत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले.

 

पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे, कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, अधीक्षक अभियंता किरण नायगावकर, प्रवीण परदेशी उपस्थित होते. पाठक म्हणाले की, “उच्चदाब वीज वितरण प्रणाली व मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यात मोलाच्या ठरणार आहेत.

 

गेल्या चार वर्षांत साडेचार लाख शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून जवळपास २ लाख, २५ हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून वीजजोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी सरकारने पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यासोबतच शेतकऱ्यांचे वीजविषयक बहुतांश समस्यांचे निराकरण होणार आहे. सौर कृषिवाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार आहे. अटल सौर कृषिपंप योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा पुरवण्यात येत आहे. एकूणच शेतकरी हा घटक केंद्रस्थानी ठेवून सरकारने हाती घेतलेल्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत मिळणार आहे,” असे पाठक यांनी सांगितले.

 

वीजयंत्रणा अद्यावत करण्यासाठी २४ कोटी

 

पालघर जिल्ह्यातील वीजवितरण यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयाने २४ कोटींचा निधी दिला आहे, अशी माहिती कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे यांनी दिली. या निधीतून उपकेंद्र उभारणी, उपकेंद्रांची क्षमता वाढवणे, रोहित्रांची उभारणी, रोहित्रांची क्षमता वाढवणे, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे जाळे अद्यावत करणे अशी कामे करण्यात येणार आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील वीजग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा महावितरण देऊ शकणार असल्याचे ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@