धर्मांतराचा बालमहोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018   
Total Views |

 


 
 
 
सिटी ऑफ होप’ने बालमहोत्सव आयोजित केला होता. त्या महोत्सवामध्ये बालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. भजनबिजन, व्याख्यानही ठेवले होते. झाले, शहरामध्ये आपल्या मुलांना स्पर्धेत भाग घ्यायला मिळेल, व्याख्यान-भजन ऐकायला मिळेल म्हणून या बालमहोत्सवामध्ये लोकांनी सहभाग घेतला. पण, प्रत्यक्षात स्पर्धा सुरू झाल्या आणि लक्षात आले की, हा बालदिन बालकांसाठी नाही, तर बालदिनाच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माचा प्रसार-प्रचार आणि सरळसरळ धर्मांतराचा कावा आहे. या महोत्सवामध्ये मुलांकडून चित्रं काढून घेण्यात आली. त्यापैकी एक चित्र म्हणजे हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या ओमवर फुली, तर ख्रिश्चन धर्माच्या क्रूसवर बरोबरचे चिन्ह. धक्कादायक म्हणजे, मोदी सरकार चोर आहे, या आशयाचे चित्रही मुलांकडून काढून घेण्यात आले. गायन स्पर्धेच्या निमित्ताने येशू आणि ख्रिश्चन धर्माचे गोडवे गाणारी गीते लावण्यात आली आणि मुलांकडून गाऊनसुद्धा घेतली. तसेच मुलांना सांगितले गेले की, जिझसला प्रार्थना केल्याने परीक्षेत उत्तम गुण मिळतात. हे सगळे कुठे घडले तर कल्याणच्या सुभाष मैदानावर. तिथे ‘सिटी ऑफ होप’ ने पं. जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त म्हणे बालमहोत्सव आयोजित केला होता. आता काय म्हणावे या अशा बालमहोत्सवाला? हा बालमहोत्सव होता की धर्मांतर महोत्सव? ‘सिटी ऑफ होप’ सारख्यांच्या मते धर्म म्हणजे हिंदू समाजाच्या भावनांशी खेळत त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजणे हेच असेल. ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असते. विंचवावर प्रेम केले तरी तो दंश करायचे सोडणार नाही आणि जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. या आणि अशाच अर्थाची कितीतरी विधाने शंभर टक्के खरे करणारी ही संस्था. स्वतःचा धर्म तो काय खरा आणि बाकीचे धर्म संपविण्याच्याच किंवा संपण्याच्याच लायकीचे या मग्रुरीत ‘सिटी ऑफ होप’ संस्था एकटी नाही. यावेळी म्हणे, पालकांनाही हे सगळे खटकले होते. त्यांनाही वाटले होते की ‘सिटी ऑफ होप’ संस्थेने बालदिनाच्या नावे आपली फसवणूक केली. यावर स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी ‘सिटी ऑफ होप’ संस्थेची पोलिसांत तक्रार केली. साम-दाम-दंड-भेद नीती करत ‘सिटी ऑफ होप’ सारख्या विषवल्ली हिंदू समाजरचनेचे अंतरंग शेकडो वर्षे कुरतडत आहेत. तरीही हलाहल पचवून सृष्टी रचणाऱ्या शिवासारखे हिंदू समाजाचे जगणे सुरूच आहे.
 

हिंदूंवरच आक्रमण का?

 

हिंदू समाजातल्या लोकांना धर्माबद्दल आस्था-प्रेम नाही, असे अजिबात नाही, पण निधर्मीपणा आणि खोटी सहिष्णुता यामध्ये हजारो वर्षांपासून हा समाज गुरफटून गेला. काही लोक म्हणतात, “शंकराचार्यही आपलेच आणि चार्वाकही आपलाच. तथागत गौतम बुद्धांनाही आपण ‘भगवान’ संबोधून विष्णूचा अवतार मानतोच ना? ईसाईंचा येशू आणि मुस्लिमांचा मोहम्मद ही आपलाच मानण्याइतके मन मोठे ठेवा. अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम. सबको सन्मती दे भगवान...” ‘हं, अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ हे म्हणण्याची सद्बुद्धी प्रत्येकालाच असती तर प्रश्नच नव्हता. ज्याला कोणाला काय मानायचे आहे, त्यांना हिंदू समाजात स्वातंत्र्य आहे. पण, अल्ला असो वा येशू यापैकी अमुक एकाला तुम्ही मानलेच पाहिजे, यासाठी चालवलेला अट्टाहास, कूटनीती, दहशतवाद याचा निषेध आहे. ‘सिटी ऑफ होप’च्या बालदिनाला जमलेले बालक होते. वयाने आणि समजुतीनेही. धर्म, राजकारण यांचा त्यांना गंधही नसेल. पण, या बालकांच्या मनात त्यांच्या स्वधर्माबद्दल ‘किंतु’ टाकून ख्रिश्चन धर्माबद्दल आस्था देण्याचे काम केले गेले. मुळात धर्म मनातून उमटायला हवा. त्याची प्रेरणा अंतःकरणात स्फुरायला हवी. लहान मुलांच्या निरागसतेचा क्रूरपणे वापर करून त्यांनाच धर्मांतराचे बळी ठरवू पाहणार्‍यांना काय सजा होईल ती होईलच. पण, यामध्ये या बालकांचे पालकही कमी गुन्हेगार नाहीत. रक्ताचं पाणी करून ज्या मुलांसाठी आपण जगतो, त्या मुलांना आपण कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमात पाठवत आहोत याची दखलही या पालकांना घ्यावीशी वाटली नाही? या संस्थेने बालमहोत्सवाचे पत्रक तयार केले होते. त्यात लिहिले होते की, येशूने म्हटले, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मनाई करू नका.” या कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रमुख वक्ता म्हणून रेव्ह. भालचंद्र कांबळे आणि उपासक ब्र. जॉन नहेम्या तसेच विशेष शास्त्रीय भजन गाण्यासाठी ब्र. रज्जू काळे आणि पपेट शोसाठी सिस्टर साळवी यांचे नावही छापले होते. आता ही सर्व मंडळी कोणता बालदिन साजरा करणार हे कुणालाही कळण्यासारखे होते. तरीही कोणतीही शहानिशा न करता परिणामांची चिंता न करता पालकांनी आपल्या मुलांना या कार्यक्रमाला पाठवले होते? का? या ‘का’चे उत्तर जे काही आहे, ते उत्तरच हिंदू समाजावर होणाऱ्या हजारो वर्षांपासूनच्या आक्रमणाचे कारण आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@