तुम्ही तर औरंग्याच्या पिलावळी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
मूठभर प्रसिद्धीपिपासू, अराजकवादी आणि काही काही तर अहिंदू असलेल्या महिलांच्या कथित भाविकगिरीच्या रक्षणापायी अय्यप्पाच्या खऱ्याखुऱ्या महिला भक्तांशी घृणास्पद व्यवहार केला गेला. ज्याची तुलना केवळ क्रूरकर्मा औरंगजेब वा टिपू सुलतानशीच होऊ शकते.
 

लाखो लोकांच्या रक्तरंजित हत्याकांडाने जगभरात ज्या विचारसरणीच्या धुरिणांचे हात माखलेत, त्याच पराभूत विचारांच्या पाईकांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर चिखलफेक केली. केरळातील सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य असलेल्या एस. रामचंद्रन पिल्लई यांनी रा. स्व. संघाची तुलना थेट तालिबानी आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी केली. याला कारणीभूत ठरला शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाचा वाद आणि त्यावरून राज्यासह देशभरात उठलेले वादळ. शबरीमलातील भगवान अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात सर्वच वयोगटांतील महिलांना प्रवेश द्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात दिला. त्यानंतर तिथे अय्यप्पाचे महिला भक्त सोडून ठिकठिकाणच्या चळवळीत वळवळ करणारे कार्यकर्तेच मंदिरप्रवेशासाठी इरेला पेटले. अय्यप्पा स्वामींवर श्रद्धा ठेवणाऱ्या व प्रामुख्याने महिला भक्तांनी या अराजकवाद्यांना विरोध केला व राज्यभरात प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला. आंदोलनाचे हे लोण सर्वत्र पसरले आणि अय्यप्पाभक्तांनी कोणत्याही महिलेला मंदिरात प्रवेश करू दिला नाही. त्याचवेळी केरळ सरकार व पोलीस प्रशासनाने मात्र या आंदोलकांवर अतिशय निर्दयतेने वार करत त्यांना पिटाळून लावण्याचे उद्योग केले. हजारो महिला-पुरुष भक्तांना व बालकांनाही तुरुंगात डांबण्यात आले. अर्थात आपल्या भक्ती व श्रद्धेपायी कोणाहीपुढे न झुकण्याचा दृढनिश्चय केलेल्या अय्यप्पाभक्तांनी सरकारी दबावतंत्राला न जुमानता आपले आंदोलन सुरूच ठेवले. आपल्या श्रद्धारक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदू समुदाय रस्त्यावर उतरल्याचे देशाने श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनानंतर पहिल्यांदाच पाहिले. परिणामी ज्यांनी हयातभर हिंदू-हिंदूंत भेदाभेद निर्माण करण्याचेच डावपेच आखले, ते या हिंदू संघटनांमुळे चवताळून उठले. देशातल्या बौद्धिक क्षेत्रावर ठाण मांडून इथल्या हिंदू धर्म व संस्कृतीच्या खाणाखुणा मिटवण्यासाठी आसुसलेल्या डाव्या विचारवंतांचेच भाऊबंद असलेल्या पिनराई विजयन सरकारच्यादृष्टीनेदेखील हिंदूंच्या एकीची ही गोष्ट अविश्वसनीयच. यातूनच अय्यप्पाच्या भक्तांनी विरोधाचे, आंदोलनाचे हत्यार उपसलेले असतानाही केरळ सरकारने आपली जुलूम-जबरदस्ती तशीच सुरू ठेवण्याचे औद्धृत्य केले. दरम्यानच्याच काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अय्यप्पाभक्तांनी पुनर्विचार याचिका दाखल केली व आता त्यावर २२ जानेवारी रोजी खुली सुनावणीदेखील घेतली जाणार आहे.

 

