ध्यास पोलियोमुक्त पाकिस्तानचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
१९९४ साली पाकिस्तानात पोलियो निर्मूलन कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नव्वदच्या दशकात पोलियोग्रस्तांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. १९८८ साली वैश्विक पोलियो निर्मूलन मोहिमेच्या प्रारंभी पाकिस्तानमध्ये नोंदविल्या गेलेल्या ३ लाख, ५० हजार प्रकरणांच्या तुलनेत २०१५ मध्ये ५४ आणि २०१६ मध्ये १९ प्रकरणांचीच माहिती समोर आली, तर २०१७ मध्ये फक्त ८ पोलियोग्रस्तांची प्रकरणे आढळली.
 

पोलियोचे संकट मानवी समाजापुढे कितीतरी शतके उभे ठाकल्याचे आपल्याला माहीतच आहे. उच्चाटन करण्यासाठी कठीण आव्हान ठरलेल्या पोलियोचा मागमूस आज अनेक देशांत दिसत नसला तरी आपल्या शेजारी देशाला आजही या आजाराचा सामना करावा लागतो आहे. हा शेजारी देश म्हणजेच पाकिस्तान. पोलियोच्या संकटाने ग्रासलेल्या पाकिस्तानने या विरोधात आघाडी उघडत पुन्हा एकदा १२ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेचा उद्देश पाकिस्तानातून पोलियोच्या विषाणूला समूळ नष्ट करण्याचा असून ही मोहीम देशातील ९४ जिल्ह्यांतील ८८ जिल्ह्यांत सुरू करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीमुळे बलुचिस्तानातील झोब, किला सैफुल्ला, दुक्की, लोरालाई, मुसाखेल आणि बरखान या सहा जिल्ह्यांना या मोहिमेतून वगळण्यात आले आहे. इथे ही मोहीम १९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल. पाकिस्तानमधील पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या जवळपास २१.३ दशलक्ष मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट या मोहिमेतून निर्धारित करण्यात आले आहे. पंजाबच्या १२ जिल्ह्यांत ६.८८ दशलक्ष, सिंधच्या ३६ जिल्ह्यांत ७ दशलक्ष, खैबर पख्तुनख्वाच्या २५ जिल्ह्यांत ५.५ दशलक्ष, बलुचिस्तानच्या २० जिल्ह्यांत १.५ दशलक्ष आणि इस्लामाबादेत ०.३३ दशलक्ष बालकांचे या मोहिमेद्वारे लसीकरण केले जाईल. तीन दिवसांच्या या मोहिमेत संपूर्ण पाकिस्तानमध्ये निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकूण १ लाख, ५० हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. १६ हजार ८४७ विभागप्रमुख, ४ हजार, ४ वैद्यकीय अधिकारी, १ लाख, १० हजार, ४४९ फिरते, ५ हजार, ३०५ कायमस्वरूपी आणि ७ हजार, ८४२ ट्रान्झिट टीमच्या सदस्यांचा यात समावेश आहे.

 

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, यावेळी जगात केवळ तीन देशांमध्ये पोलियोचे अस्तित्व राहिले आहे, ज्यात पाकिस्तानव्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि नायजेरियाचा समावेश आहे. तथापि, १९९४ साली पाकिस्तानात पोलियो निर्मूलन कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नव्व्दच्या दशकात पोलियोग्रस्तांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. १९८८ साली वैश्विक पोलियो निर्मूलन मोहिमेच्या प्रारंभी पाकिस्तानमध्ये नोंदविल्या गेलेल्या ३ लाख, ५० हजार प्रकरणांच्या तुलनेत २०१५ मध्ये ५४ आणि २०१६ मध्ये १९ प्रकरणांचीच माहिती समोर आली, तर २०१७ मध्ये फक्त ८ प्रकरणे पोलियोग्रस्तांची आढळली. १९७० च्या दशकात जागतिक आरोग्य संघटनेद्वारे ६ निर्मूलन करण्यायोग्य आजारांशी लढा देण्यासाठी लसीकरणाचा विस्तारित कार्यक्रम (ईपीआय) सुरू करण्यात आला होता. जवळपास त्याचवेळी १९७४ मध्ये पाकिस्तानमध्ये पोलियो लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. परंतु, पोलियो निर्मूलनाचे प्रयत्न अधिकृतरित्या १९९४ मध्येच सुरू करण्यात आले. गेल्या दशकभरात लसीकरणाचे १०० पेक्षा अधिक कार्यक्रम राबवूनही पोलियो संक्रमण अजूनही आढळून येते. २०१४ साली पाकिस्तानमध्ये जगातल्या सर्वाधिक पोलियोग्रस्तांची प्रकरणे समोर आली आणि ऑक्टोबर २०१५ पर्यंत ही स्थिती तशीच राहिली.

