राष्ट्रवादाचा जाच का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
राष्ट्रवादावरुन वाद पेटलेला असताना स्वा. सावरकरांचे “आम्ही या राष्ट्राचे नागरिक आहोत आणि या राष्ट्राचे रक्षण करणे आमचे कर्तव्यच आहे,” हे वाक्य महत्त्वाचे ठरते. ज्या त्या देशात राहणाऱ्या नागरिकांना आणि तिथल्या नेतृत्वाला आपल्या देशाचा विचार करण्याचा, त्याचे रक्षण करण्याचा पुरेपूर अधिकार आहे. अमेरिका तेच करत आहे, भारतही तेच करेल, हे नक्की.
 

“मी, माझे आणि माझ्यापुरते असे म्हणणाऱ्या नेत्यांची चलती असल्यामुळे जगातील अनेकानेक देश सहिष्णुतेसारख्या सर्वात महत्त्वाच्या आणि मंगल भावनेस मुकताना दिसतात.” हे विधान आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे. मॅक्रॉन यांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडायला निमित्त ठरले ते, ९० लाख सैनिक आणि ७० लाख सर्वसामान्य नागरिकांचा बळी घेणाऱ्या पहिल्या महायुद्धाच्या शंभरीचे. इंग्लंड, फ्रान्स आणि रशियाच्या विजयाने समाप्त झालेल्या पहिल्या महायुद्धाने जर्मनी, इटलीला पराभूत केले. दुसऱ्या महायुद्धाची बीजेदेखील यातच दडलेली होती आणि शस्त्रास्त्रस्पर्धेचीही. असो. दुसरीकडे मॅक्रॉन एवढेच बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रवादाचा राक्षस पुन्हा एकदा डोके वर काढायची संधी शोधत असल्याचा दावादेखील केला. मॅक्रॉन यांच्या या विधानाचे पडसादही तात्काळ उमटले आणि आपल्याकडच्या मराठी माध्यमांसह सर्वत्रच देशभक्ती व राष्ट्रवादावर चर्चा झडायला सुरुवात झाली. सहिष्णुता, उदारता, मानवता आदी मुद्दे ऐरणीवर आणून राष्ट्राभिमानी, देशाभिमानी लोक जणू काही अवघ्या जगाचे शत्रू असल्याचे चित्र रंगवण्यात आले. मात्र, जागतिक मूल्यांची पोपटपंची करणाऱ्यांनी आता आतापर्यंत अज्ञजनांना फसवण्याचेच उद्योग केल्याचे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. जगातल्या महासत्ता वा विकसित देशांनी औदार्याचा आव आणत विकसनशील देशांना मदतीचा हात देण्याचे नेहमीच भासवले. ‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे,’ ही म्हण सार्थ ठरवत याच देशांनी शस्त्रास्त्रस्पर्धेच्या जोरावर आपापल्या आर्थिक आघाड्या सांभाळल्या. देशादेशांत भांडणे लावून आपल्या देशांतील शस्त्रनिर्मात्या कंपन्यांची चांदी करण्याचे डाव या देशांनी आखले. बड्या राष्ट्रांच्या अतिरेकी स्वार्थीपणापायीच आज जगातल्या बहुतांश देशांत तंटे-बखेडे निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. आज मानवी मूल्यांची महत्ता आपल्यालाच समजल्याच्या थाटात वावरणाऱ्यांनी औषधे, रोगांवरच्या लसी, खते, तंत्रज्ञान आणि अजूनही कितीतरी मुद्द्यांवर ‘या हाताने घ्या, त्या हाताने द्या’, हीच नीती अवलंबली. म्हणजेच ‘मी आणि माझेम्हणणारी हीच राष्ट्रे होती व आता त्याविरोधात बडबडणारीही हीच राष्ट्रे आहेत.

