फेसबुक, झुकेरबर्ग आणि राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2018
Total Views |



 
 
 
केवळ एका महाविद्यालयीन प्रकल्पासाठी तयार केलेल्या सोशल नेटवर्किंग साईटची खऱ्या अर्थाने २००४ साली सुरू झालेली फेसबुक इनकॉर्पोरेशन आज बलाढ्य कंपनी म्हणून नावारूपाला आल्याचे दिसते. कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्गही जगातील अग्रगण्य श्रीमंतांच्या यादीत पोहोचले. मात्र, फेसबुकच्या गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा मागत पेच निर्माण केला आहे.
 
 
डेटाचोरी, निवडणुकांमधील हस्तक्षेपांसारख्या आरोपांवरून यापूर्वीच लक्ष्य झालेल्या झुकेरबर्ग यांच्या अध्यक्षपदाबाबत आक्षेप घेतला आहे. याशिवाय फेसबुकच्या विरोधकांना ‘यहुदी’ म्हणून संबोधल्यानंतर हे प्रकरण चिघळत गेले. महत्त्वाची बाब म्हणजे फेसबुकचे प्रमुख गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांनी झुकेरबर्ग यांना हटवण्याची मागणी लावून धरली आहे. एका ब्रिटिश वृत्तपत्राने नुकतीच ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याचे प्रमुख कारण म्हणजे फेसबुकने प्रतिस्पर्धी कंपन्या गुगल, अॅपल आदी कंपन्यांविरोधात लिहिण्यासाठी जनसंपर्क पथकाची नेमणूक केली. याचा हवाला देत कंपनीतील प्रमुख गुंतवणूकदार ट्रिलियम असेट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष जॉर्ज सोरोस यांनी झुकेरबर्ग यांना हटविण्याची मागणी केली. दुसरीकडे झुकेरबर्ग यांनी आरोप फेटाळत या प्रकरणी काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली.
 
फेसबुकवर डेटाचोरी आणि अन्य आरोपांवर होणाऱ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांविरोधात बातम्या पेरण्यासाठी कंपनीने जनसंपर्क वाढविण्यासाठी माणसे नियुक्त केली. यावर आक्षेप घेत गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांनी कंपनीचे अध्यक्षपद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद वेगळे असावे, अशी मागणी केली आहे. फेसबुकच्या अन्य गुंतवणूकदार कंपनीचेही तेच म्हणणे आहे. अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एकच असल्याने कंपनीला भेडसावणाऱ्या समस्यांचे पूर्णतः समाधान होत नाही. झुकेरबर्ग नेहमी कंपनीतील समस्यांवर चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी त्यांच्यावर पडदा टाकण्याचे काम करतात. झुकेरबर्ग कंपनीच्या या पदावर कायम असेपर्यंत शेअर घसरत राहील, असाही आरोप लावण्यात आला आहे. संपूर्ण कंपनीवर नियंत्रण मिळविण्याची ताकद झुकेरबर्ग यांच्यात असल्याचा दावादेखील गुंतवणूकदारांनी केला आहे. ‘ट्रिलियन असेट मॅनेजमेंट’ या कंपनीने केलेल्या राजीनाम्याच्या मागणीला अन्य गुंतवणूकदारांनी पाठिंबा दर्शविल्याने झुकेरबर्ग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता यावर मे २०१९ मध्ये कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येईल.
 

मार्क झुकेरबर्ग यांना हटविण्यापूर्वी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोपही गंभीर आहेत. अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये फेसबुकचा झालेला हस्तक्षेप, केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने केलेल्या ८.७ कोटी युझर्सच्या डेटाचोरीवर आक्षेप घेण्यास व चोरी रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना न करणे, फेक न्यूज रोखण्यासाठीचे फोल ठरलेले प्रयत्न आदींमुळे फेसबुकची खालावलेली प्रतिमा याचा एकत्रित मुद्दा करून राजीनामा मागण्यात येत आहे. त्यामुळे झुकेरबर्ग यांनी मे महिन्यापर्यंत वरील मुद्द्यांमध्ये काही सुधारणा केल्या नाहीत तर झुकेरबर्ग यांना पदावरून हटवल्यास नवल वाटायला नकोझुकेरबर्ग यांचा स्वभाव काहीसा लहरी असल्याने त्यांच्यावर ही वेळ येत आहे.

 
कंपनी मोठ्या नावारूपाला पोहोचविल्याबद्दल जगाला त्यांचे कौतुकच आहे. मात्र, ती पत टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर कायम राहणार आहे; अन्यथा बंडखोरी त्यांना अडचणीत आणू शकते. गुंतवणूकदारांचा पैसा लागल्याने त्यांना कंपनीची चिंता भेडसावणारच. वापरकर्ते, गुंतवणूकदार आणि प्रतिस्पर्ध्यांमध्येही कंपनीबद्दल विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. टीका सहन करण्यासही शिकले पाहिजे. गेल्या आठवड्यातच अॅपलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर चिडून अॅपलचे फोन वापरण्यास त्यांनी प्रतिबंध केला होता. टीम कुक यांनी एका मुलाखतीत झुकेरबर्ग यांच्यावर टीका केली. त्यांचा राग इतका की, कर्मचाऱ्यांनी केवळ अॅण्ड्रॉईड फोन वापरावा, असा फतवाच काढला. टीम कुक हे ग्राहकांच्या प्रायव्हसीबद्दल फेसबुकवर सडकून टीका करतात, अशा टीकाकारांना कामातून उत्तर देणे गरजेचे आहे. फेसबुवर सुरू असलेल्या फेकन्यूज आणि बदनामीकारक मजकुराला मुरड घालण्याचे आव्हान आहे. यातूनच गुंतवणूकदार, वापरकर्त्यांचा विश्वास जिंकणे शक्य आहे.
 
 - तेजस परब
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@