अपराधाने माखलेला पंजा तर नाही ना?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |


न्यायालयानेदेखील अमित शाह यांना पाण्यात पाहणार्‍यांची कारस्थाने उघड केली. आताचा राहुल गांधी यांचा आरोपदेखील याच सोहराबुद्दीन प्रकरणातला असून हाही अमित शाह यांना संपविण्यासाठीचा डावच असल्याचे स्पष्ट होते. पण राहुल गांधी असो वा काँग्रेस वा अन्य कोणी, त्यांनी हे नक्कीच लक्षात ठेवावे की, असत्याला सत्याचा अंगरखा घालून जनतेसमोर कितीही वेळा पेश केले तरी त्याचे वस्त्रहरण होतच असते.

 

इतिहासात हिटलरच्या गोबेल्स नामक सहकार्‍याची खोट्याला खरे ठरविण्याची नीती चांगलीच (कु)प्रसिद्ध आहे. सध्या या नीतीचा अवलंब करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या बेछूट बडबडीचा वारू जिथे तिथे उधळलेला दिसतो. नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर असलेल्या आणि रा. स्व. संघ बदनामीप्रकरणी भिवंडी न्यायालयात हेलपाटे मारणार्‍या राहुल गांधींनी नुकतीच आपल्या तोंडाची टकळी मोकाट सोडत भाजप व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर बेताल आरोप केले. शेंडा बुडखा नसलेल्या अफवा उडवायच्या आणि आपण सर्वज्ञानी असल्याचे भासवायचे, हा राहुल गांधी यांचा शिरस्ता. त्यालाच अनुसरून राहुल गांधींनी गुजरातच्या सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील तुलसीराम प्रजापती या साक्षीदाराची हत्या अमित शाह यांच्याच सांगण्यावरून झाल्याचे आणि शाह हेच या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले. शिवाय हत्येचा सूत्रधार राष्ट्रीय अध्यक्ष असणे हे भाजपच्या परंपरेला साजेसे असल्याचे विधानही त्यांनी केले. राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे ईश्वराने बोलण्यासाठी तोंड दिल्याने ‘उचलली जीभ अन् लावली टाळ्याला’ ही म्हण खरी करून दाखवणारेच.

 

तुलसीराम प्रजापती मृत्युप्रकरणात संदीप तमगाडगे यांनी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तमगाडगे यांनी आपल्या याचिकेत वरील दावा केला असून त्यावर अजून सुनावणी होणे बाकी आहे. पण त्याआधीच मोदी सरकारच्या सर्वांना सोबत घेऊन व थेट जनतेशी नाळ जोडण्याच्या कामाने बिथरलेल्या राहुल गांधींनी अमित शाह यांनीच तुलसीराम प्रजापतीची हत्या केल्याचा निकालही देऊन टाकला. राहुल गांधी यांच्या या बरळूपणाला तमगाडगे यांची याचिका जितकी कारणीभूत ठरली तितकेच याप्रकरणी डाव्या विचारांवर पोसलेल्या एका संकेतस्थळाने छापलेले वृत्तदेखील. एका संकेतस्थळावरील वृत्ताला सत्य समजून राहुल गांधींनी हा शहाणपणा केला. पण त्याआधीच कितीतरी सुपारीबाज पत्रकारांच्या लिखाणामुळे आपली बेअब्रू झाल्याचे राहुल गांधी विसरले. याआधी निरांजनातले तेल संपल्याने विझू लागलेल्या एकाने न्या. लोया यांच्या मृत्यूत अमित शाह यांचाच हात असल्याचे खरडले होते. राहुल गांधींनीदेखील या लेखातला शब्द न् शब्द जणू काही ब्रह्मवाक्य असल्याचे प्रमाण मानून अमित शाह यांच्यावर आरोपबाजी केली. पण कोणत्याही पुराव्याविना लिहिलेल्या या लेखाला आणि त्यातील आरोपांना प्रत्यक्ष लोया यांच्या कुटुंबीयांनी आणि नंतर न्यायालयानेही उडवून लावले. पण न्यायालयाच्या हातोड्याने थोबाड फुटले तरी या महाभागांनी आपला विरोधाचा सूर तसाच चालू ठेवला. हे म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’सारखेच!

 

दुसरीकडे राहुल गांधी यांनी कालपरवाच्याच एका प्रचारसभेत स्वा. सावरकरांवर भलते-सलते आरोप केले. स्वातंत्र्यलढ्यात आमचे पूर्वज ब्रिटिशांविरोधात लढत असताना अंदमानाच्या तुरुंगात बंदी असलेले सावरकर इंग्रजांपुढे माफी मागत होते, असे राहुल गांधींनी ठोकून दिले. इतिहासाचा मेंदूशी आणि अभ्यासाशी काडीचाही संबंध नसला की, ही असली सूर्यावर थुंकण्याची थेरं सुचतात. राहुल गांधींच्या या उद्योगालाही साथ होती ती असत्याच्या पायावर आधारलेल्या एका नियतकालिकातील लेखाची आणि हा लेखही त्याच व्यक्तीचा होता, ज्याने लोया मृत्युप्रकरणी अमित शाह यांना दोषी ठरवले होते. म्हणजेच कोणीही कुठूनतरी उचलेगिरी करायची, काहीतरी लिहायचे आणि राहुल गांधींनी कसलाही विचार न करता, त्यावर विश्वास ठेवून त्याचा आपल्या राजकारणासाठी वापर करायचा, अशी ही पद्धती. यावरूनच खोटारडेपणाचे दुसरे नाव म्हणजे राहुल गांधी, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. अशा इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे म्हणजे ‘साखरेची चव कडू असते’, असे म्हणण्यासारखे. अर्थात घराण्याची गुलामगिरी करण्यात ज्यांची हयात गेली, ते राहुल गांधींच्या शब्दांवर विश्वास ठेवतीलच. कारण त्यावरच तर त्यांच्या राजकारणातल्या गढ्या टिकलेल्या आहेत ना!

