शुद्धीचा संक्षिप्त इतिहास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |
 
 

परकीय शक्तींनी या भारतभूमीवर आक्रमण करत वर्षानुवर्षे हिंदू धर्मावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. दांभिक धार्मिक प्रचारापासून ते क्रूर अनन्वित अन्याय-अत्याचार, बाटवाबाटवी अशी सगळी अस्त्र मुस्लीम-ख्रिश्चन शासकांनी अगदी बेमालूमपणे वापरली. पण, तरीही हिंदू धर्म भ्रष्ट-नष्ट झाला नाही. या संपूर्ण प्रक्रियेत बळजबरीने, आमिषांना बळी पडून हिंदू धर्माचा त्याग केलेल्या धर्मबांधवांना शुद्धीच्या माध्यमातून पुनश्च हिंदू धर्मात सामील करण्यात अनेक विद्वानांचे अमूल्य योगदान लाभले. तेव्हा, अशा या शुद्धीच्या संक्षिप्त इतिहासावर भाष्य करणारा हा माहितीपूर्ण लेख...


तलवारीचा उपयोग बव्हंशी राज्यसत्तेसाठी केला जातो. इस्लामची तलवार दोन टोकांची.राज्यसत्तेइतकीच तिला तहान असते ती धर्मसत्तेची. म्हणून सातत्याने बाटवाबाटवी चालत आली. आक्रमक मुस्लीम आणि इथले राष्ट्रक हिंदू यांच्यात संघर्ष होत राहिला, तेव्हा हिंदूंच्या घाताला कारण ठरली ती, त्यांच्या बाटलेल्याला जातीबाहेर करण्याची प्रवृत्ती. त्याउलट समोरच्यांना बाटवाबाटवीचं प्रेम पहिलं! यामुळे हिंदूंच्या संख्याबळाची, रणांगणात होते त्याहून जास्त क्षती होत राहिली; हे नेमके जाणून या भावनिक दोषावर ज्यांनी भावनेचीच औषधं शोधली, त्यातली अत्यंत महत्त्वाची दोन नावं आहेत ती स्मृतिकार देवल ऋषी (सुमारे ८०० ते ९०० इ.स. चा काळ) आणि भाष्यकार मेधातिथी (८५० ते ९५० इ.स.) यांची. त्यांनी शुद्धीहा उपाय सक्रिय सांगितला. या विजयी उपायाच्या प्रभावाचा पुरावा तत्कालीन मुसलमान लेखकाच्याच शब्दांत दिलेला बरा! तो लेखक म्हणतो, ‘‘सिंधमध्ये आम्ही अरबांची मुले माणसे- स्त्री-पुरुष शिरजोर झालेल्या या हिंदू काफिरांच्या भयाने रानोमाळ पळतात. आम्ही जिंकलेला सिंध यांनी परत घेतलेला आहे. किल्ला तेवढा आमचे आश्रयस्थान म्हणून शिल्लक आहे. ज्या सहस्त्रावधी हिंदू काफरांना आम्ही दाहीर राजाच्या शिरच्छेदानंतरच्या शंभर एक वर्षांत बाटवले होते आणि हिंदू स्त्रियांना दासीबटकी करून घरोघरी राबविले होते, त्या धार्मिक आघाडीवरही, राजकीय आघाडीच्या बरोबरीने, आमची अशीच धूळधाण उडाली आहे. ते सारे हिंदू स्त्री-पुरुष पुन्हा हिंदू झाले आहेत.

 

शुद्धीकरणाचा सोपा, परंतु प्रभावी उपाय देवल ऋषींनंतर मनुस्मृतीवर भाष्य लिहिणारे भाष्यकार मेधातिथी हे नवव्या-दहाव्या शतकातील हिंदूंना सावरणारे धर्मपुरुष आणि लोकनेता. आर्य चाणक्यांनी दिली तशी पराक्रमाची शिकवण त्यांनी हिंदूंना दिली. देवल ऋषी आणि मेधातिथी या दोघांच्या शिकवणुकीप्रमाणे सोप्या रितीने शुद्धीकरणं करून सहस्त्रावधी स्त्रिया, ज्या बाटवल्या गेल्या होत्या त्यांना शुद्ध करून घेऊन पुन्हा हिंदू कुळात प्रतिष्ठापूर्वक सामावून घेतलं गेलं. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणं आहेत ती, सिंध, राजस्थानातील अनेक राज्यं (मारवाड- मेवाड) नेपाळ, कर्नाटक-बंगाल आणि महाराष्ट्रातली आहेत. हे कार्य केवळ राजेरजवाड्यांनी नव्हे, तर श्री रामानुजाचार्य, श्री रामानंद, चैतन्य महाप्रभू यासारख्यांनी केलं. हिंदूंना हिंदूच राखण्याचं महत्कार्य करणाऱ्या संत-सत्पुरुषांची ती रांग अव्याहतपणे चालू राहिली, याचं श्रेय त्यांना देऊन आम्ही त्यांच्याशी कृतज्ञ राहिलं पाहिजे.

