द्रोणांचे बेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |

 


 
  
भगदत्त आणि त्रिगर्तांचा दारुण पराभव करून अर्जुन पुन्हा रणांगणावर परतला. त्याला गांधार देशाच्या राजपुत्रांनी घेरले. ते खूप ताकदीचे योद्धे होते, पण अर्जुनाच्या पुढे तेही परास्त झाले. आपल्या भावांच्या मरणाचा सूड घेण्यासाठी शकुनी अर्जुनावर चाल करून आला. शकुनी मायायुद्धात प्रवीण होता, पण अर्जुनाच्या प्रभावी अस्त्रापुढे त्याचे मायातंत्र काही चालले नाही. शेवटी शकुनीला पळ काढावा लागला. हे पाहून अर्जुनावर राधेय चालून आला. त्याने अर्जुनावर आग्नेयास्त्र सोडले. त्याला उत्तर म्हणून अर्जुनाने वरुणास्त्र वापरले आणि अग्नि शांत झाला. दोघांचे तुंबळ युद्ध झाले. इतक्यात सूर्य मावळला आणि युद्धाचा बारावा दिवस संपला.
 

दुर्योधन मात्र द्रोणांवर नाराज झाला, कारण त्यांनी ना अर्जुनास परास्त केले ना युधिष्ठिरास कैद केले. युद्धाच्या बाराव्या दिवशी अर्जुनच श्रेष्ठ योद्धा ठरला. खरेतर द्रोणांनी प्रामाणिकपणे यत्न केला होता, पण दुर्योधनाला जे हवे होते ते मिळाले नाही म्हणून तो म्हणाला, “आचार्य, तुम्हाला पांडवांविषयी खूप सहानुभूती आहे, हे स्पष्टच दिसून आले. तुम्ही त्या युधिष्ठिराला कैद करण्याची संधी मुद्दामच घालवली. तुम्ही पांडवांशी हव्या तेवढ्या त्वेषाने लढत नाही. तुम्ही मला दिलेले वचन पाळत नाही.” यावर द्रोण म्हणाले, “दुर्योधना, तू पाहिलेस की मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि युधिष्ठिराला पकडणारच होतो. पण, ऐनवेळी मला चकवा देऊन तो पळून गेला आणि अर्जुन सामोरा आला. त्यानंतर मला काहीच करता आले नाही. आता उद्या मी काय करतो ते तू पाहा! उद्या आपल्या सैन्याचा मी चक्राकार व्यूह रचणार आहे, जो अभेद्य असेल. अर्जुनाशिवाय कुणालाही तो भेदता येणार नाही. तू एवढेच बघ की, अर्जुन एक दिवस युद्धभूमीत नसेल. तू खात्री बाळग, उद्या मी त्यांचा एकतरी महारथी मारेन!” त्यांचे हे भाषण ऐकून दुर्योधन शांत झाला. अर्जुनास पुन्हा आव्हान देण्यास त्रिगर्त बंधूंनी तयारी दाखवली जेणेकरून द्रोण आपले ईप्सित साध्य करू शकतील! द्रोणाच्या आश्वासनामुळे कौरव सैन्याचा उत्साह वाढला आणि ते सारे उत्कंठेने तेरावा दिवस उगवण्याची वाट पाहात होते.

 
 - सुरेश कुळकर्णी
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@