स्वयंभू कलाकृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |



कलाकार, मग तो कुठल्याही कलाप्रकारातील असो. म्हणजे तो चित्रकार, गायक, वादक, नर्तक कोणीही असो, त्याच्या एका विशिष्ट मानसिकतेतच त्याच्याकडून सृजननिर्मिती होते. कुठल्याही घात-अपघातातून मानसिक हिंदोळ्यांतून वा मनाच्या अवस्थांच्या चढ-उतारांतून अघटित घडत असतं. ओशोंनी तर चित्रकाराला ‘सर्व कलाकारांमधील कमीत कमी वेळेत एकरूप, तादात्म्य पावणारा’ असे म्हटलेले आहे. पॉल क्ली तर म्हणतात की, “पृष्ठभागावर मग तो कागद, कॅनव्हास वा दगड यापैकी काहीही असो, जेव्हा कलाकार एकरूप होतो तेव्हा तो निसर्ग त्याच्या समोर उतरवू शकतो.” “आपण जेव्हा एखाद्या कलाकृतीकडे पाहत असतो, तेव्हा जी कलाकृतीदेखील आपल्याला पाहत असते. या संवादात जर एकरूप होण्याची क्रिया घडली, तर ती कलाकृती म्हणजे एक सौंदर्याभिरुचीचा अविष्कार ठरते,” असे ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांनी कलाकृतींविषयी बोलताना सांगितले होते. हे सर्व कथन करण्याचा योगही तसा जुळून आलेला आहे. दि. २० नोव्हेंबरपासून जहांगिर कला दालनाच्या दुसऱ्या गॅलरीत प्रतिथयश चित्रकार दिगंबर चिचकर यांच्या कलाकृती आणि शिल्पाकृतींचे प्रदर्शन सुरू होत आहे. या कलाकृती उत्स्फूर्त आवर्तनांतून अवतीर्ण झालेल्या भासतात म्हणून त्यांनास्वयंभू कलाकृती’ म्हटले तरी फारसे वावगे ठरणार नाही.

 

मनात असलेली वा मनाला सुखद वा दु:खद जाणिवा करून देण्याच्या बाबींचा परमोच्च क्षण जेव्हा येतो तेव्हाच ‘कलाकृती’ निर्माण होते. हे अनुभव जसे इतर काही कलाकारांना येतात तद्वतच, चित्रकार चिचकरांनाही आले. त्या अनुभवांना व्यक्त करण्यासाठी त्यांनी रंगाकारांची वा शिल्पाकारांची मध्यस्थी घेतली. एका प्रश्नाचं उत्तर देताना चित्रकार दिगंबर चिचकर म्हणाले की, “स्वत:मध्ये गुंगून जाणे, सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे, आत्मशांतीचा शोध घेणे, समाजात सामंजस्याची अपेक्षा करणे, निसर्गचक्राला धक्का लागू न देणे, समस्यांचे अवडंबर न माजवता परिस्थितीप्रमाणे मार्गक्रमित करणे असे अनेक विचार आजच्या समाजात जगताना मनुष्य स्वभावात मला दिसतात किंवा तशा दिसाव्यात असा माझा अट्टाहास आहे.” हाच विचार त्यांनी त्यांच्या कलाकृतीद्वारे मांडला आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती ही ठरवून चाकोरीतून बनलेली दिसत नाही. उत्स्फूर्तता ही प्रत्येक ठिकाणी ध्यानी येते. ‘सोपे करून सांगणे वा मांडणे’ ही गोष्ट सोपी नसते, जी चित्रकार चिचकर यांनी अचूक परंतु, सहज सोप्या तंत्राने अन् शैलीनं मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. समाजाच्या दृष्टीने जागरूकतेने तसेच संवेदनशीलतेने विचार करणारे चित्रकार चिचकर म्हणतात की, “समाजातील समस्यांचे निर्माते आपणच. मग त्याचे निराकरण करणे हे आपले कर्तव्य समजावे. समाजाला कलावंतांनी हे लक्षात आणून देणे, हे कलावंतांचे कर्तव्य आहे,” हे चित्रकार चिचकर यांना प्रकर्षाने वाटते. चिचकर हे बहुआयामी कलाकार आहेत. पेंटिग्ज, म्युरल्स, स्कल्पचर्स अशा विविध कलाप्रकारांतून त्यांची नऊ समूह आणि आठ एकत्र प्रदर्शने आयोजित गेली आहेत. विदेशातही त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने भरलेली आहेत. त्यांच्या कलाकृती दि. २६ नोव्हेंबरपर्यंत जहांगिरमध्ये पाहता येतील.

  

- प्रा. गजानन शेपाळ

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@