‘हिंदू दहशतवादा’च्या भ्रामक संकल्पनेची पोलखोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2018
Total Views |


 

तत्कालीन केंद्रीय गृहसचिव आरव्हीएस मणी यांचे दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले आहे. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे. ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ या नावाने हे पुस्तक वाचकांच्या भेटीस येणार आहे. या पुस्तकातून ‘हिंदू दहशतवादही भ्रामक संकल्पना प्रस्थापित करून राजकीय स्वार्थापोटी हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा याला आव्हान देत भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याच्या व्यापक षडयंत्राची पोलखोल केली आहे. पाक पुरस्कृत मुंबईवरील जिहादी दहशतवादी हल्ल्याला उद्या 26 नोव्हेंबर रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त या पुस्तकाचा संक्षिप्त परिचय...

 

‘इस्रो’चे माजी वरिष्ठ वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या बाबतीत नुकतीच उघड झालेली आणि सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेली तथ्ये कोणाही सुजाण व्यक्तीला मुळापासून हादरवून टाकणारी आहेत. राजकीय व्यवस्था स्वार्थप्रेरित झाली की, कोणत्या अधम थराला जाऊ शकते. याचा अत्यंत जळजळीत प्रत्यय या प्रकरणातून येतो. देशद्रोहसदृश्य काम केल्याचा अत्यंत गंभीर आरोप नारायण यांच्यावर करण्यात आला. दोन महिने कोठडीत डांबून त्यांचा अतिशय अमानुष छळ करण्यात आला. त्यानंतरच्या गेल्या तब्बल २४ वर्षांचा काळ कमी अधिक प्रमाणात याच गलिच्छ आरोपाच्या सावटाखाली त्यांना वावरावे लागले. सीबीआय तपासात निर्दोष आढळून आल्यानंतरही २० वर्षे न्यायिक प्रक्रियेचे चक्र फिरतच राहिले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला धारेवर धरत ५० लाख रुपयांचा दंड ठोठावून नंबी नारायण यांना निर्दोष जाहीर केले. तरीही प्रश्न शिल्लक राहतातच. नंबी नारायण, इस्रो यांना खरोखरच न्याय मिळाला काय? दरम्यानच्या काळात या दोन्हींच्या प्रतिमेचे आणि एकूणच जगण्याचे जे धिंडवडे निघाले त्याचे यथार्थ परिमार्जन झाले का? आणि मुख्य म्हणजे हे सारे कारस्थान ज्यांनी अत्यंत बेगुमानरणे रचले, त्या अभद्र प्रवृत्तीच्या बड्या धेंडाना काय शासन झाले? या प्रश्नांचा मागोवा घेण्याची निकड तीव्रतेने पुन्हा जाणवली ती ‘The Myth of Hindu Terror’ हे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक वाचल्यावर. नंबी नारायण प्रकरणाचा रोख केरळच्या राज्य सरकारवर आहे, तर या पुस्तकाने थेट केंद्र सरकारमधील संपुआ राजवटीच्या काळातील अतिशय बलदंड राजकारण्यांच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश केला आहे आणि हे संभावित नेते आजही निर्लज्जपणे सार्वजनिक जीवनात वावरतात.

 

आर. व्ही. एस. मणी या भारत सरकारच्या गृहमंत्रालयात अवर सचिव (अंडर सेक्रेटरी) या नात्याने काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्याने हे पुस्तक लिहिले आहे. इ. स. २००६ ते २०११ या पाच-सहा वर्षांतल्या घटनाक्रमावर आणि त्या संदर्भातील गृहमंत्रालयाच्या कारभार आणि भूमिकेवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला, गुजरातमधील ईशरत जहाँ चकमक प्रकरण, मालेगाव बॉम्बस्फोट, समझौता एक्सप्रेस इ. गंभीर दुर्घटनांचा हा काळ. तसेच अगदी गोध्रा जळीतकांडापासून अनेक दहशतवादी कारवायांच्या प्रकरणातील तपास आणि न्यायिक प्रक्रियाही याच काळात सुरू होती. भारतात सातत्याने घडविण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या मागे पाकिस्तानी व्यक्ती, संस्था, संघटना, गट, लष्कर आणि सरकार या सर्वांचा सक्रिय सहभाग असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करण्याचे निकराचे प्रयत्न याच काळात भारतीय सुरक्षा यंत्रणा करीत होत्या. याच काळात तत्कालीन संपुआ सरकारातील काही बडी धेंडे अत्यंत नादान कारस्थान रचण्यात मग्न होती. या बाबतचा जवळून घेतलेला अनुभव अनेक कागदपत्रांच्या आधारे मणी यांनी आपल्या पुस्तकात वर्णन केला आहे.