 

हिंदुस्थानातील ख्रिस्तीकरणास विरोध

 

हिंदुस्थानात प्रथम घुसणारे पोर्तुगीज गोव्यातून प्रवेशले. त्यापूर्वीचा इतिहास असा- १३१२ मध्ये मलिक काफूरच्या दक्षिण स्वारीत दक्षिणेतल्या संपन्न मंदिरांचा विध्वंस झाला. त्यानंतर गोवे मुसलमानांच्याच हाती राहिलं. पुढे १४९८ मध्ये गोवे विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात गेले. आदिलशाहीत नेहमीप्रमाणे हिंदूंचा छळ चालू झाला. त्यांनी आपल्याला सोडवण्याची विनंती होनावरच्या हिंदू राजाच्या नौदलाचा सेनापती तिमय्या नायकाला केली. त्याची एकट्याची शक्ती तेवढी नव्हती. या आदिलशाहीविरुद्ध अल्बुकर्कला बोलावलं, ते वेर्ण्याचा म्हाला पै याने. त्याला पुढे पश्चात्तापाची पाळी आलीच. रंतु, गोवा अल्बुकर्कने २५ नोव्हेंबर १५१० ला घेतल्यानंतर ते पुन्हा स्वतंत्र व्हायला ४५० वर्षे लागली! तिथल्या सर्व मुस्लिमांची कत्तल करून तिमय्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि कुटुंबीयांचं ख्रिस्तीकरण करण्यात आलं. तसंच अल्बुकर्कने ताबडतोब गोऱ्यागोमट्या हिंदू स्त्रियांना पकडून त्यांची लग्न पोर्तुगीजांशी लावून, त्यांचं ख्रिस्तीकरण केलं. गोवा जिंकल्यावर अल्बुकर्कचा विजयनगरच्या साम्राज्याशी तह झाला. १५१५ मध्ये अल्बुकर्क मेला, परंतु पोर्तुगीजांनी १५०५ पासून १७८५ पर्यंत अंजनीव, कन्नानारे, चौल, वसई, दीव, दमण, मंगलेर, होनावर, कुंदापूर, नगर हवेली, दादरा एवढे भाग घेतले. पोर्तुगीज राजवट अत्यंत भ्रष्ट होती. पोर्तुगीज राज्यातले दुष्ट, बदमाश, अपराधी, गुंड असा गाळ गोव्यात राज्य करण्यासाठी पाठविण्यात आला. राज्यात वेश्याव्यवसाय वाढला. दुर्लक्षित,अनौरस संतती निर्माण झाली. गोव्यात बाटवाबाटवी करण्यासाठी प्रथम ज्यूंवर तसंच नंतर हिंदूंवर करण्यात आलेले अनन्वित अत्याचार यांची माहिती आणि वर्णनं वाचण्यास सुद्धा अत्यंत दु:सह आहे. परंतु, त्यांचा अभ्यास जाणीवपूर्वक केला गेला पाहिजे. ज्याला संतम्हटले जाते, अशी फ्रान्सिस झेवियरच्या काळ्या कृत्यांनी भरलेला हा भयंकर इतिहास आहे. इन्क्विझिशनया संस्थेची कृत्ये तर सैतानाचीच, नव्हे सैतानाला लाजवतील इतकी क्रूर आहेत. त्यांची माहिती लिहून ठेवणाऱ्या प्रियोळकरांचे आपण नित्याचे ऋणात आहोत, हे कुणीही हिंदुस्थानी व्यक्तीने विसरू नये. पोर्तुगीजव्याप्त प्रदेशातून हिंदू धर्माचा नाश करण्याचं काम कॅथलिक धर्मपीठ आणि पोर्तुगीज शासक यांनी संगनमताने केलं. त्या राज्यांतून हिंदू तसेच त्यांचे ज्ञान, विद्या, कला या सर्वांचे उच्चाटन करण्यात आले. त्यांच्या स्थावर जंगम संपत्तीचं सर्वस्वी अपहरण करण्यात आलं. जगण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आली, परंतु अत्यंत भयावह प्रकारे छळ आणि सर्वस्वाचं अपहरणं केलं जात असतानाही हिंदूंनी अत्यंत धैर्यपूर्वक स्वत:च्या धर्माचं रक्षण केलं, यासाठी त्यांची प्रशंसा करावी तितकी कमी आहे.

