दत्ता, तुझे गाईन मी गुणगान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |
 
 

दत्त हे प्राचीन दैवत आहे. संस्कृत स्तोत्रातून व पौराणिक श्लोकांमधून दत्तात्रेयांचे वर्णन आहे. यामध्ये दत्तात्रेयांच्या मूर्तीचे व स्वरूपाचे सुबक, सुंदर वर्णन आढळते. स्कंदपुराणामध्ये त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,

 

दिगम्बरं भस्मसुगन्धलेपन ।

जटाजूटं दण्डकमण्लुधरम् ॥

पदमासनस्थं च शशिसूर्यनेत्रम् ।

दत्तात्रेयं ध्यानमभीष्ट सिद्धिदम् ॥

 

शांडिल्योपनिषद, नारदपुराण, दत्तात्रेयकक्ष, श्रीतत्त्वनिधी इत्यादींमध्ये दत्तात्रेयांचे वर्णन वाचताना आनंद होतो. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामींनी दत्तात्रेयांचे वर्णन खालीलप्रमाणे केले,

 

सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी ।

व्याध्रचर्मधारी शोभतसे ॥

काषाय अंबर दंड कमंडलु ।

डमरू त्रिशूल शंखचक्र ॥

किरीट कुंडले रुद्राक्षाच्या माळा ।

वैजयंती गळा हार रुळे ॥

सूर्यचंद्र नेत्र शेषफणी छत्र ।

पीताबंर वस्त्र परिधान ॥

 

औदुंबर वृक्षाचा आणि दत्तात्रेयांचा जवळचा संबंध आहे. औदुंबर वृक्षाखाली त्यांचा नित्य वास असतो. या वृक्षामध्ये जलाचं आधिक्य आणि भरपूर प्राणवायू असतो. या वृक्षाच्या सान्निध्यात दत्तप्रभू योगसाधनेत निमग्न असतात. यतीप्रमाणे वैराग्यसूचक असा वेश धारण करून ते भ्रमण करतात. हातात दंड, कमंडलू असतो. डमरू, त्रिशूळ आणि शंख, चक्र धारण केलेली असतात. रुद्राक्षाच्या माळा धारण करून मूर्तिमंत वैराग्य वावरत असतं. त्यांचे नेत्र अत्यंत तेजस्वी असून त्याचं तेज सूर्य व चंद्राप्रमाणे आहे. शेषाचं छत्र मस्तकावर असतं. प्राकृत भाषेतील वर्णन आकलनाला सोप्पं असून त्यांचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतंदत्तात्रेयांना भस्म प्रिय आहे. दिशा हेच वस्त्र असणारे ते दिगंबर आहेत. सर्वत्र संचार करणारे दत्तप्रभू प्रसन्न सुंदर रुपात दर्शन देतात. तसेच मलंग, फकीराच्या रुपातही दर्शन देतात. व्यक्तीच्या रुपातदेखील येऊन ते भक्तांना भेटतात. त्यांच्या दर्शनाची ओढ अनावर झालेले भक्त सदैव त्यांचं ध्यान करतात. त्यांच्या रुपाचं गुणांचं स्मरण करता करता ते दत्तमय होऊन जातात. दत्तप्रभूंना शोधण्यासाठी भक्त व्याकुळ होतात. नृसिंहवाडीला ते मनोहर पादुकांच्या रुपात भेटतात. भक्तांच्या भक्तीनं खूश होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. भक्तांना दत्तात्रेयांच्या अनुभूतीनं भरून येतं. त्यांचा कनवाळूपणा, प्रेमळपणा, स्नेहाळूपणा अनुभवताना भक्त अधिकच भक्ती करू लागतात.

 

कृष्णा नदी मोठी भाग्यवान! दत्तात्रेयांचा नित्य सहवास लाभलेली! हीचं जल पावन, पवित्र झालं. दत्तात्रेयांच्या पूजनासाठी चौसष्ट योगिनींचा वावर कृष्णेकाठी! सकल संन्यासी, योगी स्नान आणि ध्यान करत कृष्णेचं जल पवित्र करतात. कृष्णेला दतप्रभूंना भेटावसं वाटलं की, ती थेट त्यांच्या पादुकांना मिठी मारते. गोदावरी, भीमा आणि अमरजा सरितांनादेखील त्यांनी जवळ केलं. त्यांच्या जलाला तीर्थाचं महत्त्व प्रदान केलं. दत्तात्रेय हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी औदुंबर, गाणगापूर, कुरवपूर क्षेत्री वास करतात. त्यांना भक्तांचा सहवास अत्यंत प्रिय. भक्तांच्या काळजीसाठी दत्तप्रभू कष्ट सोसून आपल्या भक्तांचे कष्ट दूर करतात. दत्तात्रेय अवधूत रुपात वावरतात. दत्तात्रेय म्हणजेच अवधूत. अवधूत हा बाह्य वेशावरून ओळखला जातो असं नाही, तर संन्यस्त वृत्तीवरून त्याची ओळख पटते. अवधूत म्हणजे जणूकाही वेदपुरुष. ‘अवधूत उपनिषदा’मध्ये ‘अवधूत’ शब्दाचा अर्थ चांगला दिलेला आहे. ‘अ’ म्हणजे अक्षरत्व! अक्षरब्रह्माचा साक्षात्कार झालेला तो ‘अवधूत.’ ‘व’ म्हणजेच वरेण्यत्व. वरेण्यत्व म्हणजे श्रेष्ठत्वाची, पूर्णत्वाची पराकाष्ठा करणारा अवधूत. ‘धू’ म्हणजे सर्व प्रकारातील बंधनातून मुक्त! धुतलेला, कोणत्याही उपाधीमध्ये, आवरणात न वावरणारा अवधूत! ‘त’ म्हणजे ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचा बोध झालेला! स्वरूपामध्ये अखंड भावनेने वावरणारा महापुरुष तो ‘अवधूत!’ दत्तप्रभूंचे विश्वभरावधूत, मायाभुवनावधूत असे अवतार आहे. प. पू. विष्णुदास महाराज हे प. प. प्रज्ञानंद सरस्वती स्वामी (मोघे स्वामी) यांचे सत्शिष्य! त्यांना अवधूत रुपात राहून दत्तभक्तीचा प्रसार करण्याची आज्ञा त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे प. प. प्रज्ञानंद सरस्वती स्वामींनी केली. त्या आज्ञेचं पालन करणारे प. पू. विष्णुदास महाराज शुभ्र वस्त्र परिधान करून परम शांतीचा अनुभव देत राहिले. अध्यात्माच्या तेजानं प्रकाशमान होऊनही अलिप्तपणानं समाजात वावरले.

