सेक्युलॅरिझमचे नवे ढोंग: मतुआप्रेम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |


 


मुस्लीम, बांगलादेशी, रोहिंग्ये यांच्यानंतर ममता बॅनर्जींच्या तुष्टीकरणाचे नवे लक्ष्य आहे मतुआ समुदाय. खरे खोटे सांगून, निरनिराळी आमिषे दाखवून ममता सध्या मतुआंना स्वत:कडे ओढत आहेत.


तोंडाने सेक्युलॅरिझमचा जप करायचा आणि नंतर तुष्टीकरणाचे राजकारण करायचे, हा या देशातला पारंपरिक पद्धतीने चालत आलेला खाक्या. २०१४ नंतर देशात तो बंद झाला खरा, मात्र अजूनही काही राज्यांत ही रीत संपलेली नाही. ममता बॅनर्जींचे पश्चिम बंगाल यात प्रमुख मानावे लागेल. ममतांचे अल्पसंख्याकांचे चोचले पुरविण्याचे उद्योग नवीन नाहीत. दुर्गापूजेच्या मिरवणुकीलाही मागेपुढे करण्याची हिंमत करणाऱ्या ममतांनी आता तुष्टीकरणाचे नवे कार्ड काढले आहे. खरेतर पश्चिम बंगाल हा डाव्यांचा बालेकिल्ला. ममता बॅनर्जींनी डाव्यांना घरी पाठवले. आता बंगालची भरभराट होईल आणि विकासाचे वारे पश्चिम बंगालमध्ये वाहू लागतील, असा समज देशभर पसरला होता. मात्र, तो व्यवस्थित पुसून काढण्याचे काम खुद्द ममता बॅनर्जींनीच केले. पश्चिम बंगाल चर्चेत येत राहिले, ते जातीय दंगलीमुळेच. इथे नुसत्या दंगलीच झाल्या नाहीत, तर राज्याच्या प्रमुखांनी घेतलेल्या मुस्लीमधार्जिण्या भूमिकाही चांगल्याच चर्चेत आल्या. विकासाची कुठलीही परिमाणे नक्की न करू शकल्याने ममता तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या प्रवासी झाल्या. या देशाचा इतिहास सांगतो की, तुष्टीकरणाच्या प्रवासाला अंतिम टप्पा कधीच नसतो. गांधी परिवाराने हा प्रवास केला आणि त्याची फळे त्यांना भोगावी लागली होती. ममतांच्या नव्या तुष्टीकरणाचा आजचा टप्पा आहे ‘मतुआ.’ मतुआ ही बांगलादेशातून इथे स्थलांतरित होऊन आलेली जमात. मतुआ हा आध्यात्मिक आधारावर चालणारा पंथ. ही मंडळी स्वत:ला हिंदूच मानतात. आत्मदर्शनाच्या तत्त्वज्ञानावर या पंथाचे अध्यात्म उभे आहे. संवैधानिकरित्या त्यांचे वर्गीकरण मागासवर्गीयांमध्ये होते. ममतांना हिंदुत्वाशी काहीही देणेघेणे नाही, मात्र मतुआसारख्या जमातींना त्यांना निवडणुकीपूर्वी स्वत:बरोबर घ्यायचे आहे.

 