दुसरीकडे शेकडो वर्षांपासून प्रचलित असलेल्या प्रथा, परंपरा, रुढी बदलण्यासाठी नेहमीच पुरेसा कालावधी द्यावा लागतो. कारण एखादी गोष्ट थोपवल्याने वा लादल्याने आचरली जात नाही तर जनजागृती व प्रबोधनानेच ती जनमानसात रुजू शकते. शिवाय कालानुरूप आपल्या वर्तणुकीत बदल करणाऱ्या हिंदू जीवनप्रवाहाने नव्या विचारांना नेहमीच स्वीकारल्याचे आपल्याला दिसते. इतिहासकाळापासून अशी शेकडो उदाहरणे आपल्याला ठायी ठायी आढळतील. बालविवाह, सतीप्रथा, केशवपन, जातीभेद, स्पृश्यास्पृश्यता अशा अनेक जुनाट व कालबाह्य चाली हिंदू समाजाने याच स्वीकारार्हतेच्या स्वभावामुळे टाकून दिल्या. अर्थातच यासाठी महर्षी दयानंद सरस्वती, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर यांसारख्या समाजसुधारकांनी आयुष्य वेचले व लोकांचे मनःपरिवर्तन घडवून आणले. शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाच्या मुद्द्यावर रा. स्व. संघानेदेखील अशीच भूमिका घेत जनभावनेचा आदर करण्याची मागणी केली. केरळच्या धुमसत्या वातावरणाला शांत करण्यासाठी ही भूमिका अत्यावश्यक होती. केरळातील सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मात्र रा. स्व. संघाच्या याच भूमिकेला विरोध करत दंडुक्याच्या धाकावर न्यायालयीन निर्णय लागू करण्याचे धोरण स्वीकारले. याच हिंदूविरोधाच्या सत्रातील पुढचा भाग म्हणजे माकपच्या एस. रामचंद्रन पिल्लई यांचे आजचे वक्तव्य. खरे म्हणजे पिल्लई आणि माकपने दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ पाहण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातले मुसळ पाहावे. डावे लोक ज्या मार्क्स आणि माओला आपला वैचारिक बाप समजतात, त्या लोकांनी जगातल्या किती राष्ट्रात रक्तरंजित क्रांतीच्या स्वप्नापायी लाखोंचे बळी घेतले, ते अभ्यासावे. इतकेच नव्हे तर केरळातल्या कन्नूर जिल्ह्यासह कितीतरी ठिकाणी जीव घेतलेल्या स्वयंसेवकांचे मृतदेह डोळ्यासमोर आणावे. एवढेही नाही जमले तर कालपरवाच्या १८ तारखेला कम्युनिस्ट सरकारने अय्यप्पा भक्तांना जी वागणूक दिली, ती आठवावी. म्हणजे पिल्लई आणि त्यांच्या पाठीराख्यांना आपल्यातल्या पाशवी जनावराचे दर्शन होईल. तर रा. स्व. संघाने नेहमीच समाजाचा, राष्ट्राचाच विचार केला. देशातल्या कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीत सर्वप्रथम धावून जात मदतीचीच भावना जोपासली, रुजवली. तरीही पिल्लई यांनी संघाविरोधात लांच्छनास्पद वक्तव्य केले, जे निषेधार्ह तर आहेच, पण रा. स्व. संघाचा आणि संघाच्या लाखो स्वयंसेवकांचा अपमानच म्हटला पाहिजे. राहुल गांधींनी संघाची ‘मुस्लीम ब्रदरहूड’शी केलेली तुलना आणि आताचे पिल्लई यांचे वक्तव्य एकाच पठडीतले. अर्थात, जनतेला डाव्या विचारांवर पोसलेल्या बांडगुळांची लायकी माहिती असल्याने त्यांच्या या बेताल बडबडीकडे कोणी लक्ष देणार नाही, हेही खरेच.

 

शबरीमलातील महिलाप्रवेशावरून सुरू असलेल्या आंदोलनाला दडपताना केरळ सरकारकडून अय्यप्पाच्या भक्तांवर होणारा अत्याचार स्वातंत्र्यपूर्व काळाची आठवण करून देणारा ठरला. १८ नोव्हेंबरच्या रात्री केरळ सरकारने क्रौर्याची परिसीमा गाठत आपल्यातल्या हुकूमशाही प्रवृत्तीचे दर्शन घडवले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची ढाल पुढे करत भगवान अय्यप्पाच्या भक्तांच्या भावना चिरडण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आले. मूठभर प्रसिद्धीपिपासू, अराजकवादी आणि काही काही तर अहिंदू असलेल्या महिलांच्या कथित भाविकगिरीच्या रक्षणापायी अय्यप्पाच्या खऱ्याखुऱ्या महिला भक्तांशी घृणास्पद व्यवहार केला गेला. ज्याची तुलना केवळ क्रूरकर्मा औरंगजेब वा टिपू सुलतानशीच होऊ शकते. शबरीमला मंदिर परिसरात अय्यप्पाच्या नावाचा जप करणेही गुन्हा ठरले. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या राहण्याच्या ठिकाणी गटाराचे पाणी फेकण्यात आले. भक्तांना पिण्याचे पाणीदेखील पुरवले नाही ना शौचालयांची व्यवस्था करण्यात आली, ज्याचा त्रास आंदोलनाची हौस भागवणाऱ्या नव्हे, तर अय्यप्पाच्या खऱ्याखुऱ्या महिला भक्तांना झाला. कहर म्हणजे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या भक्तांना ताब्यात घेऊन त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली. पोलिसांनी अय्यप्पाभक्तांना बुटांनी तुडवले, तर महिलांना चक्क उचलून फेकून दिले. अय्यप्पाभक्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने केरळ सरकारने इथे कलम १४४ देखील लावले. परिणामी, लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली. पण मंदिर म्हटले की, तिथे भक्तांचा राबता असणारच, हे केरळ सरकार विसरले. अखेर केरळ उच्च न्यायालयालाच याची दखल घ्यावी लागली. मंदिर परिसरात कलम १४४ लावण्याचे कारण काय?, असे म्हणत उच्च न्यायालयाने केरळ सरकारला चांगलेच फटकारले. पण, यामुळेही केरळचे मुख्यमंत्री व तिथला मार्क्सवादी पक्ष सुधारेल असे वाटत नाही. कारण, आतापर्यंत हिंदू भावनांना उद्दामपणे लाथाडत आलेल्यांसाठी हिंदूधर्मीय काही मतपेढी नव्हेकेरळ सरकारच्या अय्यप्पा भक्तांवरील दुर्दांत अत्याचारावरून नेमके कोण तालिबानी आणि खलिस्तानी आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल. एवढेच नव्हे तर शबरीमला प्रकरणावरून केरळचे मुख्यमंत्री राज्याला जम्मू-काश्मीरप्रमाणे हिंदूविहीन करू इच्छितात की काय, असा सवाल कोणी विचारला तर ते वावगे ठरणार नाही. अर्थात, जोपर्यंत हिंदू समाजात आत्मभानाचे स्फुल्लिंग चेतत राहील, तोपर्यंत असे होण्याची सुतरामही शक्यता नाही, याची पक्की खूणगाठ केरळ सरकार व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही मनाशी बांधून ठेवावी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@