 

मॅक्रॉन यांच्या विधानाचा मुख्य रोख होता तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे (वर उल्लेखलेले मुद्दे अमेरिकेलाही लागू आहेतच). डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्या आल्या ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा दिला. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा विषय असो की, नाटो संघटना आणि इराणशी केलेला अणुकरार मोडीत काढण्याचा विषय असो, डोनाल्ड ट्रम्प यांनी दरवेळी अमेरिकाहिताचा दाखला देत ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’ची हाक दिली. सोबतच ट्रम्प यांनी अमेरिका फक्त अमेरिकनांसाठी आणि स्थलांतरितांचे इथे काय काम, अशा शब्दांत अमेरिकेची कवाडे सर्वांसाठीच खुली नसल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांची ही भूमिका मानवी मूल्यांच्या कथित राखणदारांना निश्चितच पटण्यासारखी नव्हती. पण, ट्रम्प यांना ही भूमिका का घ्यावी लागली, याचा कोणी कधी विचार करण्याचा प्रयत्नच केला नाही. ट्रम्पच नव्हे, तर अगदी फ्रान्समध्येही मरीन ली पेन यांच्यासारखे नेतृत्व उदयाला येण्याची कारणे तपासण्याची तसदीही कोणी घेतली नाही. हंगेरीचेही तसेच. जवळपास अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यापासून व त्याहीआधी तिला घडवले, घडवत आणले ते स्थलांतरितांनी. तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंतच्या आपल्या देशाच्या धोरणाशी विद्रोह केला. डोनाल्ड ट्रम्प आज सत्तेत आहेत, उद्या सत्तेबाहेर जातीलसुद्धा. पण, ट्रम्प यांनी ही भूमिका अंगीकारली आणि त्यांना लोकांनी भरभक्कम पाठिंबा दिला तो, बौद्धिकतेच्या नावाखाली वर्षानुवर्षे चाललेल्या ढोंगामुळेच! प्रत्येक ठिकाणचे, राज्याचे, देशाचे काही प्रश्न, समस्या, अडचणी असतात. अमेरिकेचेही तसेच झाले. आपल्याला भेडसावणाऱ्या कितीतरी प्रश्नांचे मूळ कशात आहे, हे अमेरिकन जनतेला जसजसे कळू लागले, तसतसे याचे उत्तर देणाऱ्याला ते शोधू लागले. पुढे याच प्रश्नावर तोडगा काढण्याची हमी देऊ शकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना तिथल्या जनतेने निवडून दिले. इथूनच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा मक्ता आपणच घेतल्याच्या थाटात वावरणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणांच्या पुनर्मांडणीची भाषा केली जाऊ लागली. जगभरात पोलीसगिरी करण्यापेक्षा स्थानिकांच्या हक्काचे, रोजगाराचे, आरोग्याचे, घरांचे, अस्मितांचे प्रश्न प्राधान्याचे सोडवायला किमान सुरुवात झाली. यालाच बुद्धीवादाच्या फांद्यांवर वाढलेल्या बांडगुळांनी राष्ट्रवादाचे किंवा अतिरेकी राष्ट्रवादाचे लेबल चिकटवत गुन्ह्याच्या श्रेणीत ढकलले. पण, स्वतःच्या देशातल्या नागरिकांच्या इच्छा, आकांक्षांचा विचार करणे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हा गुन्हा कसा होऊ शकतो? यावर कोणीही बोलताना दिसले नाही.

 