२०११ आणि २०१६च्या ममतांच्या विजयामागे मतुआंच्या एकगठ्ठा मतांचा मोठा हिस्सा आहे. आता या मंडळींसमोर हात पसरणे त्यांनी सुरू केले आहे. मतुआंसमोर ममता बॅनर्जींनी केलेले भाषण म्हणजे सेक्युलॅरिझमच्या तंबूखाली एकत्र येऊन मोदी सरकार पाडण्याचे मनसुबे रचणारे किती जातीयवादी आहेत, हे सिद्ध करणारे आहे. ममता बॅनर्जींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र शासनावर टीका केली आहे. अर्थात ही टीका खोटी आहे. पण, स्वत:चे चमकविण्यासाठी दुसऱ्याचे किती काळे आहे, हे सांगण्याचा हा खास छद्मसेक्युलर प्रयोग समजून घेण्यासारखा आहे. ममता म्हणतात, “पश्चिम बंगालची स्थिती महाराष्ट्रासारखी नाही. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या मंडळींची अवस्था खूप बिकट झाली आहे. सरकारने त्यांच्या सोईसुविधा बंद केल्या आहेत. त्यांना जातीची प्रमाणपत्रेही मिळेनाशी झाली आहेत.” आता यांच्या कळलाव्या राजकारणाशी महाराष्ट्राचा काय संबंध? पण, कशाचा कशाशीही संबंध नसताना आक्रस्ताळेपणा करायचा हा तर ममता बॅनर्जींच्या स्वभावातला स्थायीभावचमागेही त्या अशाच मुंबईत येऊन पोहोचल्या होत्या आणि भाजपद्वेषाच्या अमलात असलेले ठाकरे पिता-पुत्र त्यांना भेटायला त्या मुक्कामी गेले होते. मतुआच्या निमित्ताने विक्षिप्तपणाचे आणि तुष्टीकरणाचे राजकारण तापणार आहे. या मतुआ मंडळींसाठी एक वेगळे विद्यापीठ स्थापून देण्याचा विचार ममतांनी जाहीर केला आहे. ३० लाख मतदार असलेल्या या समाजाला चुचकारण्याचे जे काही शक्य आहेत, ते सगळे प्रयोग सध्या सुरू आहेत. मतुआ विकास प्राधिकरणाची व्यवस्था यापूर्वीच लावण्यात आली आहे. हरिश्चंद्र ठाकूर आणि गुरूचंद्र ठाकूर हे मतुआंचे दोन प्रमुख नेते. त्यांच्या नावाने हे विद्यापीठ, त्यानंतर ठाकूर यांच्या नावाने त्यांच्या गावात मोठी प्रवेशद्वारे उभारणे असे उद्योग सुरू आहेत. ममतांनी केवळ महाराष्ट्रावरच टीका केली आहे, असे नाही तर शेजारचे राज्य असलेल्या आसामवरही त्यांनी टीका केली आहे. मतुआंची काही लोकसंख्या आसाममध्येही आहे. ममता बॅनर्जी कसे राजकारण खेळत आहेत, त्याचा हा नमुना. पश्चिम बंगालमधील मतुआंना स्वत:च्या कच्छपी लावण्यासाठी या बाईंनी अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले आहे. मतुआ बांगलादेशाच्या निर्मितीनंतर भारतात आले. आसाममध्ये एनआरसी यादी करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या यादीत चाळीस लाख लोक बाहेरून आल्याचे बोलले गेले. आसाम सरकारने या सगळ्या मंडळींना पुन्हा आपली कागदपत्रे देण्याची संधी व मुबलक प्रमाणात वेळ दिलेला आहे. ही उपाययोजना यासाठीच केली गेली होती.

 

आसाममध्ये झालेली बांगलादेशींची घुसखोरी हा मोठा डोकेदुखीचा विषय आहे. आता मतुआ बांगलादेशातून आल्यामुळे त्यांनाही आसाममधून हुसकावून लावणार असल्याचा अपप्रचार तृणमूलकडून पद्धतशीरपणे केला जात आहे. पश्चिम बंगालमधल्या मतुआंना अशा प्रकारे फितविले आणि आपण सतत आसामविरोधात बोलत राहिले की, मतुआंची मते आपल्या पदरात पडणार, याची ममतांना खात्रीच आहे. हा अपप्रचार इतका जहरी आहे की, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतुआमधील काही लोकांनी २४ परगणा येथे एकत्र येऊन ‘रेल रोको’ केला होता. हजारो मतुआ यावेळी रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. वस्तुत: आसाम सरकारचा असा कुठलाही मतुआविरोधी कार्यक्रम नाही. मात्र, या अपुऱ्या भांडवलावर खोटारडेपणाचा धंदा सध्या पश्चिम बंगालमध्ये जोरात चालू आहे. पश्चिम बंगालमध्ये असलेली मतुआंची लोकसंख्या इतकी प्रभावी आहे की, एरवी स्वत:चे सेक्युलर असणे सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या डाव्यांनीही या आध्यात्मिक चळवळीचे पाय धरण्याचे उद्योग केले आहेत. ‘बोरीमाँ’ नावाने प्रसिद्ध असलेल्या बिनापानी देवी सध्या या समुदायाचे नेतृत्व करतात. वृंदा करातसह अनेक बंगाली डावे नेते केरळमध्ये सीताराम येचुरी डोक्यावर रामायण घेऊन हिंडले होते, तशा भक्तीभावाने भेटायला गेल्या होत्या. बिगरराजकीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरीमाँना ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालचा ‘बंगभूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कारही जाहीर केला आहे. बोरीमाँ बिगर राजकीय असल्या तरी त्यांची दोन्ही मुले निवडणुका लढवतात हे विशेष. पश्चिम बंगालमधील ७४ विधानसभांवरचा मतुआंचा प्रभाव लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष असे वागतील, यात शंका नाही. मात्र, सेक्युलॅरिझमचा जयघोष करीत इतरांना जातीयवादी असल्याचा आरोप करणारे स्वत: कसे वागतात त्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@