‘किम’ करोति कोरिया?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018   
Total Views |



आज एक, तर उद्या दुसरेच. आज शांतता, उद्या शक्तिप्रदर्शन अशी ‘किमच्या आले मना’ ही परिस्थिती. त्यात ट्रम्प यांचा तापट स्वभावही लपून राहिलेला नाही. तेव्हा, अशा दोन शीर्षस्थ नेतृत्वांमधील शस्त्रसंघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताही वाढली आहे.


जेव्हा कुठेतरी थोडंफार असं वाटू लागतं की, कोरियन द्वीपकल्पात सगळं काही आलबेल होण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा नेमकी माशी शिंकतेच. म्हणजे बघा, जूनमध्ये उ. कोरियाचे हुकूमशाह किम जाँग ऊन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली ऐतिहासिक भेट सिंगापूरमध्ये पार पडली. त्या भेटीच्या पूर्वी साहजिकच दोन्ही देशांतील विसंवाद काही प्रमाणात का होईना, किमान संवादात तरी रुपांतरित झाला. अमेरिकेलाही या इटुकल्या उ. कोरियाच्या हुकूमशाही वृत्तीने नाकीनऊ आणले होते. महासत्तेला अणुबॉम्बच्या धमक्या देण्यापर्यंतही याच किमची मजल गेली. म्हणूनच, उगाच एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा समोरासमोर बसून चर्चेतून मार्ग काढण्याचे या दोन्ही देशांच्या प्रमुखांनी अखेरीस ठरविले आणि ती ऐतिहासिक भेट संपन्न झाली. उ. कोरियानेही मग आपल्या अण्वस्त्रांचा कार्यक्रम आवरता घेण्याचे काही अटीशर्तींसह वरकरणी किमान कबूल तरी केले. द. कोरियासह अख्ख्या जगाने या भेटीनंतर सुटकेचा एक निश्वास सोडला. चला, पेटलेला सत्तासंघर्ष मिटला अन् अमेरिका- उ. कोरिया मैत्रीपर्वाची सुरुवात झाली, म्हणून इतर देशांनाही थोडे हायसे वाटले. पण असे होणे नाही. कारण, नुकतीच उ. कोरियाने एका अत्याधुनिक अस्त्राची चाचणी केल्याचे समोर आले. सुदैवाने, ही अण्वस्त्रे नसली तरी किमच्या मनात आता नेमके काय सुरू आहे, याचा ठाव घेणे तसे कर्मकठीणच. आज एक, तर उद्या दुसरेच. आज शांतता, उद्या शक्तिप्रदर्शन अशी ‘किमच्या आले मना’ ही परिस्थिती. त्यात ट्रम्प यांचा तापट स्वभावही लपून राहिलेला नाही. तेव्हा, अशा दोन शीर्षस्थ नेतृत्वांमधील शस्त्रसंघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताही वाढली आहे.

 

खरं तर सिंगापूरच्या चर्चेनंतरही सगळे काही अगदी आलबेल झाले, हा गैरसमज ठरावा. किम यांनी अणवस्त्र वापरासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असल्या तरी या विषयी अजूनही म्हणावी तशी स्पष्टता दोन्ही देशांमध्ये नाही. काही दिवसांपूर्वीच किम-ट्रम्प यांची दुसरी भेट लवकरच होऊ शकते, अशाही चर्चा रंगल्या होत्या. पण, त्याला अजूनही दोन्ही राष्ट्रप्रमुखांकडून पुष्टी मिळालेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर उ. कोरियाकडून करण्यात आलेली ही शस्त्रचाचणी या चर्चेच्या प्रक्रियेत मोठा अडथळा ठरू शकते. यापूर्वीही उ. कोरियाने असे विविध शस्त्रास्त्र प्रयोग करून अमेरिकेला कायम धमकावण्याचाच प्रयत्न केला. उ. कोरियाकडून वारंवार हा दावा केला जातो की, त्यांच्याकडे असलेल्या आंतरखडीय मिसाईलच्या माध्यमातून ते अमेरिकेतील प्रमुख शहरांना सहज टार्गेट करू शकतात. कारण, उ. कोरियाची राजधानी प्योंगयांगपासून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या लॉस एंजेलिसपर्यंतचे अंतर हे साधारण ९५०० किमी इतके आहे. शिवाय, दोन्ही देशांमध्ये अथांग पसरलेल्या प्रशांत महासागरातही ही संघर्षाची ठिणगी पडू शकते. साहजिकच, अमेरिकेचे सर्वार्थाने लष्करी सामर्थ्य उ. कोरियाच्या तुलनेत हजारो पटीने जास्त असले तरी अमेरिकेला कधीही त्यांच्यावर एवढ्याशा देशाने केलेल्या हल्ल्याकडे ‘महासत्तेला आव्हान’ याच दृष्टिकोनातून पाहिले जाईल.

 

या सगळ्या पार्श्वभूमीवर उ. कोरियात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या अमेरिकी नागरिकालाही कैदेतून मुक्त करण्याचा निर्णय किमने घेतला आहे. म्हणूनच ‘किम करोति कोरिया?’ असा प्रश्न उपस्थित होतो. कारण, एकीकडे गुप्त शस्त्राची चाचणी करायची आणि दुसरीकडे अमेरिकी कैद्याला मुक्त करण्याचा निर्णय घ्यायचा. म्हणजे नेमका यातला किमचा खरा चेहरा कोणता, खोटा कोणता याचा दुश्मनांनीच सकाय तो सुगावा लावावा. पण, आंतरराष्ट्रीय राजकारणात असे मुद्दाम गोंधळात टाकणारे डावपेचही शत्रूची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम खेळले जातात. अमेरिकाही त्याला अपवाद नाही, पण, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेची शत्रूराष्ट्रे सोडाच, पण सौदी अरेबिया, भारत, फ्रान्स या मित्रराष्ट्रांचीही नाराजी ट्रम्प यांनी त्यांच्या उथळ टिप्पण्यांमुळे पत्करलेली दिसते. त्यामुळे आगामी काळात ट्रम्प यांचा ‘अमेरिका फर्स्ट’ चा नारा ‘अमेरिका अलोन’ मध्ये रुपांतरित तर होणार नाही ना, अशीच शक्यता आंतरराष्ट्रीय वर्तुळात वर्तवली जातेय. तेव्हा, द. कोरियाच्या मध्यस्थीने, सामोपचाराच्या मार्गाने कोरियन द्वीपकल्पाचा हा प्रलंबित तिढा सोडविण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना फळ मिळो आणि किमचे त्यांना सहकार्य लाभो, हीच विश्वशांतीसाठीची प्रार्थना...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@