 

कॅथलिकांनी गाईवासरांच्या रक्तामांसाने दूषित केलेल्या तलावांचे, पाणवठ्यांचे शुद्धीकरण करणे भ्रष्टविलेल्या आपल्या लोकांना दूरच्या स्थानी नेऊन त्यांना पुन्हा आपल्या जातीत घेणे, आपल्या कुलदैवतांना पोर्तुगीज सीमेबाहेर नेऊन त्याच नावांनी त्यांची पुनर्प्रतिष्ठापना करणे आणि ज्यांच्या तामसी श्रद्धेमुळे हे सर्व करावे लागले, त्यांच्यावर कडक बहिष्कार हे उपक्रम हिंदूंनी धैर्याने केले. १६६३ मध्ये डचांच्या ईस्ट इंडिया कंपनीने कोचीन जिंकलं. पोर्तुगीजांचे समुद्रावरचे वर्चस्व डचांनी संपुष्टात आणून त्यांना मलबार आणि दक्षिण हिंदुस्थानातून हाकललं. प्रतापी मराठ्यांच्या मोहिमांमुळे पोर्तुगीज आणि कॅथलिक धर्मपीठाच्या अत्याचारांना पायबंद बसला. क्रौर्य हेच केवळ पोर्तुगीजाचं सामर्थ्य होतं. त्यांच्या अत्याचारांमुळे प्रदेश ओस पडले. ब्रिटिश हे पोर्तुगीजांहून चतुर होते. त्यांनी गरीब, पीडित वा वनवासी अशांना लक्ष्य करून ललचावून आणि फसवून फार वेगाने बाटवाबाटवी केली. त्यांच्या बस्तानाचा प्रारंभ बंगालपासून झाला. त्या बंगालातले राजा राममोहन रॉय हे विद्वान, धनवान, बहुभाषापंडित गृहस्थ. सेरामपूर इथल्या मिशनमध्ये ते कधी कधी जात. त्यांचा भर वेदांतावर असून मूर्तिपूजा ते मानीत नव्हते. त्यामुळे ते ख्रिस्ती होतील, अशी मिशनऱ्यांना आशा वाटे. परंतु, चमत्कार, भविष्यवाणी, येशूचं देवत्व, पापक्षालन, ट्रिनिटी (पिता, पुत्र व पवित्र आत्मा) बायबलचा दैवी अधिकार या सर्व गोष्टी वगळून येशूची प्रतिमा नैतिक उपदेशक अशी वाचकापुढे ठेवणारं पुस्तक त्यांनी लिहिलं. द प्रीसेप्टस ऑफ जीझस.त्यावर मिशनऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची आणि निंदेची झोड उठवली. राममोहन रॉय हे धैर्यवान आणि सत्यनिष्ठ होते. त्यांनी आणखी तीन पुस्तकं लिहून मिशनऱ्यांच्या अंधश्रद्धांचा प्रतिवाद केला. १८२१ मध्ये त्यांनी युनिटॅरियन कमिटीनावाची संस्था स्थापिली. ट्रिनिटीविषयक रॉय यांच्या शंकाचं निरसन न करता आल्यामुळे रेव्ह अॅडाम हेच त्यांच्या संस्थेचे सदस्य बनले. १८२८ मध्ये त्यांनी ब्रह्म समाजस्थापिला. त्यांच्या अनेक पुस्तकांतून त्यांनी ख्रिस्ती अंधश्रद्धांचा उत्तम तर्काधिष्ठित विचारांनी प्रतिकार केला. हे त्याचं कार्य अतिमहत्त्वाचं आहे.

 

महाराष्ट्रात....

 

