.एका मिशनरीजची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
गेल्या आठवड्यातील घटना आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूहातील उत्तर सेंटिनल बेटावर 26 वर्षीय जॉन अॅलन चाऊ नावाच्या एका अमेरिकन पर्यटकाची तिथल्या स्थानिक सेंटिनिलीज जमातीने विषारी बाण सोडून हत्या केली. सर्वांनाच वाईट वाटले. अमेरिकेतील पर्यटक जीव धोक्यात टाकून नवनव्या ठिकाणी मोठ्या धाडसाने जात असतात. अशात जर त्यांची कुणी हत्या केली, तर ते किती दु:खदायक आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आली असेल. परंतु, या घटनेच्या थोडे खोलात जाऊन बघितले पाहिजे.
 
 
अंदमानच्या या सेंटिनल बेटावर बाहेरच्यांना प्रवेश नाही. हे काही पर्यटनस्थळही नाही. या बेटावर राहणार्या सेंटिनिलीज जमातीला बाहेरच्या जगातील लोकांकडून व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. कारण या जमातीचे लोक अजूनही आदिम अवस्थेत राहतात आणि त्यांच्यात या व्हायरसचा प्रतिकार करण्याची क्षमता नाही, असे मानले जाते. सेंटिनिलीज जमात बाहेरच्या व्यक्तीला बेटावरच नाही, तर बेटाच्या आसपासही येऊ देत नाही. 2004 सालच्या त्सुनामीच्या वेळी या लोकांना मदत करण्यासाठी गेलेल्या नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनादेखील या लोकांनी येऊ दिले नाही. हेलिकॉप्टरवर बाणांचा वर्षाव करून त्याला माघारी परतायला लावले होते. अशा स्थितीत हा जॉन चाऊ तिथे गेलाच कशाला, असा प्रश्न उपस्थित होतो.
भारतातल्याच काय, पण जगभरातीलही सर्व वृत्तसंस्थांनी ‘एका अमेरिकन पर्यटकाची हत्या’ याच शीर्षकाची बातमी दिली आहे. अपवाद फक्त अल् जजिरा वृत्तसंस्थेचा आहे. या वृत्तसंस्थेने ‘अंदमान बेटावरील नाशाच्या काठावर असलेल्या जमातीने अमेरिकन मिशनरीजची हत्या केली’ असे शीर्षक देऊन बातमी दिली आहे. जॉन चाऊ हा नि:संशय ख्रिश्चन मिशनरी होता. या बेटावरील सेंटिनिलीज जमातीला ख्रिश्चन करण्याच्या उद्देशानेच तो तिथे जात होता. या आधीही तिथे जाण्याचा त्याने एक-दोनदा प्रयत्न केला होता. परंतु, या प्रयत्नात मात्र त्याला जीव गमवावा लागला. या सर्व घटनाक्रमावरून काही प्रश्न मात्र निश्चितच उभे होत आहेत.
 
 
जॉन हा ख्रिश्चन मिशनरी होता तर, त्याला अंदमानच्या या प्रतिबंधित बेटावर जाण्याची परवानगी कुणी दिली? भारताची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, गुप्तचर खाते, केंद्रीय गृह मंत्रालय झोपी गेले होते काय? केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असते, तर समजता आले असते. पण, आता तिथे भाजपाचे सरकार आहे आणि तरीही भारतात ख्रिश्चन मिशनरीजना खुलेआम धर्मांतर घडवून आणण्याचे स्वातंत्र्य कसे काय मिळते? ही हिंमत त्यांना कुठून येते? याचा अर्थ, केंद्रातील भाजपा सरकारचा या लोकांवर कुठलाही धाक उरलेला नाही, असा घ्यायचा काय? मीडियाने तर ठरवून, जॉन चाऊची खरी ओळख लपवून ठेवली. अरबस्तानातील अल् जजिरा वृत्तसंस्थेला जर जॉन चाऊची खरी ओळख माहीत होत असेल, तर भारतीय मीडियाला ती का कळू नये? भारताच्या एखाद्या कोपर्यात कथित गोरक्षकांच्या हल्ल्यात कुणी मरण पावला तर त्याची जात, धर्म सर्व काही तत्काळ बाहेर येते. मग जॉन चाऊच्या बाबतीत असे का घडले नाही? हा नुसता विचारणीय नाही, तर चिंतनीय मुद्दा आहे.
 
