याहून भीषण अन्याय कोणता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018   
Total Views |

 


 
 
 
पंधरा मिनिटे पोलीस बाजूला हटवा, मग या देशात हिंदूंची काय अवस्था होते ते पाहू.” मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन अर्थात ‘एमआयएम’ या पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे हे एका जाहीर सभेतील उद्गार. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका जाहीर सभेत एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी बंधूंपैकी अकबरूद्दीन ओवेसी यांनी या उद्गारांखेरीज इतर अनेक अशी जहाल वक्तव्ये केली, ज्यातून या देशातील शांतता, कायदा-सुव्यवस्था, धर्मनिरपेक्षता वगैरे छानछान गोडगोड तत्त्वांना खतपाणी (?) मिळेल. त्यानंतर एमआयएम पक्ष त्यांचं उगमस्थान हैद्राबादसह इतर अनेक ठिकाणी निवडणुका लढला. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले. त्यात या पक्षाला थोडंबहुत यशदेखील मिळालं. हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे, या एमआयएम पक्षासोबत आता भारिप-बहुजन महासंघ या पक्षाने आघाडी केली आहे. हा पक्ष स्वतःला ‘आंबेडकरी’ म्हणवतो. राज्यशिल्पकार आणि एक राष्ट्रनायक म्हणून ज्यांना पाहिलं जातं, त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष म्हणवतो. परंतु, या पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आहेत, ही बाब वगळल्यास ‘आंबेडकर’ या शब्दाशी आणि त्या शब्दापुढे जोडल्या गेलेल्या तत्त्व आणि विचारांशी त्या पक्षाचा सध्या काहीएक संबंध राहिलेला दिसत नाही. प्रकाश आंबेडकर यांचा तर नाहीच नाही. भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि त्यानंतर राज्यभरात झालेला हिंसाचार, या काळात प्रकाश आंबेडकरांची भूमिका, त्यापूर्वी आणि त्यानंतरही प्रकाश आंबेडकर यांनी थेट नक्षलवाद्यांना सहानुभूती दाखवणारी घेतलेली भूमिका, हे सारं कमी होतं म्हणून आता भारिप-बहुजन महासंघ थेट एमआयएमला जाऊन मिळालेत! जो पक्ष थेट मुस्लीमधार्जिणी भूमिका घेतो, इतकंच नाही तर राष्ट्रीयतेशी विसंगत भूमिका घेतो, अशा एमआयएमसोबत. हेच प्रकाश आंबेडकर दुसरीकडे धर्मनिरपेक्षता, समता, कायदा-सुव्यवस्था आणि मुख्य म्हणजे राज्यघटनेविषयी इतरांना डोस पाजत आहेत. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी प्रकाश आंबेडकर स्वतःला म्हणवतात, त्या विचारांवर आणखी भीषण अन्याय याहून तो कोणता?
 

आता उरलीसुरलीही घालवली..

 

प्रकाश आंबेडकर महोदयांची सध्याची वक्तव्यं पाहता त्यांना एमआयएमचा वाण आणि गुण दोन्ही लागला असल्याचं स्पष्ट दिसून येतं. कारंज्याचे फवारे निघावेत त्या वेगाने प्रकाश आंबेडकर सध्या एकेक वक्तव्यांची कारंजी उडवत आहेत. हे महाशय नुकतेच बोलून बसले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे त्यांना काय नाटके करायची आहेत ती करू द्या, पुढच्या वेळी आमचीच सत्ता येणार आहे!” असदुद्दिन वा अकबरूद्दीन ओवेसी संतापजनक आणि वादग्रस्त बोलतात, पण इतकी हास्यास्पद वक्तव्यं नक्कीच करत नाहीत. भारिप-बहुजन महासंघ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात एकूण ७० जागा लढला आणि पैकी अवघी १ जागा जिंकू शकला. राज्यभरातून पक्षाला ०.८९ टक्के तर लढलेल्या मतदारसंघांतून ३.६४ टक्के मतं मिळाली. एमआयएम पक्ष २४ जागा लढून २ जागा जिंकू शकला. राज्यात ०.९३ टक्के मतं आणि लढवलेल्या मतदारसंघांतून १३.१६ टक्के मतं मिळवू शकला. या दोघांची आघाडी आता राज्यात सत्तेत येणार असून सत्तेत आल्यावर संभाजी भिडे यांना ‘आत’ करणार आहेत. इकडे हे असं सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस पक्ष म्हणे रोज दहादहा वेळा प्रकाश आंबेडकरांना विनवतो आहे की, त्यांनी काँग्रेसच्या आघाडीत यावं. परंतु, प्रकाश आंबेडकर हे ‘सत्ता आल्यास रा. स्व. संघावर काय कारवाई करणार ते आधी सांगा,’ म्हणत अडून बसलेत असंही वृत्त आहे. आता काँग्रेस आणि एमआयएम-भारिपची जोडी सत्तेत येऊन संघावर कारवाई करणार. तिकडे मध्य प्रदेशात बिचारी काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात संघावर कारवाई करण्याबाबत दोन वाक्यं बोलली, तर आता चोहोबाजूंनी शिव्या खात आहे. ती काँग्रेस सत्तेत येणार आणि प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्याने संघावर कारवाई करणार, असं जर प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांनी बहुधा उरलंसुरलं तारतम्यही सोडल्याचं समजायला हरकत नाही. याच वेगाने प्रकाश आंबेडकर आपली राजकीय वाटचाल करणार असतील, तर एकेकाळी अभ्यासू, संवेदनशील वगैरे भासणारे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना राजकीय विजनवासात जाण्याचे वेध लागलेत, असं म्हणायला हरकत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@