प्रशांत किशोर यांचे योगदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |

 
 
 
प्रशांत किशोर हे सध्या राजकारणातले आकर्षक नाव आहे. त्यांना निवडणूक रणनीतिकार, अशी पदवी प्राप्त झाली आहे. 2014 साली ते नरेंद्र मोदींसोबत होते. मोदींचा विजय झाला. नंतर बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते नीतीशकुमारांसोबत होते. नीतीशकुमार जिंकले. नंतर ते उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींसोबत होते. तिथे मात्र पराभव पत्करावा लागला. नंतर ते पंजाबमध्ये अमरिंदरिंसग यांच्या मदतीला गेले. अमरिंदर सिंग जिंकले. मध्यंतरी आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डींसोबतही काही काळ घालवला. आता ते बिहारचा क्षेत्रीय पक्ष जनता दल (युनायटेड) म्हणजे जदयूसोबत आहेत. सोबत म्हणजे त्यांनी या पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांना लगेचच पक्षाचा उपाध्यक्ष बनविण्यात आले आहे. असे म्हणतात की, ते सध्या जदयूमध्ये क्रमांक दोनचे नेते आहेत. क्रमांक एकवर नीतीशकुमार.
आतापर्यंत प्रसिद्धिमाध्यमांपासून दूर राहणार्या प्रशांत किशोर यांनी नुकत्याच दोन मुलाखती दिल्या आहेत. एक रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांना व दुसरी इंडियन एक्सप्रेसला. प्रशांत किशोर यांनी या मुलाखतीत एक बाब वारंवार सांगितली की, मला वाजवीपेक्षा अधिक श्रेय देण्यात येते. (त्यांचे वाक्य- वुई आर ओव्हरेटेड) निवडणुका नेत्यांमुळे जिंकल्या जातात, आमच्यामुळे नाही, असे प्रशांत किशोर म्हणाले. त्यांचे स्वत:चे हे मूल्यमापन अगदी योग्य आहे. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचा दणदणीत विजय झाला, त्याचे श्रेय राजकीय विश्लेषकांनी नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता व प्रशांत किशोर यांची रणनीती या दोघांनाच दिले. आमच्यासारख्यांना तेव्हा आश्चर्य वाटले. एक कुणीतरी बिहारची व्यक्ती, आपल्या हुशारीमुळे परदेशात शिक्षणासाठी जाते आणि तिथून ती भारतात आल्यावर, एका मोठ्या, कार्यकर्ताआधारित पक्षाच्या मदतीला येते आणि त्या व्यक्तीच्या रणनीतीमुळे तो पक्ष निवडणुकीत आश्चर्यचकित असे यश प्राप्त करतो. हे कसे शक्य आहे? मग पंडित दीनदयालजींपासून ते आजच्या अमित शाहपर्यंत, व्यर्थच मेहनत घेतली गेली, मानायचे काय? लाखो कार्यकर्ते, तन-मन-धनपूर्वक या पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी समाजाचा तिरस्कार, आकस, द्वेष, हिंसक विरोध, हेटाळणी सगळं, सगळं सहन करीत कशाला काम करीत राहिले?
 
बिच्चारे कार्यकर्ते!
सर्वसामान्य भारतीयांनी कसा विचार करायचा, हे आमच्या देशात वामपंथी विश्लेषक आणि मीडिया निश्चित करतो. निवडणुकीतील जयपराजयाचे जे विश्लेषण आमच्या बोडख्यावर थोपविले जाते, आम्ही तेच मान्य करायचे असते. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे यश, पक्षसंघटनेचे, त्याच्या नेत्यांचे, त्याच्या लाखो कार्यकर्त्यांचे, कार्यकर्त्यांनी विपरीत परिस्थितीत केलेल्या संघर्षाचे नाही आहे, प्रशांत किशोर नामक व्यक्तीच्या रणनीतीचे आहे. असे कसे उथळ विश्लेषण राहू शकते? खरेतर, हे एक वैचारिक जाळे असते. त्यात तुम्हा-आम्हाला अलगद अडकविले जाते. कॉंग्रेससहित बहुतेक राजकीय पक्षांजवळ संघटन नाही. कार्यकर्ते नाहीत. गावपातळीवर कार्यकर्त्यांच्या समित्या नाहीत. मीडिया व राजकीय पंडितांनी हवा तयार करायची आणि कॉंग्रेसने निवडणुका जिंकायच्या. अशात जर भाजपा आपल्या संघटनेच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणुका जिंकते, असे मान्य केले तर, नकळत कॉंग्रेसकडे बोट जाते. भाजपाकडे जे आहे ते कॉंग्रेसकडे नाही, हे सिद्ध होते. ते सिद्ध होऊ नये व निवडणूकपश्चात कॉंग्रेसलाही पक्षसंघटन बांधणे बाध्य होऊ नये म्हणून हे असले विचार समाजात प्रसृत केले जातात. आमच्याकडे संघटन नाही म्हणून तुम्हीही संघटनेच्या भरवशावर निवडणुका जिंकू शकत नाही, हेच या मंडळींना सांगायचे असते, जनमानसावर बिंबवायचे असते. त्यातूनच मग प्रशांत किशोरसारख्या व्यक्तींना महान बनविण्याच्या खटपटी सुरू होतात.
 
