अंदमान बेटांवर अमेरिकी पर्यटकाची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |



 
 

तो अमेरिकी नागरिक ख्रिश्चन मिशनरी?

 

पोर्ट ब्लेअर : अंदमान-निकोबार बेटांपैकी बाहेरील नागरिकांस प्रवेश निषिद्ध असलेल्या नॉर्थ सेंटीनेल बेटावर साहसी पर्यटनासाठी गेलेल्या जॉन अॅलन चाऊ या अमेरिकन नागरिकाची बेटावर हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, हा अमेरिकन पर्यटक वास्तवात ख्रिश्चन मिशनरी असल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाल्याने या घटनेतील गूढ आणखी वाढले आहे.

 

अंदमान-निकोबार बेटांपैकी पोर्ट ब्लेअरपासून ६४ किमी पश्चिमेला असणाऱ्या नॉर्थ सेंटीनेली या बेटावर बेटाबाहेरील सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश करण्यास कायद्याने बंदी आहे. या बेटावर संथाली (सेंटीनेली) या वनवासी जनजातीचे वास्तव्य असून ही जनजाती आक्रमकपणा आणि बाहेरच्यांशी संपर्क ठेवण्यास अनुत्सुक म्हणून ओळखली जाते. जॉन अॅलन चाऊ नामक अमेरिकन नागरिक या बेटावर बेकायदेशीररित्या गेला व त्यानंतर दोनच दिवसांत त्याचा मृतदेह तेथील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आले. विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन याला या बेटावर जाण्याची इच्छा होती व त्याने दि. १६ नोव्हेंबर रोजी काही मच्छिमारांना जास्त पैसे देऊन त्यांच्यासोबत या बेटावर जाण्यात यश मिळवले. मात्र, त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी अमेरिकन दूतावासाला याबाबत कळवले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच, ७ मच्छिमारांनादेखील अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.

 

गोपनीयतेची बाब म्हणून या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. तसेच, अटक झालेल्या मच्छिमारांची नावेही जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र, प्रोहिबिशन ऑफ अॅबॉरिजीनल ट्राईब्स अॅक्टसह भारतीय दंड विधानातील इतर अनेक कलमांखाली त्यांना अटक झाल्याचे समजते. जॉन हा नॉर्थ सेंटीनेली बेटावर साहसी पर्यटनासाठी गेला होता, असेही वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अमेरिकन दूतावासही जॉनच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.

 

साहसी पर्यटक की ख्रिस्ती धर्मोपदेशक?

 

जॉन अॅलन चाऊ हा जरी साहसी पर्यटनाच्या नावाखाली या बेटावर गेल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे तो एक ख्रिस्ती मिशनरी होता, असेही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या वृत्तांनुसार, जॉनला संथाली समाजातील लोकांना भेटण्याची व ख्रिश्चन धर्माचा उपदेश देण्याची तीव्र इच्छा होती. तसेच, संथालींचे ख्रिश्चन म्हणून धर्मांतर करण्याचीही त्याची योजना होती, व याच हेतूने त्याने बेकायदेशीररित्या या बेटाला भेट दिली असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नसली तरीही, या प्रकारच्या वृत्ताने एकंदरीत घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे.

 

कोण आहेत संथाली?

 

पोर्ट ब्लेअरपासून ६४ किमी अंतरावर असलेल्या नॉर्थ सेंटीनेली या बेटावर संथाली या जनजातीचे वास्तव्य आहे. या वनवासी समाजाची बेटावरील लोकसंख्या अत्यल्प असून या समाजाचे येथे पूर्वापार वास्तव्य असल्याचे म्हटले जाते. हा समाज अद्यापही जुन्या, नैसर्गिक पद्धतीने जीवन जगतो, तसेच त्यांच्या आहार-विहार, पोशाख इ. गोष्टीही पारंपारिकच आहेत. ते शिकारही धनुष्यबाणानेच करतात. जॉनची हत्याही बाण मारूनच झाली असल्याची माहिती आहे. या बेटाला व येथील समाजाला भारतीय कायद्याने संरक्षण देण्यात आले असून येथे या रहिवाशांखेरीज अन्य कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला प्रवेशबंदी आहे. या बेटावर प्रवेश करण्यासह, तेथील व्हिडीओ वा फोटोच्या माध्यमातून चित्रीकरण करणे व ते इंटरनेटवर प्रसिद्ध करणे यावरही कायद्याने बंदी आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@