मांगरुळच्या जाळपोळप्रकरणी वनाधिकार्‍यांची चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |
 

अंबरनाथ : मांगरुळ परिसरातील वृक्षांच्या जाळपोळीचे प्रकरण सध्या चांगले तापले आहे, एकीकडे वनाधिकार्‍यांवर राख फेकल्याप्रकरणी खा. श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढल्या असताना, आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ही चौकशी करावी, याचे निर्देशही यावेळी मुनगंटीवारांनी अधिकार्‍यांना दिले.

 

सलग दोन वर्ष अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथील वनक्षेत्रातील वृक्षांना वणव्याची झळ बसली आहे. याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांनी या जाळपोळीला वनविभागच जबाबदार असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी चौकशीचे आदेश तात्काळ द्यावे, असे सांगितल्यानंतर मुनगंटीवारांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले. या आदेशानुसार आगीची चौकशी करण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांची नियुक्त केली आहे. या चौकशीत अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

या निकषांवर होणार चौकशी

 

आगीचे मुख्य कारण काय, ही आग कोणी लावली आणि आग हेतुपुरस्सर लावण्यात आली किंवा कसे, रोपवनाचे एकूण क्षेत्र किती होते, लागवड केलेल्या रोपांची एकूण संख्या, जिवंत रोपांची संख्या, आगीमुळे किती रोपांचे नुकसान झाले, झळ बसलेल्या रोपांपैकी किती रोपे जगतील, किती रोपांचे नव्याने रोपण करावे लागणार, वृक्षारोपणामध्ये त्रुटी होत्या का, या क्षेत्रात कितीवेळा आग लागली, त्यासंदर्भात दाखल झालेले गुन्हे, अटक आरोपींची संख्या आणि त्यांची नावे, आगीपासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा तपशील आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी करावे लागणारे उपाय, या मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुनगंटीवारांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@