म. गांधी, पटेल व नेहरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018   
Total Views |
 

गांधी, पटेल व नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण वेगळी होती, त्यांचे स्वभाव वेगळे होते, त्यांच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. यापैकी प्रत्येकजण आपल्या प्रकृतीनुसार विचार करत होता व त्याचे भलेबुरे परिणाम देशाला भोगावे लागले. त्यांचे परस्पर संबंध हा एखाद्या शेक्सपिअरच्या प्रतिभेला स्पर्श करणारा विषय आहे. ते आपापल्या स्वभावानुसार जगत गेले आणि परिस्थितीला त्यानुसार वळण देण्याचा प्रयत्न केला.

 
 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या उभारणीनंतर पटेल व पंडित नेहरू यांच्या परस्पर संबंधाबाबत चर्चा सुरू आहे. भारत स्वतंत्र होत असताना संक्रमणाच्या काळात म. गांधी, पटेल व नेहरू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली व त्याचे स्वातंत्र्योत्तर काळावर मूलगामी स्वरूपाचे परिणाम झाले. ही तिन्ही व्यक्तिमत्त्वे भिन्न होती परंतु त्या तिघांमुळे संघटनात्मक संतुलन साधले जात होते. सर्व भारतभरात ज्या नेतृत्वाने जनसामान्यातही लोकमान्यता मिळविली होती, त्याचा पहिला मान लोकमान्य टिळकांकडे जातो. परंतु, टिळकांचे व्यक्तिमत्त्व व त्यांचे अनुयायी यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर होते. त्यामुळे नंतरच्या म. गांधींच्या काळात जशी नेत्यांची मालिका तयार झाली ते टिळकांच्या वेळी घडू शकले नाही. या नेतृत्व मालिकेत म. गांधी यांच्यासोबत पटेल व नेहरू यांनी जवळजवळ समकक्ष स्थान प्राप्त केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गांधी ७८ वर्षांचे, पटेल ७२ वर्षांचे तर नेहरू ५८ वर्षांचे होते. या तिघांच्याही व्यक्तिमत्त्वाची जडणघडण स्वातंत्र्यलढ्यातून झाली असली तरी तिघांच्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र वैशिष्ट्येही होती. म. गांधींच्या जीवनावर सनातन धर्माचा प्रभाव होता. त्यामुळे ते सर्वसामान्य व्यक्तीच्या आत्म्याला व हृदयाला स्पर्श करू शकले. पटेल यांचा जन्म सर्वसामान्य आर्थिक स्तरातील कुटुंबात झाला व आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना झगडावे लागले. गांधींशी संपर्क आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला व बार्डोलीच्या लढ्यात त्यांचे संघटन कौशल्य पणाला लागले. या दोघांच्या तुलनेत नेहरूंचे जीवन सुखवस्तू होते. गांधी किंवा पटेल यांना सामाजिक जीवनात येण्यासाठी कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. पं. नेहरूंना ती होती व त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी व्यावसायिक व राजकीय जीवनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले होते.

 
 

कोणतीही चळवळ किंवा संघटना यशस्वी व्हायची असेल तर त्यासाठी अनेक वेगवेगळी गुणवैशिष्ट्य असणारी कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे लागतात. काँग्रेसला तशी ती मिळाली म्हणून ती भारतातली प्रमुख लोकचळवळ बनू शकली. म. गांधी केवळ लोकप्रिय नव्हते तर व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची शक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. त्यामुळे काँग्रेस ही केवळ राजकीय हक्क मागणारी स्वातंत्र्य चळवळ राहिली नाही तर त्या चळवळीला मूल्यात्मक आशयही प्राप्त झाला. या आशयामुळे समाजजीवनाच्या अनेक क्षेत्रांत गांधीवादी कार्यकर्ते काम करू लागले व काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष न राहता म. गांधींच्या दृष्टीने ती एक समाजपरिवर्तनाची चळवळ होती. पटेल हे संघटनाकुशल नेते असल्याने ते व्यवहारवादी होते. नेहरू हे स्वप्नवादी होते व त्यांनी आपल्या कल्पनेने एक जग तयार केले होते. त्यामुळे जनसमूहाच्या कल्पनाशक्तीला हात घालण्याची त्यांच्यात शक्ती होती. जनतेला स्वप्न देणार्‍या एका राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाची स्वाभाविकच लोकमनावर मोहिनी होती. एखादी चळवळ चालवत असताना अशा प्रकारची भिन्न भिन्न व्यक्तिमत्त्वे एकमेकांना पूरक ठरत असतात. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हे केवळ तात्त्विक पातळीवर राहत नाहीत तर ते व्यावहारिक पातळीवर उतरतात व त्यातून संघर्षाला सुरुवात होते. एकावेळी खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते सत्ता आल्यावर मात्र एकमेकांचे कसे कट्टर शत्रू बनतात त्याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. त्यामुळे हा एक विरुद्ध दुसरा असा मुद्दा नसून ती मनुष्यस्वभावाला धरून घडणारी मानसिक प्रक्रिया आहे, असे लक्षात घेतले की कोणत्याही अभिनिवेशाशिवाय त्यांच्या परस्परसंबंधांचे विश्लेषण करता येऊ शकते. तसेही आता कितीही हिरीरीने कोण कसा वागला असता तर काय झाले असते, अशी चर्चा प्रत्यक्ष परिणामांच्या दृष्टीने अर्थहीन असते. अशा चर्चेच्या बौद्धिक आनंदातून आज घडणार्‍या घटनांचे अर्थ लावण्यासाठी काही उपयोग झाला तर ते अधिक महत्त्वाचे असते.

