अॅनास्ताशियाच्या शोधात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



 
  
झारची धाकटी मुलगी अॅनास्ताशिया... तिची तोतया म्हणून गाजलेली अॅना अँडरसन आणि एकूणच या ऐतिहासिक कथानकावरुन झालेली देशविदेशातील चित्रपट आणि नाटकांची निर्मिती याविषयी रंजक माहिती देणारा हा लेख...
 

-बी-सी-डी छोडो, नैनों से नैना जोडो, देखो दिल ना तोडो, आई शाम सुहानी...!’ उंच पट्टीत लताबाईंनी घातलेल्या या टिपिकल हिंदी चित्रपट संगीत हाकेला तब्बल ४६ वर्षं झालीत. ते १९७२ साल होतं. हिंदी चित्रपटांच्या ‘पब्लिकशिट्टी’ (म्हणजे पब्लिसिटी) खात्यांचं एक हातखंडा गणित होतं. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दोन-तीन महिने अगोदरच चित्रपटातल्या गाण्यांची एल. पी. रेकॉर्ड बाजारात आणायची. मुंबईतल्या चाळी, वाड्या आणि कॉलन्यांमधून, बारशापासून बाराव्यापर्यंत ती रेकॉर्ड ठो-ठो बोंबलत राहायची. लोकांना गाणी आवडली, तर चित्रपटही हिट होणार.

 

फेब्रुवारी १९७२ मध्ये मीनाकुमारीचा बहुचर्चित चित्रपट ‘पाकीजा’ प्रदर्शित झाला आणि धाडकन पडला. तो थेटरांमधून काढूनसुद्धा घेण्यात आला. तेवढ्यात मीनाकुमारी मेली. लगेच तो पुन्हा लावण्यात आला आणि मेलेल्या मीनाकुमारीने निर्माता-दिग्दर्शक-लेखक-नवरा जो कमाल अमरोही त्याच्या घरात नोटांच्या राशी लावल्यापण, ते कसंही असलं तरी जमाना राजेश खन्नाचा होता. ‘आराधना,’ ‘कटी पतंग,’ ‘अमर प्रेम,’ ‘आनंद,’ ‘हाथी मेरे साथी’ असे लागोपाठ तुफान लोकप्रिय चित्रपट देणाऱ्या राजेश खन्नाचा ‘दुष्मन’ हा चित्रपट आणि त्यातली गाणी धुमाकूळ घालत होती. क्रिकेटची दुनियाही ढवळून निघाली होती.इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला होता. इंग्लंडचा ताडमाड साडेसात फूट उंच टोनी ग्रेग आणि भारताचा वामनमूर्ती सुनील गावस्कर यांच्या पराक्रम वार्तांनी पब्लिक वेडं झालं होतं. या सगळ्या झगमगाटाला एक काळी किनारही होती. महाराष्ट्रात अत्यंत भीषण असा दुष्काळ पडला होता. शहाणेसुर्ते लोक चिंतेत होते, पण शहरी भागांत याचा मागमूसही नव्हता.

 

आणि अशा वातावरणात दिग्दर्शक मोहन सहगलचा ‘राजा जानी’ हा चित्रपट नोव्हेंबर १९७२ मध्ये प्रदर्शित झाला. एल. पी. म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताबाईंनी गायलेली, ‘ए-बी-सी-डी छोडो’ आणि ‘दुनिया का मेला, मेले मे लडकी’ ही गाणी अगोदरच धुमाकूळ घालू लागली होती. चित्रपटही अर्थातच हिट झाला. काय होतं त्याचं कथानक? दुर्गाबाई खोटे या गोड आजीबाई चक्क राजमाता असतात. त्यांचा मुलगा, सून आणि नात एका अपघातात ठार होतात. पण, राजमातेला असं वाटत असतं की आपली नात राजकुमारी रत्ना जिवंत असली पाहिजे. राजमातेच्या अफाट स्थावर, जंगम मालमत्तेची एकमेव वारस असते राजकुमारी रत्ना. दिवाण गजेंद्रसिंह म्हणजे खलनायक प्रेमनाथ हा नायक राजा म्हणजे धर्मेंद्रला सुपारी देतो. कुठूनही एक बरीशी पोरगी मिळवायची. तिला सर्वप्रकारे प्रशिक्षित करायचं. राजकुमारी रत्ना म्हणून राजमातेसमोर पेश करायचं. मग तिचं आपला पोरगा प्रताप म्हणजे खलनायक प्रेम चोप्रा याच्याशी लग्न लावायचं. म्हणजे राजमातेची अफाट मालमत्ता आपल्या घरात भरायची. नायकाला शन्नो ही एक फटाकडी पोरगी म्हणजे अर्थातच नायिका हेमामालिनी सापडते. तिला प्रशिक्षित करताना तो तिच्या प्रेमात पडतो. मग पुढे टिपिकल हिंदी चित्रपटाप्रमाणे वळणं घेत शेवट गोड होतो.