महाराष्ट्रातील अनेक विद्वान पंडितांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांशी वादविवाद करून ख्रिस्ती अंधश्रद्धांचा धुव्वा उडवला. त्यामध्ये फेब्रुवारी १८३१ मध्ये सतत दहा दिवस मुंबईत संध्याकाळी वाद झाला. जॉन विल्सनने धर्मांतरित केलेल्या रामचंद्र या धर्मांतरिताला स्वत: न जाता वादविवादाला पाठवलं. हिंदू आपल्या मतावर ठाम राहिले. ख्रिस्तींना निरुत्तर आणि पराभूत केलं.मोरभट्ट दांडेकर यांनी १८३२ पूर्वी लिहिलेल्या श्री हिंदूधर्म स्थापनाया पुस्तकातून तर नारायणराव या साताऱ्यातील महाविद्यालयातील इंग्रजीच्या शिक्षकाने १८३४ पूर्वी स्वदेशधर्माभिमानीया पुस्तकाद्वारे ख्रिस्ती मतखंडन केलं. बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६) हे अनेक विषयांवर प्रभुत्व असणारे विद्वान ग्रंथकार एलफिन्स्टन महाविद्यालयातील गणिताचे प्राध्यापक. हे दर्पणकारआणि शुद्धीचळवळीचे थोर, सक्रिय पुरस्कर्ते होत. श्रीपत शेषाद्रि परळीकर हा ५७ दिवस रेव्ह नेबिल यांच्याकडे राहिल्याने बाटवला गेला असता, परंतु बाळशास्त्रींनी त्याला प्रायश्चित्त देऊन परत आणलं. त्यासाठी कर्ज आणि सहा महिने बहिष्कार सहन केला. विष्णुबुवा ब्रह्मचारी (विष्णु भिकाजी गोखले १८२५-१८७१) यांनी मुंबईतील चौपाटीवर साप्ताहिक व्याख्यानमाला आयोजित करून अनेक महिने ख्रिस्ती मतखंडन केले. या तेजस्वी मनुष्याने केलेल्या वादविवाद-ख्रिस्ती अंधश्रद्धा खंडनामुळे कित्येक हिंदूंप्रमाणे पारशीही ख्रिस्ती होण्यापासून वाचले! विष्णुशास्त्री आणि कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांनीही वादविवादाद्वारा ख्रिस्ती मताचा विरोध केला.

 

जॉन मूर हा ईस्ट इंडिया कंपनीचा सनदी नोकर. याने १८३९ मध्ये ३७९ अनुष्टुभ श्लोकात ख्रिस्तमताचं मंडन आणि हिंदू धर्माचं खंडन करण्याचा प्रयत्न केला. याला सुबाजी बापू या महाराष्ट्री विद्धानाने सोमनाथया नावाने मतपरीक्षाशिक्षाया संस्कृत १०७ कडव्यांच्या पुस्तकात उत्तर दिलं, तर हरचंद्र तर्क पंचानन या विद्धान, परंतु दरिद्री बंगाली ब्राह्मणाने १३७ कडव्यांच्या संस्कृत काव्यातून उत्तर दिलं. दोन पानी इंग्रजी प्रस्तावना त्यास होती. ह्यूम, पेन, व्हॉल्टेर, पामर आणि गिबन यांनी पाद्य्रांना निरुत्तर केल्याचं सांगून ख्रिस्ती धर्मप्रसार सक्ती आणि फसवणूक यावर नेहमीच अवलंबून राहिला, हेही स्पष्ट केलं आहे. जागृत हिंदूंनी त्यांना धर्मरक्षकम्हणून गौरविलं. वाराणसीच्या निलकंठ गोरे यांनी मूरच्या पुस्तिकेचा एका लहान हिंदी प्रबंधाद्वारे उत्तम प्रतिवाद केला. मौज म्हणजे या मूरचेच पुढे पूर्ण मतपरिवर्तन झाले! ख्रिस्ती धर्ममतातली विसंगती कळल्याने तो उदारमतवादी झाला. तामिळनाडूत १८८७ मध्ये मद्रासमध्ये हिंदूज टॅक्ट सोसायटीस्थापित झाली. अनेक प्रकाशने, व्याख्याने, प्रचारक याद्वारे ख्रिस्तीमतांचा विरोध तर्कशुद्ध खंडनाने करण्यात आला.१८९५ मध्ये कुंभकोणम्ची अद्वैतसभा, तर १८९६ मध्ये दक्षिण हिंदुस्थानाची शैव सिद्धांत सभा स्थापन झाली. बंगालात आदि ब्रह्म समाजाचे नेते राजनारायण बसू यांनी १८७३ मध्ये लेक्चर ऑन सुपीरिऑरिटी ऑफ हिंदुइझमही पुस्तिका लिहिली. बंगाली पुस्तिकेतून त्यांनीं महा हिंदू समिती स्थापिण्याची सूचना केली.१८६७ मध्ये हिंदू मेळा स्थापून ते आणि नवगोपाल मित्र यांनी हिंदू राष्ट्रही संकल्पना स्पष्ट मांडली. महर्षी दयानंद (१८२४ ते १८८३) हे खरोखरीच महर्षीया पदवीस पात्र असणारे विद्वान ज्ञानी, निर्भय, सत्यनिष्ठ, स्पष्टवक्ते कृतिशील असे होते. त्यांनी सत्यार्थ प्रकाशाच्या १३व्या समुच्छासात बायबलची चिकित्सा केली. पंजाबातील कमीत कमी वीस नगरांत सार्वजनिक वादात महर्षींनी मिशनऱ्यांना निरुत्तर केलं. दक्षिण हिंदुस्थानात झाले तितके ख्रिस्तीकरण उत्तर हिंदुस्थानात झाले नाही, याचे श्रेय दयानदांना जाते.दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना करून हिंदू समाजात समता आणून तिचा जातिभेदामुळे ढळणारा तोल सावरण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केला. अनेक धर्मांतरे ख्रिस्ती आणि मुस्लीम दोन्ही थांबवली. ऐतिहासिक काळात सक्तीने आक्रमक म्लेंच्छांनी केलेल्या धर्मांतरितांना स्वधर्मात आणण्याचे स्मृतीतील आदेशांचे संदर्भ महा. काणे यांनी दिले आहेत. प्राचीन काळी व्रातस्तोम विधी केला जाई. किरात, यवन आदी अहिंदू जातींना हिंदूत घेतले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांची शुद्धी करून घेतल्याचं उदाहरण प्रसिद्धच आहे. अनाथ हिंदू मुलांची मालमत्ता जप्त करणाऱ्या वसईतील जेझुईट मिशनऱ्यांना त्यांनी कडक ताकीद दिली होती. त्यामुळे त्या मुलांना पुन्हा हिंदू करून त्यांची मालमत्ता परत करण्याला पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी जेझुईटांना भाग पाडलं होतं. शेवटच्या बाजीरावांच्या काळापर्यंत बाटवून ख्रिस्ती केलेल्यांना पुन्हा हिंदू करून घेतल्याची उदाहरणे आहेत. पोर्तुगीज राज्यातही शुद्धिकरण होतं. १८२८ मध्ये पटकीच्या साथीत औषधोपचाराद्वारा ख्रिस्ती होण्याची सक्ती केलेल्यांना पुन्हा हिंदू करण्यात आलं. बंकिमचंद्र चॅटर्जी (१८३८-१८९४) यांनी एक कलावंत म्हणून मूर्तिपूजेचे मंडन केले. हिंदू समाजातील दोषांना हिंदू धर्म कारण आहे, अशा ख्रिस्त्यांच्या अपप्रचाराचे त्यांनी खंडन केले. प्रगतीसाठी शरीरसामर्थ्य मिळवावं, ईश्वरभक्तीइतकाच देशभक्ती हा सर्वोच्च धर्म आहे, हे त्यांच्या प्रतिपादनाचं सार. बंकिम वाचा, पुन्हा वाचाअसं विवेकानंद सांगत. बंकिमचंद्रांमुळे हिंदुस्थानी देशभक्तांना वंदे मातरम्हा मंत्र आणि राष्ट्रगीत मिळाले.