 

सोहराबुद्दीन शेख मृत्युप्रकरणी याआधी २०१४ सालीच अमित शाह यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. ३० डिसेंबर, २०१४ रोजीच्या आपल्या निकालपत्रात विशेष सीबीआय न्यायाधीश एम. बी. गोसावी यांनी, “अमित शाह यांना सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात गोवण्यामागे राजकीय कारणे आहेत,” असे म्हटले होते. म्हणजेच न्यायालयानेदेखील अमित शाह यांना पाण्यात पाहणार्‍यांची कारस्थाने उघड केली. आताचा राहुल गांधी यांचा आरोपदेखील याच सोहराबुद्दीन प्रकरणातला असून हाही अमित शाह यांना संपविण्यासाठीचा डावच असल्याचे स्पष्ट होते. पण राहुल गांधी असो वा काँग्रेस वा अन्य कोणी, त्यांनी हे नक्कीच लक्षात ठेवावे की, असत्याला सत्याचा अंगरखा घालून जनतेसमोर कितीही वेळा पेश केले तरी त्याचे वस्त्रहरण होतच असते. सोबतच राहुल गांधी यांनी आणखी एक आरोप केला तो म्हणजे हत्येचा आरोपी पक्षाचा अध्यक्ष होणे, ही भाजपची परंपरा असल्याचा! पण राहुल गांधींनी असे बिनबुडाचे आरोप करण्याआधी आपल्या बापजाद्यांची आणि स्वतःची करणी काय आहे, तेही तपासावे. भाजप आणि पूर्वाश्रमीच्या जनसंघाची परंपरा हत्या करण्याची नव्हे तर अध्यक्षांची हत्या होण्याची आहे. स्वातंत्र्याच्या सुरुवाती-सुरुवातीलाच जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरला उर्वरित भारतापासून वेगळे पाडणार्‍या तरतुदींविरोधात आघाडी उघडली. आपली भूमिका जनतेला समजावून सांगण्यासाठी मुखर्जी काश्मीरला गेले असता, त्यांना अटक करण्यात आली व तुरुंगातही ठेवले गेले. देशाच्या एकता आणि अखंडतेच्या तळमळीने काश्मीरच्या जमिनीवर पाय रोवणार्‍या या नेत्याचा नंतर तुरुंगातच संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. केंद्रात काँग्रेसचे सरकार असल्याने अर्थातच त्यांच्या मृत्यूची ना चौकशी झाली ना पोस्टमार्टम! ती हत्या कोणी केली, हा प्रश्न अजूनही देशातल्या जनतेला सतावतो. एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते आणि जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूचेही तसेच. उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर असलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत तत्कालीन मुघलसराय रेल्वेस्थानकात आढळला. पण त्याचीही पुढे कोणतीही चौकशी वा तपास झाला नाही. पंडितजींच्या मृत्यूचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही.

 

दुसरीकडे सोनिया गांधी यांच्या राजकारणातील आगमनावेळी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यावरुनही बरेच काही बोलले जाते. आज राहुल गांधी अमित शाह यांच्यावर तुलसीराम प्रजापतीच्या हत्येत सहभागी असल्याचे खोटेनाटे आरोप करतात. उद्या जर राहुल गांधी यांचे अमित शाह यांच्यावरील आरोप खरे मानायचे म्हटले तर सोनिया गांधी राजकारणात सक्रिय होतेवेळी ज्या घटना घडल्या आणि त्यानंतर सोनिया गांधींचा त्या घटनांशी संबंध जोडत निरनिराळे आरोप करण्यात आले, त्यावरही विश्वास ठेवावा लागेल. इतरांवर बेभान होऊन आरोप करत असताना आपला वा आपल्या मातोश्रींच्या हाताचा पंजा अपराधाने माखलेला नाही, हेही राहुल गांधींना पाहावे लागेल. कारण एका बाजूने आरोप झाले की, दुसर्‍या बाजूने सोनिया गांधी असो वा राहुल गांधी, यांच्यावर आरोप व त्या आरोपांची चर्चा ही होणारच आहे. शिवाय जे माय-लेक आज स्वतःच ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत, त्यांनी न्यायाच्या लंब्याचौड्या बाता मारणे, ही न्यायाचीच थट्टा नव्हे काय?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@