 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या तिन्ही नेत्यांच्या मतभेदाला सुरुवात झाली होती. पटेल व नेहरू यांना राज्य चालवायचे होते तर गांधींना आपला आदर्शवाद जपायचा होता. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याच्या निमित्ताने पहिला मोठा वाद उफाळून आला. पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केल्यामुळे पाकिस्तानला पैसे देणे म्हणजे आपल्या शत्रूला मदत करण्यासारखे आहे, अशी पटेल व नेहरूंची धारणा होती तर हे पैसे न देणे हे आपल्या मूल्यांना धरून नाही, अनैतिक आहे, अशी गांधींची भूमिका होती. त्यानंतर हे मतभेद वाढतच गेले. गांधीहत्येच्या आधी तीन दिवस २७ जानेवारीला गांधींनी लिहिले, ‘’काँग्रेसचे काम ईश्वरी सत्ता राबविण्याचे आहे. आपण केवळ ईश्वरी सत्तेसाठी आहोत असे, तिने जाहीर करावे. जर ती राजकीय सत्तेचा खेळ खेळत राहिली तर एक दिवस आपण नष्ट झालो आहोत, हे तिच्या लक्षात येईल.” एवढे लिहूनच ते थांबले नाहीत तर काँग्रेस विसर्जित करून त्याचे ’लोक सेवा संघा’त रूपांतर करण्याचे टिपणही त्यांनी तयार केले होते. ते करताना त्यांनी म्हटले होते, ”भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर काँग्रेसचे काम संपले आहे. एक संसदीय पक्ष म्हणून तिचे जे स्वरूप आहे ते तिचे काम नाही. भारतातील सात लाख खेड्यांना सामाजिक, नैतिक व आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे आहे. त्यामुळे राजकीय व जातीयवादी पक्षांशी अनिष्ट स्पर्धेपासून तिने दूर राहिले पाहिजे. या आणि यासारख्या अनेक कारणांसाठी अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी विसर्जित केली जात आहे आणि तिचे ’लोक सेवा संघा’त रुपांतर केले जात आहे. ’‘ असा उद्देश स्पष्ट करून ’लोक सेवा संघ’ कसा असेल, त्याचे स्वरूपही त्यांनी स्पष्ट केले होते. गांधी हत्या झाली नसती तर २ फेब्रुवारीला हा निर्णय झाला असता.

 
 

