बालपूनर्वसनाचा विजयी ‘समतोल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |

 
 

मायानगरी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हजारो मुले महाराष्ट्रातून तसेच परराज्यांतून विविध कारणांसाठी दाखल होतात. त्यांची न कुठे दखल, ना कुणाला चिंता... पण, स्वत: प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेऊन समाजकार्यासाठी आयुष्य समर्पित केलेल्या विजय जाधव यांनी या मुलांना जीवनदानच दिले. या कुटुंबापासून दुरावलेल्या मुलांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचविण्याचा जाधव यांनी विडा उचलला. ‘समतोल फाऊंडेशन’च्या माध्यमातून आज या सामाजिक कार्याचा वटवृक्ष बहरला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची प्रेरणा, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष याचा विजय जाधव यांनी त्यांच्या आत्मकथेच्या माध्यमातून घेतलेला हा विचारवेध...

 

शिक्षणाने माणूस मोठा होतो,’ असे अनेकदा लहानपणापासून ऐकत आलो. लहानपणी म्हणजे चौथीत असताना. घरी सोयीसुविधा नसल्यामुळे शिक्षिकेच्या घरी म्हणजे आमच्या डावखरे बाई यांच्या घरी राहायचो. हळूहळू शिक्षणाची व शिकण्याची गोडी लागली आणि चौथीत स्कॉलरशिपमध्ये पुणे जिल्ह्यातून मी प्रथम क्रमांक पटकावला. खरं तर घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी बाईंकडे राहायचो. पण, लहानपणी चांगले संस्कार झाले, म्हणून नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड निर्माण झाली. स्कॉलरशिप कुठून येते? कशी येते? ती कोण देते? हे प्रश्न लहानपणीच पडले होते. पुढे दहावी उत्तीर्ण झालो. बारावीनंतरही नोकरी लागेल की नाही म्हणून चिंता होती, म्हणून तांत्रिक-व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. आय.टी.आय करताना पैसे भरावे लागणार नाही, असा कोर्स निवडला आणि पॉवर प्रेस मशीन ऑपरेटर बनलो. घरातील काही मंडळी मुंबईला होती. विक्रोळीला राहत असल्याने गोदरेज कंपनी घराजवळच होती. तेथील काही लोकांशी भावाने चर्चा केली आणि गोदरेजमध्ये १९९६ ला कामाला लागलो. पण, कामात मन रमेना म्हणून काहीतरी वेगळे करावे, असे वाटले. तेव्हा गोदरेजमध्ये दत्ता सामंत यांची कामगार युनियन होती व युनियनचे काम काही कारणाने बंद पडले होते. आता ही युनियन काय असते, तर पुन्हा प्रश्न पडले तेव्हा एका मित्राच्या मदतीने ’नर्मदा बचाव’ आंदोलनातील कार्यकर्त्यांची ओळख झाली. कामात मन रमेना म्हणून नर्मदा घाटीमध्ये आंदोलनात सहभागी झालो. काही दिवसांनंतर सामाजिक कार्याचे प्रशिक्षण असते, डिग्री असते असे समजले. तेथे मुलांना जमा करण्याचे व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम माझ्याकडे होते. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही नर्मदा घाटीत पाड्यावर जात असताना मुलांना विचारले की, ”पुढे काय करणार?” तर बरेच जण “शहरात जाणार” म्हणून सांगायचे. मनात विचार आला, कितीतरी मुले असे घरी न सांगता शहराकडे जात असतील म्हणून शोध घेऊ लागलो. पुन्हा मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वर्गाला गेलो. काहीतरी करायचे आहे, याची माहिती दिली. घरातून निघून येणार्‍या मुलांचे पुनर्वसन हा साधा सरळ विषय घेतला, परंतु हा प्रचंड मोठा विषय आहे, हे समजायला थोडा वेळ लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता याच दरम्यान बनलो. सोशल डिप्लोमा निर्मला निकेतनमधून केला आणि ‘युवा’सारख्या संस्थेत अनुभव घेण्यासाठी पाच वर्षे सातत्याने अनेक विषयांवर काम करत राहिलो. २००४ मध्ये पूर्णवेळ आपण एकच काम करावे, असे ठरवले. ‘संपूर्ण जीवन सेवा समर्पण,’ असा निश्चय मनाने केला व ‘समतोल फाऊंडेशन’ संस्थेची नोंदणी केली.