 

भूदेव मुखोपाध्याय (१८२७-१८९४) यांनी ख्रिश्चॅनिटीत हिंदूंना नवीन असं काहीच नाही, असं आपल्या निबंधातून सांगितले. स्वामी विवेकानंद (नरेन्द्रनाथ दत्त १८६३-१९०२) यांच्या शिकागोमधील भाषणामुळे आणि त्यानंतरच्या चार वर्षांतील भाषणांमुळे युरोप-अमेरिका ढवळून निघाली. मिशनऱ्यांनी त्यांना भरपूर त्रास देऊन विरोध केला, परंतु त्यांचे तेज तळपल्यावाचून राहिलं नाही. ख्रिस्ती मताबद्दल अत्यंत स्पष्टपणे बोलून त्यांनी त्यांच्या अपप्रचाराचा तोरा उतरवला. १८९९च्या प्रबुद्ध भारतमध्ये प्रकाशित वार्तालापात ते म्हणाले की, ‘‘हिंदू धर्माबाहेर बाटल्याने एक व्यक्ती गेली तर केवळ एक व्यक्ती कमी होत नसून एक शत्रू वाढतो. तलवारीमुळे आणि लाचारीमुळे ज्या व्यक्ती बाटवल्या गेल्या, त्यांना केवळ हिंदू धर्मात पुन्हा येण्याची इच्छा हीच पुरेशी आहे. त्यांना शुद्धी विधीचीही गरज नसावी,” हे त्यांचं मत होतं. गांधीजींनी उघडपणे ख्रिस्ती नेत्यांशी चर्चा केल्या. पत्रे लिहिली. धर्मांतराविरोधात सातत्याने स्वत:च्या साप्ताहिक/वृत्तपत्रातून लिहिले. ते मूर्तिपूजेचे समर्थक होतेे. धर्मांतर, युरोपीकरण, पाश्चात्त्य संस्कृतीचा स्वीकार राष्ट्रीयतेपासून च्युती हे समानार्थी आहेत आणि त्यांचे परिणाम घातक आहेत, हा त्यांचा निष्कर्ष होता. धर्मांतर हे सत्याच्या कारंज्याला शोषणारे सर्वात प्राणघातक विष आहे, असे त्यांनी प्रा. केझेन्स्कीना म्हटले. भीती, उपासमार, सक्ती, ऐहिक लाभांची लालूच, यामुळे बाटलेल्या व्यक्तींना स्वधर्मात येण्यास विधी/उपचारांची गरज नाही, हे त्यांचं मत मनुस्मृती ११-२३०-२३२ शी सुसंगत आहे आणि सेंग खासी संघटनेचे कार्यवाह ठक्कर बाप्पा हे मिशनरी कारवायांची वृत्ते विस्तृतपणे छापीत. गजानन भास्कर वैद्यांनी १९१७ मध्ये मुंबईत हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना करून शुद्धी केल्या. काशीची विद्वत सभा, भारत धर्म महामंडळ, बंगाल ब्राह्मण सभा, हिंदू महासभा, महाराष्ट्र हिंदू धर्म परिषद, हिंदू मिशन (कराड) प्रभृतींनी शुद्धिकार्य केले. धर्मभास्कर श्री विनायक महाराज मसुरकर यांनी १९२० मध्ये ब्रह्मचर्याश्रम (मसूर) स्थापिला. चिंबल इथे भगवतीदेवींच्या उद्ध्वस्त मंदिराच्या जागीच २८ फेब्रुवारी, १९२८ या दिवशी मसुराश्रमाच्या कार्यकर्त्यांनी ८०० बाल स्त्री-पुरुष ख्रिस्ती गावड्यांची त्याच दिवशी नागझर येथे ३५० लोकांची दुसऱ्या दिवशी कालापूर इथे १०० लोकांची शुद्धी करून त्यांना पुन्हा हिंदू केले. या ऐतिहासिक शुद्धी चळवळीत सहा ते सात हजार धर्मांतरितांना स्वधर्मात आणण्यात आले.

