गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |


 


महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षात काही बंदिवानांच्या शिक्षेमध्ये सवलत दिली जाणार असल्याचे प्रकट झाले आहे. महात्मा गांधींच्या हत्येमागे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर होते, अशा स्वरूपाच्या आरोपांची द्वेषरूपी जन्मठेप सावरकरांच्या विरोधकांनी सावरकरांना त्यांच्या उत्तर आयुष्यात, तर दिलेली होतीच, त्याशिवाय ती मरणोत्तरही चालू ठेवलेली आहे. त्यातून या वर्षात सावरकरांची सुटका व्हावी आणि सावरकरांची अपकीर्ती थांबावी, अशी अपेक्षा आहे. महात्मा गांधींच्या उदार धोरणानुसार, त्यांच्या आत्म्याकडून त्यांच्या अनुयायांना तसा संदेश दिला जाईल, अशी आशा करूया. प्रा. शेषराव मोरे यांना याच वर्षामध्ये ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ हा ग्रंथ लिहिण्याची व प्रकाशित करण्याची प्रेरणा झालेली आहे हे विशेष !

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेक सावरकरप्रेमी लेखकांनी छोट्या लेखांद्वारे आणि छोट्या पुस्तिकांद्वारे केलेला आहे. प्रा. शेषराव मोरे यांच्या ग्रंथाने अत्यंत मोलाची भर घातली आहे. या ग्रंथ निर्मितीसाठी सावरकरांच्या विचारांचा विपर्यास करणाऱ्यांची नावे घेऊन कोणतीही भीडभाड न ठेवता टीका करणारे आणि सावरकरांचा बुद्धिवाद, सावरकरांचे सामाजिक विचार आणि सावरकरांचा विज्ञानवाद लोकांना कळेल अशा भाषेत उलगडून सांगणारे प्रा. शेषराव मोरे, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत आणि ‘राजहंस प्रकाशन’ यांना जितके धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत. मोरे यांच्या ग्रंथप्रकाशनाच्या दिवशी त्या ग्रंथाचे इंग्रजी आणि हिंदी भाषेतून अनुवाद केले जावेत, ते आंतरजालाच्या (इंटरनेट) माध्यमातून तरुण पिढीला वाचावयास व मनन करण्यास उपलब्ध व्हावेत अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. गांधीहत्येचे दायित्व सावरकरांवर टाकून सावरकरांना दोषी ठरविण्याचा सावरकर विरोधकांकडून जो प्रयत्न सातत्याने केला जात आहे याची चिकित्सा आणि शहानिशा करून या ग्रंथाद्वारे चपखल उत्तर दिले गेलेले आहे.

 

ग्रंथाची रचना

 

या ग्रंथाचा सारांश प्रामुख्याने ग्रंथाच्या प्रस्तावनेत पहिल्या प्रकरणात आणि समारोपाच्या प्रकरणात वाचावयास मिळतो. गांधीहत्येचे कारस्थान कसे घडले, यासंदर्भातील माहिती प्रकरण दोनमध्ये आहे. असे दिसते की, २० जानेवारी, १९४८ च्या गांधीहत्येच्या प्रयत्नानंतरही शासनाचे गुप्तहेर खाते सतर्क झालेले नव्हते, नाहीतर ३० जानेवारी, १९४८ ची घटना घडलीच नसती. त्या प्रकरणात फरारी घोषित करण्यात आलेले गंगाधर जाधव आणि सूर्यदेव शर्मा पुढे सापडले की नाही हेही कळलेले नाही. गांधीहत्या कटातील आरोपी करण्यात आल्यामुळे सावरकरांना प्रचंड मनस्ताप व मनोयातना सहन कराव्या लागल्या होत्या. दि. ५ फेब्रुवारी, १९४८ ला सावरकरांना मुंबई सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली व मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले. त्यांना तेथे कोणत्याही वकिलास दि. १४ मे, १९४८ पर्यंत (म्हणजे तीन महिने) भेटू देण्यात आले नव्हते, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्याविरुद्ध खोटे पुरावे तयार केले जातील व ते सादर केले जातील याचा अटक झाल्यापासूनच सावरकर विचार करीत होते.

