पितळ उघडे पडू लागले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |



 
 
 
भीमा-कोरेगाव दंगलीत संभाजीराव भिडेंना गोवण्याचे षड्यंत्र आखणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आयोगासमोर मात्र त्यांचे नावही घेतले नाही. कारण बाहेर खोटे बोलता येते मात्र आयोगासमोर खोटी साक्ष देणे हा गंभीर गुन्हा आहे.
 

संदर्भहीन झालेला माणूस पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी जे काही करतो, तो त्याचा संघर्ष म्हणून ओळखला जातो. समाज अशा माणसाकडे आदराने पाहतो आणि त्याच मार्गावर चालणारे लोक या संघर्षाकडे वस्तुपाठ म्हणून पाहायला लागतात. मात्र, स्वत:ला पुनर्स्थापित करण्यासाठी जेव्हा एखादा माणूस संपूर्ण समाजालाच वेठीला धरतो, तेव्हा त्याला ‘उचापत्या’ म्हटले जाते. प्रकाश आंबेडकरांच्या उचापत्या आता अशाच प्रकारे उघडकीला यायला लागल्या आहेत. बाबासाहेबांचे आडनाव लावून स्वत:चे शून्य कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या व्यक्तीने काल भीमा-कोरेगाव प्रकरणी होत असलेल्या सुनावणीसमोर संभाजीराव भिडेंचे साधे नावही घेतले नाही. आता याच संभाजीरावांच्या नावाने प्रकाश आंबेडकरांनी जो काही उर बडविला होता, तो नेमका कशासाठी या प्रश्नाचे उत्तर प्रकाश आंबेडकरांना द्यावे लागेलपुण्यात झालेल्या एल्गार परिषदेपासून सुरू झालेला विष ओकण्याचा कार्यक्रम भीमा-कोरेगावला झालेल्या दंगलीनंतर संपला. पोलीस व शासनाने संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळल्याने दंगल शमली असली तरी महाराष्ट्रातल्या दलित-सवर्ण संघर्षाचे भरलेले घाव ताजे करण्याचे काम या दंगलीने केले. त्यावेळी नामांतरासारखा विषय तरी होता. आता मात्र एका संदर्भहीन माणसाच्या अस्तित्वासाठी केलेल्या धडपडीचे आणि अभद्र युत्यांचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले. भीमा-कोरेगावच्या दंगलीचे षड्यंत्र रचणाऱ्यांचे डाव उघडे पाडण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे आणि त्या संदर्भात सुनावण्या व आरोपपत्र दाखल करण्याचे काम चालले आहे.

 