 

स्वामी विवेकानंद लो. टिळक, लाला लजपतरायजी, पं. मदन मोहन मालवीय, डॉ. मुंजे, न. चिं. केळकर प्रभृतींचा शुद्धीला पाठिंबा होता. स्वामी श्रद्धानंद तर महान शुद्धी कार्यकर्ते होते. त्यासाठीच त्यांची अब्दुल रशीदने हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जन्मभर शुद्धीकार्यांचा पाठपुरावा, पाठराखण केली. दादर येथे झालेल्या एका शुद्धीकृतांच्या स्वागत समारंभात ते म्हणाले, ‘‘या कार्यासाठी एक जन्म पुरणार नाही. त्यासाठी मला पुन्हा जन्म घेणे आवडेल.रत्नागिरीत स्थानबद्ध असताना,अस्पृश्यतेचं उच्चाटन, हिंदूंना अनेक रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देणं इ. उपायांनी त्यांनी त्या जिल्ह्याचा कायापालटच घडवून आणला. केवळ सर्व जातीच्या मुलांना सरमिसळ बसण्यास लावून त्यांनी असा चमत्कार घडवला की मिशनची शाळा ओस पडली! शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी कु. मिलर या अमेरिकन युवतीची शुद्धी केली. इंदोरच्या संस्थानिकाशी तिचा झालेला विवाह ही त्या काळी गाजलेली घटना. शं. रा. उपाख्य मामाराव दाते यांनी शॉर्ट नामक ब्रिटिश तरुणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हिंदू करून घेतलं. प्रा. पिंटो हेही पुन्हा स्वधर्मात आले. श्री. म. माटे यांनी ख्रिस्ती झालेल्या १०० ब्राह्मण कुटुंबांना स्वधर्मात यावं म्हणून पत्रे लिहिली होती. चित्रावशास्त्री, श्री. शं. नवरे, न. भा. वैद्य, गोपाळराव बदामी हे सुद्धा त्या काळातील काही उल्लेखनीय शुद्धी कार्यकर्ते. संत पांचलेगावकर आणि मसूरकर महाराजांचं शुद्धीकार्य खूप महत्त्वाचं आहे. मसूरकरांचे एक सत्शिष्य ब्र. विश्वनाथजी यांचं शुद्धीच्या क्षेत्रातलं योगदान विशेष महत्त्वाचे आहे. लेखणी, वाणी आणि प्रत्यक्ष कार्य अशी अनेक परिमाणं असणारे! आजही मुंबई-गोरेगावचा मसुराश्रम त्यांचं हे कार्य पुढे चालवित आहे. धर्मभास्करमासिक ते प्रकाशित करते. स्वा. सावरकरांचे कृतिशील अनुयायी (आणि पुतणे) विक्रम सावरकर यांनी १९५३-५४ पासूनच नागपुरात शुद्धिकार्य हे सुद्धा इतर सामाजिक, राजकीय कामांसमवेत केलं.१९६४ मधल्या यूकॅरिस्टिक काँग्रेसआणि पोपभेटी वेळी त्यांनी बाटवाबाटवीला यशस्वी विरोध केला. तसंच १९८६ मध्येही लक्षणीय विरोधी आंदोलन घडवले.

