‘प्रश्नचिन्हा’तून शैक्षणिक उद्धाराकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |



 
  
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या माध्यमातून फासेपारधी समाजातील मुलांना एक सुसंस्कारित माणूस म्हणून घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मतीन भोसलेची ही कहाणी...
 

पोलीस आणि फासेपारधी समाजाचे तसे फार जवळचे नाते... आपल्या देशात प्रचलित विविध परंपरांसारखी ही देखील एक परंपरा... परंतु, फासेपारधी आणि पोलीस ही परंपरा एका विशिष्ट शिक्षित समाजाने केवळ आपल्या पोटाची खळगी भरू पाहणाऱ्या एका अशिक्षित समाजाविरुद्ध केलेल्या अन्यायामुळे उदयास आली आणि दुर्दैवाने ही परंपरा आजही सुरूच आहे. परिणामस्वरुप, फासेपारधी समाज पोलिसांच्या भीतीने डोंगराकडे वळला. पोटाची आग विझवण्यासाठी वणवण भटकू लागला. पण, केवळ ‘भटकणे’ हा एकमेव पर्याय नसतो. त्याला काहीतरी उपाय शोधायला हवा, या हेतूने याच समाजातील मतीन भोसले हा तरुणाने पुढाकार घेण्याचे ठरविले. शाळेतच आपल्या एका शिक्षकाकडून मतीनला समाजकारणाचे बाळकडू मिळाले. तो नववीत असताना वनवासी समाजातील लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारूनही जातीचे दाखले मात्र मिळत नव्हते. त्याच्या निषेधस्वरुप मतीनने समाजबांधवांना जातीचे दाखले प्राप्त व्हावेत, म्हणून २५ तरुणांना सोबत घेऊन अमरावती-नागपूर हायवेवर सहा तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. त्यामुळे सहा महिन्यांमध्ये तीन हजार फासेपारधी समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळाले. समाज शिक्षित करण्यासाठी मतीनचे हे पहिले पाऊल होते. पुढे येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देत, कधी कधी पोटाला उपाशी ठेवत तो शिक्षण घेऊ लागला. पुढे त्याने डीएड् पूर्ण केले. डीएड्नंतर त्याला काही महिन्यांमध्येच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. पण, मतीनने जो संघर्ष आजवर केला होता, तो त्याचा वैयक्तिक संघर्ष होता. त्याला समाजकार्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. ज्यावेळी मतीनने आपल्याच समाजात नीट डोकावून पाहिले, त्यावेळी हाच समाज त्याला अतिशय मागास वाटू लागला. आपल्याच समाजातील कुणाचा बाप तुरुंगात, तर कोणाचे आई-बाप दोघेही कैदेत. मतीनच्या मग असेही लक्षात आले की, पोलिसांनी अनेक समाजबांधवांना ते अपराधी नसतानाही जेलबंद केले आहे. अशा बांधवांसाठी काही तरी करायलाच हवे, या भावनेने मग मतीनने समाजकार्याची दिशा निर्धारित केली.

 

या सर्व बाबींचा अभ्यास केला असता, समाजातील अज्ञानामुळे हे सर्व घडत असून समाजाच्या अज्ञानाचे मूळ कारण हे शिक्षणाचा अभाव असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आपला समाज शिक्षित, सुसंस्कृत झाला पाहिजे, यासाठी त्याने नोकरी सोडली. पण पुढे प्रश्न होता की, या मुलांना शिकविण्यासाठी गोळा कसे करायचे? म्हणून मग मतीन या मुलांना गोळा करण्यासाठी वणवण भटकला. पण, त्याच्याच समाजातील हे लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी घराबाहेर पाठवायलाही तयार नव्हते. कारण, ही मुलेच त्या पालकांची रोजीरोटी होती. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मग मतीन डोंगराळ भागात जाऊन काही महिने थांबायचा. मुले शिकली तर काय होऊ शकते, याचा विश्वास त्यांच्यात निर्माण करायचा आणि मग त्या मुलांना सोबत घेऊन यायचा.

 
मतीनच्या या प्रयत्नांना हळूहळू यश आले आणि प्रथम ८५ मुलांना घेऊन मतीनने २०१२ मध्ये शाळा सुरू करण्याचा विचार केला. सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या, पण यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने मुलांच्या शिक्षणासाठी ‘भीख माँगो’ आंदोलन केले. मतीन स्वतः १८८ मुलांसोबत दानपेटी घेऊन ‘पोटासाठी, शिक्षणासाठी १ रु. द्या,’ अशी भीक मागू लागला. भीक मागणे गुन्हा आहे, म्हणून १४ ऑगस्टला मतीन आणि त्याच्या सोबतच्या मुलांना अटक झाली. १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर त्याने तुरुंगातच शाळा सुरू केली. चार दिवसांच्या अटकेनंतर आणि ७२ तासांच्या उपोषणांतर १८ ऑगस्ट रोजी मतीन आणि मुलांना सोडण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन थांबले. १९ महिने चाललेल्या या आंदोलनातून मतीनला ६२ हजार रुपयांची मदत मिळाली. त्यातून त्याने अमरावतीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मतीनने आणलेली १२० मुले आईबापांनी चक्क कुंभमेळ्यात भीक मागण्यासाठी नेली. मात्र, त्यातील काही मुले पुन्हा शिकण्यासाठी परतली. सध्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेत इ. १ ली ते १० वी. मध्ये एकूण ४१५ विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेतून आतापर्यंत १०० पेक्षा जास्त मुले दहावी उत्तीर्ण झाली आहेत. आज ही मुले आपली व आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील आहेत. रस्त्यावर राहणाऱ्या फासेपारधी समाजाच्या दृष्टीने ही नवीन पहाट. मात्र, अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.
 

मतीनला आजही विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुले आणि मतीन दोघेही रोजीरोटीसाठी धडपडत आहेत. अल्पशा मानधनावर शिक्षक आणि इतर कर्मचारी काम करत आहेत. शाळेतील काही विद्यार्थ्यांना आजही तात्पुरत्या कुडाच्या हलणाऱ्या चार भिंतीमध्ये शिकावे लागत आहे. जालना येथील ‘मैत्र मांदियाळी’ या संस्थेने शाळेच्या १० वर्गखोल्या बांधण्यासाठी मदत केली असली तरी हे पुरेसे नसून इतर संस्थांनीही ‘प्रश्नचिन्ह’ला मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 
 
 - नितीन जगताप
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@