 

अपकीर्तीमागील हेतू

 

सावरकरांच्या विरोधकांनी त्यांच्या बदनामीची मोहीम कोणत्या कारणासाठी उघडली याचे विश्लेषण मोरे यांनी पहिल्या प्रकरणात केले आहे. सावरकरांची ‘हिंदुत्व’ विचारसरणी आणि त्यांनी सांगितलेले हिंदू हिताचे राजकारण याचा विपर्यास करून त्यांना ‘जातीयवादी’ व ‘मनुवादी’ ठरविणारे लेखन करणे व त्याची ‘गोबेल्स’ तत्त्वाप्रमाणे प्रचाराची मोहीम उघडणे हा सावरकर विरोधकांचा कावा मोरे यांनी ओळखून त्या आधारे संपूर्ण ग्रंथाची मांडणी केल्याचे दिसते. “कायद्याने स्थापन झालेल्या सक्षम न्यायालयाने गांधीहत्येसंदर्भात सावरकरांना निष्कलंक (निर्दोष) ठरविल्यानंतरही त्यांच्यावर खुनी असल्याचा आरोप करीत राहणे हा भारतीय दंड विधानानुसार बदनामीचा शिक्षापात्र गुन्हा ठरत असूनही सावरकरांची बदनामीची मोहीम चालू ठेवणारे सर्व तथाकथित विद्वान दंडनीय गुन्हा करीत असतात.” अभियांत्रिकीबरोबर कायद्याचाही अभ्यास झालेले शेषराव मोरे असे सांगण्याचे धाडस करतात. त्याकरिता त्यांचे विशेष अभिनंदन. सावरकरांच्या मृत्यूनंतर इ.स. २००० पर्यंत ‘सावरकर व गांधीहत्या’ हा विषय इतिहासजमा झाला होता. परंतु, १९९८ मध्ये भाजपप्रणीत आघाडीचे शासन केंद्रात स्थापन झाल्यापासून भाजपच्या ‘हिंदुत्ववादी’ विचाराचे प्रामुख्याने सावरकरच प्रेरणास्थान आहेत, हे निश्चित करून सावरकर विरोधकांनी सावरकरांना अपकीर्त करण्यासाठी त्यांच्यावर मुख्यत: त्यांच्या मृत्यूनंतर वैयक्तिक आरोप करणे सुरू केले. ज्या प्रमाणात भाजपचे राजकीय सामर्थ्य वाढत आहे, त्या प्रमाणात सावरकरांना अपकीर्त करण्याची मोहीमही वाढतच चालली आहे.

 

‘कपूर’ अहवालाची चीरफाड

 