 

या कारस्थानाच्या अंतर्गत २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यासह विविध दहशतवादी घटनांच्या तपासातील निष्कर्ष दडवून ठेवण्याचे, तपासाची दिशाच बदलून टाकण्याचे आणि आपल्याला हवे ते निष्कर्ष प्रस्थापित करण्यासाठी तपास आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याचे दु:साहस या मंडळीनी केले. अस्सल तपासावर आधारलेली प्रतिज्ञापत्रे बदलण्यास सरकारी अधिकाऱ्यांना भाग पाडण्याचा प्रयत्न झाला. ज्यांनी हे दुष्कर्म करण्यास नकार दिला, त्यांचा विविध प्रकारे छळ करण्यात आला. या सर्व दुराचारामागे हेतू होता तो ‘हिंदू दहशतवाद’ नामक भ्रामक संकल्पना प्रस्थापित करून हिंदुत्ववादी संस्था आणि व्यक्ती यांना बदनाम करण्याचा डाव. अत्यंत क्षुद्र आणि बटबटीत राजकीय स्वार्थापोटी आपण करीत असलेल्या या उपद्व्यापामुळे देशाच्या सुरक्षेला नख लावणाऱ्या शक्ती आणि प्रवृत्तींना खतपाणी घातले जाते, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा अकारण मलिन होते, पाकिस्तानच्या कांगाव्याला भारताच्या ‘अधिकृत’ सूत्रांकडूनच दुजोरा दिला जातो, याचीही तमा या बेदरकार नेत्यांनी बाळगली नाही. केंद्रीय गृहखाते या काळात सांभाळणारे (?) शिवराज पाटील, चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री अंतुले, मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्यासारख्या राजकीय धेंडांपासून महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या तत्कालीन संयुक्त सचिव चित्कला झुत्शीसारख्या उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका याकामी कशी संशयास्पद राहिली याचे अत्यंत विदारक वर्णन आर. व्ही. एस. मणी यांनी आपल्या या पुस्तकात केले आहे.

 

स्वत: मणी यांना व्यक्तिश: भरपूर त्रास या काळात सोसावा लागला. सर्वात कहर म्हणजे त्यांचे अपहरण करून, त्यांना पाकिस्तानात नेऊन त्यांच्या मोबदल्यात अजमल कसाब या क्रूरकर्म्याची सुटका करून घ्यावी असेही कारस्थान रचण्यात आले. (सुदैवाने मणी वेळीच सावध झाल्यामुळे ते यशस्वी झाले नाही.) ईशरत जहाँ प्रकरणात आपल्याला हवे तसे प्रतिज्ञापत्र तयार करण्यास नकार दिल्यामुळे मणी यांच्यामागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. चौकशीच्या नावाखाली सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांच्या वयोवृद्ध आईवडिलांसमक्ष मणी यांचा जो छळ केला त्याच्या धक्क्याने त्या दोघांचाही क्रमाक्रमाने मृत्यू झाला. उद्या २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवरील हल्ल्याला दहा वर्षे होत आहेत. भारताच्या विविध भागांत, विशेषत: जम्मू-काश्मीरच्या क्षेत्रात थैमान घालण्याचे प्रयत्न फुटीर गटांकडून सुरूच आहेत; तर देशांतर्गतही फुटीरतेला चालना देण्याचा प्रयत्न अस्तनीतील निखाऱ्यांकडून चालूच आहे. एका परीने देशहितैषी आणि देशविरोधी यांच्यातील द्वंद्व कळसाला पोहोचले आहे. अशा स्थितीत देशविरोधी शक्ती-प्रवृत्ती कोणत्या थराला जाऊ शकतात, याची चुणुक दाखविणाऱ्या या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ या नावाने लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकाच्या मराठी रूपांतराचे कसे स्वागत होते, हे पाहण्यासारखे आहे.

 

पुस्तकाचे नाव : दि मिथ ऑफ हिंदू टेरर

लेखक : आर. व्ही. एस. मणी

मराठी अनुवाद : अरुण करमरकर

प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे

(अधिक माहितीसाठी संपर्क : 9321259949 / 9969496634

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@