 

 

‘स-समता, म-ममता, तो-तोहफा, ल-लक्ष’ या चार चतुःसूत्रीवर काम करायचे ठरवले. घरातून निघून येणारी मुले ही अनेक राज्यांतील, अनेक भाषेतील, अनेक जाती-धर्मातील, अनेक परंपरेतील असतील म्हणजेच या मुलांसाठी आपल्याकडे समानता असेल. वयाने लहान असणारी ही मुले म्हणजे ६ ते १८ वयोगटातील, ज्याला कायद्याने ‘बालक’ म्हटले आहे. अशा वयोगटातील मुलांना भावनिक आधार म्हणजेच ममतेची गरज आहे व असते. जगातील कोणतीही मुलं अनाथ नसतात, यावर संस्थेचा विश्वास आहे, नव्हे ती आमची खात्रीच आहे. अनाथ तर मुलांना बनवले जाते आणि आईवडील नसतानाही नातेवाईक सांभाळणार नाही म्हणून त्यांना ‘अनाथ’ म्हणायचे. त्यांची ओळख पुसून टाकायची नाही, तर आपण त्याचे पालक बनायचे व आहे ती ओळख तशीच ठेवून त्यांच्या राज्यात, त्यांच्या जिल्ह्यात त्यांचे पुनर्वसन करायचे ठरविले. आपल्या मातीत त्यांना जगायला शिकवायचे, म्हणजेच तोफा - एक भेट या स्वरूपात त्याचे पुनर्वसन करायचे व कुटुंबाशी जोडून ठेवायचे. कारण, आमची व्यवस्था कुटुंबावर आधारित आहे. म्हणून आमचा समाज सक्षम आहे. एवढेच करून थांबायचे नाही तर बालकाच्या विकासासाठी आवश्यक त्या गोष्टींचा पाठपुरावा करायचा. होईल ती मदत करायची म्हणजे त्याचे विकासाचे व सक्षमीकरणाचे लक्ष त्याला दाखवून द्यायचे, ही चतुःसूत्री ठेवून कार्य सुरू ठेवायचे आणि ती सातत्याने सुरू राहील, जेणेकरून समाजाचा सामाजिक ‘समतोल’ही राहील.
 

‘समतोल’च्या कार्याची सुरुवात २००६ पासून सुरू झाली. रेल्वे स्टेशनवर मुलांचा जाऊन शोध घ्यायचा, त्यांना प्रेमाने आपलेसे करायचे, त्यांना समस्या न विचारता आधार द्यायचा, मूलभूत सुविधा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा, शासकीय यंत्रणांना माहिती द्यायची, मग ते पोलीस असो किंवा वैद्यकीय रुग्णालय असो अथवा बालगृह असो, मुलांच्या माहितीच्या आधारे शोध सुरू ठेवायचा, असे ठरले. प्रथम तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर म्हणजे पूर्वीच्या व्ही.टी स्टेशनपासून या कामाला सुरुवात झाली. २००६ मध्ये सात दिवसांत अशी ७०० मुले मिळाली. नवीन-जुनी मिळून एवढी मोठी संख्या झाली तेव्हा कळले, दिवसाला महाराष्ट्रातील फक्त एकट्या मुंबईत १०० ते १५० मुले येतात. यामध्ये दोन प्रकारची मुले असतात. एक तर नवीन येणारी व दुसरी स्टेशनवर म्हणजे जुनी राहणारी मुले. ही मुले मुंबईत का येत असावीत, याचा शोध घेतला आणि अंतत: चार प्रमुख कारणे समोर आली. कौटुंबिक समस्या, शहराचे आकर्षण, शैक्षणिक समस्या व फसवणूक; मग ती कामासाठी किंवा लैंगिक शोषणासाठी किंवा अजूनही इतर शरीराचे भाग काढून घेण्यासाठी. २००६ ते २०१८ या १२ वर्षांच्या कालखंडात या समस्येला घेऊन काहीही बदल झालेला दिसला नाही. तेव्हा जेवढी मुले आढळत होती, आजही तेवढीच मुले रेल्वे स्टेशनवर आढळतात. फक्त यंत्रणांमध्ये (G.R.P, R.P.F, Station Manager, Hospital) यांची रिपोर्टिंग पद्धत बदलली आहे. सुरुवातीला गरीब घरातील मुले घर सोडून बाहेर पडत होती, पण आता ज्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत म्हणजेच श्रीमंत घरातील मुलेदेखील घर सोडून बाहेर पडतात. त्यामुळे गरीब-श्रीमंत असा भेद मुलांमध्ये करण्याचे कारण नाही. ‘समतोल’ने आतापर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून पुनर्वसन केले आहे. पण, हे सामाजिक कार्य करताना अनेकदा वाईट प्रसंगांनाही तोंड द्यावे लागले. मग ते गुंड असो किंवा शासकीय यंत्रणा, परंतु ‘समतोल’ने हार मानली नाही. १३ पोलीस केसेस तर काही संस्थांकडून माझ्यावरच टाकण्यात आल्या. कारण, सगळीच मुले घरी गेली, तर ना त्यांचे धर्मांतर करता येईल आणि ना त्या मुलांच्या नावाखाली सरकारकडून शासकीय अनुदान लाटता येईल. परंतु, बालक हे कुटुंबातच वाढले पाहिजे व संस्था हा शेवटचा पर्याय असला पाहिजे, हे कायदाही सांगतो, हे इथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते.