ज्या कपूर आयोगाचा आधार घेऊन आणि त्याचा मनसोक्त वापर करून सावरकर विरोधक सावरकरांना अपकीर्त करीत असतात, त्या कपूर आयोगाच्या अधिकारबाह्य आणि निराधार मतप्रदर्शनाची ग्रंथातील चौथ्या प्रकरणात प्रा. मोरे यांनी चीरफाड केलेली आहे. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, सर्वसामान्यांना न्यायालय आणि आयोग यांच्यातील फरक, आयोगाचे अधिकार व आयोगाने खरोखर कोणत्या आधारे निष्कर्ष काढला आहे याची माहिती नसते. मोरे यांनी हा फरक चपखलपणे विशद केला आहे. सावरकरांच्या संबंधात चौकशी करण्याचा अधिकारच शासनाने कपूर आयोगाला दिलेला नव्हता आणि सावरकरांना निर्दोषठरविणाऱ्या विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध निष्कर्ष काढण्याचाही आयोगाला कोणताच अधिकार नव्हता, हेही मोरेंनी उत्कृष्टपणे प्रतिपादिले आहे. ‘प्रीतमसिंह विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब’ या प्रकरणी दिलेल्या निकालाचा संदर्भ देऊनही कपूर आयोगाने सावरकरांविषयी पूर्णपणे अधिकारबाह्य व अनैर्बंधिक निष्कर्षात्मक मतप्रदर्शन का केले, हे एक कोडे असल्याचे सांगून प्रा. मोरे म्हणतात, “कपूर आयोगाने सावरकर संबंधात विशेष न्यायालयाच्या निकालावर बोळा फिरविला आहे. हे एक चांगले झाले की, २८ मार्च, २०१८च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने पुढील विधाने (स्टेटमेंट्स) केलेली आहेत. आयोगाच्या निष्कर्षामुळे सावरकरांना निर्दोष ठरवणारा फौजदारी (विशेष) न्यायालयाचा निकाल कोणत्याही प्रकारे बदलू शकत नाही. ''It cannot have the effect of overturning the finding of the Criminal Court which acquitted Shri. Savarkar.'' याचिकाकर्त्यांचे म्हणणे की, आयोगाने श्रीयुत सावरकरांना गांधीहत्याप्रकरणी दोषी धरले आहे. त्यांचा हा समज चुकीचा आहे. ''The submission of the Petitioner that Shri. Savarkar has been held guilty for the murder of Gandhiji is misplaced.'' (ग्रंथातील परिशिष्ट दोन पाहावे.) सावरकरांच्या अनुपस्थितीत सावरकरांच्या वारसदारांना आयोगाने बोलाविलेले नव्हते. याचाच अर्थ त्यांच्याबाबत आयोगाने निष्कर्षात्मक प्रदर्शन करणे अन्यायकारक होते. हा मुद्दा मोरे यांनी उत्कृष्टपणे स्पष्ट केला आहे.वस्तुस्थिती शोधनाची यंत्रणा असलेल्या आयोगाने गांधीहत्येच्या पूर्वी शासकीय अधिकारी आणि संबंधित मंत्री यांची निष्क्रियता गांधी हत्येला कितपत कारणीभूत आहे, हे शोधून काढणे, हा जो मुख्य उद्देश कपूर आयोगाचा होता, याकडे मात्र सावरकर विरोधक दुर्लक्ष करतात. ज्या कपूर आयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे सावरकर विरोधक सावरकरांना दोषी ठरवित असतात. त्या आयोगाला ‘सावरकरांचा गांधीहत्या कटाशी संबंध होता का’ याची चौकशी करण्याचाच अधिकार नव्हता.

 

साक्षीदारांची विश्वसनीयता

 

प्रकरण तीनमध्ये मोरे यांनी दिगंबर बडगे याची साक्ष ‘विकत घेतलेली साक्ष’ हे उत्कृष्टपणे स्पष्ट केली आहे आणि वरिष्ठ न्यायालयाने सावरकरांना निर्दोष ठरविणारी जी दोन पानांची कारणमीमांसा दिली आहे ती कशी योग्य आहे, याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. साक्ष, पुरावा याचे कायद्यातील अर्थ समजावून सांगितले आहेत. प्रमुखतः सावरकरांच्या विरोधात बडगेची साक्ष आहे आणि त्या बडगेचे चारित्र्य कसे अविश्वसनीय होते हेही दिले आहे. विशेष न्यायालयासमोर फिर्यादी पक्षाने (पोलिसांनी) आणलेला व न्यायालयाला एकमेव वाटलेला पुरावाच (दिगंबर बडगे याची साक्ष) कपूर आयोगासमोर आणला गेला नाही आणि जी साक्ष विशेष न्यायालयाने दखलशून्य मानली होती, त्या साक्षीला केंद्रस्थानी व पायाभूत ठेवून सावरकरांविरूद्ध निष्कर्ष काढण्यासाठी निर्णायक पुरावा मानला आहे. हा पुरावा आपल्याला पाहिजे तसा वापरण्याचा अधिकार कपूर आयोगाला नव्हताच. प्रकरण पाचमध्ये सावरकरांविरुद्ध बनावट, निरर्थक म्हणून अग्राह्य असलेले पुरावे कोणते व कसे आहेत हे मोरे यांनी मांडले आहे. प्रा. जैन यांच्या साक्षीची दखल घेऊन कपूर आयोगाने सावरकरांना दोषी ठरविण्याचे मतप्रदर्शन केले आहे. न्यायालयासमोर न आलेला परंतु, त्या काळात फिर्यादी शासनाकडे (पोलिसांकडे) माहिती असलेला पुरावा सावरकरांना दोषी ठरविण्यासाठी कपूर आयोगाने वापरला आणि सावरकर विरोधक त्याचे तुणतुणे वाजवतात. ज्या नगरवालांच्या साक्षीचा विरोधक उपयोग करून घेतात, त्या नगरवालांचा तपास अहवाल कसा बनावट आहे, हे मोरेंनी उत्कृष्टपणे मांडले आहे. नगरवाला, जैन आणि बडगे यांच्या साक्षीवर आधारित निष्कर्ष काढणाऱ्या आणि मतप्रदर्शन करणाऱ्या कपूर आयोगाला सावरकरांना दोषी ठरविता येईल, अशी मांडणी करण्याच्या सूचना त्यावेळच्या सत्ताधीशांनी दिल्या होत्या की, काय अशी शंका व्यक्त करण्याला पूर्ण जागा आहे.

