आता लक्ष्य 72 जागांकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018
Total Views |

 
 
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील 18 जागांचे मतदान आटोपल्यानंतर, दुसर्या टप्प्यात आता 20 नोव्हेंबरला 72 मतदारसंघांत निवडणूक होत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने फक्त 18 मतदारसंघांत निवडणूक घ्यावी लागली. पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त बस्तर भागातील सात जिल्ह्यांत तसेच राजनांदगाव जिल्ह्यात मतदान झाले.
 
 
नक्षलवाद्यांनी या भागातील विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केला, प्रचारादरम्यान सुरक्षा दलांवरील हल्ल्यासह हिंसाचाराच्या अनेक घटनाही घडवल्या, त्यामुळे येथे मतदान शांततेत होऊ शकेल की नाही, अशी शंका येत होती. पण, तेथील जनतेने सुरक्षा दलांच्या मदतीने नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले आणि आपला लोकशाहीवरच विश्वास असल्याचे दाखवून दिले. पहिल्या टप्प्यात या भागात 76 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. त्याचा निकाल 11 डिसेंबरला लागणार आहे.
 
 
मतमोजणीला महिनाभराचा कालावधी असला, तरी आतापासून भाजपा आणि कॉंग्रेस यांनी आपापल्या विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू केले आहेत. सामान्यपणे सत्ताधारी पक्षाचा नेता असो की विरोधी पक्षाचा, त्याला आपली ताकद नेमकी माहिती असते, कोणत्या मतदारसंघात आपली ताकद आहे आणि कोणत्या मतदारसंघात आपण कमजोर आहोत, याचा नेमका अंदाज त्यांना आला असतो. मात्र, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असे दावे-प्रतिदावे राजकीय पक्षांच्या नेत्यांना करावेच लागतात.
पहिल्या टप्प्यातील 18 पैकी 14 मतदारसंघांत आमचा विजय निश्चित असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. रमणिंसह यांनी केला आहे; तर कॉंग्रेसला 15 जागा जिंकण्याचा विश्वास आहे. 2013 च्या निवडणुकीत यातील 18 पैकी 12 जागा कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळी कॉंग्रेसला आपल्या जागा कायम राखता येतील की नाही, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात जो पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकेल, त्याची सत्तेवर येण्याची शक्यता वाढणार आहे. कारण 90 सदस्यीय छत्तीसगढ विधानसभेत साध्या बहुमतासाठी 46 जागा हव्या आहेत.
 
 
छत्तीसगडमध्ये 15 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे आणि डॉ. रमणिंसह मुख्यमंत्री. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. रमणिंसह यांना छत्तीसगडच्या जनतेची नाडी खर्या अर्थाने गवसली आहे. त्यामुळे यावेळी चौथ्यांदाही राज्यात भाजपाची सत्ता येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जी सर्वेक्षणे झाली, त्यात भाजपाला सत्ता मिळण्याचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये अन्य काही पक्ष रिंगणात असले, तरी खरा मुकाबला भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यातच आहे. त्यामुळे सर्वांची नजर आता दुसर्या टप्प्यातील 72 जागांवर केंद्रित झाली आहे.
माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत जनता कॉंग्रेस छत्तीसगडची स्थापना करत, मायावती यांच्या बसपाशी आघाडी केली आहे, त्यामुळे यावेळी या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता बळावली आहे. अजित जोगी यांनी मायावती यांच्या बसपासोबत आपल्या आघाडीत भाकपालाही आणले आहे, त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. अजित जोगी यांचा पक्ष 60 जागांवर, तर बसपा 30 जागांवर निवडणूक लढत आहे. अजित जोगी यांनी आपल्या 60 मधील दोन जागा भाकपासाठी सोडल्या आहेत.
 
 
अजित जोगी स्वत: मरवाही या त्यांच्या परंपरागत मतदारसंघातून, तर त्यांच्या पत्नी रेणू जोगी या कोटा मतदारसंतून निवडणूक लढवत आहेत. अजित जोगी यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत आपला नवा पक्ष काढला, तरी त्यांच्या पत्नी रेणू जोगी या कॉंग्रेसमध्येच होत्या. कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांना नाइलाजाने जनता कॉंग्रेस छत्तीसगडतर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. अजित जोगी यांची स्नुषा ऋचा जोगी बसपाच्या उमेदवार म्हणून अकलतारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. कॉंग्रेसने रेणू जोगी यांना उमेदवारी दिली असती, तर अजित जोगी जनता कॉंग्रेस छत्तीसगडतर्फे, त्यांच्या पत्नी रेणू जोगी कॉंग्रेसतर्फे, तर स्नुषा ऋचा जोगी बसपातर्फे निवडणूक लढवत असल्याचे दिसले असते. अजित जोगी यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, ते त्यांनी लपवूनही ठेवले नाही.
किंगमेकर नाही तर मला किंग व्हायचे, असे अजित जोगी यांनी म्हटले आहे. छत्तीसगडमध्ये भाजपा वा कॉंग्रेस यांपैकी कुणालाच बहुमत मिळणार नाही, त्यामुळे तिसर्या आघाडीचे नेते म्हणून मुख्यमंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, असे स्वप्न अजित जोगी पाहात आहेत. कर्नाटकात कुमारस्वामी जर मुख्यमंत्री बनू शकतात, तर मी का नाही, असा अजित जोगी यांचा युक्तिवाद आहे.
 
