ओसीरिस आणि आमून रे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018   
Total Views |

 


 
 
 
इजिप्तच्या प्राणी-पक्ष्यांच्या चिह्नसंस्कृतीकडे वळण्यापूर्वी एका साम्य-साधर्म्याचा आणि विरोधाभासाचा दृष्टांत पाहूया. कृषिप्रधान भारतीय समाजात पाळीव प्राणी आणि अन्य वन्य प्राण्यांचे महात्म्य आणि त्यांची पूजा-उपासना याला प्राचीन परंपरेने फार मोठे सांस्कृतिक महत्त्व दिले गेले आहे. अशी पूजा-उपासना म्हणजे वर्षातून एक दिवस या प्राण्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सौजन्यशील आणि वत्सल संस्कृती. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या नागाची पूजा नागपंचमीला आणि बैलाची पूजा पोळ्याच्या दिवशी केली जाते. दिवाळीतील वसुबारस या दिवशी सवत्स धेनुची म्हणजे गाय-वासराच्या जोडीची पूजा केली जाते. या सांस्कृतिक परंपरेत बैल-गाय-वासरू यांची पूजा प्रत्यक्षात केली जाते, तर नागाची उपासना-पूजा सांकेतिक स्वरूपाची असते. या प्राण्यांचे पोषण-संवर्धन ही या संकल्पनेमागची प्रमुख भूमिका. प्राचीन भारतीय चिह्नसंस्कृती आणि प्रतीकशास्त्रात, अनेक प्राणी आणि पक्ष्यांची उपस्थिती ‘वाहन’ म्हणून देव-देवतांच्या मूर्ती-प्रतिमांमध्ये झालेली आपल्याला दिसते. या प्राचीन भारतीय सांस्कृतिक परंपरेची नोंद इथे प्रथम घेतली. कारण, प्राणी-पक्ष्यांच्या पूजा-उपासनेसंदर्भातील अशाच स्वरूपाच्या प्राचीन इजिप्शियन संस्कृतीचा तुलनात्मक परिचय करून घेऊया.
 

तत्कालीन प्राचीन इजिप्तमधील समाजव्यवस्था निर्माण होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात नाईल नदीच्या सुपीक किनाऱ्यावर वसलेल्या दूरदूरच्या छोट्या खेड्यातील गावकऱ्यांच्या स्वत: नियुक्त केलेली दैवते व कुलदेवता होत्या. आकाशस्थ तारे-ग्रह आणि प्राणी-पक्षी यांची भिन्न चिह्ने-प्रतीके असे यांचे स्वरूप होते. अशा चिह्न-प्रतीकांमध्ये खूप भिन्नता होती. शेजारी देशातील तत्कालीन अन्य संस्कृतीतील नागरिकांनी कितीही हिणवले तरी, या पक्षी-प्राण्यांच्या चिह्नसंस्कृतीमागील एक प्रयोजन, संवेदना, प्रेरणा अत्यंत महत्त्वाची होती. या चिह्न-प्रतीकांतील प्राणी-पक्षी आणि खेड्यातील नागरिक म्हणजेच मानवाशी असलेले त्यांचे ममत्वाचे नाते आणि या बरोबरच या चिह्न-प्रतीकांत व्यक्त होणाऱ्या प्रवृत्ती, वैशिष्ट्ये, गुणवत्ता यांचे मानवी व्यक्तिमत्त्वाशी असलेले साधर्म्य आणि विरोधाभास अशा या महत्त्वाच्या संवेदना.

 

 
 

पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, तत्कालीन प्राचीन इजिप्तमधील समाज आणि नागरिक आपल्या आसपासच्या निसर्ग आणि वन्यजीवांशी खूप निकट होते, त्याचे संवर्धनही करत होते. ग्रह-तारे, प्राणी-पक्षी अथवा अर्धमानवाकृती अशा देवदेवतांच्या संदर्भात, वाचकांच्या मनात प्रथम काही जाणिवा जागृत करणे आवश्यक आहे. आज, वर्तमानात वाचकांच्या धारणेतील देव-देवता ही संकल्पना आणि ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील देवदेवता या संकल्पना यात अविश्वसनीय फरक आहे. आपले आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाबद्दल, उपासक आणि श्रद्धाळू भक्त यांच्या मनांतील वर्तमानकाळातील संकल्पना, धारणा, अपेक्षांचा आपण आलेख मांडूया. श्रद्धाळू भक्तांच्या विश्वासाप्रमाणे, हा कृपाळू, वत्सल श्रीगणेश आपली सगळी विघ्ने निरपेक्ष वृत्तीने दूर करतो. दुष्ट-घातक प्रवृत्तींपासून आपले रक्षण करतो. तो सर्वश्रेष्ठ आहे. तो सर्वशक्तिमान आहे. त्याचे अस्तित्व सर्वत्र आहे. तो अमर आणि अविनाशीसुद्धा आहे. ‘देव-देवता’ या शब्दातच इतके गर्भित अर्थ दडलेले आहेत की, या दोन शब्दांच्या निव्वळ उच्चाराने क्षणभरात देवदेवतांच्या अगणित, अलौकिक गुणवत्ता आपल्या स्मरण पटलावर त्यांच्या मूर्ती आणि प्रतिमा, चित्ररूप धारण करतात. आजच्या श्रद्धाळू भारतीय समाजाची परिस्थिती ही अशी आहे.

 
 

 
 ओसीरिस
 

या उलट प्राचीन इजिप्तमधील श्रद्धाळू भक्तांच्या आणि उपासकांच्या मनातील देव-देवतांबद्दलच्या संकल्पना, धारणा, अपेक्षा खूपच वेगळ्या होत्या. तत्कालीन इजिप्शियन नागरिकांसाठी देव-देवता या सामान्य मनुष्याप्रमाणे होत्या. सामान्य मनुष्याच्या जीवनात ज्या ज्या बऱ्या-वाईट घटना घडतात, तशाच प्रकारचे आयुष्य त्यांच्या मते या देव-देवतांच्या वाट्याला येणे आवश्यक असते आणि आलेलेही असते. या संदर्भात अनेक प्राचीन पौराणिक कथा, आख्यायिका, दंतकथा प्रचलित आहेत. यातील एका पौराणिक कथेनुसार, इजिप्शियन नागरिकांचे सर्वप्रथम आराध्य दैवत ‘रा’ म्हणजे सूर्यदेव यालाही एक दिवस जमिनीवरून प्रवास करताना मायावी सर्पदंश करतो आणि त्यालाही यातना आणि कष्टाचा अनुभव मिळतो. स्वर्गातील अनेक देव-देवतांचा वध करणारा आकाशस्थ शिकारी ‘ओरियन’ याचाही मृत्यू होतो आणि नंतर तो ‘Orion’ (मृगशीर्ष) या नक्षत्राचे रूप धारण करतो. ‘Osiris’ हा सर्जनशीलता आणि सुपीकतेचा दाता असे महात्म्य असलेला देव होता. याच्या धाकट्या भावानेच याचा वध केला, अशी पुराणकथा आहे. या मृत्यूनंतर ओसीरिस मृत्यूचा आणि पुनर्जन्माचा अधिपती म्हणून स्वीकारला गेला. नाईल नदीला येणाऱ्या वार्षिक पुराचा निर्माता, पुरामुळे होणाऱ्या विद्ध्वंसाचा आणि मृत्यूचा नियंत्रक आणि त्यानंतर जमिनीत उगवणाऱ्या प्रत्येक तृणाचा कर्ता स्वामी, पुनर्जन्माचा अधिपती म्हणून याची महती फार मोठी होती. सुपीकता आणि पुनर्जन्माचा अधिपती म्हणून याची अंगकांती हिरव्या रंगाची आहे. ओसीरिसचे वसतिस्थान ‘Orion’ म्हणजे ‘मृगशीर्ष’ या नक्षत्राच्या मध्यावर आहे. या नक्षत्राचे स्थान विषुववृत्तावर असल्यामुळे हा नक्षत्राचे दर्शन रात्रीच्या आकाशात जगभरातून सहज घेत येते.