 
जॉन चाऊला तिथपर्यंत नेणार्या सात मासेमारांना अंदमान पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती स्थानिक पोलिस प्रमुख दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे. याने कुणाचेच समाधान होणारे नाही. या आधीही तो एक-दोनदा या प्रतिबंधित बेटाकडे जाऊन आला होता. तेव्हा पोलिस झोपले होते का? 14 नोव्हेंबर रोजी मासेमार्यांच्या टोळीत जॉन सेंटिनल बेटाकडे जाण्यास निघाला. भारतीय तटरक्षक दलाला आपण दिसू नये, यासाठी तो या मासेमार्यांच्या टोळीत लपला होता. या बेटापर्यंत नेण्यासाठी जॉनने स्थानिक मासेमारांना 25 हजार रुपये दिले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 15 नोव्हेंबरला पहाटे सेंटिनल बेटाजवळ आल्यावर मासेमारांनी जॉनला एकटे सोडले आणि 17 तारखेला समुद्रात एका विशिष्ट ठिकाणी येऊन भेटण्याचे ठरवून ही मासेमारमंडळी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली. दुसर्या दिवशी हे मासेमार तिथे गेले असता, त्यांना दुरून किनार्यावरील वाळूत एखादे प्रेत पुरले असल्याचे दिसले. बाजूला कपडे वगैरे पडले होते. त्यावरून जॉनची हत्या झाल्याचा तर्क या मासेमारांनी काढला आणि पोर्ट ब्लेअरला जाऊन ही माहिती जॉनचा स्थनिक मित्र अलेक्झांडरला दिली. अलेक्झांडरने जॉनच्या कुटुंबीयांना कळविले. परंतु, पोलिस अथवा स्थानिक प्रशासनाला कुणी कळविले नाही. नंतर चेन्नईतील अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाचा एक ई-मेल अंदमान पोलिसांना मिळाला. त्यावरून पोलिसांनी, जॉन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांना हे समजल्यावर, 20 नोव्हेंबरला त्यांनी भारतीय तटरक्षक दलाची मदत घेऊन या बेटाची रेकी केली. 21 तारखेला पोलिसांनी तटरक्षक दलाच्या विमानाने या बेटाची पुन्हा रेकी केली. यावेळी त्यांच्यासोबत अंदमान आदिम जनजाती विकास समितीचे काही कार्यकर्तेही होते. त्यांनी घटनास्थळ शोधून काढण्यात यश मिळविले. परंतु, अजूनही जॉन याचे शव पोलिसांना मिळालेले नाही. कारण, तिथपर्यंत कुणी जाऊ शकले नाही.
जॉन चाऊची हत्या झाली नसती, तर त्याचे या बेटावर वारंवार जाणे सुरूच राहिले असते (कारण जॉन 16 ऑक्टोबरपासून अंदमानात होता) आणि त्याला तिथे जे काही (म्हणजे धर्मांतर) करायचे, ते तो करून चुकला असता, असा आरोप जर कुणी पोलिसांवर आणि पर्यायाने केंद्रीय गृह खात्यावर करत असेल, तर त्याला चूक म्हणता येणार नाही. ख्रिश्चन मिशनरीजचा भारतातील दुर्गम स्थानी जाण्याचा जो प्रयत्न असतो, तो हलक्याने घेण्यासारखा नाही आहे. तिथे ते काय व कसे कार्य करतात, हे समजून घ्यायचे असेल, तर नॉर्मन लुईस यांचे ‘द मिशनरिज : गॉड अगेन्स्ट द इंडियन्स’ हे पुस्तक वाचावे. त्यात मध्य-दक्षिण पॅसिफिक महासागरातील ताहिती बेटाची कहाणी वाचण्यासारखी आहे. सध्या फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या या बेटावर आधी ताहितीयन जमातीचे लोक राहात होते. ख्रिश्चन मिशनरीजनी या जमातीला ख्रिश्चन बनविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु, त्यात यश येत नव्हते. शेवटी जे. एस. ओर्समॉण्ड या मिशनरीजला यश मिळाले. या बेटावर या जमातीचा एक प्रमुख होता. त्याला पोमार म्हटले जायचे. हा दारुड्या होता. त्याच्या नशेखोरीचा फायदा ओर्समॉण्डने उचलला. इतर बेटांवरील जमातप्रमुखांशी पोमारचे नेहमी युद्ध होत असे. एका युद्धात ओर्समॉण्डने या पोमारला पाठबळ दिले. अट एकच की, विजय मिळाला तर ख्रिश्चन व्हायचे. आधुनिक शस्त्रास्त्रे मिळाल्याने अपेक्षेप्रमाणे पोमार जिंकला. जिंकल्यानंतर पोमार ख्रिश्चन झाला आणि जमातीतील इतर लोकांचे मग जबरीने धर्मांतर करण्यात आले. या घटनेचे वर्णन करताना जे. एस. ओर्समॉण्डने म्हटले- एक संपूर्ण राष्ट्र एका दिवसात धर्मांतरित झाले!
 
खरेतर ओर्समॉण्डने म्हटल्याप्रमाणे ही जमात एका दिवसात धर्मांतरित झाली नाही. त्यासाठी त्याला अथक परिश्रम करावे लागले. ओर्समॉण्डने तिथल्या गैरख्रिश्चनांना कडक शिक्षा जाहीर केल्या. तिथल्या लोकांना परंपरा पाळणे बेकायदेशीर ठरविले. शरीरावर धार्मिक चिन्हे गोंदविणे आणि सामूहिक नृत्य करणे दंडनीय अपराध ठरविण्यात आला. यामुळे या बेटावरील स्थानिक संस्कृती लयास गेली. हे सर्व 18व्या शतकाच्या शेवटी घडले. आज आपण 21व्या शतकात आहोत.
ताहितीची ही घटना आम्हाला काय शिकवते? दुर्गम भागात जाऊन तिथे वरवर समाजसेवेचे काम करून, तिथली संपूर्ण जमातच्या जमात ख्रिश्चन करण्याचे कारस्थान आजही पूर्ण ताकदीने सुरू आहे, हे आम्ही समजून घेतले पाहिजे. धर्मांतर घडवून आणण्यासाठी जॉन चाऊसारखे तरुण मिशनरीज आपल्या प्राणाची पर्वा करत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. घरातल्या सुखासीन वातावरणात धर्मांतर, त्याचे धोके, हिंदू संस्कृती व हिंदू राष्ट्राचे रक्षण इत्यादी मुद्यांवर चर्चा करूनही, लेख लिहिल्याने धर्मांतराचे प्रयत्न थांबलेले नाहीत आणि थांबणारही नाहीत.
@@AUTHORINFO_V1@@