गेल्या काही वर्षांत अनेक मुस्लीम राष्ट्रांतील यादवी, दहशतवादी हत्याकांडे आणि बॉम्बस्फोटांनी पोळलेल्या जनतेने युरोपातील देशांमध्ये आश्रय घेतला. पण, पुढे चालून काही मूठभरांच्या ‘ज्या थाळीत खाल्ले, त्याच थाळीला छेद करण्याच्या’ वृत्तीने डोके वर काढले आणि शरणागत आश्रयदात्यांवरच उलटले. जर्मनी, फ्रान्स आदी देशांत आश्रित म्हणून आलेल्यांनी मुली-महिलांवर बलात्काराचे, विनयभंगाचे, छेडछाडीचे सत्र आरंभले. ट्रकखाली लोकांना चिरडून मारणे, फरफटत नेणे, चाकूहल्ला करून दहशत माजवण्याची थेरंही या लोकांनी तिथे केली. शिवाय ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर नागरी स्थलांतर होते, तिथल्या पायाभूत सोयी-सुविधांवर, नैसर्गिक साधनसंपत्तीवर, रोजगाराच्या संधींवरही नेहमीच ताण येतो. परिणामी, आपल्या अस्तित्वालाच स्थलांतरितांमुळे फटका बसण्याची शक्यता वाटू लागल्याने स्थानिकांनी त्याविरोधात आवाज उठवला. मानवी मूल्यांची वकिली करणाऱ्यांनी हे समजून न घेता स्थानिकांच्या मनात अपराधगंड निर्माण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालवले. राष्ट्रवादी, राष्ट्राभिमानी व्यक्तींना, लोकांना, नेतृत्वाला धर्म, वंश, भाषा, वर्णाच्या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यास सुरुवात केली. इथेच यातला मूळ विषय हरवून गेला. दरम्यानच्या काळात तर राष्ट्रवादाची भाषा करणाऱ्यांना युद्धखोर ठरवण्यापर्यंतही मजल मारली गेली. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “आम्ही या राष्ट्राचे नागरिक आहोत आणि या राष्ट्राचे रक्षण करणे आमचे कर्तव्यच आहे,” हे वाक्य महत्त्वाचे ठरते. ज्या त्या देशात राहणाऱ्या नागरिकांना आणि तिथल्या नेतृत्वाला आपल्या देशाचा विचार करण्याचा, त्याचे रक्षण करण्याचा पुरेपूर अधिकार आहे. अमेरिका तेच करत आहे, भारतही तेच करेल, हे नक्की. शिवाय ज्या मूल्यांच्या महतीचे गोडवे गायले जातात, त्यावर आधारित ‘चांगले जग’ कधी अस्तित्वात येण्याची शक्यताही नसते. केवळ शेखचिल्ली स्वप्नांत रमणाऱ्यांच्या कल्पनेतल्या त्या उड्या असतात. जर हे सत्य असते तर ज्यांनी आश्रय दिला, त्यांच्याचविरोधात हात उचलण्याची हिंमत कोणा स्थलांतरिताने कधीही केली नसती. आपल्याकडेही अशा मनोराज्यात भटकणाऱ्या लोकांची अजिबात कमतरता नाही. म्यानमारमधून देशात घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांना हाकलून देण्याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारे महाभाग त्यामुळेच इथे दिसतात. पण, ज्यांच्या गळाभेटीसाठी तुम्ही हात पसरून उभे आहात, त्यांच्यामुळे आपल्या देशात कसला संघर्ष पेटू शकतो, याची या लोकांनी फिकीर बाळगल्याचे कधी दिसले नाही. आसाम, पश्चिम बंगाल आणि सीमावर्ती राज्यात स्थलांतरित विरुद्ध स्थानिकांत वाद का होतोय, याचा विचार या मंडळींनी कधी केला नाही. हा मुद्दा जितका राष्ट्रवादाचा आहे, तितकाच तो स्थानिकांच्या प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचाही आहे. स्थानिक अस्मितेची, अभिमानाची, संस्कृतीची जी काही ओळख असते, ती स्थलांतरितांमुळे उद्ध्वस्त होईल, अशी भावनाही त्यामागे आहे. अमेरिका असो वा अन्यत्र, हाच विचार आहे. त्याला कोणी ‘राष्ट्रवादाचा राक्षस’ म्हणून हीनत्व देऊ इच्छित असले, तरी ते त्याला नाकारू शकत नाही. कारण, जोपर्यंत मानवी अस्तित्व असेल, तोपर्यंत ही राष्ट्रवादाची जाणीव कायम राहणार आहे, तिला ना कोणी रोखू शकते, ना थांबवू शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@