ई वाहने चार्जिंग स्टेशन प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |




ठाणे : केंद्र सरकारच्या सन २०३० पर्यंत देशातील सर्व वाहने ई-वाहने करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ठाणे शहरात १०० ई चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या सामंजस्य करारावर गुरुवारी ठाणे महानगरपालिका तसेच महिंद्रा अँड महिंद्रा आणि कायनेटिक ग्रीन्स मोबिलिटी प्रा. लि. यांच्या दरम्यान महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या. केवळ ई-चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यापुरताच हा प्रकल्प मर्यादित न ठेवता शहरामध्ये ई वाहने उपलब्ध करून देणे, त्यासाठी लागणारे अर्थसाहाय्य कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणे असा सर्वं योजना राबविणारी ठाणे महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे.

 

महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्यावतीने कन्नन चक्रवर्ती यांनी तर कायनेटिक ग्रीन्सच्यावतीने कार्यकारी संचालक रितेश मंत्री यांनी स्वाक्षरी केली. येत्या जानेवारी महिन्यापासून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशनचे श्री. मुजूमदार, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे आंतरराष्ट्रीय संचलन विभागाचे प्रमुख अरविंद मॅथ्यू आदी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या ई-वाहने धोरणातंर्गत महापालिकेच्यावतीने सप्टेबर २०१७ रोजी ठराव क्र.१०७८ अन्वये शहरात १०० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन उभा करणे, तसेच पुढील १५ वर्षे महापालिकेच्यावतीने संचलन, निगा व देखभाल करण्यासाठी महासभेने मंजूरी दिली आहे. त्याचप्रमाणे जागतिक बँकेशी संलग्न इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशनने युरोपियन युनियन सहाय्यित ईको सिटीज या प्रकल्पातंर्गत आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणेबाबत महापालिकेस मदत केली आहे.

 

महासभेच्या धोरणानुसार पालिकेच्यावतीने पहिल्या वर्षी ई चार्जिंगसाठी येणा-या खर्चाच्या ७५ टक्के अनुदान, दुस-या वर्षी ५० टक्के तर तिस-या वर्षी २४ टक्के अनुदान नागरिकांना दे्यात येणार आहे जेणेकरून ई वाहने धोरणातंर्गत नागरिक ई वाहने घेण्यासाठी प्रोत्साहित होतील. या करारातंर्गत शहरात १०० ईचार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार असून याचा खर्च संपूर्णतः महिंद्रा अँड महिंद्रा तसेच कायनेटिक ग्रीन्स ही कंपनी करणार आहे. मात्र यासाठी लागणारी जागा महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वेळप्रसंगी खाजगी जागा उपलब्ध झाली तर त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. केवळ ई-चार्जिंग पुरताच हा प्रकल्प मर्यादित न ठेवता महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने शहरामध्ये ई वाहने उपलब्ध करून देणे तसेच त्यासाठी कर्ज स्वरूपात अर्थसाहाय्य करणा-या वित्तीय संस्थांसी समन्वय साधने आणि ई-चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देवून शासनाचे धोरण शंभर टक्के यशस्वी करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या ई-चार्जिंग स्टेशनवर वाहने चार्ज करण्यासाठी केवळ या दोन कंपन्यांची मक्तेदारी राहणार नसून कुठल्याही कंपनीच्या वाहनांस या ठिकाणी आपले ई-वाहन चार्ज करण्याची मुभा असणार आहे.

 

भविष्यात प्रकल्पाची कक्षा वाढू शकेल - संजीव जयस्वाल

 

ई-चार्जिंग स्टेशन उभा करण्याचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कार्यकक्षा वाढविण्यासाठी महापालिका हद्दीलगत असलेल्या महापालिकांशी समन्वय साधून महापालिका हद्दीलगत ई-चार्जिंग स्टेशन्स उभा करण्याचा प्रस्ताव खुला असून भविष्यात त्यादृष्टीने प्रकल्पाची आखणी करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले. सदर प्रकल्पाची कार्यकक्षा वाढविल्यामुळे महापालिका हद्दी्च्या बाहेर गेल्यानंतर ई-चार्जिंगमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही असेही श्री. जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@