तिन्ही सशस्त्र दले अल्पावधीत कोणतेही युद्ध जिंकू शकते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2018
Total Views |



नवी दिल्ली : “भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्कर यांच्यात संयुक्त नियोजनाकरिता विशेष यंत्रणा प्रस्थापित केली जावी. असे झाल्यास आपला देश भविष्यात कोणतेही युद्ध अल्पावधीतच जिंकू शकतो,” असे प्रतिपादन हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी आज रविवारी केले. “देशाला भेडसावत असलेल्या सर्व संभाव्य धोक्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तिन्ही सशस्त्र दलांनी एकत्रित व्यूहरचना स्वीकारायला हवी. अशा प्रकारची यंत्रणा स्थापन करण्यात यावी, असे हवाई दलाचे स्पष्ट मत आहे,” असे धानोआ यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

 

“हवाई दल, नौदल आणि लष्कर यापैकी कोणीही एक दल स्वबळावर आणि स्वत:च्या रणनीतीने युद्ध जिंकू शकत नाही. आपल्या देशापुढे अनेक प्रकारची आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी तिन्ही दलांमध्ये सुसूत्रता असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. “भारत हा अखंड असल्याने या देशातील तिन्ही सशस्त्र दलांनी स्वत:ला वेगवेगळे समजू नये. तिघांचाही उद्देश देशाचे रक्षण करणे हाच असल्याने, भविष्यातील कोणतेही युद्ध जिंकण्यासाठी तिन्ही दलांनी संयुक्त रणनीतीअंतर्गतच काम करायला हवे. सध्या सरकार आणि तिन्ही दलांमध्येही या विषयावर सखोल चर्चा सुरू झालेली आहे. देशातील या तिन्ही सामर्थ्यशाली दलांचे संपूर्ण मनुष्यबळ आणि संपत्ती एकाच अधिकाऱ्यांच्या कमांडमध्ये आणता येऊ शकते काय, हा या चर्चेतील मुख्य विषय आहे. अमेरिका आणि अन्य काही पाश्चिमात्त्य देशांमध्ये सर्व सशस्त्र दलांची कमांड एकाच अधिकाऱ्याकडे आहे,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

दरम्यान, तिन्ही दलांची एकच कमांड असावी काय, यावर केंद्र सरकारने अद्याप कोणतेही संकेत दिले नसले, तरी याच वर्षीच्या एप्रिलमध्ये सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण नियोजन समिती स्थापन केली आहे. तिन्ही सशस्त्र दलांमध्ये समन्वय राखून राष्ट्रीय सुरक्षा डावपेच तयार करण्याची जबाबदारी ही समिती पार पाडणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@