दुसरे म्हणजे, भाजपासारख्या, संघटन व कार्यकर्त्यांच्या बाबतीत भाग्यवान असलेल्या पक्षाला, महान नेतृत्वाची परंपरा असलेल्या पक्षाला निवडणुकीच्या वेळी प्रशांत किशोरसारख्या उपर्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते, हा भाजपाच्या (आणि पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या) समर्पित कार्यकर्त्यांचा अपमान नाही का? असे मानायचे का की, हे जे समर्पित कार्यकर्ते आहेत, ते निवडणुकीच्या रणधुमाळीत कुचकामाचे आहेत! त्यांनी फक्त मोर्चात सामील व्हायचे, लाठ्या-काठ्या खायच्या, तुरुंगात जायचे, घरावर तुळशीपत्र ठेवायचे, घोषणा द्यायच्या, सभेत सतरंज्या अंथरायच्या व नंतर उचलायच्या! निवडणुका जिंकायला आणि निवडणुकीनंतर मलिदा खायला हे कार्यकर्ते कामाचे नसतात का? ‘चाय पे चर्चा’ हे पिल्लू प्रशांत किशोर यांचे आहे म्हणतात. समजा प्रशांत किशोर भाजपाच्या मदतीला आले नसते, तर भाजपाला बहुमत मिळाले नसते का? चहा पिता पिता मोदींचे भाषण ऐकले आणि एकदम लोकांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी कमळाचे बटन दाबले, असे मानायचे का?
 
बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या एका मुलाखतीतील एक वाक्य संदर्भसोडून प्रचारित करण्यात आले आणि त्यामुळे म्हणे, भाजपाच्या हातून बिहार गेला! गुजरातच्या एका निवडणुकीत सोनिया गांधींनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले आणि तत्क्षणी जिंकत असलेला कॉंग्रेस पक्ष पराभूत झाला! मागील वर्षी झालेल्या गुजरात निवडणुकीत मणिशंकर अय्यरने मोदींना नीच म्हटले म्हणून कॉंग्रेस हरली! या असल्या थापांवर विश्वास ठेवायचा का?
जो जनहिताचे काम करतो, केलेली सर्व कामे पक्षकार्यकर्त्यांच्या भरवशावर प्रत्येक मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवितो, तोच पक्ष निवडणुकीत जिंकतो. लोकशाहीत हेच अभिप्रेत आहे आणि तसेच ते घडत असावे, असा माझा विश्वास आहे. ज्याच्याजवळ संघटन आहे, देवदुर्लभ, समर्पित कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, तोच या तात्कालिक लहानसहान घटनांचा फायदा उचलू शकतो. महाराष्ट्रात शेतकरी संघटनेने जी वातावरणनिर्मिती केली होती, त्याचा सर्वाधिक फायदा फक्त भाजपालाच का म्हणून उचलता आला, याचाही आपण विचार केला पाहिजे. बिहारमध्ये नीतीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या जातीय मतांची बेरीज झाली म्हणून तिथे भाजपाचा पराभव झाला.
 
त्रिपुरात भाजपा सत्तेत आली, ती काय नरेंद्र मोदी यांच्या चार-पाच प्रचारसभांमुळे आली काय? तिथे गेली 20-25 वर्षे तळागाळात जे काम सुरू आहे, त्याचा फायदा भाजपाला झाला. छत्तीसगडमध्ये पहिल्यांदा भाजपाचे सरकार आले, तेव्हा केंद्रात रालोआचे शासन होते. लालकृष्ण अडवाणी केंद्रीय गृहमंत्री होते. गृहमंत्र्यांच्या अखत्यारित केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) असते. या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाचे विश्लेषण करताना बहुतेक पंडितांनी असे म्हटले होते की, वनवासी भागातील मतदान केंद्रांवर रक्षणासाठी तैनात सीआरपीएफच्या जवानांनी, वरून आलेल्या आदेशाप्रमाणे भाजपाच्या चिन्हासमोर ठप्पे मारून भाजपाला विजयी केले. छत्तीसगडच्या घनदाट वनवासी भागात कित्येक वर्षांपासून प्राण तळहातावर घेऊन जी अनेक समाजहिताची कामे सुरू आहेत, त्यातून तिथे जे एक राष्ट्रहितैषी समाजमन तयार झाले, त्याचे या विजयात काहीच योगदान नाही म्हणायचे काय? हे विश्लेषणच सत्य आहे आणि ते लोकांसमोर आले पाहिजे.
 
प्रशांत किशोर यांनी दोन-चार युक्त्या सांगितल्या नसतील असे नाही. म्हणून राजकीय विश्लेषकांनी यशाचे श्रेय एखादा नेता आणि या अशा आगंतुकाला द्यायला नको. तसेच, पक्षनेतृत्वानेदेखील अशा रणनीतिकाराच्या आहारी न जाता, स्थानिक पातळीवरील सामान्य कार्यकर्त्यांचे मनापासून भान ठेवायला हवे. तसे झाले नाही तर, आज जसे इतर पक्ष कार्यकर्त्यांच्या बाबतीत दिवाळखोर झाले आहेत, ती स्थिती कार्यकर्ताआधारित पक्षांचीदेखील होऊ शकते. तसे झाले तर मग प्रत्येक निवडणुकीत कुठल्या तरी लाटेचीच प्रतीक्षा करत बसावे लागेल आणि विजयाची गुरुकिल्ली विश्लेषक व मीडिया यांच्या हातात जाईल. त्यांना तर ती हवीच आहे. ती किल्ली आपण द्यायची का?
@@AUTHORINFO_V1@@