 

पाकिस्तानमध्ये पोलियो निर्मूलनासाठीच्या लसीकरणाचा दर कमीच राहिला आणि यामध्ये अनेक घटकांनी अडथळेही निर्माण केले. या अडथळ्यांपैकी सर्वाधिक आणि मुख्य अडचण कट्टरवादी इस्लामी मान्यतांची आहे. कारण, या लोकांच्या मते लसीकरण इस्लामविरोधी आहे. तेहरिक-ए-तालिबानकडून सातत्याने अशी अफवा पसरविण्यात आली की, लसीकरणासाठी वापरल्या गेलेल्या औषधांत डुकराची चरबी आणि अल्कोहोल मिसळण्यात आले आहे, जे इस्लामी मान्यतेनुसार निषिद्ध मानले जाते. पाकिस्तानच्या एफएटीए, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानच्या दुर्गम आणि धोकादायक भागांमध्ये पोलियो लसीकरणासाठी नियुक्त केलेल्या गटांना घेऊन जाणे व काम पूर्ण करणे आत्यांतिक बिकट कार्य आहे. २०११ साली ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी चालवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन नेपच्यून स्पीयर’च्या आडूनही पोलियो निर्मूलन मोहिमेत अडथळे आणले गेले. अबोटाबादमधील घरात लादेन उपस्थित असल्याची पुष्टी करण्यासाठी डीएनए सॅम्पल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यातून सर्वच दहशतवादी संघटनांना पोलियो निर्मूलनासाठीच्या लसीकरणाचा विरोध करण्याची एक आयती संधी मिळाली. कितीतरी वेळा या भागांमध्ये पोलियो लसीकरणासाठीच्या गटांवर हल्ले आणि कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या बातम्यांनी माध्यमांच्या मथळ्यांवर स्थान मिळवले. सार्वजनिक क्षेत्रातून मिळणार्‍या घटत्या अर्थपुरवठ्यामुळे, एका गैर-विनियमित खाजगी क्षेत्र आणि सरकारी पारदर्शकतेच्या अभावामुळे पाकिस्तानची आरोग्यसेवा प्रणाली नेहमीच गांजल्याचे पाहायला मिळते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सेवांच्या गुणवत्तेवर वाईट प्रभाव पडला. तथापि, पोलियो निर्मूलन कार्यक्रमाला अर्थपुरवठा सुरळीत सुरू असूनही दुबळ्या सार्वजनिक पायाभूत रचनेच्या माध्यमातून संचालित केला गेला. विशेष म्हणजे, पाकिस्तानमधील पोलियो निर्मूलन समितीच्या सदस्यांनी या मोहिमेचे समर्थन करणार्या संघटनांच्या उत्तरदायित्वाबाबत आपली काळजी आणि शंकांनादेखील कित्येकवेळा सार्वजनिकरित्या व्यक्त केले. शिवाय पाकिस्तानी बालकांमध्ये व्यापक प्रमाणात असलेल्या कुपोषण, रोगांशी लढण्याच्या दुबळ्या क्षमतेमुळे पोलियो लसीकरणाच्या प्रभावाला कमी केले.

 

विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पोलियोने एका जागतिक समस्येचे रूप धारण केले होते. मात्र, या शतकाच्या अखेरीस पोलियोवर नियंत्रण मिळवण्यात यशही आले. खरं तर, कुठलेही विषाणू भौगोलिक किंवा राजकीय सीमांनी बांधलेले नसतात आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यापासून देशाला दूर ठेवणे जवळपास अशक्य असते. सौदी अरेबियादेखील पाकिस्तानमधील पोलियोग्रस्तांमुळे चिंतीत आहे, कारण दरवर्षी हज यात्रेवेळी लाखो पाकिस्तानी नागरिक सौदी अरेबियामध्ये दाखल होतात. अशा स्थितीत सौदी अरेबिया केवळ पाकिस्तानला पोलियो निर्मूलनासाठी आर्थिक सहकार्यच करतो, असे नव्हे, तर राजकीय दबावतंत्राचाही वापर करतो. पाकिस्तानला जागतिक आरोग्य नियामकांकडून अशा देशाच्या रूपात नोंदविण्यात आले आहे, जे डब्ल्यूपीव्ही १, सीव्हिडीपीव्ही १ वा सीव्हीडीपीव्ही ३ याद्वारे संक्रमित आहे आणि ज्यासोबत या संक्रमणांच्या आंतरराष्ट्रीय प्रसाराची संभावित जोखीमदेखील आहे.

 

तथापि, भारताला २०१४ साली पूर्णपणे पोलियोमुक्त घोषित करण्यात आले. परंतु, शेजारी देश पाकिस्तानातील पोलियोचे अस्तित्व भारतासाठीही तितकाच चिंतेचा विषय आहे. कारण, पाकिस्तानशी परिस्थिती सुधारण्याची चर्चा होते, तेव्हा सीमेवरील येणेजाणे सुलभ व्हावे, हेही त्याचाच एक भाग असते. अशा स्थितीत भारतालादेखील काही उपाय करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे पोलियो पुन्हा भारतात प्रवेश करण्याची संधीच उपलब्ध होणार नाही. आज पाकिस्तानमध्ये निरक्षरता, धार्मिक रुढीवाद-परंपरावाद, संघर्ष आणि गंभीर असुरक्षा पोलियोच्या अस्तित्वाचे एक प्रमुख कारण झाले आहेत. पाकिस्तान सरकार आणि त्याच्याशी संबंधित एजन्सी-संस्थांनी ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की, अडथळे दूर केल्याशिवाय पोलियो निर्मूलनाचा मार्ग दुष्करच राहील. अशा स्थितीत पाकिस्तानच्या नव्या सरकारला अपयशातून धडा घेण्याची गरज आहे की, जर त्यांना खरेच नवा पाकिस्तान घडवायचा असेल तर त्यांना आपल्या प्राधान्यक्रमांत परिवर्तन आणावेच लागेल; अन्यथा अशिक्षित, कुपोषित आणि रोगग्रस्त लोकसंख्या हीच पाकिस्तानची ओळख बनून राहील आणि विकास केवळ एक दिवास्वप्नासारखा दूरच राहील.

 

- संतोष कुमार वर्मा

(अनुवाद: महेश पुराणिक)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@