 

आपल्याकडे नाटककार प्र. ल. मयेकर यांनी याच कथेवर ‘रमले मी’ नावाचं छानसं नाटक लिहिलं होतं. नायक-नायिका म्हणून संजय मोने आणि वंदना गुप्ते, तर आजीच्या भूमिकेत चारुशीला ओक होत्या. चंद्रलेखाच्या मोहन वाघांनी त्यांच्या काहीतरी वेगळं करण्याच्या प्रथेनुसार ३१ डिसेंबर १९८७ च्या रात्री या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग केला होता. ‘रमले मी’ देखील मराठी रंगभूमीवरचं एक लोकप्रिय नाटक ठरलंपरंतु, या दोन्हीचं मूळ होतं ‘अॅनास्ताशिया’ या अत्यंत गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटात. १९५६ साली ‘ट्वेंटीएथ सेंचुरी फॉक्स’ या प्रख्यात हॉलिवुड स्टुडियोने युल ब्रायनर आणि इन्ग्रिड बर्गमन या अव्वल अभिनेत्यांना घेऊन हा चित्रपट काढला होता. राजमाता म्हणजे रशियन सम्राज्ञी मारी हिच्या भूमिकेत होती, तितकीच मातब्बर चरित्र अभिनेत्री हेलन हेस.

 

१९१७ साली रशियात क्रांती झाली. सम्राट झार निकोलस याला पदच्युत करून अलेक्झांडर केरेन्स्की याचं लोकशाही सरकार आलं, पण लेनिन आणि ट्रॉट्स्की यांनी साम्यवादी क्रांती करून लोकशाही सरकार खाली खेचलं. काही काळ लोकशाही सरकारची सेना म्हणजे ‘व्हाईट आर्मी’ आणि लेनिनची साम्यवादी सेना म्हणजे ‘रेड आर्मी’ यांच्यात तुंबळ यादवी युद्ध झालं. रशियात ही अंतर्गत यादवी चालू असताना ब्रिटन-फ्रान्स-रशिया विरुद्ध जर्मनी-तुर्कस्नान यांच्यातलं पहिलं महायुद्ध एकीकडे जोरात चालूच होतं. हळूहळू रेड आर्मीचा जोर वाढत गेला आणि अखेर त्यांनी म्हणजे लेनिन-ट्रॉट्स्कीच्या बोल्शेव्हिक पक्षाने सत्ता हडपली. या काळात झार निकोलस, त्यांची पत्नी अलेक्झांड्रा आणि मुलं अनुक्रमे, ओल्गा-वय १७, ततियाना-वय २१, मारिया-वय १९, अॅनास्ताशिया- वय १७ व मुलगा अॅलेक्सी-वय १३ असे सात जण व चार परंपरागत सेवक अशा एकंदर अकरा जणांना कैद करून ठेवण्यात आलं होतं. रशियाच्या सैबेरियन प्रदेशात उरल पर्वताच्या पायथ्याशी येकॅतेरिनबर्ग नावाच्या शहरात त्यांना ठेवलेलं होतं.

 

राज्यक्रांती ही गोष्ट युरोपला नवीन नव्हती. अशा राज्यक्रांतीत राजाला किंवा फार तर राजा-राणीला ठार केलं जात असे. पण, मुलांना अन्य देशांमध्ये राजकीय आश्रय घ्यायला सोडून दिलं जात असे. पण, राजे-सरदार-सरंजामदार इत्यादी प्रस्थापित वर्गाविरुद्ध खवळून उठलेल्या श्रमिक-कष्टकरी-शोषित-वंचित यांच्या साम्यवादी सरकारला म्हणजे लेनिन ट्रॉट्स्कीला हे मान्य नव्हतं. त्यामुळे १६ जुलै १९१८ ची मध्यरात्र उलटल्यावर रेड आर्मीचे हौशी मारेकरी झारच्या निवासात घुसले आणि त्यांनी झार, झरीना, पाच मुलं, चार नोकर अशा अकरा माणसांना सरळ गोळ्या घातल्या. हे हौशी मारेकरी इतके उत्तेजित झाले होते की, त्यांना समोरच्या निःशस्त्र लोकांवर नीट गोळ्यादेखील झाडता येईनात. झार ताबडतोब मेला, पण उरलेले लोक किंचाळत विव्हळत, रक्त गाळत, दयेची याचना करत वीस मिनिटं तळमळत होते. अखेर त्या हौशी लोकांनी बायोनेटं भोसकून त्यांना ठार केलं. मग त्यांची प्रेतं एका उघड्या ट्रकमध्ये टाकून शहरापासून १०-१५ किमीवर कोपत्याकी नावाच्या जंगलात नेण्यात आली आणि एका दलदलयुक्त खड्ड्यात फेकून देण्यात आली. अनेक शतकं रशियावर अप्रतिहत सत्ता गाजवणारं रोमानोव्ह हे राजघराणं संपलं.

