कोणाला हवाय खलिस्तानचा भस्मासुर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
पंजाबातल्या आताच्या घटनांकडे केवळ दोन संप्रदायातील संघर्षाच्या नजरेने न पाहता अधिक व्यापक परिघातून पाहणे गरजेचे ठरते.
 

पंजाबच्या अमृतसर या पवित्र शहरातील आदलीवाल गावात निरंकारी सत्संगात सहभागी झालेल्या लोकांवरील बॉम्बस्फोटाची घटना राज्यातल्या अशांततेची नांदीच म्हटली पाहिजे. कारण, आदलीवाल गावात बॉम्बस्फोट होण्याआधी जालंधरमध्येही अशीच घटना घडली होती. त्याआधी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही पंजाबमध्ये पुन्हा एकदा फुटीरतावादी आणि खलिस्तानवादी शक्ती सक्रिय झाल्याचा गंभीर इशारा दिला होता. मात्र, राज्य सरकारने लष्करप्रमुखांचा इशारा गांभीर्याने न घेतल्याने इतके दिवस दबलेल्या अराजकवादी शक्तींनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले व थेट बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे पंजाब राष्ट्रविरोधी आणि विभाजनवादी कारवायांचे केंद्र झाले होते, तशीच स्थिती आताही होत असल्याचे गेल्या काही दिवसांतल्या घटनांतून दिसून येते. ऐंशीच्या दशकात पंजाबात दहशतवादाने प्रथमतः डोके वर काढले, त्यावेळीही त्यांच्या निशाण्यावर निरंकारी संप्रदायच होता. पण, तेव्हाच्या सरकारने याकडे हा दोन संप्रदायांतील संघर्ष समजून दुर्लक्ष केले, शीख समुदायाच्या भावनांशी खेळण्याचे राजकारण करण्यात आले व त्यातूनच इथे हिंसाचाराचा आगडोंब उसळला. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेनेही या आगीचे रूपांतर वणव्यात करण्यात पुढाकार घेतला. पुढे या वणव्यातच पंतप्रधान इंदिरा गांधींचा बळी गेला. १९८४ सालच्या शीखविरोधी दंगली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळल्या व राजीव गांधींनी “मोठा वृक्ष उन्मळून पडला की, असे होतच असते,” म्हणत या दंगलींना जणू काही समर्थनच दिले. खलिस्तानी दहशतवादाला उखडून फेकण्यासाठी अमृतसरमधील सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू-स्टारचा बदला घेण्यासाठी लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. २०१२ साली लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा गळा आणि जबडा अतिशय वाईट प्रकारे जखमी झाला होता. खलिस्तानी दहशतवादाला नायनाटानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. त्यामुळे पंजाबातल्या आताच्या घटनांकडे केवळ दोन संप्रदायातील संघर्षाच्या नजरेने न पाहता अधिक व्यापक परिघातून पाहणे गरजेचे ठरते.

 

भारताचे अहित चिंतणाऱ्या शक्ती नेहमीच भारतविरोधात कुटील कारस्थाने रचण्यासाठी तत्पर असतात. या कारस्थानांचा पुढचा अंक म्हणावा अशा घटना गेल्या काही दिवसांपासून पंजाबात घडल्या व तिथली स्थिती बिघडविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सातत्याने होत आले. ज्या लोकांना निर्दोष आणि निःशस्त्र लोकांचा बळी घेऊन दहशत आणि द्वेष पसरवायचा आहे, त्याच शक्ती यामागे असल्याचे कोणीही सांगू शकेल. अर्थातच सामाजिक सौहार्द गढूळ करण्याचे मनसुबे बाळगणारे हे लोक देशाच्या आत आणि देशाबाहेरही सक्रीय आहेत. परकीय दहशतवादी संघटनांचा-प्रामुख्याने पाकिस्तानच्या आयएसआयचा यात हात आहे. जम्मू-काश्मिरात भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांचे आणि दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडल्याने त्या देशाला आपली दहशतवादी पिलावळ कुठेतरी अडकवून ठेवणे गरजेचे झाले आहे. कधीकाळी पंजाबात फुटीरतावादी खलिस्तानी चळवळीने धुमाकूळ घातल्याचे सर्वांसमोर आहेच. परिणामी पाकिस्तानला काश्मिरातली कसर इथे भरून काढण्याची आशा निर्माण झाली व यातूनच त्या देशाने आपल्या पिट्ट्यांना पंजाबातले वातावरण बिघडविण्याच्या कामी लावल्याचे दिसते. पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारसभांमध्ये खलिस्तान समर्थनाच्या काही घटना घडल्याचे उजेडात आले होते. आपले राजकीय आणि सामाजिक स्थान बळकट करण्यासाठी राजकीय नेतेमंडळींकडून नेहमीच जनभावनेचा विचार केला जातो. पण, गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पंजाबात आम आदमी पक्षाकडून खलिस्तानच्या मागणीचा विचार केला गेला. शिवाय खलिस्तानवाद्यांना पूरक ठरेल, अशी विधानेदेखील करण्यात आली. एवढेच नव्हे तर काही भागात तशा आशयाची पोस्टर्सही चिकटविण्यात आली. हे नक्कीच धक्कादायक होते. पण, निवडणुका झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारकडून त्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सोबतच यंदाच्याच वर्षी पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धूने पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर बाज्वा यांची गळाभेट घेतली. देशाचे परराष्ट्र धोरण केंद्र सरकार ठरवत असताना भारताला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्या देशाच्या लष्करप्रमुखाच्या भेटीची उठाठेव करण्याची खरे तर सिद्धूला काहीही गरज नव्हती. पण सिद्धूने तसे केले, तरी काँग्रेसने वा अमरिंदर सिंग सरकारने सिद्धूला ना जाब विचारला ना त्याच्यावर काही कारवाई केली.