 

१३ डिसेंबर १९५३ या दिवशी स्वा. सावरकरांनी सभेत केेलेल्या भाषणात धर्मांतर हेच राष्ट्रांतरहे सूत्र विवरून सांगितले होते. ते आजही तितकंच महत्त्वाचं ठरतं. ते म्हणाले होते, ‘‘थेट १९२४च्या सिंध प्रांत वेगळा करण्याच्या प्रस्तावापासून मी हे सांगत आलो. त्यावेळी पाकिस्तानची पायाभरणी चालू होती. तुम्ही टाळ्या वाजविल्यात, परंतु मते चुकीच्या ठिकाणी टाकलात त्याचा हा परिणाम. १९३१,१९४१,१९५१च्या शिरगणतीवेळीही आम्ही हिंदूंना सांगत आलो, परंतु संख्याबळाचे महत्त्व हिंदूंनी ओळखले नाही. काँग्रेसने शिरगणती बहिष्कारिली, उलट मुस्लिमांनी स्वतःची नोंद खोटे फुगवलेले आकडे सांगून केली. त्या खोट्या संख्याबळावर पंजाब-बंगाल विभागले गेले. हाच डाव मिशनरी खेळत आहेत.यानंतर संत तनपुरे महाराज, गमाबाई मनमाडकर, गोधडे बुवा याचं शुद्धिकार्य नावाजून त्यांनी अस्पृश्यता निवारण, शुद्धी आणि सैनिकीकरणावाचून पर्याय नाही, हे बजावलं. शेवटी ते म्हणाले, ”जगायचे असेल तर फाजील उदारता सोडा. रामकृष्ण मिशनचा पैसा हिंदूंचा पण त्याचा विनियोग सर्वांसाठी! हे थेट १८८३ पासून चालू आहे. हिंदू धर्म सहिष्णू आहे, हा एकांगी प्रचार थांबवा. तो त्रिगुणांचा समतोल शिकवतो. हिंदुस्थानच्या सैन्यात सर्रास मुसलमान भरतीला त्यांनी विरोध दर्शविला. एक मुसलमान काय करू शकतो? असफअली अमेरिकेत भारताचा राजदूत असताना भारताने विकत घेतलेल्या शस्त्रास्त्रांनी भरलेले एक जहाजचे जहाज त्याने पाकिस्तानकडे पाठवले! माल पाकिस्तानात उतरवला. दोन पिढ्यांपूर्वी हिंदू असणाऱ्या जिनांनी पाकिस्तानमागून भारताचा लचका तोडला, हे लक्षात ठेवा.

 

