एका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018   
Total Views |

 
 
राजकारणात वावरणार्यांना पैसा-प्रसिद्धी-पद... सारे मिळत असते. समाजाला ते दिसत असते, कधीकधी खुपतही असते. त्यावर टीकाही होत असते. मात्र, त्याची एक मोठी किंमत त्या व्यक्तीला मोजावी लागते, ती मात्र समाजाला, टीकाकारांना दिसत नसते.
 
सतत सहा वेळा दक्षिण बंगळुरूमधून विजयश्रीची माळ गळ्यात पडणार्या अनंतकुमार यांना, मृत्यूने आपल्याला केव्हा विळखा घातला, हे समजलेच नाही. वयाच्या अवघ्या 59 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते 1996 मध्ये म्हणजे वयाच्या 37 वर्षी खासदार झाले. म्हणजे सतत 22 वर्षे ते खासदार होते. यातील तब्बल 10 वर्षे ते मंत्री होते. आपली खासदारकी त्यांनी शेवटपर्यंत अबाधित राखली. पायाला भिंगरी लावून फिरणार्या या नेत्यास, कर्करोगाने आपल्या शरीरात केव्हा प्रवेश केला आहे, हे कळलेच नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मे महिन्यात कर्करोगाचे निदान झाले, तरीही अनंतकुमार यांनी त्यास गांभीर्याने घेतले नाही. राज्यातील पोटनिवडणुका, संसदेचे पावसाळी अधिवेशन यात ते गुंतून पडले आणि जेव्हा स्थिती हाताबाहेर गेली, त्यांनी उपचारासाठी न्यू यॉर्क गाठले. पण, यास फार उशीर झाला होता. फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांच्या शरीरात बस्तान मांडले होते. न्यू यॉर्क- लंडनमधील उपचारांचा कोणताही फायदा त्यांना झाला नाही. शेवटी त्यांनी बंगळुरूमधील एका रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले. ज्यात केवळ औपचारिकता होती. एवढा निष्काळजीपणा त्यांनी कसा काय दाखविला, हे खरोखरीच न समजण्यासारखे आहे.
लढाऊ नेता
कर्नाटक हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. 1977 च्या जनता झंझावातातही तो कॉंग्रेसने कायम राखला होता. अशा या बालेकिल्ल्यात पाय रोवून उभे राहण्याचे साहस कुणाजवळही नव्हते. लढाऊपणा त्यांच्या रक्तात होता. एकदा त्यांनी एक किस्सा सांगितला. अनंतकुमार लहान असताना, गल्लीत त्यांचे कुणाशीतरी भांडण झाले. तीन-चार मित्रांनी मिळून त्यांना चोप दिला. ते रडत रडत आपल्या घरी गेले. आईजवळ रडत, आपल्याला झालेल्या मारहाणीची कथा सांगू लागले. आई संतापली- ‘‘तुला मारले हे तू मला घरी येऊन सांगत आहेत. तू काय करीत होतास? यापुढे घरी येऊन, अशी रडकथा सांगत बसला, तर मीही जबर मार देईन.’’ यानंतर अनंतकुमार बदलले. ‘ठोशास ठोसा’ हे सूत्र त्यांनी अवलंबिले- जे राजकारणात आल्यावरही कायम राहिले.
 
