सोन्यात गुंतवणूकीचे पर्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018   
Total Views |

 


 
 
 
सोन्याच्या खरेदीच्या प्रत्येक प्रकारात काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत, पण वित्तीय नियोजकांच्या मते देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत सॉव्हरीन गोल्ड बॉण्डस् हा चांगला पर्याय आहे. यात मिळणाऱ्या व्याजदरात सातत्य आहे. सोन्याच्या दराच्या चढउतारावर व्याजाचा दर अवलंबून नाही.
 

दिवाळीपूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दहा ग्रॅमचा दर ३२ हजार, ६२० रुपये होता. हा यापूर्वीच्या ६ वर्षांतील उच्चांकी दर होता. २ नोव्हेंबर रोजी हा दर ३१ हजार, ६२२ रुपये होता. येत्या तीन महिन्यांत हा दर ३२ हजार रुपयांपर्यंत जाईल, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहेसोन्याचे भाव कितीही वाढले तरी भारतीयांची सोने खरेदी करावयाची ‘क्रेझ’ मात्र कमी होत नाही. सध्या तरुण पिढीच्या बाबतीत ‘ट्रेंड’ बदलत चालला असून तरुण पिढी पिवळे सोने वापरण्यापेक्षा हिरे वापरण्यास प्राधान्य देत आहे. आपल्याकडे मुलीचा सालंकृत विवाह करण्याची पद्धत आहे. सालंकृत म्हणजे मुलीला दागिने घालून तिचा विवाह करणे. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी, दहा टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सोन्यात असता कामा नये.

 

दागिने खरेदी

 

दागिने खरेदी ही सोने खरेदी करायची सर्वमान्य पद्धत आहे. दागिने नियमित किंवा प्रासंगिक वापरले जातात. बरेचसे दागिने हे चोरीच्या भीतीने बँकांच्या लॉकरमध्येच ठेवले जातात. अशा वेळेला ही ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ ठरते. समजा सोन्याचे भाव वाढले तर कागदोपत्रीच तुम्ही श्रीमंत झालेले असता किंवा तुमची पुंजी वाढलेली असते. तुम्हाला कधीही पैशाची गरज निर्माण झाली तर सोने विकून तत्काळ पैसे हातात येऊ शकतात. दागिने खरेदी करताना सोन्याच्या कॅरेटबाबत म्हणजे शुद्धतेबाबत सोन्याचे दागिने विकणार्‍यांकडून फसवणूक होऊ शकते. मोठ्या ब्रॅण्डसकडून फसवणूक होणार नाही पण छोट्या व्यापार्‍यांकडून फसवणूक झाल्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. दागिने खरेदी करताना मूळ सोन्याची किंमत तर द्यावीच लागते, याशिवाय दागिने घडणावळीचे शुल्कही द्यावे लागते. हे साधारणपणे सोन्याच्या किमतीच्या २५ ते ३० टक्के आकारले जाते.दागिने विक्रीस काढल्यावर घडणावळीवर केलेला खर्च फुकट जातो.

 

सोन्याची नाणी व बार

 

सोन्याची नाणी तसेच बार ही खरेदी करता येतात. नाणी कमी वजनाची व छोट्या आकाराची असतात. बार मात्र १०० ग्रॅम व त्या पटीत असतात. बहुतेक सार्वजनिक उद्योगातील बँका सोन्याची नाणी व बार त्यांच्या ग्राहकांसाठी व अन्यांसाठी विकतात. यात ग्राहकाला सोन्याची अचूक शुद्धता मिळते. यावर ‘हॉलमार्क’ असतो. तुम्ही जर छोट्या सोन्याच्या व्यापाऱ्याकडून नाणे किंवा बार विकत घेतल्यानंतर त्यावर हॉलमार्क असेलच असे नाही. यावर घडणावळ शुल्क द्यावे लागत नाही. कोणतीही बँक विकलेले सोने परत विकत घेत नाही. त्यामुळे तुम्हाला पैशाची गरज पडल्यास सोने सराफा पेढीवरच विकावे लागते.

 

ईटीएफ आणि फंड्स

 

सोने धातू स्वरूपात खरेदी करण्यापेक्षा पेपर किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये खरेदी करण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत. गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (इटीएफ) किंवा गोल्ड म्युच्युअल फंड्स हे दोन पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेल्या योजनेत निव्वळ मालमत्ता मूल्य वाढते व जेव्हा सोने घसरते, तेव्हा निव्वळ मालमत्ता मूल्य कमी होते. या सोने गुंतवणुकीच्या पर्यायात चोरीची भीती नाही तसेच लॉकरचे भाडेही भरावयास लागत नाही. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंटस् प्लान’ (एसआयपी) नेही यात गुंतवणूक करता येऊ शकते. याचे व्यवस्थापन अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांकडे असल्यामुळे गुंतवणूकदाराला फंड व्यवस्थापन शुल्क भरावे लागते. हे शुल्क ईटीएफवर वर्षाला गुंतवणुकीच्या एक टक्का व गोल्ड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर वर्षाला गुंतवणुकीच्या दीड ते १.८ टक्के भरावे लागते.

