वृद्ध आईला मृत्यूशय्येवर सोडून मुलाने काढला पळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |
रुग्णालयात नाव, पत्ता न सांगताच झाला गायब
 
धुळे - घरापासून जवळ असलेल्या हिरे रुग्णालयात वयोवृद्ध आईला उपचारासाठी दाखल केल्यानंतर मुलाने काढता पाय घेतला. अखेरच्या क्षणीही या वृद्धेजवळ त्यांचा मुलगा व इतर नातलग आले नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आयुष्याच्या सायंकाळी जन्मदात्या आईला मृत्यूशय्येवर सोडून पळ काढणार्‍या या मुलाचा व नातलगांचा आता शोध घेतला जात आहे.
 
 
 
हिरे रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी सुमनबाई रामदास पाटील या 72 वर्षीय वृद्ध महिलेला दाखल करण्यात आले. आजाराने त्यांची प्रकृती खालावली होती. या वेळी संबंधित तरुणाने आपण सुमनबाई यांचा मुलगा असल्याचे सांगितले होते. सुमनबाई यांना रुग्णालयात दाखल करताच काही तरी कारण सांगून तरुण वॉर्डातून बाहेर पडला. यानंतर मात्र तो कधीही परत आला नाही तर रुग्णालयाकडून मात्र सुमनबाई यांच्यावर उपचार सुरू होते.
 
आजारपणामुळे अखेर सुमनबाई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दरम्यानच्या काळात त्यांच्या नातलगांचा शोध घेणार्‍या कर्मचार्‍यांनी याबाबत पोलिसांना कळविले. मृत महिलेच्या नावापुढे केवळ देवपूर एवढाच उल्लेख आहे.
 
 
यामुळे गुरुवारी दुपारी या घटनेबद्दल देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृत सुमनबाई यांच्याकडे आयुष्याच्या सायंकाळी पाठ फिरविणारा मुलगा व नातलगांचा शोध घेतला जात आहे.
नावावरही संशय
 
रुग्णालयाच्या केसपेपरवर सुमनबाई रामदास पाटील असे नाव असले तरी ते खोटे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कदाचित रुग्णालयात दाखल करताना ते खोटे सांगितले गेले असावे. असा पोलिसांचा संशय आहे. शिवाय रुग्णालयात दाखल करताना संबंधित वृद्ध महिला अत्यवस्थ होती. त्यामुळे आपले खरे नाव सांगण्याच्या परिस्थितीत ती नव्हती.
@@AUTHORINFO_V1@@