या घटनेकडे पाहताना गांधी विरुद्ध पटेल किंवा नेहरू असे पाहण्याऐवजी एक आदर्शवादी व व्यवहारवादी यातील संघर्ष म्हणून याकडे पहिले पाहिजे. ३० जानेवारीला गांधीहत्या झाली नसती तर पुढच्या घटना कशा घडल्या असत्या, याचा आज अंदाज करणेही अवघड आहे. खरोखरच काँग्रेस बरखास्त झाली असती तर आज काँग्रेस जो स्वातंत्र्यलढ्याचा वारसा सांगते तसा तो सांगू शकली असती का? एक राजकीय पक्ष म्हणून तिचे स्वरूप कसे राहिले असते याची आज कल्पना करणेही अवघड आहे. तसेच त्या काळात पटेल व नेहरू यांचे मतभेद इतके विकोपाला गेले होते की, आपण एकत्र काम करू शकत नाही, असे दोघांनीही गांधींच्यापाशी स्पष्ट केले होते. गांधी व पटेल यांची शेवटची भेट त्यासाठीच झाली होती. याचे कारण म्हणजे पटेल व नेहरू यांचे अनेक प्रश्नांवर मूलभूत मतभेद होते व ते त्यांच्या राजकीय आकलनातून आलेले होते. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार हे पटेलांना सांस्कृतिक स्वातंत्र्याचे लक्षण वाटत होते तर नेहरूंना हिंदूंनी आपल्या श्रद्धा लादण्याचा प्रकार वाटत होता. धोरणात्मक निर्णयापेक्षा नेहरूंना आपले व्यक्तिगत संबंध अधिक महत्त्वाचे वाटत होते. शेख अब्दुल्ला हे त्याचे उदाहरण. संघटनाकुशल असलेल्या व्यक्तींना माणसांच्या हेतूंचा लगेच सुगावा लागतो. चीनने तिबेटवर दावा सांगितल्यावर पटेलांनी नेहरूंना जे पत्र लिहिले आहे, ते आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. संघाचे काम नेहरूंना धोकादायक वाटत होते, पटेलांना तसे वाटत नव्हते. म्हणून नेहरू परदेशात असताना काँग्रेस कार्यकारिणीने संघाच्या स्वयंसेवकांना काँग्रेसमध्ये येण्याचे स्वागत करणारा ठराव केला. नेहरूंनी परत आल्यावर तो रद्द करायला लावला. पटेल मुस्लीमद्वेष्टे नसले तरी मुस्लिमांचे अराष्ट्रीय लाड खपवून घेण्याची त्यांची तयारी नव्हती. काकासाहेब गाडगीळ पहिल्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातील अनेक प्रसंग जरी पाहिले तरी पटेल व नेहरु या दोघांच्या दृष्टिकोनात किती फरक होता ते कळेल. आपली प्रतिमा पटेल राष्ट्रहितापेक्षा महत्त्वाची मानत नव्हते किंवा पटेलांनी राष्ट्रहितापेक्षा व्यक्तीगत मैत्रीलाही अधिक मोठे स्थान दिले नाही, तसे नेहरुंचे नव्हते. त्यामुळे गांधी, पटेल व नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण वेगळी होती, त्यांचे स्वभाव वेगळे होते, त्यांच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. यापैकी प्रत्येकजण आपल्या प्रकृतीनुसार विचार करत होता व त्याचे भलेबुरे परिणाम देशाला भोगावे लागले. त्यांचे परस्पर संबंध हा एखाद्या शेक्सपिअरच्या प्रतिभेला स्पर्श करणारा विषय आहे. ते आपापल्या स्वभावानुसार जगत गेले आणि परिस्थितीला त्यानुसार वळण देण्याचा प्रयत्न केला.

 
 

असे असताना आज नेहरूंवर सोशल मीडियात जो राग दिसतो त्याचीही कारणमीमांसा केली पाहिजे. चीनच्या पराभवानंतर इंदिरा गांधींनी नेहरूप्रणीत पंचशील तत्त्वे सोडून दिली व भारताला प्रादेशिक महासत्ता बनविण्याचा संकल्प केला. राजीव गांधींच्या काळापासून नेहरूंच्या समाजवादी धोरणांना तिलांजली द्यायला सुरुवात झाली. नरसिंह राव पंतप्रधान असताना भारताचे तटस्थ धोरण सोडून अमेरिकेबरोबर संबंध वाढवायला सुरुवात झाली. आता राहुल गांधी देव-देवळे, दर्गे यांना भेटी देऊन नेहरूप्रणीत निधार्मिकतेला सोडचिठ्ठी देत आहेत. नेहरूंनी आधुनिक संस्थाजीवनाचा, उच्च शिक्षणसंस्थांचा पाया घातला. पण हे सर्व करीत असताना नेहरू घराण्याशिवाय आणखी कोणाचा देश घडविण्यात वाटा नव्हताच, असे वातावरणही तयार करण्यात आले. देश म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे नेहरू घराणे, असा जो प्रचार करण्यात आला, त्याची ही तीव्र प्रतिक्रिया आहे. नेहरूंनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या पुरुषोत्तमदास टंडन यांना राजीनामा द्यायला लावला. ’जनसंघाला चिरडून टाकीन,’ अशी भाषा वापरली. हा केवळ राजकीय विरोध नव्हता तर द्वेष होता. त्यांच्या काळात भारतातील सेक्युलॅरिझम म्हणजे अल्पसंख्याकवाद अशी परिस्थती निर्माण केली गेली. त्यामुळे पंचशील, निधर्मीवाद, समाजवाद, तटस्थ राष्ट्र गट या त्यांच्या परराष्ट्रीय, आर्थिक, सैद्धांतिक आधारशीला होत्या, त्या हळूहळू कालबाह्य होत गेल्या. त्यामुळे नेहरूंचे सार्वजनिक मूल्यमापन होत असताना या सर्वांचा त्यावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्याला उत्तर देत असताना गांधी, पटेल व नेहरू हे जणू काही एकच गीतातील सहगायक होते, असे अट्टाहासपूर्वक सांगण्याची गरज नाही. भारताला स्वातंत्र्य मिळविण्याच्या समान आकांक्षेने ते एकत्र आले, नंतर मात्र राष्ट्रघडणीच्या तिघांच्याही कल्पना वेगळ्या होत्या. गांधींची हत्या झाल्याने व पटेलांच्या वयपरत्वे मृत्यूमुळे त्यांना स्वातंत्र्यानंतर आपल्या विचारानुसार परिस्थितीला आकार देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@