कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा मुंबईकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |


गेल्या १५ वर्षांपासून कचऱ्यातून खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी संजू काळे हे पर्यावरणवादी कार्यकर्ते दिवसरात्र झटत आहेत. अशा या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या या मुंबईकराची ही कहाणी...

 

संजू काळे यांचे बालपण चेंबूरमधील टिळकनगर परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण बाळ लोकमान्य टिळक इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसाय, व्हिडिओ व्यवसाय असे अनेक व्यवसाय केले. पण त्या व्यवसायांमध्ये त्यांचे मन रमले नाही. वडील काम करत असलेल्या स्थापत्त्य अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. आरसीएफ, बीपीसीएलसारख्या कंपन्यांची त्यांना कंत्राटे मिळाली. सर्व काही सुरळीत होते. दि. १ ऑक्टोबर, २००१ रोजी संजू काळे यांच्या पत्नीला दुसरा मुलगा झाला. आनंदाने ते साईटवरून घरी आले आणि त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. अॅन्जिओग्राफी केली असता त्यांच्या ७० टक्के रक्तवाहिन्या बंद असल्याचे समजले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. याला दुसरा पर्याय काय? असे डॉक्टरांना विचारले असता सिगारेटचे व्यसन व दारुचे व्यसन सोडावे लागेल, असा सल्ला त्यांनी सांगितले. स्थापत्त्य अभियांत्रिकीचा व्यवसाय प्रचंड तणाव निर्माण करणारा आहे हेही एक कारण होते. त्यामुळे या कामाकडेही काही महिन्यांसाठी फिरकायचे नाही, असे त्यांना कटाक्षाने सांगण्यात आले. म्हणून काळे यांनी योगाभ्यास करायचे ठरविले आणि ठाणे येथील निकम गुरुजी यांनी स्थापन केलेल्या ‘अंबिका योग कुटिर’ येथील वार्षिक शिबिरात भाग घेऊन, संपूर्ण एक वर्ष न चुकता नियमितपणे त्यांनी योगाभ्यास केला. त्यानंतर परत एकदा अॅन्जिओग्राफी करून पाहिली असता त्यांच्या सर्व रक्तवाहिन्या १०० टक्के मोकळ्या झाल्याचे आढळले. योगाभ्यासाचे महत्त्व कळल्यामुळे पुढे ‘योग विद्या निकेतनया पद्मश्री सदाशिव निंबाळकरांकडून योग पदविका प्राप्त करून त्यांनी समाजात योगप्रसाराचे कार्य हाती घेतले.

 

योगाभ्यास करताना श्वास हा महत्त्वाचा केंद्रबिंदू. दूषित वातावरण, पर्यावरणाची दशा पाहता, आपण पर्यावरणासाठी काही तरी योगदान दिले पाहिजे, असे सतत त्यांना वाटू लागले. डम्पिंग ग्राऊंड समस्येवर आंदोलन करताना मुंबईमध्ये जवळ जवळ रोज १५-१७ हजार टन कचऱ्याची निर्मिती होते, असे त्यांना समजले. पुढे हा कचरा सोसायट्यांच्या मोठ्या डब्यात जातो व नंतर मोठ्या गाडीत तो दाबून भरला जातो. कचरागाडीचा हा प्रवास डम्पिंग ग्राऊंडला जाऊन एकावर एक ढीगामागून ढीग अशारितीने संपतो. कुठेच या कचऱ्याला श्वास घेता येत नाही व मग अधूनमधून यातून मिथेन वायू निर्माण होऊन या ढिगाऱ्याला आगी लागतात व प्रदूषणात भर पडते. “कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यापासून खतनिर्मिती हा पर्याय पुढे आला आहे. त्यासाठीच मी झटत आहेत. परंतु, खत विकत घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही,” असेही काळे सांगतातकाळे यांनी सुरु केलेल्या दोन वर्षापुर्वी ‘मिस्टर ब्लॅक वेस्ट मॅनेजमेंट फाऊंडेशन’ने ’एम’ पश्चिम विभागातील आठ इमारतींमध्ये स्वखर्चाने कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. टिळक नगर येथे गेल्या १५ वर्षांपासून गीत गोविंद सोसायटीमध्ये खतनिर्मिती प्रकल्प सुरू आहे. मुंबईसारख्या ठिकाणी काळे यांची ही फाऊंडेशन छोट्या पातळीवर भाजीपालाही निर्माण करते. पालक, मेथी, पपई, मिरची, आले, कोथिंबीर, कडिपत्ता यांसारख्या भाज्या पूर्णपणे सेंद्रिय खतापासून ते तयार करतात. काही शाळांमधील शालेय विद्यार्थीही या शेतीला शैक्षणिक भेट देत असतात, तर सध्या काही वसाहतीत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते.

 
 

या व्यतिरिक्त ए डब्ल्यू सी वडाळा येथेही संस्थेचे खतनिर्मिती प्रकल्पावरील काम चालू आहे. केवळ टिळक नगरमध्ये ही संस्था जवळ जवळ एका महिन्यात आठ ते दहा टन इतक्या ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून खतनिर्मिती करत आहे. एकट्या टिळक नगरमध्ये जर सर्व रहिवाशी संकुलांनाीहा प्रकल्प चालू केल्यास साधारणत: १६० इमारतींमधील एका महिन्यात १००० ते १६०० टन एवढा ओल्या कचऱ्याची खतनिर्मिती करता येऊ शकते. जागा नसल्यास गच्चीवरही हा प्रकल्प उभारला जाऊ शकतो. पण, सध्या काळे यांनी कोणालाही या कचऱ्यापासून तयार झालेल्या खतांची विक्री केली नसून ते शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याची कशी व्यवस्था करता येईल, ते याच्या शोधात आहेत. त्यासाठी जवळच्या परिसरात पालिकेने एखादी जागा उपलब्ध करून दिल्यास खूप चांगल्यारीतीने व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे काळे सांगतात. तसेच रहिवाशांनी जर विश्वास ठेवला व साथ दिली तर टिळक नगर, चेंबूर व मुंबई, कचरा मुक्त नव्हे, तर धूळमुक्त होऊशकेल,” असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केलाअशा या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या या मुंबईकराला त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा...

 
 
 
 
 
- नितीन जगताप 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@