 

सॉव्हरीन गोल्ड बॉण्डस्

 

भारत सरकारच्या सॉव्हरीन गोल्ड बॉण्डस् योजनेत गुंतवणूक करून सोने खरेदीचा पर्याय निवडता येतो. गोल्ड बॉण्डस् रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विक्रीस काढते. ऑक्टोबर २०१८ पासून फेब्रुवारी २०१९ पर्यंत रिझर्व्ह बँक हे बॉण्डस् दर महिन्याला विक्रीस काढणार आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला बॉण्डस्मध्ये गुंतविलेल्या रकमेवर वर्षाला अडीज टक्के दराने व्याज मिळते. दागिने बनविले किंवा नाणी किंवा बार विकत घेतले तर गुंतवणूकदाराला ते विकेपर्यंत काहीही परतावा मिळत नाही. पण यात मात्र व्याज मिळते. व्याजाची रक्कम बॉण्डधारकाच्या खात्यात थेट जमा केली जाते. सोन्याचे भाव कमी होवोत किंवा वाढोत, गुंतवणूकदाराला व्याज मिळणारच मिळणार. या व्याजाची रक्कम ही गुंतवणूकदाराचे उत्पन्न समजली जाते, परिणामी ही रक्कम करपात्र आहे पण बॉण्डस्चा परतावा घेताना गुंतवणूकदाराला जर कॅपिटल गेन झाला तर त्याला कॅपिटल गेन टॅक्स आकारला जात नाही. यात केलेल्या गुंतवणुकीसाठी पाच वर्षांचा ‘लॉक इन पीरियड’ आहे पण तुम्ही हे बॉण्ड शेअर मार्केटमध्ये विकू शकता.

 

-गोल्ड

 

सोन्याची ऑनलाईन खरेदी करता येते. मोबिक्विकच्या मोबाईल अॅपद्वारे डिजिटली सोने विकले जाते. पेटीएम आणि फोन पे यांच्या अॅपद्वारे ही ई-गोल्ड पर्याय उपलब्ध आहे. येथे किमान १ रुपयाही गुंतविता येतो. खरेदी करताना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. जर तुम्हाला घरपोच सोने हवे असेल तर तुम्हाला १ ग्रॅमच्या पटीतच विकत घ्यावे लागते. तुम्हाला जर नाणी हवी असतील तर नाण्याच्या घडणावळीचा खर्च व घरपोच पाठविण्याचा खर्च आकारला जातो. पेटीएम १ ग्रॅम नाण्यासाठी ३७४ रुपये तर २ ग्रॅम नाण्यासाठी ४०४ रुपये घडणावळ शुल्क आकारते. याचे रोकड रकमेत रुपांतर करताना ‘बँक ट्रान्सफर’ व ‘कन्विनिअन्स’ शुल्क आकारले जाते. पेटीएम आणि फोन पे पाच वर्षे तुमचे सोने सांभाळतात. त्यानंतर तुम्हाला ‘डिलिव्हरी’ घ्यावीच लागते. दोन वर्षांच्या कालावधीत २ ग्रॅमहून कमी सोने खरेदी केल्यास फोन पे ‘स्टोअरेज’ व विमा प्रीमियम म्हणून ०.०५ टक्के शुल्क आकारते.

 

तुम्ही काय करावे?

 

सोन्याच्या खरेदीच्या प्रत्येक प्रकारात काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत, पण वित्तीय नियोजकांच्या मते देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत सॉव्हरीन गोल्ड बॉण्डस् हा चांगला पर्याय आहे. यात मिळणाऱ्या व्याजदरात सातत्य आहे. सोन्याच्या दराच्या चढउतारावर व्याजाचा दर अवलंबून नाही. गोल्ड ईटीएफ हा दुसरा पर्याय म्हणून स्वीकारण्यास हरकत नाही. कारण यात ‘एसआयपी’ पर्यायही उपलब्ध आहे. सोन्याचे भाव वाढत असल्यामुळे, शेअर बाजार बराचसा दोलायमान अवस्थेत असल्यामुळे, सामान्य व किरकोळ गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय स्वीकारण्याची शक्यता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@