 

गांधीजी-सावरकर संबंध

 

सावरकरांची महात्मा गांधींविषयी किती आदराची व राष्ट्रीय स्वरूपाची भावना होती, हे आपल्याला सहाव्या प्रकरणात वाचावयास मिळते. गांधीहत्येच्या सुनावणीच्या वेळी वरिष्ठ न्यायालयासमोर सावरकरांनी जे कथन केले आहे त्यातही ते स्पष्ट झालेले आहे. आरोपी स्वत:ची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सहसा साक्षीदारांना बोलावत नाही. सावरकरांनी फिर्यादी पक्षानेच आणलेल्या पुराव्याच्या व युक्तिवादाच्या आधारांवर आपली भूमिका कशी मांडली, हे प्रा. मोरे याच प्रकरणात मुद्देसूद विशद करतात. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, गांधीवादावरील सावरकरांची टीका बौद्धिक व वैचारिक स्वरूपाची आहे. मोरेंनी गांधीजींचे कोणते वर्तन सावरकरांना आवडत नव्हते, याची काही उदाहरणे देऊन म्हटले आहे ते अत्यंत समर्पक आहे. मोरे म्हणतात, “इतकी वर्षे (२५-३० वर्षे) उघडपणे बौद्धिक व वैचारिक लढाई करणारा नेता (सावरकर) राजकीय विरोधासाठी गांधीजींची हत्या करण्याच्या मार्गाचा विचार तरी करील का, याचा पूर्वग्रह सोडून आपण शांतपणे विचार केला पाहिजे.” सावरकरांवर दोषारोप करणाऱ्यांनी मोरेंनी केलेले विवेचन मनापासून समजून घ्यावे. गांधीजींबाबत सावरकरांची भूमिका कशी होती, याचे जे उदाहरण सावरकर विरोधकांसाठी मोरेंनी त्यांच्या या ग्रंथात दिले आहे, ते येथे देत आहे. ३ ऑगस्ट, १९२८ दिनांकास लिहिलेल्या ‘हुतात्मा अंदमानात मेले का नाहीत?’ नावाच्या लेखात तसा प्रश्न उपस्थित करणाऱ्या व गांधीजींविषयी काहीतरी विचारणाऱ्या कानपूर येथील एका वृत्तपत्राच्या संपादकास, सावरकरांनी कठोर उत्तर दिले आहे. त्यात सावरकरांनी लिहिले होते, “महात्मा गांधीस आम्ही जाणतो आणि ते आम्हास जाणतात. आमचे आम्ही आजपर्यंत पाहत आलो आहोत. पुढेही पाहून घेऊ. (कोणा गोमागणेशास त्यात तोंड खुपसण्याची योग्यता नाही. अहिंसेस लतकोडगी म्हणणे आणि गांधीजींसच तसे म्हणणे या दोन भिन्न गोष्टी आहेत, इतके कळण्याचेही ज्ञान ज्यास नाही त्याच्याशी बोला ते काय? महात्माजींस उत्तर देऊ, पण पुढे) आज तो थोर देशभक्त बार्डोलीच्यारणांगणात ज्या धोरणाने लढत आहे, ते धोरण अजून कुशल सेनापतीस योग्यच असल्याने आणि कोणाच्याही राष्ट्रीय लढ्यात शक्यतो आपण सर्वांनी खांद्यास खांदा लावून एकजात लढणे युक्त असल्याने यावेळी आम्ही महात्माजींच्या असहकारितेस आणि साहसास उपयोगी पडतील तेच शब्द बोलू आणि तेच आचरण करू इच्छितो. राष्ट्रीय हिताचाच अगदी घात होतो, तेथेच काय ते आडवे येणे प्राप्त ठरते आणि तेही राष्ट्रकार्यापुरतेच. व्यक्तिश: ‘परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचशताधिकम्?’ हेच आमचे सर्वांचे ब्रीदवाक्य असले पाहिजे. आमचे आहे.’

