नक्षलवाद्यांच्या पत्रातील मोबाईल क्रमांक दिग्विजय सिंह यांचाच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |



 
 
 
पुणे : काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेच नक्षलवाद्यांना मदत करण्यासाठी तयार असलेले नेते आहेत का? याचा तपास सध्या पुणे पोलीसांनी सुरू केला आहे. एल्गार परिषदेनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील तपासामध्ये पोलीसांना एक पत्र सापडले. या पत्रात नमूद करण्यात आलेला मोबाईल क्रमांक हा दिग्विजय सिंह यांचाच आहे. या वृत्ताला पुणे पोलीसांनी दुजोरा दिला आहे.
 

पुढील काळात या प्रकरणी सखोल तपास करणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. एल्गार परिषदप्रकरणी तपासामध्ये सापडलेले पत्र हे नक्षलवादी प्रकाश याने सुरेंद्र गडलिंग याला पाठवले होते. या पत्रात हा मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आला होता. हा मोबाईल क्रमांक दिग्विजय सिंह यांचाच असल्याचे आता उघडकीस आले आहे. या प्रकरणी पुणे पोलीसांनी प्राथमिक आरोपपत्र सादर केले आहे. तसेच दिग्विजय सिंह यांच्या मोबाईल क्रमांकाचा तपास सुरू आहे. या मोबाईल क्रमांकावरून दिग्विजय सिंह यांचे नक्षलवाद्यांशी काही बोलणे झाले आहे का? याची चौकशी सध्या सुरू आहे. या मोबाईल क्रमांकाची पडताळणी संबंधित टेलिकॉम कंपनीकडून केली जात आहे. या पडताळणीनंतर याप्रकरणी दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती पुणे पोलीसांनी दिली. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याचा आरोप यापूर्वी भारतीय जनता पक्षाने केला होता.

 

पुण्यात शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेप्रकरणी जे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांच्या तपासानंतर, देशभरात खळबळ माजली आहे. संशयित नक्षलवाद्यांच्या ताब्यातील अनेक कागदपत्रे, लॅपटॉप, हार्ड डिस्क, सीडी पुणे पोलीसांनी तपासादरम्यान जप्त केले. याप्रकरणी तपासात आणखी एक पत्र पुणे पोलीसांनी जप्त केले आहे. नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याने याप्रकरणी अटकेत असलेल्या रोना विल्सन याला हे पत्र लिहिले होते. काँग्रेसचे काही नेते नक्षलवाद्यांना मदत करण्यास तयार असल्याचे या पत्रात मिलिंदने म्हटले आहे. ‘वरिष्ठ कॉम्रेड नेत्यांनी काँग्रेसमधील काही नेत्यांशी संपर्क साधला आहे. या चर्चेत काँग्रेसमधील मित्रांनी मागासवर्गीयांचे संघटन अधिक आक्रमक करण्यास सांगितले आहे. काँग्रेस नेत्यांनी कायदेशीर आणि आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली आहे.’ असे या पत्रात लिहिले आहे.

 

पुणे पोलीसांनी जप्त केलेली ही दोन्ही पत्रे आणि दिग्विजय सिंह यांचा मोबाईल क्रमांक यामुळे तपासाला गती मिळाली आहे. असे पोलीस आयुक्त सुहास बावचे यांनी म्हटले. याप्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणी मी दोषी आढळल्यास सरकारने मला अटक करावी. आधी देशद्रोही आणि आता मला नक्षलवादी ठरवले जात आहे.” असे दिग्विजय सिंह म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@