 
अजित जोगी अनेक कारणांनी वादग्रस्त ठरले असले, तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असले, तरी त्यांची छत्तीसगढमध्ये ताकद आहे, हे मान्य केलेच पाहिजे. त्यामुळे अजित जोगी यांनी नवा पक्ष स्थापन करत निवडणूक रिंगणात उडी घेतल्यामुळे कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुळात आतापर्यंत छत्तीसगडमध्ये झालेल्या सर्व निवडणुकांत भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात चुरशीचा मुकाबला झाला आहे. सलग तीन वेळा भाजपाने राज्यात सत्ता मिळवली असली, तरी भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यातील जागांचा आणि मतांच्या टक्केवारीचा फरक खूप कमी राहिला आहे.
2003 मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 39.26 टक्के मतांसह 50 जागा जिंकल्या होत्या. 36.71 टक्के मतांसह कॉंग्रेसने 37 जागा जिंकल्या होत्या. बसपाला 4.45 टक्के मतांसह दोन जागा जिंकता आल्या होत्या. अन्यांना 7.02 टक्के मतांसह फक्त एक जागा मिळाली होती. या निवडणुकीत भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यातील मतांमध्ये 2.55 टक्क्यांचा, तर जागांमध्ये 13 चा फरक होता.
2008 च्या निवडणुकीत भाजपाने 40.33 टक्के मतांसह 50 जागा जिंकल्या. म्हणजे 2003 मधील 50 जागा भाजपाने कायम राखल्या. कॉंग्रेसने 38.63 टक्के मतांसह 38 जागा जिंकल्या. म्हणजे कॉंग्रेसची जागा 2003 च्या तुलनेत एकाने वाढली. बसपाने 6.11 टक्के मते घेऊन आपल्या दोन जागा कायम राखल्या.
 
 
 
2013 मध्ये भाजपाने 41 टक्के मतांसह 49 जागा पटकावल्या, तर कॉंग्रेसने 40.3 टक्के मतांसह 39 जागा जिंकल्या. बसपाला यावेळी 4.3 टक्के मतांसह फक्त एक जागा मिळाली. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. याचाच अर्थ, भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात गेल्या तीन निवडणुकांत मतांच्या टक्केवारीतील फरक 0.7 पासून तर अडीच टक्क्यांपर्यंतचा, तर जागांचा फरक 10 ते 13 चा राहिला आहे.
छत्तीसगडची पहिली म्हणजे 2003 ची विधानसभा निवडणूक सोडली, तर आतापर्यंतच्या दोन्ही म्हणजे 2008 आणि 2013 ची निवडणूक संपुआच्या कार्यकाळात झाली होती. म्हणजे केंद्रात संपुआचे सरकार असतानाही भाजपाने राज्यात कॉंग्रेसचा पराभव केला होता. डॉ. रमणिंसह यांच्या नेतृत्वात भाजपाने या दोन्ही निवडणुका जिंकल्या होत्या. पहिल्या म्हणजे 2003 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील रालोआचे सरकार होते. यावेळी केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे राज्यात भाजपाचे मनोबल उंचावले आहे.
 
 
 
छत्तीसगडची निवडणूक यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री डॉ. रमणिंसह यांच्या नेतृत्वातच लढवली जात आहे. ही भाजपाची जमेची बाजू आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये सलग चौथ्यांदा कमळ फुलणार, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. अमित शाह तर पक्षाला विजय मिळवून देण्यासाठीच ओळखले जातात! अमित शाह यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आतापर्यंत जेवढ्या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात एखाद्दुसरा अपवाद वगळता सर्व निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. डॉ. रमणिंसह यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात छत्तीसगडचा बहुमुखी विकास झाला आहे. राज्यातील विकासाची ही प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी यावेळीही भाजपाचा विजय आवश्यक आहे...

श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@