कर्नाटकात भाजपाच्या पहिल्या पिढीतील एक शिलेदार म्हणून अनंतकुमार यांचा उल्लेख केला जात असे. विद्यार्थी-परिषदेपासून सार्वजनिक जीवन सुरू करणारे अनंतकुमार कर्नाटक भाजपाचा चेहरा झाले. दिल्लीच्या राजकारणात त्यांनी आपला जम बसविला. राजकीय किस्से सांगण्यात ते पारंगत होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये शपथविधी झाल्यावर ते पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. तोपर्यंत खातेवाटप झाले नव्हते. वाजपेयींशी भेट घेतल्यानंतर अनंतकुमार जाण्यासाठी उठले तोच वाजपेयींनी आपल्या टेबलावरील विमानाची एक प्रतिकृती त्यांना भेट म्हणून दिली. अनंतकुमार यांना आश्चर्य वाटले. मी काय लहान आहे की, त्यांनी मला विमानाची प्रतिकृती भेट म्हणून द्यावी, असा विचार त्यांच्या मनात रेंगाळत होता. सायंकाळी खातेवाटप जाहीर झाले. अनंतकुमार यांना विमान वाहतूक मंत्रालय देण्यात आले होते.
केंद्रात शहरी विकास, ग्रामीण विकास, संस्कृती, रसायने व खते, संसदीय कामकाज अशी वेगवेगळी मंत्रालये सांभाळणार्या अनंतकुमार यांनी प्रत्येक मंत्रालयावर आपली छाप सोडली. विषयाची समज, नोकरशाहीला वरचढ होऊ न देण्याची त्यांची खास शैली, नियमांची माहिती आणि सोबत संघटनेत काम करण्याची मानसिकता, या गुणांमुळे त्यांनी आपले एक स्थान निमार्ंण केले होते. राजकारणात काम करीत असताना, सामाजिक कार्य कसे करता येते याचे ते एक उदाहरण होते. ‘अदम्य चेतना’ नावाने चालविल्या जाणार्या एका संस्थेमार्फत, लहान मुलांच्या भोजनासाठी त्यांनी एक मोठी योजना चालविली होती. यात दररोज 40 ते 50 हजार मुलांना नि:शुल्क भोजन दिले जाते. कोणत्याही गैरसरकारी संस्थेमार्फत चालविली जाणारी ही जगातील सर्वात मोठी योजना असावी! अशा नेत्याचे निधन भाजपासाठी, त्यातही कर्नाटकसाठी एक पोकळी निर्माण करणारे आहे. आज दक्षिणेत भाजपाजवळ मोठा चेहरा नाही. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाले आहेत. केरळ, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू येथे भाजपाजवळ जननेता नाही. सतत सहा वेळा लोकसभेवर निवडून येणारा एकमेव चेहरा म्हणजे अनंतकुमार होते! त्यांची उणीव भाजपाला सतत जाणवत राहील.
बेटी बचाओ, बेटी पढाओे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ!’ला सार्या भारतात अभूतपूर्व यश मिळत असल्याचे आढळून आले आहे. भारत सरकारची ही योजना सर्वात लोकप्रिय ठरली असल्याचे सरकारला वाटत आहे. विशेष म्हणजे सार्या जगात या योजनेची प्रशंसा होत आहे. अनेक राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान भारत सरकारकडे या योजनेबाबत विचारणा करीत असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेबाबत राज्याराज्यांत असलेली माहिती भारत सरकारकडे आली असून, ती अतिशय उत्साहवर्धक असल्याचे आढळून आले आहे.
हरयाणात, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ!’ कार्यक्रमाला मोठे यश मिळाल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. या योजनेमुळे हरयाणातील सारे वातावरणच बदलले असल्याचे सरकारला वाटत आहे. हीच स्थिती राजस्थानमध्ये तयार झाली असल्याचे समजते. राजस्थान सरकारने या योजनेचा पाठपुरावा केल्यानंतर, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ!’ला यश मिळणे सुरू झाले. अर्थात, याचे सारे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जाते. त्यांच्याच कल्पनेतून साकारलेल्या या योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे, यावर ते बारीक लक्ष ठेवून होते. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात या योजनेची कोणती व कशी प्रगती होत आहे, याचा आढावा ते वेळोवेळी घेत होते, असे समजते.
देशातील सर्वात मोठ्या राज्यात- उत्तरप्रदेशात- ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ!’ला फार मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे म्हटले जाते. या योजनेमुळे समाजात एक क्रांतिकारी परिवर्तन झाल्याचे राज्य सरकारला वाटत आहे. आजवर कोणत्याही पंतप्रधानाने याकडे लक्ष दिले नव्हते, जे मोदी यांनी दिले. याचा फार मोठा फायदा समाजाला आणि भाजपाला मिळण्याचे संकेत आहेत. दक्षिण भारत, पूर्वोत्तर भारत या भागातही ‘बेटी बचाओ’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या राज्यातून आलेल्या आकडेवारीच्या आधारे हा निष्कर्ष काढला जात आहे.
सर्वच राज्यांत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ!’ला मिळणार्या यशाने सार्यांचे डोळे दिपून गेले आहेत. आजवर कोणत्याही सरकारला जे करता आले नाही, ते मोदी यांच्या प्रयत्नांमुळे साकार झाल्याचे सरकारमधून सांगितले जात आहे. जगातील काही आंतरराष्ट्रीय संस्था, या योजनेचे यश-विश्लेषण करण्यासाठी, केस स्टडी म्हणून या योजनेकडे पाहात आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी ही एक फार मोठी उपलब्धी मानली जाणार आहे. या योजनेमुळे त्यांचे नाव देशाच्या कानाकोपर्यातच नाही, तर जगाच्या सर्व देशांमध्ये जाऊन पोहोचले आहे.
@@AUTHORINFO_V1@@