 

 

सध्या ‘समतोल’ मुंबई सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, पुणे, भुसावळ, जळगाव, नागपूर या स्टेशनवर कार्यरत आहे. रेल्वे स्टेशनवरून दरमहा २०० ते २५० मुले ‘समतोल’च्या कार्यकर्त्यांना भेटतात. त्यात मुलींचाही समावेश असतो. सध्या ‘समतोल’कडे ४० जणांची पूर्णवेळ काम करणारी टीम आहे. ‘समतोल’चे मनपरिवर्तन शिबीर हे मुख्य कार्यक्रम म्हणून चालते. हिंदू सेवा संघ, मामणोली येथे स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र उभे आहे. मनपरिवर्तन शिबीर प्रक्रिया ही महाराष्ट्रामध्ये राबवित असलेली ‘समतोल’ ही एकमेव संस्था आहे. जी मुले अनेकदा घरदार सोडलेली असतात, जी मुले शिक्षणापासून वंचित आहेत, ज्या मुलांना घरी जाण्याची इच्छाच नाही व वयाने ८ ते १५ वयोगटातील आहेत, ज्यांना नशेची सवय लागलेली आहे, अशा मुलांना शिबिरात नेले जाते व त्यांचे ४५ दिवस शिबीर चालते. त्यातून मुलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम केले जाते. शेवटच्या समारोपात पालकांचे समुपदेशन होते. अचानक पालक व मुले यांची भेट घडवली जाते. हा क्षण भावनिक असतो. अशी एकूण ३४ शिबिरे यशस्वी करण्यास ‘समतोल’ सक्षम ठरली आहे. समाजातील प्रतिष्ठित मान्यवर ज्यामध्ये साहित्यिक, पत्रकार, व्यापारी, समाजसेवक, मंत्री, चित्रकार, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते सामील आहेत, त्यांच्या उपस्थितीत या मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली आनंदाने सुपूर्द केले जाते. यावेळी पालकांच्या डोळ्यातून येणारे अश्रू बरेच काही सांगून जातात. यासाठी आर्थिक खर्च खूपच मोठा असतो. साधारण एका शिबिराला चार लाख रुपये इतका खर्च येतो. ज्या मुलांचे पालक शिबिरासाठी उपस्थितीत राहू शकत नाहीत किंवा ज्यांच्यापर्यंत पत्रच पोहोचत नाही, अशा मुलांना आपला कार्यकर्ता अगदी घरापर्यंत पोहोचवतो. पण, दुर्देव म्हणजे बरेचदा आपली मुले या जगातच जिवंत नाही म्हणून घराच्या भिंतीवर त्यांचा हार घातलेला फोटो लावलेला असतो. या पळून आलेल्या मुलांना घर सोडून पाच-सहा वर्षं झालेली असतात. पालकांना जेव्हा मुले भेटतात, तेव्हा ओळख पटवून देण्यासाठी अनेक लहानपणाच्या आठवणी जागृत कराव्या लागतात. खरंतर यालाच ‘समतोल’ बाल अधिकार समजते. कारण, मुलांना केवळ बालसुधारगृहात डांबून त्या मुलांचा विकास होत नाही, हे मान्य करावे लागेल. कारण, बालसुधारगृहातील कर्मचारीवर्ग बालप्रेमी असावा, तेथील सुविधाही बालप्रेमी असाव्यात, पण हे असे सकारात्मक वातावरण क्वचितच बालसुधारगृहात आढळते. शिवाय विभागांची गुंतागुंत जास्त असल्यामुळे मुले ही देशाची संपत्ती आहेत, त्यांचे योग्य संगोपन करा, अशी म्हणण्याची वेळच आली नसती. सध्या ‘बाल संरक्षण समिती’ ही संकल्पना सर्व जिल्ह्यात असावी, म्हणून ‘समतोल’ ठाण्याच्या वस्तीमध्ये कार्यरत आहे. शासकीय अनुदान न घेता व कुठल्याही फंडिंग एजन्सीबरोबर करार न करता फक्त सामाजिक देणगीवरच ‘समतोल आपला आर्थिक भार चालवते. ‘समतोल मित्र बना व सामाजिक कार्यात सहभागी व्हा,’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘समतोल’चा प्रवास सुरु आहे. समतोलविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या www.samatol.org या संकेतस्थळादेखील भेट देऊ शकता. ‘समतोल’च्या कार्याची दखल व अनुभव घेऊन विजय जाधव सध्या बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य या सदस्य पदावर नियुक्त आहेत. पुढे भारतातील रेल्वे जंक्शन, स्टेशनवर जिथे मुलांना मदत हवी आहे, तिथे तिथे ‘समतोल’ पोहोचण्याचा प्रयत्न करते. सक्षम होण्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग, कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र, समतोल वार्ता, समतोल अॅप याद्वारे लोकांना ‘समतोल’च्या कार्याची माहिती देण्यात येते. पण, या सगळ्यासाठी तुमच्या सर्वांचे सहकार्य व मदत हवीच आहे. कारण, आपला समाज बालप्रेमी बनवायचा आहे, तरच समस्या कमी होतील आणि हा ‘समतोल’ अबाधित राहील.
 
 

 
 
- विजय जाधव

 

(लेखक समतोल फाऊंडेशनचे संस्थापक-सचिव असून महाराष्ट्र राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य आहेत.)
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@