धुळे, अहमदनगर मनपासह शेंदुर्णी न.प.साठी 9 डिसें.ला मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |

धुळ्यात 74 जागांसाठी 3 लाख मतदार बजावतील हक्क

 
मुंबई, 1 नोव्हेंबर
धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 10 डिसेंबर रोजी होईल. त्यासाठी गुरूवारपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरूवारी येथे केली. यासोबतच नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (जि. नांदेड), मौदा (जि. नागपूर), रिसोड (जि. वाशीम), ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) आणि शेंदुर्णी (जि. जळगाव) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकाही 9 नोव्हेंबरलाच होणार आहेत.
 
 
सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5 तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.
 
 
अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
 
दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.
 
सहा नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठीही 9 डिसेंबरला मतदान
 
यासोबतच नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) आणि शेंदुर्णी 
(जळगाव) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान; तर 10 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशीही माहितीसुध्दा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
 
 
त्यांनी सांगितले की, निवडणूक होणार्‍या ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यातील मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. येथे नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 नोव्हेंबर रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 29 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.
 
 
अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसर्‍या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 9 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.
 
 
निवडणूक कार्यक्रम
* नामनिर्देशनपत्रे दाखल करणे: 13 ते 20 नोव्हेंबर,
 
 
* नामनिर्देशनपत्रांची छाननी : 22 नोव्हेंबर,
 
 
* उमेदवारी मागे घेणे : 26 नोव्हेंबर पर्यंत,
 
 
* निवडणूक चिन्ह वाटप: 27 नोव्हेंबर,
 
 
* मतदान: 9 डिसेंबर,
 
 
* मतमोजणी : 10 डिसेंबर,
 
 
* निकालाची राजपत्रात प्रसिद्धी: 13 डिसेंबरपर्यंत
 
@@AUTHORINFO_V1@@