भावनांची उकल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |

 


 
 
राग आला ना की खूप घाण शिव्या बाहेर पडतात तोंडातून. भानच राहत नाही. थोड्या वेळाने प्रश्न पडतो, ती शिव्या देणारी मुलगी मीच होते का?” वय वर्षे बारा.
 

ती समोर आली की माझं लक्षच लागत नाही अभ्यासात आणि ती समोर नसली की तिच्या आठवणीमुळे अस्वस्थ वाटतं. मला कळतं की माझा परफॉर्मन्स घसरत चाललाय. पण काय करू तेच कळत नाही.” वय वर्षे सतरा.

 

एरवी मी शांत राहीन. फक्त तो माझ्या समोर येता कामा नाही. नाहीतर मग माझ्यासारखा वाईट कुणी नाही. उगीच का ऐकून घ्यायचं मी?” वय वर्षे पंधरा.

 

या प्रश्नाचं उत्तर मीही तसंच लिहिलंय की. मग तिला एक मार्क जास्त का दिला? ती टीचरची फेवरेट आहे ना.” वय वर्षे तेरा.

 

सगळे चिडवतात मला. कधीकधी तर अगदी मी अस्पृश्य असल्यासारखं वागवतात. कुणीही मैत्री करत नाही माझ्याशी. कालचं विसरून मी रोज नव्याने सुरुवात करून पाहिली. पण, हे संपतच नाही. आता तर मला जगावंसंच वाटत नाही अनेकदा.” वय वर्षे चौदा.

 

वरचे उद्गार टीनएजर मुलांचे आहेत खरे. परंतु, थोड्याफार फरकाने हे कुठल्याही वयोगटांतील व्यक्तींचे असू शकतात, नाही का? वेगवेगळ्या प्रसंगांतून आपल्या अनुभवाला येणाऱ्या भावनांची योग्य हाताळणी झाली नाही, तर आपल्या विचारांची आणि पर्यायाने वर्तनाची दिशा बदलून अनर्थाच्या वाटेवर जाऊ शकते. अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या काही व्यक्तीही भावनांच्या आहारी जाऊन अयशस्वी होताना आपण आजूबाजूला पाहतो. आयुष्यात यशस्वी आणि समाधानी होण्याच्या प्रक्रियेतील भावनिक बुद्धिमत्तेचे स्थान महत्त्वाचे आहे. ‘भावनिक बुद्धिमत्ता’ ही संकल्पना विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्य देशांत काही पुस्तकांतून आणि शोधनिबंधांतून चर्चिली गेली. स्वतःच्या भावना ओळखणे, त्यांचे विश्लेषण करणे या माहितीच्या आधारे विचार व वर्तनाला दिशा देणे आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन ध्येय साध्य करण्यासाठी भावनांची योग्य हाताळणी करणे या साऱ्या क्षमता भावनिक बुद्धिमत्तेच्या संकल्पनेत समाविष्ट होतात.

 

पाश्चात्य अभ्यासकांनी ही संकल्पना शब्दांत मांडून त्याच्या उपयोजनांचा पद्धतशीर विचार विसाव्या शतकात केला आहे. अर्थात, भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, भावनांच्या नियोजनाचे महत्त्व अगदी भगवद्गीतेपासून संतसाहित्यापर्यंत सर्वत्र वेगवेगळ्या उदाहरणांतून विशद केले गेले आहे. चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या भावनांच्या प्रभावाखाली येऊन

 

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।

 वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते॥ 

गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते। 

न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः॥

 

अशा नैराश्यग्रस्त अवस्थेला पोहोचून साक्षात युद्धभूमीवर शस्त्रत्याग करणाऱ्या अर्जुनासारख्या समर्थ योद्ध्याला, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने भावनांचे नियोजनच तर शिकवले आहे. भगवद्गीतेतील संदेश आजही तितकाच योग्य आणि आचरणात आणण्यासारखा आहे.

 

जगभरातील अनेक अभ्यासांतून असे दिसते की, ज्या व्यक्तींची भावनिक बुद्धिमत्ता तुलनेने जास्त आहे, त्यांचे मानसिक आरोग्य, व्यावसायिक यश आणि नेतृत्व गुण जास्त चांगले असतात. मुलांच्या जडणघडणीच्या वयात त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वत:च्या भावनांची जाणीव करून घेणे, आपल्यासाठी तसेच इतरांसाठी घातक असणाऱ्या भावनांवर ताबा मिळवता येणे, मैत्री व नातेसंबंध फुलवणे, विशेषत: काही निर्णय घेताना इतरांच्या भावनांची जाणीव ठेवणे, स्वत:साठी तसेच इतरांसाठी प्रेरणादायी बनणे अशी वैयक्तिक व सामाजिक कौशल्ये वृद्धिंगत करणे अपेक्षित आहे.

 

भावनिक बुद्धिमत्तेचा विकास साधण्यासाठी मुलांच्या आजूबाजूला भावनिकदृष्ट्या समतोल असे वातावरण असणे गरजेचे आहे. कुटुंबातील, शाळेतील प्रौढ व्यक्ती आपल्या भावना संयमितपणे व्यक्त करत आहेत, मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळत आहे, इतरांबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवला जात आहे, गंभीर समस्या शांतपणे व प्रगल्भतेने हाताळल्या जात आहेत ही उदाहरणे मुलांसमोर असली, तर त्यांचे शिक्षण सोपे होते. मुलांना त्यांची भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी कोणत्या संधी देता येतील याचा विचार आपण पुढे सविस्तरपणे करू.

 

- गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 
 
 
  • माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
@@AUTHORINFO_V1@@