डांभुर्णीत हजरत पाचपीर शहाबाबाची संदल मिरवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

 
डांभुर्णी ता.यावल : 
येथे दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी भाऊबीजनिमित्ताने सालाबादप्रमाणे गावातील राजपूत यांचे राहत्या घरून संध्याकाळी पाच वाजता हजरत पाचपीर शहाबाबाची संदल मिरवणूक उत्साहात पार पडली. या संदल मिरवणुकीत सात आठ घोडे सहभागी झाले होते.
 
संदल निघण्यामागची आगळीवेगळी आख्यायिका गावातील लोक अजाही सांगतात. जुन्या काळी डांभुर्णी गावात राजपूत लोकांचा रहिवास होता. त्यात एका कुटुुंंबात लग्न करुन सासरी आलेल्या मुलीचा भाऊ नसल्याने भाऊबीजेच्या दिवशी घरात पती-पत्नीमध्ये बोलचाल झाली.
 
महिलेने रात्री भाऊबीज असल्याने पूजेचे ताट बनवून घरातून काढता पाय घेतला. पूजेचे ताट घेऊन गावाबाहेर काही अंतर पार केल्यावर पांढर्‍या घोड्यावर बसून एक व्यक्ती समोरुन येत असल्याचे त्या महिलेला दिसले.
 
मानाच्या भाऊचा शोध घेत असलेल्या महिलेसमोर घोडा येऊन थांबला अन् घोड्यावरील व्यक्तीने विचारले की, ताई एवढ्या रात्री कुठे निघालीस?त्यावर त्या महिलेने उत्तर देत आपली हकिकत सांगितली. घोडेस्वारांनी खाली उतरुन मला तुझा मानाचा भाऊ समज व मला औक्षण कर अशी विनंती केली.
 
भाऊबीजेचे ओवाळणी म्हणून साडी चोळीऐवजी शेतजमीन तिला दिली. ती जमीन आजही पाचपीर बाबाचे चोळीचे जंगल म्हणून नावलौकिक आहे. बहिणीला मानाचा भाऊ मिळाल्यावर तिने त्यांना आपल्या घरी आणले रात्री जेवण दिले.
 
सकाळी ही चर्चा गावभर पसरल्यावर भावाला पाहण्यासाठी गर्दी झाली. मात्र त्यानंतर गावाबाहेर घोडा अदृष्य झाला, तेव्हा तो घोडेस्वार हजरत पाचपीर शहाबाबा असल्याचे कळले.
 
त्या वर्षापासून दर भाऊबीजेला ही संदल राजपूत कुटुंबाकडून काढण्याची प्रथा आजही सुरू आहे. या वेळी हिंदूसमाज बांधवासह मुस्लीम बांधवही सहभागी होतात. संदल गावातून निघून पाचपीर बाबांनी ओवाळणी घातलेल्या चोळीच्या शेतावर जाऊन आजही राजपूत महिला भाऊबीज साजरी करतात.
@@AUTHORINFO_V1@@