प्रकाश आंबेडकरांनाही या समितीसमोर पाचारण करण्यात आले होते. जे ते बाहेर बरळत होते साधारणत: इथेही तेच बरळतील अशी अपेक्षा होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराव भिडेंचे साधे नावही उच्चारले नाही. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर ज्या काही खऱ्या-खोट्या गोष्टी प्रकाश आंबेडकर आणि कंपूने पसरविल्या, त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात तणावाची स्थिती निर्माण झाली. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्यात आली आणि वाहतूक व्यवस्था वेठीस धरली गेली. अनेक निरपराध नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागले. स्वत:ला ‘आंदोलक’ म्हणत जे लोक रस्त्यावर उतरले होते, त्यांच्या तोंडी फक्त आणि फक्त अफवा होत्या. या सगळ्या अफवांच्या केंद्रस्थानी होते संभाजीराव भिडे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या कंपूने पद्धतशीरपणे या अफवा आंबेडकरी विचार मानणाऱ्या मंडळींमध्ये पसरविल्या. संभाजीराव भिडेंना आंबेडकरी विचार मानणाऱ्यांचा कट्टर शत्रू म्हणून पेश केले गेले. पत्रकार परिषदा घेऊन, मुलाखतींमधून प्रकाश आंबेडकर हेच सांगत होते. भीमा-कोरेगाव दंगलीचे वास्तव काय होते, ते आता उघडकीला यायला लागले आहे. डाव्यांचा यातला हात, त्यामागचा माओवाद्यांचा अजेंडा, शहरे अस्थिर करण्यासाठी आखली गेलेली षड्यंत्रे या सगळ्याच्या मागे आहेत. त्याचे एक एक करून पुरावेही समोर येत आहेत. डाव्यांच्या अशा समाजविरोधी, देशविरोधी कारवाया नवीन नाहीत. वनवासींच्या जीवावर राज्य करणाऱ्या नक्षल्यांपासून ते प्रा. साईबाबांसारख्या शहरी प्राध्यापकांपर्यंत या मंडळींचे मोठे जाळे देशभरात पसरलेले आहे. क्रांतीच्या आणि समाज बदलण्याच्या अफूच्या अमलाखाली ही मंडळी वावरत असतात. यांच्या अपेक्षेप्रमाणे समाज काही बदलत नाही. मात्र, समाजात वितुष्ट निर्माण करण्यात मात्र या मंडळींना चांगलेच यश आले आहे, हे भीमा-कोरेगाव घटनेनंतर लक्षात यायला लागले आहे. सरकारी किंवा अनुदानित पैशांवर चालणाऱ्या शिक्षणसंस्थांमधून गलेलठ्ठ पगार घेऊन गरीबांच्या वेदनांचा बाजार मांडणाऱ्या या मंडळींना हे असले प्रयोग नवे नाहीत.

 

यातील दुःखद भाग म्हणजे ज्या बाबासाहेबांनी मार्क्स नाकारून धम्म स्वीकारला, त्याच बाबासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या माणसाने आपल्या हीन स्वार्थासाठी आंबेडकरी जनतेला डाव्यांच्या गोठ्यात नेऊन बांधण्याचा खटाटोप केला. प्रकाश आंबेडकरांची राजकीय कारकीर्द ही काही फारशी मोठी प्रभावी राजकीय कारकीर्द नव्हे. आंबेडकरी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या मंडळींचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत, असेही मुळीच नाही. मात्र, त्याचे भांडवल करून डावे मित्र जोडण्याचा प्रकाश आंबेडकरांचा डाव आता उघडा पडू लागला आहे. आडनावाचा वारसा आपल्याकडे मात्र राजकीय फायदे सगळे रामदास आठवलेंना, हीच प्रकाश आंबेडकरांची खरी दुखरी नस. कबीर कला मंचच्या मंडळींसोबत उभे राहाण्यापासून ते आजपर्यंत आपली वेगळी जागा निर्माण करण्याच्या नादात प्रकाश आंबेडकर वडाच्या झाडावर धोतऱ्याचे रोप कलम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला दंगलीसारखी फळेच येणार, यात काही शंका नाही. मात्र, दूरगामी विचार केला तर यातून निर्माण होणाऱ्या दुह्या आणि परस्परांबाबतचा विद्वेष इतका पराकोटीचा असेल की, समाजातल्या कुठल्याही घटकाला तो परवडणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी जो खोटेपणा केला, त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी जे सांगितले तेच त्यांचे खरे रूप आहे. “बाहेर आरोप करणे निराळे आणि आयोगासमोर साक्ष देणे निराळे.” आयोगासमोर खोटी साक्ष देता येत नाही. तो कायदेशीर गुन्हा ठरतो. वकील म्हणून प्रकाश आंबेडकरांना याची पूर्ण कल्पना आहे. बाबासाहेबांचे आडनाव वाचून मागे येणाऱ्या आंबेडकरी जनतेला यातली मेख आता समजली असेल, असे मानायला हरकत नाही. आमदार, खासदार काहीही नसलेले प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान कसे होणार, हे बहुदा प्रकाश आंबेडकरच समजावून सांगू शकतात. या सगळ्यातून आंबेडकरी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या मंडळींनी जो काही बोध घ्यायला हवा तो घ्यावा, एवढेच वाटते.

 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@