मागणेकरी ते समाजवैभव...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018   
Total Views |


 

यश मिळवण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे आहे, असे आयुष्याचे सूत्रबंधन ठरवत महेश जगताप चिकाटीने कार्यरत राहिले आणि शेवटी त्यांनी आयुष्यात ठरवलेले यश मिळवलेच.


 

युवा आणि समाजाभिमुख प्रतिमा आणि प्रतिभा असलेले महेश जगताप. ते बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रमुख लेखापाल, वित्त विभागामध्ये कनिष्ठ लेखा परीक्षक म्हणून सेवेत आहेत. भटक्या विमुक्त जातीप्रवर्गातील गोसावी समाजातील हे पहिले युवक आहेत, जे बृहन्मुंबई महानगरपालिकेत या पदावर नियुक्त झाले. स्पष्ट मोजक्या शब्दांत सांगायचे, तर ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वित्त विभागात ऑडिटमध्ये कार्यरत आहेत. सरकारी स्पर्धा परीक्षांतून उत्तीर्ण होऊन हजारो विद्यार्थ्यांमधून निवडून येऊन पदावर रूजू होणे ही तशी सोपी गोष्ट नाही. सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थितीत जगत असणाऱ्या महेश यांच्यासाठी तर ही गोष्ट अतिशय कष्टप्रद आणि बहुधा अशक्यप्रायच. पण, त्यांनी स्वत:चे जीवन बदलण्याचे ठरवले आणि त्यांनी तसे सकारात्मकरित्या बदललेही. ज्यांच्या पूर्वजांना गाव नव्हते, ज्यांच्या पूर्वजांना घर नावाची वास्तू नव्हती, त्या जातीच्या भाळी असलेले सर्व दु:ख, त्रास, समस्या पचवून त्यातून बाहेर पडणे हे सगळ्यांनाच शक्य नसते. महेश यांनी हे शक्य केले. त्यांचे मूळ गाव शिरसोडी, तालुका इंदापूर आणि जिल्हा पुणे. भीमराव जगताप व कमल जगताप या गोसावी समाजाच्या दाम्पत्याला दोन मुले आणि दोन मुली. त्यापैकी एक होते महेश. भीमराव बारावीपर्यंत शिकलेले. सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला.

 

अंधेरी मरोळ पाईपलाईन येथील पत्र्याच्या चाळीत हे कुटुंब राहायचे. महेश म्हणतात, “वडील कामाला असले तरी, घरी कायम आर्थिक चणचण. कारण, परंपरेनुसार पैशाचा विनियोग कसा करावा, हे समाजात कुणालाही माहिती नव्हते.” त्यामुळे लहानपणी ते आजोबांसोबत मागायलाही गेलेले. त्या मागण्याला कोणतेही औचित्य नसायचेच. ते सांगतात की, एकदा ईदी मागण्यासाठीही ते गेलेले. त्यावेळचे एक दृश्य त्यांच्या मनावर ठसले. घरी शिक्षणाला पैसे खर्च करण्याची आर्थिक स्थिती नव्हती. पडेल ते काम करत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. त्यानंतर त्यांच्या वडिलांना मुंबईमध्ये सरकारी क्वार्टर्स मिळाले. इथून मात्र त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण, जिथे ते क्वार्टर्स मिळाले होते, तिथे विविध समाजाची कुटुंबं राहत होती. विविध स्तरांवरील अधिकारी वर्गाच्या लोकांचे येणेजाणे, दिसणे, वागणे यामुळे महेश यांना वाटू लागले की, आपलेही जगणे यांच्यासारखे व्हावे. कायम दोन वेळच्या जेवणासाठीचे जगणे नाकारायला हवे. वर्षभरात दिवाळीला मिळणारा एक कपड्याचा जोड तो वर्षभर पुरवताना त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या मित्रांचे फॅशनेबल राहणीमान येईल. त्यावेळी त्याला वाटे की, हे सर्व आपल्याला आपल्या घरातल्यांना प्राप्त होण्यासाठी शिकणे गरजेचे आहे.

 

पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण प्राप्त केल्यानंतर ते खाजगी कंपनीत काम करू लागले. पण, तुटपुंज्या पगारावरचे जगणे दु:खाशिवाय काही प्राप्त करू देत नव्हते. त्याने ठरवले की, आपणही एमपीएसी, युपीएसी परीक्षा द्याव्यात. हा विचार त्यांनी घरी सांगितला. त्यासाठी त्यांना पुण्याला शिकायला जायचे होते. पण, पैसे कुठून मिळणार, साठवलेल्या पैशांबरोबर आईने आपले किडूकमिडूक दागिने विकले, कर्ज काढले आणि ते पुण्याला परीक्षेसाठी गेले. एक वर्ष अभ्यास केला. या दरम्यान त्यांनी खर्च माफक ठेवला होता. वसतिगृहाचे शुल्क भरणे गरजेचे होते. त्याची तरतूद प्रथम केली. मात्र, त्या एका वर्षात ते केवळ दिवसातून एकदाच जेवायचे. दुपारची मेस लावली होती. त्यात चार पोळ्या मिळत. दुपारी दोन पोळ्या खाऊन उरलेल्या दोन पोळ्या रात्री खात. त्यांनी पूर्ण वेळ अभ्यासाला दिला. परीक्षा दिली, पण एक-दोन गुणांसाठी त्यांचे यश हुकले. या दरम्यान ते सातत्याने विविध स्पर्धा परीक्षा देत होते. त्यातच मग बृहन्मुंबईच्या सरल सेवा भरतीमधून त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. ते म्हणतात की, “माझे सगळ्यांना एकच सांगणे आहे की, ज्यांना आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे, त्यांनी एमपीएसी, युपीएसीच्या अभ्यासक्रमाचा सराव करावा. यश मिळेल न मिळेल, पण चौकटीपलीकडे जाऊन खूप काही शिकायला मिळते.” ते आज स्थिर आयुष्य जगतात. पण, त्यांचे मन मात्र नेहमी अस्थिर जीवन जगणाऱ्या समाजबांधवांविषयी विचार करत असते. गाई घेऊन भिक्षा मागायला जाणारे समाजबांधव विशेषत: भगिनींबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. ते म्हणतात, “माझ्या आयुष्यात मी ध्येय ठरवले आहे की, आमच्या पुढच्या पिढीला मागायला जावे लागणार नाही. यासाठी मी प्रयत्नशील राहायचे. शिक्षण, स्वावलंबन आणि समाजजागृतीद्वारेच हे शक्य आहे. समाजासाठी खूप साऱ्या सरकारी योजना आहेत. त्या समाजापर्यंत पोहोचल्या, तर हे चित्र पालटायला मदत होईल. त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे.” महेश जगताप यांच्यासारखे युवक समाजाचे वैभव असतात, हेच खरे...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@