 

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग खलिस्तानविरोधात बोलताना दिसतात. पण, त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये बरेच अंतर आहे. खलिस्तान चळवळ ही कट्टरवादी ताकदींमुळेच फोफावली. आजही गुरू ग्रंथसाहिबच्या बदनामीवरून पंजाबचे वातावरण ढवळून निघाल्याचे दिसते. असे करण्यात कट्टरतावादी ताकदी आघाडीवर आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग याच ताकदींसोबत उभे राहत असल्याचे अनेकदा दिसून आले. यातूनच सरकार आपल्यासोबत असल्याचा आणि आपण काहीही केले तरी आपल्याला कोणीही अडवू शकत नसल्याचा संदेश या लोकांमध्ये गेला. आताच्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा या सगळ्याच गोष्टींशी संबंध आहे, त्यामुळे काँग्रेसने कितीही दहशतवादविरोधाचा आव आणला तरी त्या पक्षाची भूमिका खरोखरच तशी असेल असे नव्हे. पंजाबमधील धुमसणाऱ्या वातावरणात भर टाकणाऱ्या आणखीही काही घटना नजीकच्याच काळात घडल्या. ‘रेफरन्डम २०२०’ याअंतर्गत राज्यात खलिस्तान समर्थकांनी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला. जगभरात भारताची खराब प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही मंडळी जुंपली. लंडनमध्ये काढलेला मोर्चा त्याचेच निदर्शक. सोबतच ‘बारगरी मोर्चा’ नामक एक चळवळही इथे सुरू आहे. या मोर्चाला परकीय संस्था व संघटनांकडून अर्थपुरवठा केला जातो, ज्यामुळे या चळवळीच्या हेतूवर शंका उपस्थित होऊ लागल्या. शिवाय बारगरी मोर्चाच्या मंचावर देशविघातक लोकांनाही पाहण्यात आले. या मोर्चाला मुस्लीम, अनुसूचित जाती-जमाती आणि काँग्रेसचाही पाठिंबा असल्याचे म्हटले जाते. सोबतच बहुजन क्रांती मोर्चा, मूळनिवासी वाद आणि ब्राह्मण हटाव मोहिमेशीही बारगरी मोर्चाचे घनिष्ठ संबंध आहेत. या चळवळीचा व त्यांच्या कारवायांचा पंजाबची शांतता भंग करण्यात मोठा वाटा आहे. गुरू ग्रंथसाहिबच्या अवमानाचा मुद्दा पुढे करून ही मंडळी पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानच्या भस्मासुराला उभे करू इच्छितात. नुकतीच अल कायदाच्या एका दहशतवाद्याला पंजाबमधून अटक करण्यात आली. तो पंजाबमध्ये हल्ला करण्याच्या व हिंदू नेत्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आला होता. सोबतच गोपाल सिंग चावला हे नावदेखील आताच्या हल्ल्यावरून पुढे आले. या चावलाला कुख्यात दहशतवादी हाफिज सईदबरोबर पाहिले गेले, ज्याची छायाचित्रे आजही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हा पाकिस्तानात राहतो व तो कट्टर खलिस्तानसमर्थक आहे. तपास यंत्रणा त्या दिशेनेदेखील तपास करत आहेत. एकूणच पंजाबमधील सध्याची परिस्थिती सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे स्पष्ट होते. आता ही परिस्थिती आटोक्यात आणायची तर राज्य सरकारसह केंद्र सरकारलादेखील त्यात हस्तक्षेप करावा लागेल. शिवाय देशविघातक ताकदींना दयामाया न दाखवता नेस्तनाबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, तरच पंजाबची दहशतवादाच्या, हिंसाचाराच्या, द्वेषाच्या आणि भितीच्या होरपळीतून सुटका होईल.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@