 

१९२० साली जर्मन राजधानी बर्लिनमधल्या एका वेड्यांच्या हॉस्पिटलात एका अनामिक तरुणीला भरती करण्यात आलं. पुलावरून खाली नदीत उडी मारून आत्महत्या करताना तिला पकडण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरू झाले. १९२२ च्या मार्चमध्ये एक वेगळाच सनसनाटी घटनाक्रम सुरू झाला. संपूर्ण युरोप खंडात खळबळ उडाली. ही अनामिक तरुणी म्हणजे अॅना अँडरसन ही झारची सगळ्यात धाकटी मुलगी अॅनास्ताशिया आहे, अशी बातमी सर्वत्र पसरली. या अॅनाच्या कपाळावर आणि अंगावरही गोळ्यांच्या जखमांच्या खुणा होत्या. झारच्या नात्यातले अनेक लोक युरोपच्या अन्य राजघराण्यांमध्ये होतेच. खुद्द ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज (तोच तो पु. ल. देशपांड्यांच्या लेखातून ‘भो भो पंचम जॉर्ज भूप’ म्हणून आपल्याला माहीत असलेला) हा झारचा सख्खा मावसभाऊ होता, तर अशी अनेक मंडळी अॅनाला पाहायला बर्लिनला येऊ लागली, पण कुणाचाही निःशंक खात्री पटेना. काहींनी मात्र स्पष्ट मत दिलं की, ही मुलगी तोतया आहे. झार राजघराण्याची मालमत्ता हडप करण्यासाठी तिचं हे नाटक चाललंय. मग जर्मनी, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि अखेर अमेरिका अशा देशांमध्ये न्यायालयीन चौकशांचा एक प्रदीर्घ सिलसिला सुरू झाला. जो थेट १९६८ पर्यंत चालूच राहिला. त्या वर्षी शेवटी निकाल लागला की, अॅना अँडरसन ही राजकन्या नसून तोतया आहे. त्याच वर्षी तिने व्हर्जिनियातला एक प्राध्यापक जॉन मॅनहान याच्याशी लग्न केलं. पुढे १९८४ साली ती न्यूमोनियाने वारली. १९९१ साली रशियातली साम्यवादी राजवट संपली. येकॅतरिनबर्गजवळच्या जंगलातलं झारचं थडगं शोधून काढण्यात आलं. अकराच्या अकरा सांगाडे सापडले. त्यांची डीएनए चाचणी युरोपच्या अनेक प्रयोगशाळांमधून करण्यात आली आणि हडसून खडसून सिद्ध झालं की, त्या अंदाधुंद गोळीबारातून कुणीच वाचलं नव्हतं. मग अॅना अँडरसनचाही डीएनए मॅच करण्यात आला. तो जुळला नाही, पण या सगळ्या पुढच्या गोष्टी.

 

१९२२ पासून पुढे किमान तीन दशकं अॅनास्ताशियाच्या कथेने युरोप अमेरिका भारून गेली होती. १९५२ साली मर्सेल मॉरी या प्रख्यात फ्रेंच नाटककर्तीने या कथेवर ‘अॅनास्ताशिया’ हे नाटक लिहिलं. ते कमालीचं गाजलं. त्यामुळेच १९५६ साली हॉलिवूडने त्याच कथेवर त्याच नावाचा चित्रपट काढला. कथेतला तमाम जनतेला आवडणारा भाग म्हणजे नायक नायिकेला प्रशिक्षण देऊन राजकन्या बनवतो तो. सुरवंटाचं एकदम फुलपाखरू नव्हे एकदंम राजहंसीच होते. राजहंसीचा हा रूबाब इन्ग्रिड बर्गमन, हेमामालिनी आणि वंदना गुप्ते यांनी फारच सुंदर वठवला होता. इन्ग्रिडला तर त्या वर्षीचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@