 

१९४२च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात सावरकर अध्यक्ष असलेल्या हिंदू महासभेने भाग घेतला नव्हता. तरीही सावरकरांनी शासनाच्या विरोधात देशभक्त गांधीजींची व काँग्रेसची बाजू घेतली होती. १० ऑगस्ट, १९४२च्या पत्रकात सावरकर म्हणतात, “महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्षाचे आघाडीचे व देशभक्त शेकडो नेते आणि कार्यकर्ते यांना पकडून कारागृहात डांबण्यात आले आहे. देशभक्तीसाठी त्यांना सोसाव्या लागलेल्या यातनांबद्दल हिंदू संघटनवाद्यांची वैयक्तिक सहानुभूती त्यांच्या बाजूने आहे.” गांधीजींनी येरवडा कारागृहात १० फेब्रुवारी, १९४३ पासून उपोषण सुरू केले होते. उपोषणकाळात त्यांची अवस्था नाजूक झाली होती. त्यांच्या सुटकेसाठी मागणी करणाऱ्या सप्रू परिषदेकडे सावरकरांनी तारेने संदेश दिला होता की, “देशाचे कल्याण लक्षात घेऊन स्वत: गांधीजींनीच उपोषण सोडून द्यावे.” त्याशिवाय एका पत्रकात म्हटले होते, “ज्या राष्ट्राच्या सेवेसाठी गांधीजींनी हे प्राण धोक्यात आणणारे उपोषण आरंभिले आहे, ते राष्ट्रच त्यांना सांगत आहे की, यावेळी त्यांचे प्राण जाण्यापेक्षा ते राहणेच (राष्ट्रासाठी) अगणित मौल्यवान ठरणार आहे. स्वत: गांधीजींनीही अशा राष्ट्रीय आवाहनातून हे ओळखले पाहिजे की, त्यांचे जीवन हे केवळ त्यांचे स्वत:चे नसून तो एक राष्ट्रीय ठेवा आहे. साऱ्या राष्ट्राची मालमत्ता आहे.” २ ऑक्टोबर, १९४३ रोजी ७५व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या गांधीजींना शुभेच्छा देणारा संदेश आणि २२ फेब्रुवारी, १९४४ ला कस्तुरबांच्या निधनानिमित्त संवेदना व्यक्त करणारा संदेश गांधीजींना सावरकरांनी पाठविलेला होता. ६ मे, १९४४ ला गांधीजींची येरवडा कारागृहातून सुटका होताच,”ही माणुसकीची कृती आहे, गांधीजींची प्रकृती पूर्ववत होवो,” अशी सदिच्छा सावरकरांनी व्यक्त केली होती. मोरे ही उदाहरणे देऊन (सावरकरांच्या या भूमिकेनंतर) प्रश्न विचारतात, “पाच वर्षांच्या आत असे काय घडले होते की सावरकरांनी या राष्ट्रीय ठेव्याला संपवून टाकण्याचा विचार करावा?” सावरकरांच्या सर्व विचारांवर टोकापर्यंत जाऊन प्रखर टीका करणाऱ्या डॉ. य. दि. फडके यांनी या पुराव्यांवर पुढीलप्रमाणे अभिप्राय लिहिला असल्याचेही मोरे लक्षात आणून देतात, “गांधीजींचा खून होण्यापूर्वी चार वर्षांआधी काढलेली ही सर्व (सावरकरांची) पत्रके म्हणजे सावरकर राजकीय रंगभूमीवर करत असलेल्या नाटकाचा भाग होती, असे मानणे बरोबर ठरणार नाही.” (पुढे पाच वर्षांनंतर आपण गांधीजींना संपविणार आहोत म्हणून आत्ताच साखरपेरणी करून ठेवावी असा सावरकरांनी विचार केला असेल, असे म्हणणे शुद्ध मूर्खपणाचे नाही का?)

