लबाड सर्जनशीलतेचा निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018   
Total Views |

 


 
 
 
मला तर नेहमी वाटत असते की, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरूर इथे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, संजय राऊत म्हणजे अर्थोअर्थी उद्धव ठाकरे हे सगळे जण एकमेकांच्या स्पर्धेतच आहेत. दररोज या सगळ्यांची नवीन नवीन मुक्ताफळे वाचून चांगलीच करमणूक होते. असो, मात्र त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक वाटते. कुठे गेली सर्जनशीलता? असे विचारणाऱ्यांना ही महान मंडळी माहिती नसावीत, असे वाटते. गोष्ट जुनी आहे पण तरीही राज ठाकरेंची व्यंगचित्रही पाहा. भाऊबीजेला भारतमाता पंतप्रधानांना ओवाळणी नाकारते, असे चित्र होते. आता रा. स्व. संघ स्वयंसेवक भारतमातेला माता मानतो आणि भाऊबीजेला माता नाही तर बहीण भावाला ओवाळते हे वास्तव आहे, पण राज ठाकरेंनी अतिकल्पकतेने पुत्राची ओवाळणी करायला माता नकार देते, असे चित्र काढले. आता ही कल्पनेतली नवीन भाऊबीज काढणारे राज ठाकरे सर्जनशील नाहीत, असे कोण म्हणेल? आता प्रकाश बघा. जानेवारी २०१८ पासून त्यांना जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी संभाजी भिडे दिसायचे. पण चौकशी आयोगासमोर त्यांना संभाजी भिडेंऐवजी अचानक नवीनच उत्तर सापडले. तुम्हीच सांगा, माणसाने महिनोन्महिने एखादे नाव घोकावे आणि ऐनवेळी दुसरेच काही तरी आत्मविश्वासाने बोलावे, यात सर्जनशीलता नाही का? तसेच काहीसे उद्धवराजांचे. मराठी माणूस, मराठी भाषा, माझा महाराष्ट्र करण्यात सगळी उमेद संपली. आता ते अयोध्येत हिंदीमध्ये भाषण करणार आहेत. यावेळी तुमच्या आमच्या बेअक्कल लोकांना प्रश्न पडेल की, ते कावळा, मावळा, कोथळा वगैरे शब्द हिंदीत कसे बोलतील? पण नाही, उद्धव सर्जनशील आहेत. त्यामुळे ते हिंदीत या शब्दांचा सर्जनशीलपणे वापर करतील. दिग्विजय सिंग यांचा सर्जनशीलतेच्या बाबतीत तर कोणी हात धरू शकणार नाही. भारतातील पामर नागरिक तर सोडाच प्रत्यक्ष अयोध्येतल्या रामलल्लांचेही मन त्यांना कळते. त्याशिवाय का दिग्गी म्हणाले की, “बेकायदेशीर जागेवरचं राम मंदिर रामाला तरी आवडेल का?” पाहा, प्रत्यक्ष रामाच्या मनातले विचार दिग्विजय जाणतात, पण त्याचवेळी कोट्यावधी हिंदूंची ‘मंदिर वही बनायेंगे’ची श्रद्धा मात्र दिग्विजय यांना दिसत नाही की समजत नाही. हीच तर खरी लबाडांची सर्जनशीलता.. लबाड सर्जनशीलतेचा निषेध...



तेव्हा काय झाले होते?


मनाला वाटेल तसे बरळून आपणच कसे विद्वान आहोत, असे भासवणाऱ्यांमध्ये शशी थरूरांचे हात नव्हे नव्हे तोंड कोणीच धरू शकणार नाही. सुनंदा पुष्कर यांचे नावही आठवले तरी कोणाही सज्जन माणसाचा आत्मा तिळतिळ तुटतो. या सर्व घडामोडीतही अतिशय फाजील आत्मविश्वास आणणे कोणाला जमेल का? पण शशी थरूर हा असा आत्मविश्वास बाळगून आहेत. ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाचा एक आवडता शब्द आहे- निधर्मी. त्यामुळे शशी निधर्मीपणाचे बेगडी ढोल बडवतच नेतेपदी आरूढ झाले यात शंका नाही. निधर्मीपणाची व्याख्या या लोकांच्या मते काय असते, हे सगळ्यांना माहिती आहे. विशिष्ट धर्माचे लांगूलचालन आणि विशिष्ट धर्माची अवहेलना. त्यामुळेच निधर्मी बिधर्मीपणा बाळगणाऱ्या मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरूर यांची नेहमीच चांदी होत गेली. पण पुढे परिस्थिती बदलली, निधर्मी शब्दाला काँग्रेसमध्ये जरी किंमत असली तरी लोकमनाचा कौल २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये बेगडी निधर्मीवाद पाळणाऱ्या पक्षाला मिळालाच नाही. ‘सत्तेसाठी काहीही’ म्हणत मग यांनी निधर्मीपणाची झूल फेकली ते देव देव करायला लागले. शशी थरूरसारख्यांनी चांगला हिंदू, वाईट हिंदू वगैरे हिंदूची व्याख्या केली. ही व्याख्या करताना सर्वव्यापी, सर्वकल्याणाची मंगल कामना करणाऱ्या हिंदू धर्माचा आपण अपमान करत आहोत, असे चुकूनही थरूरांना वाटले नाही. कसे वाटणार? कारण त्यांच्या मते ते सर्वसाक्षी सर्वव्यापी विद्वान आहेत. त्यानंतर तर थरूरांची तोंड एक्सप्रेस सुसाट धावतच आहे. पण ती निश्चित मार्गाकडे सुसाट धावत नाही तर रूळ सोडून अधःपतनाच्या दरीच्या मार्गाकडे धावत आहे. त्यामुळेच तर ते देशाच्या पंतप्रधानांची अवहेलना करण्याची एकही संधी सोडत नाही. शशी नुकतेच म्हणाले की, “नेहरूंमुळे एक चायवाला पंतप्रधान बनू शकला.” कसे तर म्हणे नेहरूंनी संस्थात्मक रचना केली म्हणून. यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चोख उत्तर दिलेच म्हणा. पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकच प्रश्न आहे की, संस्थात्मक प्रशासन, लोकशाही रचना, निवडणुका यामध्ये संविधानाची काही भूमिका आहे की नाही? नेहरूंनी इतक्या व्यवस्था निर्माण केल्या पण जवळजवळ ६० वर्षांनी काँग्रेस पक्षाबाहेरचा पंतप्रधान देशाला मिळाला. त्याआधी या संस्थात्मक रचनेला काय झाले होते?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@