याच भाषणात त्यांनी मिशनऱ्यांच्या काळ्या कारवाया आणि ढोंगं बाहेर काढली. मोठी खळबळ उडाली. शेवटी पुढे शासनाला न्या. रेगे आणि न्या. नियोगी यांचे आयोग नेमावे लागले. त्यांचे निष्कर्ष ही भारतासाठी भयघंटाच होती. रा. स्व. संघ परिवाराने ईशान्येत आणि अन्यत्र जे विधायक कार्य जागोजागी केले आहे, ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. केरळमध्ये आणि ईशान्येतही प्राणसंकटं झेलून संघकार्यकर्त्यांनी जे कार्य केले आहे, करीत आहेत ते अति प्रशंसनीय आहे. परंतु, फाळणीच्या संहारक रक्तपाती काळामध्ये, डॉ. ना. भा. खरे या सिंहाच्या छातीच्या कर्तृत्वशाली नेत्याने जी देशरक्षणाची महत्त्वपूर्ण कामगिरी केली, तिच्या उल्लेखावाचून मात्र हा तपशील पूर्णत्वाला जात नाही. डॉ. खरे मुळात प्रथमपासून काँग्रेस पक्षाचेच नेते, परंतु त्यांची दृढ देशप्रीती, सत्यवक्तेपणा, स्वतंत्र बुद्धिमत्ता, निर्भयता आणि कर्तृत्व हे सारं रसायन काँग्रेसला न पचणारं! १९४६ मध्ये काँग्रेसचे काही नेते, मुस्लीम लीग नि ब्रिटिश राज्यकर्ते यांच्या एकत्रित कारस्थानामुळे त्यांना व्हॉईसरॉय यांच्या कार्यकारिणीतून त्यागपत्र देऊन बाहेर पडावं लागलं. त्यानंतर अलवर संस्थानाच्या अधिपतीने त्यांना त्यांच्या संस्थानाचे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची विनंती केली अन् १९४७च्या २१ एप्रिलला ते त्या पदावर रुजू झाले. यावेळी फाळणीपूर्वीच १६ ऑगस्ट १९४६ पासून आधी कोलकाता नि मग नौखाली इथे असंख्य हिंदू लिगी गुंडांकडून मारले गेले होते. आता गुरुगाव जिल्ह्यात भयंकर दंगे चालू झाले. मेवो मुस्लिमांनी बंडाचा झेंडा उभारला. डॉ. खरे मुख्यमंत्री असणारे अलवर संस्थान हिंदुस्थानात सामील होणार हे कळताच मेवस्थान स्थापून ते पाकिस्तानात सामील होणार, असा प्रचार करून १९४७चा संपूर्ण ऑगस्ट महिनाभर भरतपूर तिजारा, गुरगांव आणि अलवरच्या सीमेवरची गावं इथे भयंकर शस्त्रांनिशी १० हजार ते २० हजारांच्या जमावानिशी येऊन भयानक अत्याचारांचं थैमान घातलं. तेव्हा रजपूत, जाट, गुज्जर, अहिर आणि वाणी यांनी अलवरच्या सेनेला साहाय्य केलं आणि मेवोंना मर्मांतक तडाखा लगावला. याचं श्रेय होतं डॉ. खरे यांच्या कर्तबगारीला, परंतु या सत्यकथेचं मर्म असं की, त्या पराभूत होऊन मार खाल्लेल्या आणि अलवरमधून पळून जाणाऱ्या ४०-५० सहस्त्र लोकांना आर्य समाजाने लगोलग त्यांच्याच संमतीने शुद्ध करून देशातच राहण्यायोग्य करून घेतलं! मेवो मुस्लिमांनी हल्ले करून छळबळाने मुसलमान करून घेतलेले हजारो हिंदूसुद्धा त्यात होते. त्या अत्यंत आणीबाणीच्या काळात नि परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं, ते निर्भयतेने करणारा हा वीरपुरुष डॉ. ना. भा. खरे आपल्याला वंद्य असला पाहिजे. मेवोंची योजना मुळात दिल्लीवरसुद्धा हल्ला करून नेहरू प्रभृतींना ठार करून राज्य ताब्यात घेण्याची होती! १३ नोव्हेंबर १९४८च्या हिंदू संदेशमधली ही वार्ता पाहा.

 

‘‘यह सभी जानते है की मेवोंने मुस्लीम लीगके संकेतपर मेवस्तान बनानेकी योजनाको पूर्ण करने के लिए अलवर, भरतपूर, गुडगाव, बुलंद शहर, आगरा, मेरठ और देहली तक को आक्रांत करनेका निर्णय ले लिया था। यदि उस समय अलवर और भरतपूर की सरकारे उन्हें न रोकती तो आज क्या परिणाम होता? यह राजनीतिज्ञ भली भाँति समझ सकते हैं। इस प्रकार डॉ. खरेने न केवल अलवर को बचाया, बल्कि केंद्र को भी महाविनाशसे बचाकर उसकी रक्षा की।’’ तेव्हा देवल ऋषींनी चालू करून दिलेल्या त्या शुद्धिकार्याच्या परंपरेला आपल्या कृतीने डॉ. खरे यांनी विसाव्या शतकात पुन्हा झळाळी आणली. स्वामी रामानंद प्रभृति संतांच्या पुण्यकर्माची आठवण करून दिली. आजही असे धर्मधुरंधर आपल्या सुदैवाने देशात कार्यरत असलेले दिसतात. ओडिशात शुद्धिकार्य केलेले स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती, डांग, अंदमान येथे शुद्धीकार्य केलेले स्वामी असीमानंद, नूतन शंकराचार्य नरेंद्र महाराज... साखळी पुढे जात आहे. पूर्ण हिंदुस्थानाने त्यांच्याशी कृतज्ञ असलंच पाहिजे. आजचा काळही आणीबाणीचाच संकटमय असाच आहे. शुद्धिकार्यांची आवश्यकता संपलेली नाही. स्वाभिमानाचे आणि सत्य इतिहासाचे संजीवन घेतल्यानेच योग्य ती कृती घडेल आणि हिंदुस्तान या जगात स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभा राहिल.

 

आधारग्रंथ

 

१) भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने - स्वा. वि. दा. सावरकर

२) सांगता पर्व - आचार्य बाळाराव (शांताराम शिवराम सावरकर) स्वा. सावरकरांच्या चार खंडी चरित्राचा चौथा खंड

३) ख्रिश्चॅनिटी आणि हिंदुस्थान - डॉ. अरविंद गोडबोले

 

- अनुराधा खोत
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@