 

सावरकरांची इच्छा

 

सावरकरांविरुद्ध गांधीहत्या प्रकरणातील विशेष न्यायालयासमोर आलेले पुरावे, कपूर आयोगासमोरील तथाकथित पुरावे, विरोधकांकडून मांडले जाणारे निरर्थक पुरावे, सावरकरांचे तथाकथित राजकीय हत्या करण्याचे तत्त्वज्ञान, काँग्रेस शासनाविषयीचे सावरकरांचे धोरण, गांधीजींविषयीची सावरकरांची भावना, सावरकरांचे गोडसे-आपटे यांच्याशी असलेले संबंध या दृष्टिकोनातून त्यांचा गांधीहत्या कटाशी संबंध होता का, याची प्रा. शेषराव मोरेंनी या ग्रंथामध्ये सविस्तर चर्चा केली आहे आणि पुराव्यांच्या पलीकडे जाऊन तर्क करायचाच, तर सातव्या प्रकरणात संपूर्ण तारतम्य वापरून आणि पूर्णत: विवेक करून सावरकरांना कसे विनाकारण अपराधी ठरविले जात आहे, याची विचारप्रवर्तक मांडणी प्रा. शेषराव मोरेंनी केल्याचे आढळते. या प्रकरणातील पुढील भाग अधिक महत्त्वाचा वाटतो. आता विचार करावयाचा प्रश्न असा आहे की, असा आरोपी होण्याची सावरकरांची इच्छा वा अपेक्षा होती का? अशी अपेक्षा करणे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्यावर, अंदमानात भोगलेल्या यातनांवर, हिंदुंच्या हितासाठी मांडलेल्या विचारांवर व एकूण सर्वच सार्वजनिक जीवनकार्यावर स्वत:च पाणी फिरवून आपले जीवन कलंकित करून घेण्याची अपेक्षा धरणे होय. असे सावरकरांना अपेक्षित होते का? ऐतिहासिक व राष्ट्रीय पुरुष म्हणून कीर्ती मिळवलेला व स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी कायम जपणारा सावरकरांसारखा विवेकी पुरुष अशी इच्छा वा अपेक्षा धरणेच शक्य नव्हते. आपले सर्व जीवन पणाला लावून व बाळाप्रमाणे प्राणपणाने वाढविलेल्या हिंदू महासभेला मूठमाती देण्याचा विचार सावरकरांनी केला असेल का? ‘गांधीहत्येतील एक आरोपी म्हणून आपली इतिहासात नोंद व्हावी, अशी सावरकरांची इच्छा होती असे मानणे विवेक व तारतम्यास सोडून होईल,’ या शब्दांत मोरे आपले मत मांडतात.

 

समाजातील मी एक अत्यंत गर्हणीय/अत्यंत निंदनीय मनुष्य आहे असे माझ्याविषयी मत होईल याची मला पूर्ण कल्पना होती,” असे नथुराम गोडसे आपल्या निवेदनात म्हणतो. मग ‘बॅरिस्टर’ असलेल्या सावरकरांना याची निश्चितच कल्पना असणार. ‘सावरकरांनी या कटकारस्थानाला संमती दिलीच नव्हती. त्यांना ते काही माहीत नव्हते. त्यांच्या काही कडव्या व भावनातिरेकी अनुयायांचे सावरकरांनाही गोत्यात आणणारे हे भयंकर असे कृत्य होते, हेच म्हणणे यथोचित, विवेकपूर्ण व तर्कशुद्ध होईल, असेही मोरे बजावतात. आपला विचार ठासून सांगण्यासाठी आणि संदर्भ कळण्यासाठी प्रा. मोरे यांनी काही मुद्द्यांची पुनरुक्ती केली आहे, एवढाच दोष या ग्रंथात दिसतो. वाचकांनी हा ग्रंथ विकत घेऊन आवर्जून वाचावा व सावरकरांची अपकीर्ती करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी संदर्भग्रंथ म्हणून वापरावा.

- श्रीकांत ताम्हनकर

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@