 

दत्तात्रेयांचा साक्षात्कार झालेले व त्यांच्याशी संवाद साधणारे सत्पुरुष होऊन तर गेलेच; आजही असे सत्पुरुष आहेत. त्यांना विश्वरक्षक दत्त, दीनदयाळू श्रीदत्त, विघ्नहर्ता श्रीदत्त, पतितपावन एकमुखी दत्त, त्रिभुवनपालक दत्त, कृपामूर्ती श्रीदत्त, ऐश्वर्यदाता श्रीदत्त, अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्रीदत्त यांची साक्षात अनुभूती आली. ज्या रुपात दर्शन दिलं त्याप्रमाणे दत्तप्रभूंची मूर्ती साकारून प्राणप्रतिष्ठापना करून, भक्तांना पूजनासाठी स्थानं निर्माण करणारे सत्पुरुष सर्वश्रेष्ठ होय.एकमुखी, तीनमुखी दत्त त्याचप्रमाणे दोन हात, चार हात, सहा हात असलेल्या दत्तमूर्ती भक्तांना दिलासा देतात. कलियुगात त्यांचा आधार वाटतो. त्यांच्या प्रत्येक हातामध्ये अफाट शक्ती सामावलेली आहे. चार वेद हे चार श्वानांच्या रुपात त्यांच्यासमवेत वावरतात. सकल कामना पूर्ण करणारा धर्म गाईच्या रुपात दत्तात्रेयांच्या मागे उभा राहतो. खरोखर दत्तप्रभूंची भक्ती आणि शक्ती अफाट आहे. त्या त्या काळात भक्तांना येणारे अनुभव वेगवेगळे आहेत. त्यांचे अवतार अनेक होऊन गेले व होत राहणार. त्याचं रूप बघून भक्त भारावून जातात. गिरनार पर्वताच्या दहा हजार पायर्‍या प्रत्येक पौर्णिमेला चढून जाणारे भक्त दत्तप्रभूंच्या अनुभूतींनी समृद्ध होत जातात. त्यांची कृपा हीच संपत्ती मानणारे हे भक्त. भक्तांना लौकिकामधील सर्व देऊन परमार्थामधील अमूल्य गोष्टी देणारे दत्तात्रेय! भक्तांशी संवाद साधत त्यांना भोगाकडून योगाकडे घेऊन जाणारे दत्तप्रभू! भक्त त्यांच्या सहवासाच्या चंदनगंधानं न्हाऊन निघतात.पायातील खडावा वाजवत ते भक्तांना साद घालतात. प्रपंच आणि परमार्थ, लौकिक आणि पारलौकिक योग आणि भोग दोन्ही सांभाळणारे दत्तप्रभू, जितके प्रेमळ तेवढेच कडक. जेवढे सौम्य तेवढेच उग्र. भक्तांची परीक्षा पाहणारे आणि त्यांना आनंदात सचैल स्नान घालणारे दत्तप्रभू! भक्तांना सावरणारे, संरक्षण देऊन साधनेचं संवर्धन करणारे दत्तप्रभू!

 

ते कधी नदीकाठी रमतात, तर कधी उंच पर्वतावर... दुर्गम भागात ते तप करतात. ते कधीही, कुठेही प्रगट होऊन दर्शनाचा आनंद देतात. दत्तावतार हा अक्षय असणारा गुरुअवतार पूर्वी होऊन गेला, आजही आहे आणि पुढेही होत राहणार! दत्तप्रभूंना आर्ततेनं साद घातली की, ते साहाय्यासाठी सत्वर धावून येतात. अशा दत्तप्रभूंच्या भजनात रंगलेले भक्त ‘दिगंबराऽऽ दिगंबराऽऽ श्रीपाद वल्लभ दिगंबरा।’ या मंत्राचा जप करतात. भक्त अंत:करणापासून म्हणतात,

 

दत्त दिगंबर दैवत माझे।

हृदयी माझ्या नित्य विराजे ॥

 

यांची भक्तीची भावगंगा दुथडी भरुन वाहते. भक्तांना शब्दांचं भजनाचं, गायनाचं स्फुरण देणारे दत्तात्रेय आहेत. भक्त गायनानं दत्तप्रभूंना प्रसन्न करतात,

 

‘कृष्णाकाठी रम्य तुझे रे आहे वसतिस्थान।

दत्ता तुझे गाईन मी गुणगान ॥

 

दत्तप्रभू भक्तांना हृदयाशी धरतात व प्रत्येक युगात धीर देऊन भक्तीचं अमृत देऊन मोक्षाच्या मुक्कामापर्यंत घेऊन जातात

 
 
- कौमुदी गोडबोले 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@