 
 
 

सूर्याचे भ्रमण आणि राशिचक्र या आधीच्या लेखातील उल्लेखानुसार, प्राचीन इजिप्तमधील विद्वानांचा खगोलशास्त्राचा अभ्यास फार प्रगत होता. देव-देवता, पौराणिक कथा, आख्यायिका, दंतकथा यांची उत्तम सांगड आकाशातील खगोलीय तारे, ग्रह, नक्षत्रांशी घातली गेली होती. अनेक देव-देवता आणि त्यांच्या विविध गुणवत्ता ही इजिप्शियन संस्कृतीतील मूळ संकल्पना, त्यानुसार प्राणी, पक्षी, मानवाकृती चिन्हे आणि प्रतीकांची रचना, त्यांच्या अंगावरील परिधान वस्त्रे, अंगकांतीचा वर्ण, हातातील अवजारेही यांची सगळी चतुर मांडणी आकाशातील खगोलीय तारे, ग्रह, नक्षत्रांशी अंतिमतः जोडली जाणे हा काही अपघात नव्हता. ही व्यापक मांडणी बुद्धिमान इजिप्शियन विद्वान नागरिकांची काही सहस्र वर्षे निर्माण केलेली अद्भुत संहिता होतीप्राचीन काळातील इजिप्शियन नागरिक जरी श्रद्धाळू असले तरी, त्याची एक निश्चित आणि ठाम समजूत आणि श्रद्धा होती. बळीच्या चौथऱ्यावर आम्ही रोज जेवण आणि पाणी ठेवतो किंवा अग्नीच्या स्वाधीन करतो तेव्हाच देवाची भूक भागते. अगदी तसेच, आमच्या दैनंदिन जीवनात पृथ्वीवर काय घडते आहे, हे आम्ही सांगितल्याशिवाय कुठल्याही देवाला समजणार नाही. प्रथम आम्ही त्याच्या प्रतिनिधी वा निरोप्याची आराधना करून त्याला प्रसन्न करू. असे निरोपे किंवा खबरे प्राणी-पक्षी यांच्या प्रतीकांत दिसत होते. त्याच्यामार्फत देवाला गार्‍हाणे घालू, त्याला काय हवे ते देऊ, मगच आमचा निरोप त्याला पोहोचेल. दूरदूरच्या गावात आपला देव स्वत: जाऊच शकत नाही. त्याचा सांगावा फक्त निरोप्याच आमच्यापर्यंत आणू शकतो. वरकरणी विसंगत वाटणारी ही श्रद्धा काही निश्चित अनुभव, निष्ठा, मिथके आणि राज-भक्तीवर आधारलेली होती.

 

 
 

‘Amun Re’ ‘आमून रे’ या शब्दातील ‘आमून’ म्हणजे सूर्याची अजूनही न दिसलेली अलौकिक शक्ती असा अर्थ व्यक्त करते. त्यातील ‘रे’ हा शब्द म्हणजे नियमित उगवून जगाला प्रकाश देणारा, अस्ताला जाणारा सूर्यदेव असा अर्थ व्यक्त करतो. जसे जसे राजे फरोहा शक्तिमान झाले तशी त्यांनी स्वत:ला ‘आमून’ असे संबोधित करायला सुरुवात केली. जणू काही अलौकिक शक्ती प्राप्त झालेली देवता. माजी-आजी राज्यकर्त्यांच्या नावाने एकेक नक्षत्र प्रतीक म्हणून नेमले गेले. आता ‘आमून रे’ या नावाचा संधी नष्ट झाला आणि नियमित उगवणाऱ्या सूर्यदेवाला फक्त ‘रे’ असे संबोधन कालांतराने प्राप्त झाले. आता आपल्या आधी जन्माला आलेल्या आणि आपल्यापेक्षा बुद्धिमान काहीतरी कर्तृत्व गाजवलेल्या राजाला प्रजेने देवत्व बहाल केले होते. त्यामुळे काही गंभीर परिस्थितीत आणि काळ-वेळेच्या काही मर्यादांमध्ये देवाशी प्रत्यक्ष संपर्क होऊ शकत नव्हता. म्हणूनच इजिप्शियन श्रद्धाळू नागरिकांसाठी देव म्हणजे अमानवी-अलौकिक शक्ती असलेला कोणी रक्षणकर्ता नव्हता. तोही एक सामान्य माणसासारखाच होता आणि म्हणूनच या देवस्वरूप राज्यकर्त्यांच्या विरोधात अनेक वेळा उठाव झाले आणि समाजाने नव्या राज्यकर्त्याला पुन्हा देवत्व बहाल केले. ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांच्या आधीपासून पसरलेल्या आणि खोलवर रुजलेल्या प्राचीन इजिप्तमधील या लोकपरंपरेला, लोकसंस्कृतीला, लोकश्रुतीला, लोकमानसाला आपल्या समाजातील आजच्या ‘देव’ या संकल्पनेच्या भिंगातून पाहणे, म्हणूनच योग्य होणार नाही.

 
 
 
  • माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@